राजकुमारच्या विक्षीप्तपणाबद्दल कोणी काही म्हणो पण तो एक जबरदस्त अभिनेता होता आणि त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स असलेल्या अभिनेत्यांची गणना हिन्दीत तरी फार नसावी. त्यानंतर काहीतरी झाले आणि उतारवयात जानीसाहेब पडद्यापेक्षा मोठे झाले आणि घशातुन जास्तच खरबरीत आवाज निघु लागला. पूढे त्यावर अनेक मिमिक्री आर्टीस्टनी त्यावर टाळ्या मिळवल्या. "आपका मंगलसूत्र कहां है" असे बप्पी लाहीरीला ऐकवणार्या जानीचा येथे विचार नाही. मला भावलेला राजकुमार हा अतिशय संवेदनशील अभिनेता आहे. अगदी उजाला, संघर्ष ते वक्त पर्यंत.
"ये जुल्फ अगर खुलके बिखर जाये तो अच्छा" या गाण्याच्या सर्वप्रथम प्रेमात पडलो ते रफीमुळे. पुढे ते अनेकदा ऐकत असताना त्यातील सुरेख जागा समजु लागल्या. गाणे आणखि आवडु लागले. "जिस तरहा से थोडीसी तेरे साथ कटी है" मधल्या "साथ" शब्दावर रफीने केलेली कमाल एकदम स्पर्शुन गेली. त्यातच साहिरचे शब्द. "वैसे तो तुम्ही ने मुझे बरबाद किया है..इल्जाम किसी और के सर जायें तो अच्छा" आणि त्याचवेळी फ्रेम मध्ये बहुधा आपल्या शराबी नवर्याची वाटा पाहाणारी मीना कुमारी फ्रेममध्ये दाखवली आहे. दिग्दर्शनही लाजवाबच.
सुरुवातीला समोरच नाचणारी मदनिका हेलन येते. कोठ्यावरचा सीन. हेलनचं सौंदर्य त्यावेशात आणखि खुललेलं. पिंगट केस. आणि चेहर्यावर लोभस हसु. ती देखिल या मर्दात गुंतलेली आहे हे जाणवतं. आणि बाजुला राजकुमार. मर्दानी, खानदानी पुरुष. चषक घेऊन बसलेला आहे मात्र रस्त्यावरच्या बेवड्याप्रमाणे मान लटलट हलत नाही की नजर चळत नाही. रफीच्या मखमली स्वरात "ये जुल्फ अगर खुलके बिखर जाये तो अच्छा" सुरु होतं. आणि एक अतिशय संयत अभिनयाचा अविष्कार पाहायला मिळतो.
सारंगीच्या स्वरात हेलनचा चेहरा जाम मध्ये दिसतो. ती तो उचलुन त्याला देत असतानाच हसर्या चेहर्याने राजकुमार त्या लावण्यवतीला आणखि घायाळ करीत सुर आळवु लागतो. "इस रात की तकदिर सवर जाये तो अच्छा" म्हणत तो देखणा नट जाम उंचावतो आणि हेलनचे पाय थिरकु लागतात. गाणे हळुवारपणे पुढे सरकत जाते. प्रेक्षक त्यात गुरफटत जातात. शेवटी समर्पणोत्सुक हेलन गादीवर पहुडली असताना पाय लडखडत असलेला राजकुमार चषकातल्या मदिरेचा वर्षाव तिच्यावर करतो आणि तिच्या दिशेने पुढे सरकतो...
प्रतिक्रिया
19 Jan 2014 - 8:53 pm | Atul Thakur
संघर्ष ऐवजी पैगाम लिहायला हवे होते. क्षमस्व :)
19 Jan 2014 - 8:57 pm | बर्फाळलांडगा
हे विशेष भावले!
21 Jan 2014 - 11:52 am | विजुभाऊ
गाण्याची स्टाईल " तेरी जुल्फो सें जुदाई तो नही मांगी" ....... यासारखी वाटते
24 Jan 2014 - 8:16 pm | पैसा
गाण्याची ओळखही छान करून दिली आहे. आणखी येऊ दे!