झुळुक वादळी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
22 Dec 2013 - 11:36 am

युगे जाहली जळून पण अंगारा अजून दाही
कलेवरे उरली स्वप्नांची डोळा भरून कांही
काजळ वाटा धूळ फ़ुफ़ाटा दिशा व्यापल्या दाही
सुकलेला पाचोळा भिरभिर उडवत वारा वाही

अंध मोहरे काळे गहिरे पोत मानवत नाही
वठलेल्या रेषांचे व्रण अवशेष वाहती भोई
पराधीन मायामय जीवन झुळुक वादळे तीही
ओहटीत कवने वचनांची जगणे लाट सदाही

उलगडणे वाळूसम काठावर लोटांगण घेई
खोल तळातिल दडलेले सागर पृष्ठावर येई
फेस दुधी विरघळे उफाळे फुटे अंगभर लाही
श्वासांचे दळणे आदळणे चिर अंदोलत राही

…………………. अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

वैभवकुमारन's picture

22 Dec 2013 - 1:09 pm | वैभवकुमारन

मस्त !!!

अमेय६३७७'s picture

22 Dec 2013 - 8:02 pm | अमेय६३७७

अप्रतिम कविता. तुमच्या रचनांत एक गूढ, गहन भाव आणि जगण्या वागण्यातल्या व्यामिश्रतेचा एक खोलवर शोध असतो. पण या गूढतेला न बिचकता थोडे धैर्य ठेवुन उलगडा करु पाहणार्‍यास काहीतरी उच्च कोटीचे मिळून जाईल यात शंका नाही.
मला जितकी समजली तितका अपार आनंद मिळाला.

अज्ञातकुल's picture

22 Dec 2013 - 9:10 pm | अज्ञातकुल

एका प्रगल्भ कवीकडून मिळालेला प्रतिसाद एक सन्माननीय शिरपेच समजतो मी. तसा प्रत्येक प्रतिसादकर्ता ही ऊर्जाच असते कुणालाही. परंतु असा अस्वादात्मक, अभ्यासपूर्ण, प्रांजळ सखोल शेरा अंतरंग ढवळून टाकतो कृतज्ञ भावनेनं. आपल्या प्रतिक्रियेच्या शब्दलाघवानं माझी उत्सुकता ताणली गेली आणि आपल्या सर्वच्या सर्व कविता (मिपावरच्या) एका दमात वाचून काढल्या आज आत्ता. आपली विचारसरणी, विषयाची समज, शब्दांची उमज आणि प्रतिभासंपन्न मांडणी ह्या सर्वांनीच मला थक्क व्हायला झालं. कामांमुळे वाचनासाठी निवांत वेळ क्वचित मिळतो पण सुंदर साहित्य वाचायलाही कांही निमित्त व्हावं लागतं तसं आज झालं. आपण केलेल्या कौतुकासोबत माझ्या दृष्टीला एक नवी किनार मिळाली माझ्याच कवितेची नव्याने ओळख झाली. मनापासून धन्यवाद. असाच लोभ असावा. ........... :)