मेरे सामनेवाली खिडकी मे... ३

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
12 Dec 2013 - 2:36 pm

मेरे सामनेवाली खिडकी मे

मेरे सामनेवाली खिडकी मे... २

*********

या संपूर्ण कथेत माझ्या मनाची ब-याचदा द्विधा अवस्था झाल्याचं मला स्वतःलाच लेखन करताना लक्षात येतंय. आता, ओळख झाली, त्यात नंबरही मिळाला. मी समोरच राहतो म्हटल्यावर ती गोड हसली होती. त्यामुळे तिला पाहायची, तिच्याशी बोलायची इच्छा अजुनच बळावत चालली होती. पण त्याचवेळी आता किचनाच्या खिडकीतून तिला बघत बसण्यासाठी मन धजेना. मी आता कमालीचा धास्तावलो होतो. जर त्या रितेशऐवजी तिने मला तिला बघताना पकडलं असतं तर?? तसं तिनं एकदा पकडलंही होतं म्हणा. पण मी सहजच किचनात आलोय पाणी प्यायला, असं दाखवून वेळ मारून नेली होती त्यामुळे तिला शंका आली नसावी. यापुढे जरा सांभाळून, जपून पावलं उचलावी लागतील.

असो. आता नंबर मिळाला होता. तेव्हा कॉल किंवा मेसेज करून तिला भेटायला बोलवू शकत होतो. भेटण्याचं निमित्त सुचत नव्हतं, आणि सुचलं तरी ती भेटायला येईल याची काहीच शाश्वती नव्हती. त्यात सध्या तर तिची परीक्षा चालू होती. या इंजिनिअर लोकांच्या परीक्षा कित्ती वेळ चालतात यार!! मी माझ्या दोन-चार इंजिनिअरिंग करणा-या मित्रांना फोन लाऊन 'कधी संपत्येय तुमची एक्झाम??' असा प्रश्न विचारला. त्यांना शंका आली.

'तू का विचारतोयस?'
'अरे असंच सहज...'
'सहज??'
'हो म्हणजे, ब-याच दिवसांत फुटबॉल खेळलो नाहीये ना!!'
'फुटबॉल, आणि तू??'
(आयला, मला फुटबॉल खेळण्यात विशेष रस नसतो हे यांच्या लक्षात आहे तर)
'हा रे मूड आलाय असाच.'
'एक्झाम झाली की नक्की खेळू. मी सांगतो तुला'
'हो हो ओके.'

च्यायला साधी चौकशी करायला गेलो अन् नसती ब्याद मागे लाऊन घेतली. मला खरं तर फुटबॉल खेळायला आवडतं, पण माझ्या सगळ्या आडदांड आणि तगड्या मित्रांच्या खेळापुढे मी खुजा पडतो. त्यामुळे हे लोक मला एक तर गोलकी ठेवतात नाहीतर सरळ सब्स्टिट्युट म्हणून बाहेर बसवतात. चिल्ल्या पिल्ल्या पोरांबरोबर मला बसावं लागतं. खूपच अपमानास्पद असतं ते. आणि आता तर सोसायटीत ही नवी अप्सरा आलीये. तिने मला पाहिलं तर?? लागले वांदे. उगाच स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. असो. खेळायला बोलावतील तेव्हा कटवू कसंतरी. मरुदे.

एफबी वर मैत्री झाली होतीच. तिच्या प्रत्येक पिकवर कमीत कमी दिडशे-दोनशे लाईक्स असायचे. तेही पोस्ट केल्यानंतर एक-दोन दिवसात!! होतीच तशी ती. चोवीस तास ही मुलगी मला व्हॉट्स अ‍ॅपवर ऑनलाईन दिसायची. खिडकीतून बघतानाच ते लक्षात आलं होतं माझ्या. अभ्यास करताना दर दोन-तीन मिंटांनी सेलफोन चेक करायची. मी गपचूप किचनमध्ये जाऊन खाली वाकून, दबकून ती मला दिसेल, पण तिने पाहिलं तरी मी तिला दिसणार नाही, अशा व्यवस्थेत बसायचो. आणि मग तिला जोक्स, शेरो-शायरी पाठवायचो. माझं नाव पाहिलं की आपसुकच ती मान वळवून माझ्या खिडकीच्या दिशेला एक लूक द्यायची. मी तयारीत असायचोच. लगेच खाली वाकायचो(काय भरोस दिसलो चुकून तर??). थोड्या वेळाने पुन्हा डोकं वर काढायचो. मग ते वाचताना मी तिची रिअ‍ॅक्षन टिपायचो. कधी कधी ती खूप हसायची, कधी कधी चेह-यावर एक स्माईल यायचा, तर कधी कधी तोंड वाकडं व्हायचं(विनोद आवडला नसावा), पण तिची खरी रिअ‍ॅक्षन काहीही असो, ती नेहमी माझ्या जोक्स ना उत्तर द्यायची - हसता हसता डोळ्यांतून पाणी येणारा स्माईली. तिला 'हेय... वॉस्सप??' असा मेसेज पाठवायची जुर्रत मी कधीच केली नाही. पण तिच्याशी गप्पा मारायची खूप इच्छा व्हायची. त्यात ती सतत ऑनलाईन दिसल्याने मोह आवरायचा नाही. म्हणून मग वेळेला साजेसा असा एखादा फॉरवर्ड मेसेज द्यायचो पाठवून. तिचा स्माईली यायचा. मग काहीतरी विषय काढून बोलायला सुरुवात. मग मध्येच, 'तू अभ्यास करत्येस का? मी डिस्टर्ब नाही ना करत आहे?' असा उगाच आगाऊपणा. त्यावर ती नेहमी, 'हो अरे अभ्यासच करत्येय. पण बोल तू नो प्रॉब्लेम!' असं उत्तर. कित्ती गोड. एकदा असाच आगाऊपणा केला -

'ए तू अभ्यास करत नाहीयेस ना?'
'मघाशी पाहिलं नाहीस खिडकीतून??'
मी गप्प. काय उत्तर देऊ तेच कळेना. शेवटी लिहीलं,
'मी म्हणजे काय रितेश वाटलो का तुला??'
'[स्माईली] अरे तसं नव्हतं म्हणायचं मला... मघाशी आला होतास ना तू किचनमध्ये? चमच्याने काहीतरी खाल्लंस बघ.'
'एक मिनिट. म्हणजे तू माझ्यावर लक्ष ठेऊन असतेस तर?? [चिडवणारी स्माईली]'
'[मला अजिबात न आवडणारी वाकडं तोंड करणारी स्माईली] मी कशाला लक्ष ठेऊ तुझ्यावर? मी वाटले का तुला रितेशसारखी?'
'अगं गम्मत करतोय गं. एवढं मनाला काय लाऊन घेतेस चिल...'
'ह्म्म्म... चल आता मी अभ्यास करते. परवा पेपर आहे. गुड नाईट.'
'गुड नाईट ऑल द बेस्ट स्टडी वेल'
'थँक्यु [पप्पी देणारी स्माईली]'

खरं तर त्या शेवटच्या स्माईलीमुळे मी जाम खुश झालो होतो, पण माझ्या लगेच लक्षात आलं की यात हुरळून जाण्यासारखं काही नाही. या पप्पीत आणि ख-या पप्पीत जमीन-आसमानाचा फरक असतो. खरा मुका, जो ओठांवर किंवा गालावर दिला, तर त्यामुळे हुरळून जायला नक्कीच हरकत नाही. पण ही व्हॉट्स अ‍ॅपवरची पप्पी म्हणजे, माशासाठी टाकलेला हूक असतो, ज्याकडे आकृष्ट होऊन आपण एकदा का गळाला लागलो, की तो फेकणारीकडे आपण ओढले जातो आणि मग आपल्याकडे तडफडण्याखेरीज दुसरा काहीही पर्याय उरत नाही. तेव्हा मी स्वतःचा कुठलाही गैरसमज करून घेतला नाही.

पण अलिकडे मला भलतीच धास्ती वाटायला लागली होती. ही मुलगी एवढी सुरेख देखणी. त्यात राहण्याची पद्धतही स्टायलीश. बरं असं असूनही 'अ‍ॅटिट्यूड' हा जो एक सर्वसाधारण सुंदर वाटणा-या मुलींमध्ये त्यांच्या सौंदर्याबरोबर फ्री मध्ये दिसून येणारा घटक असतो तो हिच्यात हिच्या सौंदर्याच्या तुलनेत तसा बेताचाच. म्हणजे हिच्या गळाला लागलेले आपल्यासारखे अनेक असतील. आणि त्यातल्या कुणाच्या जाळ्यात ही तर अडकली नसेल? किंवा अडकत नसेल? शक्यता खूप आहे. एक तर ऑनलाईन असते सतत. त्यात एवढी सुंदर मुलगी आपल्या समोर राहायला आली हे जरी चांगलं असलं, तरी ती सिंगल असण्याएवढं आपलं भाग्य थोर नक्कीच नसणार. सगळंच आयतं, हवं तसं, कसं काय मिळेल? तिचा साजन कोण आहे हे शोधावं लागणार!! त्याच्यातला पसेसिव्हनेस बाहेर काढावा लागणार. मग दोघांत भांडणं लावावी लागणार. लागलेली भांडणं विकोपाला नेऊन ब्रेक अप करवावा लागणार. ब्रेक-अप-पूर्व आणि ब्रेक-अप-नंतर तिला मन मोकळं करायला फक्त मी, आणि डोकं टेकवून मनसोक्त रडायला फक्त माझाच खांदा दिसेल अशी व्यवस्था करावी लागणार. हे सगळं व्हायचं कसं??? सोपं काम नाही ते. सुरुवात हीचा साजन कोण हे शोधण्यापासून. मुली सहसा नव्या ओळखीच्या लोकांना 'मी सिंगल आहे, मला बीएफ मध्ये काही इंटरेस्ट नाही' असं सांगतात. मुलाकडून भाव मिळणं थांबू नये, यासाठी मारलेली ही एक तद्दन खोटी थाप असते. आणि हे सगळ्या मुलांना माहित असतं. त्यामुळे मुलीने ती सिंगल असल्याचं सांगितलं काय, किंवा तिला बॉयफ्रेंड असल्याचं कबूल केलं काय, मुलाच्या तिच्याविषयीच्या भावना, तिच्याविषयीची ओढ कमी होत नाही. कारण सगळ्या मुलांच्या मनामध्ये एक गोष्ट पक्की बिंबवली गेलेली असते - 'जब तक लडकी कवारी... ना तुम्हारी... ना हमारी...' त्यामुळे इन्सिक्युरिटी हा प्रकार सदैव मुलांमध्ये असतो आणि असतोच. जाऊ दे. अवांतर पुरे. अजुन मैत्रीसुद्धा झाली नाहीये धड. नुसती ओळख झाली तर लगेच हवेत मनोरे बांधायला सुरुवात नको.

मैत्री वाढवायची संधी शेवटी एकदाची मिळाली. तिची परीक्षा नुकतीच संपली होती. टीव्हीवर पुरब कोहली आणि दिपीकाला एका कॉफीच्या अ‍ॅड मध्ये बॅडमिंटन वरून ओळख वाढवताना पाहिलं. लगेच व्हॉट्स अ‍ॅप केला -

'हेय'
'hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii'
'तुला बॅडमिंटन खेळायला आवडतं?'
'येस्स्स्स!!![स्माईली]'
'आज खेळुया??'
'ओक्के!![स्माईली]'
'ओके मग ४.३० वाजता?'
'अम्म... ४.३० नको. खूप ऊन असतं रे. ५.३० वाजता??'
'डन. ५.३० वाजता. सी या'
'यप'

साडे पाच वाजता भेटलो. ती डीप नेकवाला पिवळा टी-शर्ट आणि अर्धी चड्डी घालून आली होती. केस बांधलेले. सोसायटीत बॅडमिंटन कोर्ट आहे, सोसायटीच्या ऑफिसमध्ये नेट सुद्धा आहे. मी ते जाऊन घेऊन आलो.

'ए मला अगदी प्रॉपर रुल्स-बिल्स वरुन खेळता येत नाही हां. आम्ही जुन्या कॉलनीत डाँकी-डाँकी नाहीतर कट-आऊट खेळायचो.'

मग मी तिला सगळे रुल्स समजावले. आधी वॉर्म अपसाठी थोडा वेळ असेच खेळलो. ती अगदीच सुमार खेळत होती. सर्विस सुद्धा टेनिस मध्ये करतात तशी करत होती. एकदा शटल-कॉक खाली पडलं, तर ते ती उचलायला गेली. आणि माझं खेळावरून लक्ष उडालं. तो टी-शर्ट डीप नेक का असतो ते मला कळलं. मी मुद्दामून स्मॅशवर स्मॅश मारायला लागलो आणि तिला कॉक उचलायला लावायला लागलो. मी स्मॅश मारायला गेलो की ती डोळे मिटून घ्यायची. नंतर ती कंटाळली. वैतागली. एकदा कॉक पडल्यावर ती तशीच उभी राहिली. मी सुद्धा ती केव्हा वाकते(कॉक उचलायला) त्याची वाट बघत उभा राहिलो. ती माझ्याकडे रोखून बघत होती.

'उचल अगं {शांतता. ती तशीच उभी} काय झालं?'
'{दीर्घ श्वास.} अजुन पुन्हा एकदा तू स्मॅश मारलास, तर मी सरळ घरी जाईन.'

आयचा घो. तिला कळलं की काय!!! जाऊदे बाबा. मी सॉरी सॉरी म्हटलं. बॅडमिंटन खेळताना मी खूप उत्तेजित होतो, मग स्मॅशेस मारत सुटतो, असं म्हटलं.

'नाही ते पाहिलं मी तू किती आणि कसा उत्तेजित होतोस ते'

बापरे. मेलो. मी ओशाळलो. पुन्हा सॉरी म्हटलं. मग गपचूप तिला मारता येतील असे शॉट्स मारत खेळलो. बराच वेळ तिच्या चेह-यावरचं हसू गायब होतं. मला राहवेना. मी मुद्दामून तिने उडवलेलं शटल कॉक माझ्या डोक्यावर येऊन पडेल असा उभा राहिलो आणि रॅकेटची अंदाधुंद अ‍ॅक्षन केली. कॉक डोक्यावरून बाऊन्स होऊन खाली पडलं, आणि मॅडम हसायला लागल्या. मी मनातल्या मनात हुश्श... केलं. मग वातावरणातला तणाव पूर्णपणे निवळला आणि आम्ही कंटाळा येईपर्यंत मनसोक्त हसत हसत खेळलो.

खेळून झाल्यावर जवळच्या बाकड्यावर आम्ही बसलो होतो. बराच वेळ इथल्या तिथल्या गप्पा झाल्या. तिने अर्थात ती सिंगल आहे, सगळे मुलगे हरामी असतात, असं अपेक्षित उत्तर दिलं. मी सुद्धा 'तुझ्यासारख्या मुलींना माझा हरामीपणा माहित असतो म्हणून नाईलाजास्तव मला सिंगल राहावं लागतंय' असं सांगून तिला हसवलं... (आणि 'तुझ्यासारख्या' वर जोर देऊन एक हिंटसुद्धा टाकून दिली.)

थोड्यावेळाने तिला घरून फोन आला. 'येते येते' असं म्हणून ती निघाली.

'तू येतोस घरी?'
'मी? आत्ता? नको गं'
'चलं ना... मम्मी डोसे करत्येय. तू मम्मीच्या हातचे डोसे खाऊन बघ एकदा'
'अगं पण माझा अवतार बघ. घामटलोय मी चिकट झालोय.'
'मी सुद्धा झाल्येय त्यात काय.'
'तुझं ठीक आहे ते तुझंच घर आहे'
'चल रे नाटकं नको करूस चल आता'

तिने माझा हात धरला आणि मला ओढायला लागली. मग काय, मी गेलो तिच्या घरी. तिचा बंगला मस्तच होता. सगळी सजावट नव्याने झालेली होती त्यामुळे ते घर अजुनच छान दिसत होतं. तिने तिच्या आईशी माझी ओळख करून दिली. वडील बाहेर गेले असावेत. घरात दिसले नाहीत. आई सुद्धा बोलायला छान होती. तिच्याकडे बघून ही बाई स्मार्ट आहे हे कळत होतं(तिच्या तथाकथित मॉड वावरामुळे नाही). तिच्या आईने मला नजरेनेच जोखून घेतलं असणार. जाऊदे ना. आई-वडील नंतर. आधी मुलगी तर पटू दे. हॉलमध्ये तिच्या आईची आवडती टीव्ही-मालिका चालू होती. किचनमधल्या सर्व्हिंग विंडोतून ती डोकवून बघत होती. मुलगी हात-पाय धुवून कपडे बदलून, अर्धार्धोरुकधारण करून(काय शब्द दिलायत ज्ञानोबा!! व्वा!!) आली. मला तिने तिच्या खोलीत बसायला बोलावलं. मी गेलो. तिने मला बसायला एक खुर्ची दिली आणि स्वतः 'आलेच' असं म्हणून निघून गेली. खोली छान टापटीप होती. बेडवर बरेच टेडी बेअर्स पडलेले होते. स्टडी टेबलवर सगळी पुस्तकं-वह्या-जर्नल्स नीट लावलेली होती. त्यावर ठेवलेल्या पीसीवर कोणा हॉलिवूडच्या पॉप-सिंगरचा वॉलपेपर होता. टेबलावरच्या कपाटावर काही कागद चिकटवून अत्यंत घाणेरड्या अक्षरात काही फॉर्म्युले का काहीतरी लिहिलेले होते. मी खिडकीबाहेर नजर टाकली. मला सरळ माझं किचन आणि त्यात काम करणारी आई दिसत होती. तिचा चेहराही स्पष्ट दिसत होता. आईला बघून मी घाबरलो. कॉटवर जाऊन बसलो. तिथून मी आईला दिसलो नसतो. थोड्या वेळानं ती आली. हातात दोन ताटं होती. डोसे होते.
'हे घे'
'अगं कशाला'
'घे आता नाटकं करू नकोस'
मी ताट घेतलं आणि डोसे खायला लागलो. डोसे छान झाले होते.
'सॉरी मी इथे येऊन बसलो. अ‍ॅक्च्युअली किचनमध्ये माझी आई उभी आहे. तिनं मला इथे पाहिलं तर माहित नाही काय म्हणेल'
'तुझ्या आईला आवडत नाही तू मुलींशी बोल्लेलं?'
'चल चल... असं काही नाही. पण तरी...'
'ह्म्म...'
'तू पडदा का नाही लाऊन ठेवत?'
'मी तर खिडक्या सुद्धा उघड्या ठेवते रे. खूप उकडतं. पंख्याचा वारा पुरत नाही. एसी लाऊन घ्या म्हणते तर पप्पा नाही म्हणतात. ही इज वेरी इकोफ्रेंडली टाईप ऑफ गाय यु नो... माय पॉप्स!!'
'ओह... पण तरी अगं.. निदान पडदे तरी लाऊन घेत जा.. आत चल या खिडकीचं ठीक आहे... माझंच घर आहे. पण रितेशचं काय?'
'त्याचं काय?'
'अगं तो-' मग माझ्या लक्षात आलं, की तिच्या खोलीत एकच खिडकी होती. आणि तिथून रितेशची खिडकी दिसत नव्हती. फक्त माझीच खिडकी दिसत होती अगदी समोर.

'तू अभ्यास करत असताना रितेश तुला बघतो ना?'
'हो ना... चोरून चोरून बघतो.'
'पण तू तर इथेच बसतेस ना अभ्यास करायला?'
'हो!!'
'मग तो कसा काय आणि कुठुन बघतो तुला?'
'ह्म्म... प्रश्नच आहे नाही??' असं म्हणून तिनं माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं, एक भुवयी उडवली, आणि स्माईल दिली. मी गार झालो. माझे डोळे मोठे झाले. डोश्याचा घास तोंडातच पडून राहिला. आणि एवढा वेळ खेळून फुटला नसेल तेवढा घाम मला आता फुटायला लागला.

'म्हणजे... तुला...' मला पुढे बोलवेचना.. तिने माझ्याकडे बघून हसत हसत पापण्या अलगद मिचकावल्या.
'मला माहित होतं तू त्या दुकानात काम करत नाहीस ते'
आणि असं म्हणून माझ्यासाठी अजुन एक गरमागरम डोसा आणायला निघून गेली.

(समाप्त.)

कथामौजमजा

प्रतिक्रिया

पियुशा's picture

12 Dec 2013 - 3:44 pm | पियुशा

पु.भा. प्र. :)

प्यारे१'s picture

12 Dec 2013 - 4:05 pm | प्यारे१

>>>(समाप्त.)

योग्य वेळेत संपवली कथा.
मुलगी 'हुशार' आहे. (वाढीव म्हटल्यावर प्रश्ण येतात हल्ली ;) )

कपिलमुनी's picture

12 Dec 2013 - 6:39 pm | कपिलमुनी

ख्खिक ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2013 - 3:52 pm | बिपिन कार्यकर्ते

दंडवत!! अजून लिहित जा! :)

युगन्धरा@मिसलपाव's picture

12 Dec 2013 - 4:06 pm | युगन्धरा@मिसलपाव

खुप छान रंगवलं आहे. रंगवलं याचा शब्दशः अर्थ घेउ नये.

सूड's picture

12 Dec 2013 - 4:13 pm | सूड

मस्तच !!

कवितानागेश's picture

12 Dec 2013 - 4:13 pm | कवितानागेश

हीहीही! :)

अनिरुद्ध प's picture

12 Dec 2013 - 5:06 pm | अनिरुद्ध प

+१

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Dec 2013 - 4:13 pm | लॉरी टांगटूंगकर

अजून लिहीत रहा. कमाल जमतंय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Dec 2013 - 5:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

रंगली होती गोष्ट्..पण एक्झिटसुद्धा आवडली.

प्रभाकर पेठकर's picture

12 Dec 2013 - 6:31 pm | प्रभाकर पेठकर

पण त्याचवेळी आता किचनाच्या खिडकीतून तिला बघत बसण्यासाठी मन धजेना. मी आता कमालीचा धास्तावलो होतो. जर त्या रितेशऐवजी तिने मला तिला बघताना पकडलं असतं तर?

वडापावजी, लोहा गरम है जभी हातोडा मारो। (वाक्याचा भावार्थ घ्यावा, शब्दार्थ नाही). मुलीला पटवायला सशाचं काळीज नाही, सिंव्हाचं धाडस लागतं.

ओळख झाली, त्यात नंबरही मिळाला. मी समोरच राहतो म्हटल्यावर ती गोड हसली होती.

इथेच तिने तुम्हाला 'गो अहेड' संकेत दिला आहे. धाडस दाखवायलाच हवे होते. दरवेळी घाबरून मागे राहाल आणि तिच पुढाकार घेईल अशी अपेक्षा बाळगाल तर संपलंच सगळं. आई-वडील निवडतील त्या मुलीशी लग्न करून 'मोकळे' व्हा.

तिचा साजन कोण आहे हे शोधावं लागणार!! त्याच्यातला पसेसिव्हनेस बाहेर काढावा लागणार. मग दोघांत भांडणं लावावी लागणार. लागलेली भांडणं विकोपाला नेऊन ब्रेक अप करवावा लागणार. ब्रेक-अप-पूर्व आणि ब्रेक-अप-नंतर तिला मन मोकळं करायला फक्त मी, आणि डोकं टेकवून मनसोक्त रडायला फक्त माझाच खांदा दिसेल अशी व्यवस्था करावी लागणार.

नाही हो. खर्‍याखुर्‍या प्रेमाची लक्षणं नाहीत ही. ह्यात निव्वळ स्वार्थ दडलेला आहे. खर्‍या प्रेमात त्याग असतो. (आमच्या काळी तरी असायचा). आशा सोडायची नाही. पण 'त्याच्या'पेक्षा तुम्हीच किती लायक आहात हे पटविण्याचा प्रयत्न करायचा असतो. ती स्वतःहून, मनपरिवर्तन होऊन, तुमच्याकडे आली पाहीजे. तुटक्या हृदयाने तुमच्याकडे येईल आणि तुम्ही पारिस्थितीचा, सांत्वनाद्वारे, फायदा घ्याल हा चुकीचा मार्ग आहे.

मी तयारीत असायचोच. लगेच खाली वाकायचो(काय भरोस दिसलो चुकून तर??).

घोडचुक. तुमचा नंबर तिला माहीत आहे. ती अपेक्षेने तुमच्या खिडकीकडे (पर्यायाने तुम्हाला शोधत) पाहते आहे हीच वेळ होती सुहास्यवदनाने खिडकीत उभे राहून हात करण्याची. काय हे...काय हे...

एकदा शटल-कॉक खाली पडलं, तर ते ती उचलायला गेली. आणि माझं खेळावरून लक्ष उडालं. तो टी-शर्ट डीप नेक का असतो ते मला कळलं.

च्यायला! फार उशीरा कळलं म्हणा की.

मी स्मॅश मारायला गेलो की ती डोळे मिटून घ्यायची. नंतर ती कंटाळली. वैतागली.

वैतागणारच. तुम्हाला मुलीला जिंकायचं होतं की बॅडमिन्टनचा गेम? काय राव, तुमचं उद्दीष्टच स्पष्ट नाहीए. तुम्ही खेळ हरायला पाहिजे होतं कदाचित मुलीला जिंकलं असतंत.

टीव्हीवर पुरब कोहली आणि दिपीकाला एका कॉफीच्या अ‍ॅड मध्ये बॅडमिंटन वरून ओळख वाढवताना पाहिलं.

अरेरे! तुमची केस पार हाताबाहेर गेली आहे. कांही ओरिजिनल आयडियाज नाहीत का?

असं म्हणून माझ्यासाठी अजुन एक गरमागरम डोसा आणायला निघून गेली.

घ्याSSSSS! म्हणजे तुम्हाला डोसा खाऊ घालून तुमचा 'वडा' केला तर!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Dec 2013 - 9:22 am | ज्ञानोबाचे पैजार

पेठकरकाकांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत.

अनिरुद्ध प's picture

13 Dec 2013 - 4:07 pm | अनिरुद्ध प

+१ पूर्णपणे सहमत

पेस्तन काका's picture

18 Dec 2013 - 4:23 pm | पेस्तन काका

जय हो पेठकर काका :-)

बाबा पाटील's picture

12 Dec 2013 - 6:46 pm | बाबा पाटील

वड्यापावा शिक बाबा काही तरी....

विशाल चंदाले's picture

12 Dec 2013 - 6:58 pm | विशाल चंदाले

'थँक्यु [पप्पी देणारी स्माईली]' --> मज्ज्या आहे एका माणसाची.
'जब तक लडकी कवारी... ना तुम्हारी... ना हमारी...' --> *lol* *lol*

शिद's picture

12 Dec 2013 - 7:43 pm | शिद

जबरदस्त वाक्य...

'अ‍ॅटिट्यूड' हा जो एक सर्वसाधारण सुंदर वाटणा-या मुलींमध्ये त्यांच्या सौंदर्याबरोबर फ्री मध्ये दिसून येणारा घटक असतो

बाकी लेख मस्तचं... :)

निमिष ध.'s picture

12 Dec 2013 - 9:03 pm | निमिष ध.

एकदम बरोबर वेळी सम्पवली!! शेवट आवडला !!

साती's picture

12 Dec 2013 - 9:35 pm | साती

मस्तं!

बॅटमॅन's picture

13 Dec 2013 - 1:39 am | बॅटमॅन

मस्त!!!!!!!!!!!

(किशोरवय वैचारिक हर्मिटेजात घालवलेला) बॅटमॅन.

खटपट्या's picture

13 Dec 2013 - 4:33 am | खटपट्या

संपायला नको होते…

विजुभाऊ's picture

13 Dec 2013 - 1:27 pm | विजुभाऊ

मस्त लिहीले आहे. स्नेहलता दसनुरकरांची अशीच खासीयत होती लिहायची.

संजय क्षीरसागर's picture

16 Dec 2013 - 10:55 am | संजय क्षीरसागर

आणि मस्तच जमवली आहेस कथा. असाच लिहीत राहा.

निरु's picture

16 Dec 2013 - 11:42 am | निरु

जमलिये कथा. छान रंगवलिये पण. :)

प्रशांत क्षीरसागर's picture

17 Dec 2013 - 7:09 pm | प्रशांत क्षीरसागर

खूपच छान आहे … पुढील भाग कधी प्रकाशित करणार आहात???

पैसा's picture

17 Dec 2013 - 7:25 pm | पैसा

मस्त जमलीय कथा!!

भावना कल्लोळ's picture

17 Dec 2013 - 8:00 pm | भावना कल्लोळ

+१

चाणक्य's picture

18 Dec 2013 - 7:35 pm | चाणक्य

मजा आली वाचताना. प्रतिसाद द्यायला जरा उशीर झाला

आदूबाळ's picture

19 Dec 2013 - 1:00 pm | आदूबाळ

हे काय? समाप्त कस्काय?