घरची मैफल !!
मैफल झाली गंधर्वांची
अहा काय ते गाणे झाले
सूर अजूनही संगीताचे
कानी माझ्या भरून राहीले
रात्रीच्या त्या दुसऱ्या प्रहरी
असा कसा मी असतो गाफील
कसे पामरा ठाव असावे
सुरू व्हायची घरची मैफल
खिसा रिकामा, किल्ली विसरलो
आठवतो कालचाच तंटा
अन दारावरती वाजवतो मी
मैफलीची ही तिसरी घंटा
जरा कुठे मज झोप लागली
वेंधळ्याची ही जात कशी
दारामागून शिव्या देऊनी
सुरवातीची नांदी अशी
संताप राग हा तार सप्तकी
ताल तिखट अतिद्रुत ती लय
पाहुनिया आवेश हिचा मज
वाटू लागे भलते भय
संथ आलापी रुसव्याची ती
नंतर ताना कडकड कडकड
दमदाटीचे घेऊन तीय्ये
बोलतानी तर अशक्य बडबड
रौद्र भयाची रसउत्पत्ती
शापांच्या कित्येक शृंखला
समेवरी फुलपात्र आपटुनी
बडा ख्याल हा पहा संपला
चीजा बंदिश छोट्यांचीही
मैफलीत कधी कमी नसे
चुका सर्वही ध्यानी ठेवण्या
दैवी हिला वरदान असे
निवळल्यावारी राग जरासा
गालही थोडे उगा लाजती
कपाटातुनी देता सदरा
नाट्यगीताचे सूर वाजती
किंचित पडका चेहरा माझा
पाहून ओढी चादर हिरवी
कुशीत घेऊन थोपटणारी
हवीहवीशी हीच भैरवी ..
प्रतिक्रिया
11 Dec 2013 - 3:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
वृत्तात कुठे कुठे कविता अंमळ गंडली आहे..पण आशयाच्या दृष्टीने आवडली.
11 Dec 2013 - 3:51 pm | अभ्या..
अशा कविता लिहायचा काळ सुध्दा अम्मळ गंडलाय :-(