जॉनी मॅड डॉग
आफ्रिकेतल्या एका देशात यादवी छेडली गेली आहे. एका गावावर हल्ला होतो आहे. हल्ला करणारे सैनिक हे अगदी १२ ते १५ वर्षांचे दिसताहेत. त्यांचा एक कमांडर मोठा दिसतो आहे. प्रत्येक घरातले सगळे लोक शिव्या घालून बंदुकीच्या जोरावर तुडवून बाहेर काढले जातात. गावाच्या चौकात एकत्र केले जातात. काही लोक दयेची याचना करत असतात. जे जास्त बोलतात ते लक्ष वेधून घेतात. एका क्षणात निवाडा होतो - गोळ्या अगदी सहजतेने चालतात. अशी चौकशी आणि निवाडा चाललेला असतानाच एका लहान दहा वर्षाच्या मुलाला पुढे आणले जाते. त्याचा बाप म्हणतो त्याला सोडा यात मुले कशाला? सैनिकातला एक जण विचारतो तुझा कोण तो? उत्तर येते 'मुलगा'. त्याची आई पण रडत प्राणांची याचना करू लागते. सैनिक आता चेकाळलेले असतात. त्या मुलाच्याच हातात एक बंदुक देण्यात येते. बापानी मुलाच्या दयेची भीक मागितली म्हणून मुलानेच बापाला गोळ्या घालायच्या असा आदेश निघतो.
मुलगा ते करू शकत नाही. कुणीतरी त्याचे ट्रिगरवरचे बोट दाबते. एक क्षण ती ए के ४७ थडथडते. एका स्त्रीच्या रडण्याचा करूण आवाज आणि जल्लोष असे दोन्ही ऐकू येऊ लागते. मुलाला आपण काय केले हे लक्ष्यात येण्याच्या आत सैनिकांत सामील करून घेतले जाते.
या बंडखोर टोळक्याचा म्होरक्या असतो एक जेमतेम चौदा पंधरा वर्षांचा थंड डोळ्यांचा मुलगा - जॉनी मॅड डॉग. कोणतेही शालेय शिक्षण नसलेला पण स्वतःला हुषार मानणारा.बंडखोर बाल सैनिकांची ही तुकडी पुढे निघते. आता प्रमुख शहरावर बंडखोर चालून जायला निघतात. आधीच्या लुटीतून एकाने नवरीचा पांढरा पोषाख लुटलेला असतो त्याने आता तो परिधान केलेला असतो. एका सैनिकाने एका लहान मुलीचा फ्रॉक घातलाय. कुणी कान टोपी घातलीय. एकाने तर परीचे पंख घातले आहेत. जॉनीच्या कानात कुड्या, गळ्यात क्रॉस आणि विवीध माळा आहेत. आहेत. एकाने एक हेल्मेट घातले आहे. या विनोदी दिसणार्या तुकडीच्या हातात मात्र अतिशय घातक आणि विध्वंसक अशी शस्त्रे आहेत.
याच शहरात लाओकोले ही साधारण सोळा वर्षांची मुलगी आपले वडील आणि लहान भाऊ फोफो सोबत रहात असते. लाओकोले शाळेच्या परीक्षेचा अभ्यास करत असते. बंडखोर आता शहरावर हल्ला करणार आहेत हे ती रेडियोच्या बातम्यांमध्ये ऐकत असते. राष्ट्राध्यक्षांनी युनायटेड नेशन्सची मदत मागितल्याचे ही ऐकू येते.एका ठिकाणी या गटाची गाठ अजून एका सशस्त्र तुकडीशी गाठ पडते. प्रश्नांच्या फैरी झडतात. मोठ्याने ओरडून उत्तरे दिली जातात. ओळख पटते. हे ही आपलेच! ताकद वाढते, तसा उन्मादही वाढतो.निसर्गरम्य जंगलातून चालत ही तुकडी एका ठिकाणी पोहोचते. आता शहरात जायचे आणि टिव्ही स्टेशन ताब्यात घ्यायचे आहे असा आदेश निघतो जॉनी ज्याला जनरल संबोधतो तो हा आदेश देतो.
रात्रीचे सेलेब्रेशन आणि झोप घेऊन तुकडी ताजीतवानी होते. आता मुख्य शहरावर हल्ला! एक जोरदार स्फोट घडवून शहरावर हल्ला होतो. अडवायला कुणी नसतेच. तरीही अंदाधुंद गोळ्या चालवत आक्रमण होते. जे काही विरोधी सैनिक असतात त्यांची प्रेते रस्त्यावर पडलेली दिसतात.एका लहान बाल सैनिकाला हे सहन होत नाही. तो हातात बंदूक घेऊन उलट पळत सुटतो. तुकडीच्या मागे जनरल असतो. त्याचे काहीही म्हणणे ऐकून न घेता तो म्हणतो 'मर' आणि गोळ्या घालतो. त्याची बंदूक जीवापेक्षा जास्त मूल्यवान - ती उचलून घेतो!
गोळ्या आणि स्फोटाचे आवाज ऐकू येतात तशी लाओकोले अस्वस्थ होते. तिच्या वडिलांना सांगते तिला परिस्थिती योग्य वाटत नाही. तिच्या वडिलांनी आपले दोन्ही पाय या आधीच्या नुकत्याच झालेल्या सशस्त्र लढ्यात गमावलेले असतात. किडुकमिडूक घेऊन लाओकोले वडिलांना सांगते की चला आपल्याला शहर सोडले पाहिजे. आपला लहान भाऊ फोफो त्याला झोपेतून उठवून तयार करते. वडिलांना चला म्हणते. दोन्ही पाय नसलेले वडील परिस्थिती लक्षात घेऊन म्हणतात की. तू जा! मी येणार नाही. लाओकोले त्याला तयार होत नाही. पण वडील लाओकोले ला बाहेर घालवून दार लावून घेतात.
निर्वासितांच्या लोंढ्यात लाओकोले आणि तिचा भाऊ सामील होतात. या शहरात कुठे जायचे याची काहीच दिशा नाही.इकडे या अतिरेकी पिशाच्चांसारख्या फिरणार्या सैनिकांच्या तुकडीला एक गाडी दिसते. गाडीत एक साधे मध्यमवयीन जोडपे असते. ते हात वर करतात. पण काहीही चौकशी न करता गाडीतल्या लोकांना गोळ्या घालून ती प्रेते फेकून देतात.
आता गाडी मिळाल्यावर वेग वाढतो. घोषणा देत गाडी शहराच्या निर्जन रस्त्यावरून फिरू लागते. अचानक एक माणूस डुक्कर घेऊन जाताना दिसतो. त्याला लुटेरा ठरवून त्याचे डुक्कर लुटून घेतले जाते. लाओकोले लोंढ्यात चालते आहे. एक मोठा स्फोट होतो. आक्रमणाचा आवाज येतो. लोंढा फुटतो. जो तो जीव वाचवायला धावू लागतो. लाओकोले आता लोंढा सोडून फोफो सोबत शहरातल्या निर्जन झालेल्या रस्त्यावरून चालते आहे. पलीकडून या तुकडीची गाडी येते. दुरून कुठून तरी एक गोळी सुटते. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून गाडी थांबते. अंदाधुंद गोळ्या चालायला लागतात. यामुळे थबकलेली लाओकोले एका इमारतीत आश्रय घेते. एका मुलाला तेथे बंदूक सापडते. बंदूक जमा केली जाते.
एक टोपली घेतलेला मुलगा पकडून आणला जातो. काय विकतो अशी चौकशी केल्यावर तो मुलगा सफरचंद असे म्हणतो. टोपलीत संत्री निघतात. त्याला खोटारडा घोषित केले जाते. त्याचे हात त्याच्याच शर्टाने मागे बांधले जातात. या सगळ्यांपासून तो लहान मुलगा पळायला लागतो. त्याबरोबर जॉनीची बंदूक त्या मुलाचा वेध घेते. नकळतपणे लाओकोले या घटनेची मूक साक्षीदार बनते. टोळी विजयाचा घोष सुरू करते. जॉनीला मात्र पुढे जाऊन अजून येथे कुणी आहे का हे पाहायचे असते. तो चालत चालत नेमका लाओकोले जेथे लपलेली असते तेथपर्यंत येतो. जॉनीला समोर पाहून लाओकोले जिन्यावरच थबकते. आता आपल्यावर गोळ्या चालणार आणि भावाला दिसू नये म्हणून त्याचे डोळे हाताने झाकून घेते. जॉनी चे डोळे तिच्याकडे पाहत राहतात. काही क्षण तसेच जातात. इतर सैनिक जॉनीला हाका मारू लागतात म्हणून जॉनी गाडीकडे परततो.
सुरक्षेसाठी लाओकोले आता त्या इमारतीतच चांगली जागा शोधायचा प्रयत्न करते. त्या निर्जन इमारतीतल्या एका पिंपात ती फोफो ला लपून बसायला सांगते. पळत पळत लाओकोले वडिलांकडे परत येते. त्यांना कुणीतरी गोळी घातलेली असते. तिला पाहून मग त्यांची शुद्ध हरपते. लाओकोले मुकपणे रडते. पण त्यांचा जीव वाचवायला त्यांना एका व्हिलबॅरो मध्ये घालून इस्पितळाकडे पळत सुटते. रस्त्यात फोफोला लपलेल्या ठिकाणी शोधायचा प्रयत्न करते पण तो तेथे नसतो! लाओकोले सैरभैर होते.पाशवी बाल सैनिकांची तुकडी पुढे निघते. एका क्षणी एक गोळी सुसाटत येते आणि एका सैनिकाचा वेध घेते. एका क्षणात धावपळ होऊन सगळे लपतात. फक्त नवीनच सामील करून घेतलेला लहान मुलगा... त्याच्या हातूनच त्याच्या वडीलांना गोळी घातलेली असते तो! तो शांतपणे चालत राहतो. स्वसंरक्षणासाठी त्याला चक्क एक कवायत किंवा प्रशिक्षणात वापरतात तशी लाकडी बंदुक असते. तो शांतपणे चालत राहतो - दुसरी गोळी त्याचा वेध घेते!
जखमींना हलवले जाते.स्नायपर्सचा शोध ही टोळी खुनशीपणाने घेऊ लागते. एका इमारतीत अत्यंत क्रूरतेने गोळ्या घालून त्यांचा बंदोबस्त करतात.मेलेल्या सदस्याला एकप्रकारे श्रद्धांजली दिली जाते.जखमींना इस्पितळात घेऊन जातात. इस्पितळ युनायटेड नेशन्सच्या अखत्यारीत आहे. तेथील आंतरराष्ट्रीय सैनिक या टोळीला सांगतात की आत शस्त्रे चालणार नाहीत ते येथे ठेवा आणि आत जा. एक जण म्हणतो, ' हऊ कॅनाय लिव गन्स? गन्सार मा मदर अँ फादर, यु फकीन...'लाओकोले आपल्या वडीलांना इस्पितळात कसेबसे आणते. उपचाराची काहीशी सोय होते. आता ती फोफोला शोधायला बाहेर पडते.टोळी आता चालत बीच वर पोहोचली आहे. जनरल कडून ठोस आदेश नाही. संपर्क धड होत नाही. मघाशी लुटलेल्या डुकरावरून जॉनी आणि डुक्कर लुटणारा यांचा वाद होतो. जॉनी म्हणतो डुक्कर मार. तो म्हणतो नाही.जॉनी डुकरावर बंदुक चालवतो. माणसांना कचाकचा मारणारा आपले काही तास आधी मिळालेले डुक्कर मेले म्हणून दु:खी होतो!
लाओकोले इस्पितळात परत येते. मृत्युच्या तांडवात जन्माचा सोहळा होत असतो. इस्पितळात नवीन मूल जन्माला येते हे ती पाहते. रात्र होते. डुकराची मेजवानी सागरकिनारी सुरू होते. तेथे असलेल्या मुलीला जॉनी सांगतो मला गोळ्या मारु शकत नाहीत. त्या माझ्या आजूबाजूने जातात पण मला लागत नाहीत. कारण माझ्या कडे हे मंतरलेले ताईत आहेत. ते माझे रक्षण करतात. 'बुले गो अराउं मी. दे डों ट्च मी'. मी विशेष आहे हे ठसवण्याचा त्याचा प्रयत्न. ती विचारते तू कधी पासून लढतो आहेस. तो म्हणतो अगदी लहान असल्या पासून. 'आ हॅ नो फामिली'.ती कोण वगैरे विचारण्याचा प्रश्न नसतोच. येवढ्या माहितीवर सागर किनारी संभोग रमतो.
पहाटे युएन ची अजून कुमक शहरात येते.टोळी शहराच्या इतर भागात अंदाधुंद गोळीबाराचा धुडगूस सुरू करते गोळीबार झाल्यावर एका इमारतीत जॉनी घुसतो ते इस्पितळ असते. आत पांढर्या चादरींवर प्रेते. सगळे नग्न. मृत्यूचा नंगा नाच या शब्दाला जागणारे दृष्य! एक म्हातारा तेथे एका प्रेताजवळ शांतपणे बसला आहे. जॉने आज्ञा देतो 'उठ'. म्हातारा लक्षही देते नाही. मागून टोळीचा अजून एक जण येतो आणि त्याला गोळी घालतो. तो वयस्क माणूस निर्जीव होऊन कलंडतो. उठ म्हंटल्यावर उठत नाही म्हणजे काय?बाहेर एका बाईचे लहान मूल एक बाल सैनिक हिसकायचा प्रयत्न करतोय. ती नाही म्हणतेय, रडतेय, याचना करतेय.
लाओकोले आता डोक्यावर आपली बॅग घेऊन पळत सुटलीय. एका सायकलवाल्याला तिने दोनशे डॉलरमध्ये आपल्या वडीलांना हलवण्यासठी पटवले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आता इस्पितळाने सोडून दिले आहे. पळताना तिच्या लक्षात येते की ते आता मरण पावलेत. त्यांना स्मशानात लाओकोले पुरते.
सायंकाळ होते. परत विजयाचा उन्माद. त्या उन्मादात जॉनीला नवीन मैत्रिण भेटते. तिची चुंबने घेत असतानाच कालची प्रेमिका तेथे येते व नव्या मुलीला रागाने थांबवायचा प्रयत्न करते. अंगावर धाउन जात रागात 'आय विल किल या' असे म्हणत ती तिला खरच गोळ्याच घालते!
हे पाहणारा दुसरा गट क्षणात तिलाही गोळ्या घालतो. दोघी धाडकन मरून पडतात!
एका क्षणात होत्याचे नव्हते होते! आपले तिच्यावर प्रेम होते हे जॉनीच्या लक्षात येते. पण आता उशीर झालेला असतो. जॉनीला दु:ख म्हणजे काय याची चव कळते.
तो ती रात्र तिच्या प्रेताजवळ बसून घालवतो.दुसरा दिवस सकाळ जॉनी जनरल ला रिपोर्ट करतो. जनरल म्हणतो मी काही जनरल वगैरे नाही. मी आत प्रेसिडेंटचा सिक्युरिटी गार्ड आहे. युद्ध संपले!युद्ध संपले?? मग आता काय करायचे? जॉनी विचारतो.त्याला काही उत्तर नसते. पैसे? जॉनी विचारतो. कसले पैसे? तू लुटले ना लोकांना? मग? थोड्या उर्मट बोलाचाली नंतर तो सो कॉल्ड जनरल जॉनी ला तोंड काळे करायला सांगतो.क्षणांपूर्वी आपले असलेले लोक जॉनीला परके होतात.
लाओकोले चालत एका वस्तीत पोहोचते. काही अनाथ मुलांना एकत्र करून कुणीतरी बसलेले असते. ती विचारते माझ्या भावाला शोधतेय. त्याचे नाव फोफो. तेथे एक चार पाच वर्षांची गोड चेहेर्याची मुलगीही आहे. ती उठून लाओकोले कडे येते. बहुदा तिलाही मोठी बहीण असावी. लाओकोले विचारते, 'आईबाप कुठे आहेत हीचे?'. 'मेलेत' उत्तर येते. लाओकोले तिला उचलून घेते.इतर काही विचारण्याचा प्रश्न नसतोच. लाओकोले तिला आंघोळ घालते. आणि तिला घेऊन चालू लागते.
तिला एका ठिकाणी जॉनी दिसतो. ती त्याला हाक मारते आणि लक्ष वेधून घेते. तेथे मदतीचा ट्रक धान्याची पोती घेउन आलाय. तो लुटायचा प्रयत्न होतो. त्यात ती परत दिसेनाशी होते. जॉनी तिचा शोध घेऊ लागतो. एका ठिकाणी ती त्याला त्या लहान मुली सोबत बसलेली दिसते. तो तिला बंदुकीच्या जोरावर बाहेर काढतो. ते तिच्या घरी पोहोचतात. बंदुक रोखुन प्रश्नांच्या फैरी सुरू होतात. 'दिस गल यो दोता..?' तुझे मुलगी आहे का ही? व्हेज यो फामेले? तुझी फॅमिली कुठाय? आणि व्हेज यो मानी? पैसे?लाओकोले म्हणते तुला वाटते की पैसे कुठे ठेवलेत मी तुला सांगेन मॅड डॉग? तो चपापतो. तुला माझे नाव कसे माहिती म्हणतो? मॅ डोग्ज्फिनिश! मॅड डॉग मेला!
माझा लहान भाऊ कुठे आहे? कोण तुझा भाऊ?तू एका लहान मुलाचा खून केलास संत्र्यांकरता. जॉनी म्हणतो मी त्याला संत्र्यांसाठी नाही मारले. तो खोटे बोलला आणि पळू लागला म्हणून मारले. ती भेदक प्रश्न विचारते, मग आता तुझी त्यांना गरज उरली नाही वाटते?
जॉनी उत्तर देत नाही.तो तिला त्याच्या गळ्यातली एक माळ देण्याचा प्रयत्न करतो. ती ते नाकारते. आता तो जवळ यायचा प्रयत्न करतो. एका गाफिल क्षणी लाओकोले त्याची बंदूक हिसकते आणि त्याला दस्त्याने एक तडाखा देते. जॉनी कोसळतो. मग ती त्याला दस्त्याने तडाख्यावर तडाखे देते... गलितगात्र झालेला जॉनी हाताने नाही म्हणतोय. आता तो बंदुकीच्या समोर असतो. तिच्या हाती पुस्तक नसून बंदूक असते. लाओकोलेचे बोट आता चापावर आहे. पहिल्यांदाच लाओकोलेच्या डोळ्यातून अश्रू ओघळतो.
---------------------
चित्रपट संपल्यावर मी नुसताच बसून राहिलो विमनस्कपणे. चित्रपट अंगावर आला नाही, तर धडकला!
ही २००८ ची निर्मिती आहे आणि या घटना साधारणपणे २००३ मध्ये घडल्या आहेत. गेली काही दशके चाललेली आफ्रिकेतली यादवी. त्याचे हे भेसूर चित्रण. हा चित्रपटही नाही आणि ही डॉक्युमेंटरीही नाही. त्याच्या अधेमधेच कुठेतरी आहे. यातले अनेक कलाकार खरोखरीचे बाल सैनिक होते. त्यांची शस्त्रे हाताळण्याची पद्धती हे सहजतेने सांगते. युद्ध होत राहते. कोण जिंकते आहे, कुणाशी जिंकते आहे? कशावर विजय मिळवलाय हे ही त्यांना आणि आपल्यालाही समजत नाही. कहाणी दोन पातळ्यांवर उलगडत(?) जाते. एक जॉनीच्या आणि दुसरी लाओकोलेच्या पातळीवर. त्यांचे मार्ग एकमेकांना छेदत राहतात. दिग्दर्शन दाखवत राहते की त्यांचे मार्ग एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ही कहाणी खरंतर उलगडत नाही. गुंतत जाते. यात काही कथाही नाही. फक्त एकामागे एक घडत जाणार्या दोन दिवसातला घटनाक्रम. अनेक आयुष्ये संपवणारा. यातले मृत्यू शेवटचे संवाद बोलून श्वास वगैरे घेऊन येत नाहीत. एक गोळी आणि खाडकन मृत्यू. इतर काही भानगडींसाठी तेव्हढा वेळच नाही. लाओकोलेच्या वडिलांचा मृत्यूही असाच चालतीवर होतो. मृत्यूला काही किंमतच नाहीये आणि जीवालाही! किंमत एकाच गोष्टीला आहे बंदूक. ज्याच्याकडे बंदुक त्याच्याकडे सत्ता. भलेही ही ती काही क्षणांचीच का असेना!भावभावना गोठवून टाकणारे क्रौर्य आहे, रासवट संभोग आहे. विजयाचे जल्लोष आहेत. पण कशावर कसला तरी विजय मिळवला आहे. कसला हे ही त्यांना आणि आपल्यालाही कळत नाही. एका ठिकाणी बाळाचा जन्म होतो तो प्रसंग आणि त्या नंतर येणारा एका बाल सैनिक एका आईकडून एक बाळ हिसकू पाहतो तो प्रसंग हादरवतात. काहीही झाले तरी पुढे जाऊन काय? जन्म झाला तरी त्याचे पुढे बाल सैनिकच बनणे काय? हीच मुले पुढे जर जगून वाचून मोठी झालीच तर परत तेच चक्र सुरू? फोफो चे काय झाले? तो ही असाच बाल सैनिक म्हणून कोठे तरी सामील झाला असेल का? मुलाच्याच हातून घडवलेला वडीलांचा मृत्यू. पुढे त्या मुलाचे हातातली लाकडी बंदुक घेऊन मृत्यूला कवटाळणे, आपण सुन्नच होत जातो!
हे सारे घडत जाते. हिंसा दिसत राहते. आपण आगतिक होऊन पाहात राहतो.त्या बंदुकींच्या लहरींवर जीवनाचे आणि मृत्यूचेही हिंदोळे हलत राहतात.लाओकोले आता बंदुकीचा चाप दाबते की नाही हे प्रेक्षकांवर सोडले आहे...इमान्युएल डोंगालाचे हे लिखाण आहे. तो स्वतः ही या युद्धा॑तून गेला होता. त्यामुळे अगदी प्रत्यक्षदर्शी सादरीकरण आहे. संगीत अप्रतिम आहे. श्रद्धांजली दिली जाते त्या इमारतीतले इट इज माय वर्ल्ड हे गाणे म्हणणे अंगावर काटे आणते. ही मुले जंगलातून चालत असताना मागे मार्टीन ल्युथर किंग चे प्रसिद्ध भाषण ऐकू येत असते 'आय हॅव अ ड्रीम'.
अशा गोष्टींचा प्रभावी वापर आहे.चित्रपटात कलाकार नसून खरोखरीचे बाल सैनिक आहेत. त्यांच्या शस्त्रे हाताळणीतून हे जाणवत राहते.
चित्रीकरण अगदी निराळे आहे. कसे ते पाहायलाच हवे. काही प्रसंगात पडद्याचा अर्धा भाग झाकलेलाच असतो. क्लोज अप्स मध्ये फक्त अर्धाच चेहरा दिसतो. प्रत्येकाला येथे अर्धीच कथा माहिती आहे. सगळ्याचे जणू अर्धेच स्पष्टीकरण आहे असे चित्रीकरण सुचवत राहते.
चित्रपट संपला आणि माझ्यासमोर ते फ्लेक्स येत राहिले. राजाचे राज पण आज पण उद्यापण आणि हातात पिस्तुल घेतलेला माणूस! अराजक आणि बंदुकांची क्षणिक सत्ता! आपली पण वाटचाल याच दिशेने होते आहे का? हा प्रश्न अस्वस्थ करायला लागला.
चित्रपट - जॉनी मॅड डॉग Johnny Mad Dog
दिग्दर्शन - जीन स्तिफन स्वेरकथा - एमॅन्युएल डोंगाला
पटकथा - एमॅन्युएल डोंगाला आणि जीन स्तिफन स्वेर
प्र. भू.
जॉनी - क्रिस्तोफ मिनी
लाओकोले - डेझी व्हिक्टोरिया वँडी
पुरस्कार
कान्स - २००८ होप पुरस्कार
द्युवेले - २००८ उत्कृष्ट पटकथा
टीपः चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. परंतु तो अधिकृत आहे की नाही हे न कळल्याने दुवा दिला नाही.
प्रतिक्रिया
18 Nov 2013 - 9:41 am | यशोधरा
वाचतानाही भयानक वाटले..
18 Nov 2013 - 10:03 am | खबो जाप
अतिशय भयानक , वेगवान कथा आहे पण बरोबर छाप टाकते.
ह्याच आशयाचा (रेबेअल्स वरती) "Tears of the Sun" बघितला होता.
अतिशय भयानक सत्य……
18 Nov 2013 - 10:11 am | अग्निकोल्हा
इथ गोलियोंकी रासलीला चित्रपट बघून डोकं ठणानले..
हां काय बघणार :(
18 Nov 2013 - 11:12 am | विटेकर
मी सहसा इंग्रजी चित्रपट पाहात नाही , संवाद कळत नाही आणि आवडत ही नाहीत. पण तुमची लेखन शैली आवड्ली.
चित्रपट कधीच पाहणार नाही. कदाचित चांगला ही असेल. पण एखादी कलाकृती अंगावार धाडकन कोसळते म्हणजे काय हे निश्चित माहेत आहे त्यामुळे तुमचे लेखन भावले.छान समिक्षण केल आहे तुम्ही !
चित्रपट संपला आणि माझ्यासमोर ते फ्लेक्स येत राहिले. राजाचे राज पण आज पण उद्यापण आणि हातात पिस्तुल घेतलेला माणूस! अराजक आणि बंदुकांची क्षणिक सत्ता! आपली पण वाटचाल याच दिशेने होते आहे का? हा प्रश्न अस्वस्थ करायला लागला.
भारतात असे कधीही होणार नाही याची खात्री बाळगा ! आपण समजतो त्यापेक्षा आपला समाज फार फार म्याचुअर्ड आहे.धर्माची ( नीतीशास्त्र या अर्थाने ) आपल्या समाजात फार खोलवर रुजली आहेत. देवभोळा आणि पापभिरु समाज आहे आपला !
18 Nov 2013 - 1:35 pm | कपिलमुनी
शीख दंगली ? हिंदू मुस्लिम दंगली ? खैरलांजी ?
आपल्या समूहामधल्या अशा प्रवृत्तींचे वेळोवेळी दर्शन झाले आहे ..
18 Nov 2013 - 3:57 pm | विटेकर
शीख दंगली ? हिंदू मुस्लिम दंगली ? खैरलांजी ?
ही समूहाची मानसिकता आहे आणि तरीही क्रौर्याला मर्यादा आहे( तुलनेने), ज्या पद्धतीने समिकक्षणात सांगितले आहे ,त्यातील व्यक्तिगत क्रौर्य अंगावर शहारे आणणारे आहे ! विशेषतः लहान मुलांची मानसिकता ! ही विकृती आपल्याकडे घड्णार नाही असे वाटते.
18 Nov 2013 - 8:30 pm | अग्निकोल्हा
म्हणून आपली त्यांची असा फरक नको.
असो आपण Lord of the Flies नक्कीच वाचली असेल.
19 Nov 2013 - 7:16 am | निनाद
भारतात असे कधीही होणार नाही याची खात्री बाळगा ! धाडसी आहे विधान.
18 Nov 2013 - 12:38 pm | स्पंदना
:( !!
कोनी बद्दलपण असच काही वाचल आहे.
तुम्ही किती अस्वस्थ आहात हे लिखाणात पुरेपूर जाणवतय.
19 Nov 2013 - 7:17 am | निनाद
कोनीची ख्रिश्चन आर्मी तर अजूनच भयानक आहे... त्यांना देवाचे खरे राज्य येथे आणायचे आहे. :(
18 Nov 2013 - 12:56 pm | प्यारे१
थेट भिडणारं...
चित्रपट पाहवणार नाही. :(
18 Nov 2013 - 4:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
:(
18 Nov 2013 - 6:20 pm | मुक्त विहारि
ये वादा रहा
18 Nov 2013 - 11:30 pm | विनोद१८
विनोद१८
19 Nov 2013 - 12:40 am | अर्धवटराव
जबरदस्त परिक्षण रे निनाद. चित्रपट देखील फार सशक्त असावा.
पडदा खरच अर्धा अंधारात आहे. आणि हे केवळ वर्तमानाच्या कारण मिमांसेचं लक्षण नाहि. अफ्रीकेचा भूतकाळ रसातळाला नेला युरोपने. त्या जखमा अजुन भरल्या नाहित. आधुनीक जगाशी सांगड घालणे तर लांब राहिलं... त्यांना एक राज्यव्यवस्था म्हणुन देखील उभं राहता आलं नाहि अजुन :(
19 Nov 2013 - 7:19 am | निनाद
अफ्रीकेचा भूतकाळ रसातळाला नेला युरोपने. त्या जखमा अजुन भरल्या नाहित. आधुनीक जगाशी सांगड घालणे तर लांब राहिलं... त्यांना एक राज्यव्यवस्था म्हणुन देखील उभं राहता आलं नाहि अजुन पण त्यातही त्यांचा टोळीवाद अजून भयंकर. युरोपीय येण्याआधी तेथे काही तरी व्यवस्था होती ती युरोपीयनांना उध्वस्त केली हे मात्र खरे.
19 Nov 2013 - 1:47 am | आदूबाळ
भयंकर... चित्रपट बघायचा धीर होईल असं वाटत नाही.
19 Nov 2013 - 2:28 am | विजुभाऊ
म बापरे.......लादेखील चित्रपट बघायचा धीर होईल असे वाटत नाही. आणि बघितल्यावर मी पुन्हा नॉर्मल होइन असेही वाटत नाही.
पण ही हिंसा कशासाठी? इतके क्रौर्य....... नकळत्या वयात?
19 Nov 2013 - 7:24 am | निनाद
चित्रपट बघायचा धीर होईल असं वाटत नाही. असं म्हंटलय. पण चित्रपटात हिंसा असली तरी रक्तरंजित हिंसा नाही. म्हणजे एका बॉलिवुडपटात जसे ओंगळवाणे रक्ताळलेले चेहरे दाखवतात असे काही नाही. जे आहे जसे आहे तसे. गोळी लागल्यावर जसे बोटभर रक्त बाहेर येईल तसेच चित्रपटात दिसते.
मरतांना शेवटचे संवाद, फायनल श्वास, क्लोजअप, ढ्यांग करून आलेले 'मुजिक', मग मरणे वगैरे वगैरे काही नाही...
20 Nov 2013 - 5:32 am | आदूबाळ
म्हणूनच धीर होईलसं वाटत नाही. गुंडा बघायला मजा येते, वासेपूर कथानकामुळे आवडतो - तरी रियलिस्टिक हिंसा एक तिटकार्याची भावना आणतेच...
19 Nov 2013 - 11:37 am | झंम्प्या
उत्तम मांडणी, लेखनाची पद्धत आवडली. मनात विचार आले, की, भरकट्लेले तारुण्य, अन्धारातलं भविश्य... अद्ज्ञाना मुळे वाढती पाशवी विचार सरणी, एका बाजूला जेव्हा माणूस मंगळावर जातोय, तेव्हा दुसर्या बाजूंला जगात अशीही परिस्थिती असते ह्याची कल्पना करवत नाही. गाळात रुतत चाललेलं आयुष्य आहे, ते शेवटी त्याच गाळात बुडूनच संपणार आहे, फक्त केव्हा ह्याची वाट पाहत दिवस काढतायत.
असं होण्यामागची कारण भरपूर असतील, पण खरच भयंकर आहे.