स्त्रीशिल्पे.........
जग निर्माण झाले त्या काळात.... सृष्टी जवळ जवळ तयार झाली होती. त्या श्रेष्ठ निर्मात्याला आढळले की त्याच्याकडील सर्व तत्वे ही सृष्टी निर्माण करतानाच संपली आहेत. स्त्रीसाठी काय करावे हे न सुचल्यामुळे त्याने अगोदरच जन्माला घातलेल्या सृष्टीतून काही तत्वांची व गुणांची उसनवार केली.
त्याने चंद्राकडून गरगरीतपणा घेतला, वृक्षांवर चढणार्या लतांकडून वळणे घेतली, त्याच वेलींच्या तंतूंकडून धरण्याचा गुण घेतला, वार्यावर थरथरणार्या गवाताकडून थरथरणे घेतले, हिरव्या पानांचा तजेलदारपणा घेतला, हतीच्या सोंडेचा निमुळतेपणा, हरिणीचे अक्ष, मधुमक्षिकांची सहजीवनाची ओढ , प्रकाशकिरणांकडून उत्साह, काळ्या ढगांकडून मुसमुसणे, वार्याकडून चंचलता, सशाकडून भेदरटपणा, मोराचा डौल, पोपटाच्या छातीवरील पिसांचा मुलायमपणा, आडमुठ्या स्वभावाच्या माणसाकडून हट्टीपणा, मधाचा गोडवा, वाघाची क्रूरता, अग्नीकडून ऊब तर बर्फाकडून थंडपणा, पक्षांचे कूजन व कोकिळेची कुहूक, करकोच्याचा ढोंगीपणा तर चक्रवाकाची एकनिष्ठता....हे सगळे गुण घेऊन त्याने स्त्री जन्माला घातली व सृष्टीला अर्पण केली.
भारतीय प्राचीन शिल्पकलेचा विचार करताना सर्व शिल्पकारांनी वरील विचारांचा पुरेपूर उपयोग केला आहे असे म्हणावे लागेल. आपल्याला ज्ञात असलेला भारतातील सगळ्यात प्राचीन शिल्पकाराचे नाव होते देवदिन्ना व तो ख्रि.पू. दुसर्या शतकात मध्यप्रदेशात रामगिरी पर्वताच्या आसपास रहात असे. काव्य, शास्त्र, व विनोदचा निस्सीम भोक्ता असलेला हा कलावंत गळ्यात जस्मिनची पुष्पमाला घालून रामगिरी पर्वतावरील गुहेत पौर्णिमेला साजर्या होणार्या उत्सवाला गेला. त्या वसंतऋतूत तेथे कवितांचे गायन करीत असणारी एक सुंदर लावण्या त्याच्या मनात भरली. तिचे नाव होते सुतनुका. तेथेच एका शिळेवर देवदिन्नाने आपले ह्रदय चोरणारीला एक संदेश कोरला. हा संदेश तिने वाचला का ? वाचल्यास त्या प्रेमकहाणीचे पुढे काय झाले हे आज ज्ञात नाही. पण शिल्पांमधे स्त्रियांना महत्वाचे स्थान मिळाले हे निश्चित. डॉ. सांकलियांच्या मते भारतातील सगळ्यात जुने स्त्रीशिल्प उत्तर प्रदेशामधे बेलन खोर्यात सापडले. एका हाडाच्या तुकड्यावर कोरलेले हे शिल्प तसे ओबडधोबडच आहे पण तज्ञांना ओळखू येते.
ख्रिस्तपूर्व 2700 या काळातही शिल्पकला ऐन बहरात होती व त्यात स्त्रीशिल्प ही प्रामुख्याने तयार केली जात. ही दिसायला सुबक नसतील पण त्यांनी जो परिणाम साधला आहे तो साधण्यासाठी भले भले शिल्पकार आज झटून अभ्यास करताना दिसतात. स्त्रीच्या जननक्षमतेबद्दल नितांत आदर असल्यामुळे तिला देवतेचे स्वरुप दिले गेले ते याच काळात. ही ख्रिस्तपूर्व 2600 काळातील स्त्रीशिल्पे मातृशिल्पे असून या शिल्पकारांनी ती टेराकोटामधे तयार केली आहेत. जी स्त्रीशिल्पे आज भारतात आपण दगडात, लाकडात, तांब्यात व शाडूमधे बघतो त्याची सुरवात ही अशी झाली हे मानायला हरकत नसावी. खाली दिलेली छायाचित्रे आपण जर नीट पाहिली तर बोटाच्या चिमटीने मातीला आकार देऊन व ती मूळ आकृतीला चिकटवून ही शिल्पे तयार केली गेली आहेत. त्या काळातील स्त्रियांचा आकर्षक बांधा, त्यांची केशभूषा व वक्षांवर रुळणारे दागिने हे त्या शिल्पकारांनी अगदी साधेपणाने पण उत्कटतेने दाखविलेले दिसतात. पंख्याच्या आकाराची त्यांची केशरचना ही जगप्रसिद्ध आहे.
इंडस व्हॅली संस्कृतीतील स्त्रीशिल्पे .. (छायाचित्र क्र. 1 व 2)
मग निसर्गात जे जे सर्जनशील दिसेल त्यात हे शिल्पकार स्त्रीची मातृत्वाची देणगी पाहू लागले. दररोज नजरेस पडणारे वृक्ष आणि स्त्रीमधे साम्य आढळल्यानंतर शिल्पांमधे स्त्री वृक्षांबरोबर दाखविण्याची परंपरा निर्माण झाली. त्यामुळे अनेक शिल्पात आपल्याला स्त्रीशिल्पात पाने, वृक्ष हमखास दिसतात. अशा शिल्पांना मग वनदेवतांचे नाव पडले. त्यातच लुंबिनीच्या जंगलात शालवृक्षाखाली मायादेवीने बुद्धाला जन्म दिल्यामुळे नंतरच्या स्त्रीशिल्पांमधे पानाफुलांचे व वृक्षांचे महत्व वाढले. पुराणकथांमधे सुंदर स्त्रीने अशोकाला पाय लावल्यावर अशोक फुलला असा उल्लेख आढळतो. या समजुतीवर अधारलेल्या अशोकदोहदाचा उल्लेख कालिदासाच्या मालविकाअग्निमित्रम् नावाच्या नाटकात मोठ्या रसिकतेने केला आहे. भह्रताच्या शिल्पांमधे अशोकदोहद व वृक्ष-स्त्रीशिल्पे अनेक आहेत. त्यापैकी एकाचे चित्र खाली देत आहे.
भह्रत येथील स्त्रीशिल्प.
प्राचीन साहित्यिक कलाकृतीमधे, उदा. कामसूत्र या ग्रंथात वसंतोत्सवात, बहरलेल्या आम्रवृक्षाची फळे तोडण्याचा एक कार्यक्रमच असे असा उल्लेख आला आहे. त्याचे नाव आहे सहकारभंजिका. यात स्त्रिया आम्रवृक्षाखाली हसत खेळत आंबे तोडत. काही शिल्पांमधे हा खेळही मोठ्या सूचकतेने दाखविलेला दिसतो. असेच एक शिल्प आपल्याला पळसदेव येथील देवळाच्या भिंतीवर दिसते. या स्त्रीला वृक्षिका किंवा यक्षी असे संबोधिले जाते.
पळसदेवचे देऊळ. सहकारभंजिकामधे भाग घेणारी एक वृक्षिका/यक्षी. काळ ( अंदाजे 1000 साल)
ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात एका यक्षीचे सुंदर शिल्प जन्माला आले. हे शिल्प दीदारगंज पाटण्याची चामरधारिणी म्हणून ओळखली जाते. भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाणारे हे शिल्प एका स्त्रीचे आहे हीच बाब स्त्रीशिल्पे पूर्वी किती महत्वाची होती ते सिद्ध करते.
दीदारगंजची मौर्यकालीन चामरधारिणी...
तिच्या स्तनभाराने ती थोडी पुढे झुकलेली दिसते. तिच्या नितंबावर एक सुंदर कमरपट्टा घातलेला असून हातात बांगड्या, पायात पैंजण व कानात कर्णभुषणे अशी ती नटलेली आहे. शिल्पकाराने त्या दगडाला एखाद्या माणकाला आणावी तशी चमक आणून ते शिल्प स्वर्गीय केले आहे. कालिदासाने मेघदूतामधे याच शिल्पाचे वर्णन तर केले नसेल ना ? कालिदासाने यक्षीचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. कमनीय बांधा, सुंदर दंतपंक्ती, बिंबाच्या फळाच्या रंगाप्रमाणे लालचुटुक ओठ, निमुळती कंबर, भेदरलेल्या हरिणीसारखे डोळे, स्तनांमुळे थोडीशी वाकलेली तर नितंबांमुळे गजगामिनी. जणू काही निर्मात्याने त्याची सर्वोत्कृष्ट पहिली कलाकृती सादर केली आहे......
प्राचीनकाळी स्त्रिया शस्त्रे चालवत, लिखाण करीत. उदा. रामायणात कैकेयी दशरथराजाबरोबर देवासूराबरोबर झालेल्या लढाईत लढायला गेली होती. त्या स्त्रियांची शिल्पेही देवळात दिसली नसती तर नवलच. खाली अशा काही शिल्पांची छायाचित्रे दिली आहेत.
1 धनुर्धारी स्त्रीचे शिल्प. काही जणांच्या मते हे एका राशीचे शिल्प आहे....
देवालयांच्या भिंतींवर स्त्रियांची शिल्पे मुबलक आढळतात त्यात प्रामुख्याने स्त्री देवतांची शिल्पे जास्त असतात. उदा महिषासुरमर्दीनीचे शिल्प किंवा कालीमातेचे शिल्प किंवा सरस्वती व गंगेचे शिल्प. महिषासुरमर्दिनीचे शिल्प व त्यामागची कथाही आपल्याला माहीत असतेच. खाली जयपूर येथील अल्बर्ट हॉल वस्तूसंग्रहालयातील एका उत्कृष्ट शिल्पाचे छायाचित्र दिले आहे.
महिषासुरमर्दीनीचे शिल्प...
जर देवतांच्या शिल्पांची गणना केली तर आपल्याला आश्चर्य वाटेल. बघा त्याची यादी - दुर्गा, श्रीचक्रदेवी, निलकंठी, क्षेमकारी, हरसिद्धी, रुद्रदुर्गा, वनदुर्गा, अग्नीदुर्गा, जयदुर्गा, विंध्यवासिनी, कात्यायनी, चंडिका, नंदा, नवदुर्गा, भद्रकाली, महाकाली, अम्बा, अंबिका, मंगला, सर्वमंगला, काळरात्री, ललिता, गौरी, उमा, पार्वती, रंभा, भूमाता, योगिनी, सर्वभूतदामिनी, रौद्री, वामा, ज्येष्ठा, वारुणी चामुंडा, रक्त चामुंडा, शिवदुती, योगेश्वरी, भैरवी, त्रिपुरभैरवी, सिद्धी, रिद्धी, क्षमा, दिप्ती, रती, श्वेता, भद्रा, जया, विजया, घंटाकर्णी, जयंती, अरुंधती, अपराजिता, सुरभी, कृष्णा, इंद्राक्षी, अन्नपूर्णा, तुलसीदेवी, भुवनेश्वरी, बाला, लक्ष्मी, महालक्ष्मी, सरस्वती, सप्तमातृका, जोगेश्वरी.....या सर्व देवतांच्या मूर्तींमधे सूक्ष्म फरक असतो व या मूर्ती भारतभर आढळतात.
श्रेष्ठ नाटककार भासाच्या स्वप्नवासवदत्ता नावाच्या प्रसिद्ध नाटकात राजकन्या पद्मावती चेंडूबरोबर खेळत असताना एक मर्कट तेथे अवतरला त्यामुळे ती अत्यंत घाबरली असा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील काही देवळात सूरसुंदरींच्या शिल्पात पायापाशी माकड दाखविलेले आहे त्याचा उगम येथे असावा असे मला उगाचच वाटते. खिद्रापूर येथील अत्यंत देखण्या देवळात ही मर्कटलीला आपल्याला बघायला मिळेल.
सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरावर असलेले मर्कटलीलेचे शिल्प.
प्राचीन काळात स्त्रिया मद्याचा आस्वाद घेत असत ही माहिती आता नवीन रहिलेली नाही. कित्येक ग्रंथांमधे याचे उल्लेख आले आहेत. शिल्पातही अशा स्त्रिया दाखविल्या गेल्या असल्यास आश्चर्य वाटायला नको. उदा. बदामी येथे एका शिल्पात बेहोष झालेल्या स्त्रीला तिचा पती सावरतोय असे आपल्याला दिसते. त्या शिल्पाचे छायाचित्र खाली दिले आहे.
मद्याने बेहोष झालेल्या स्त्रीचे शिल्प. बदामी.....
दिल्ली नॅशनल म्युझियममधील एक शिल्प. यात एका झिंगणार्या गणिकेला आधार देत उठायला मदत करताना एक पुरुष दिसत आहे तर शेजारच्या माणसाच्या हातात तिच्याकडून काढून घेतलेला मद्याचा चषक दिसत आहे. मद्यसेवनामुळे जो चेहर्यावर भाव दिसतो तो तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत आहे.
बासरी वाजविणार्या सुंदर युवती ग्रीसमधून भारतात पाठविल्याचे उल्लेख अनेक पुस्तकात आहेत. त्यातील काही सातवाहनांच्या काळात नाणेघाटातून देशावर आल्याची शक्यता नाकारता येत नाही. या युवतींचा प्रभाव शिल्पांवर पडला असेल का ? शक्यता नाकारता येत नाही. हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो.
नृत्य, संगीत व कला यात प्राचीन काळात स्त्रियांचा सहभाग वाखाणण्यासारखा असल्यामुळे शिल्पकलेवर त्यांचा प्रभाव पडला जो आपल्याला नृत्य करणार्या, अनेक प्रकारची वाद्ये वाजविणार्या व लेखन, वाचन करणार्या अनेक स्त्रीशिल्पातून दिसून येतो. स्त्रिया त्यांच्या जोडीदारांबरोबरही नृत्य करत असत वे ते आपल्याला खालील शिल्पात दिसून येते. ही शिल्पे तयार करणार्या कलाकारांचा नाट्यशास्त्राचा अभ्यास चांगलाच असणार कारण नृत्यातील अनेक मुद्रा, पदन्यास, करन्यास त्यांच्या शिल्पात आपल्याला बघावयास मिळतात. भारतीय पुराणात नृत्यकला हे प्रथम पार्वतीने बाणासुराच्या कन्येला शिकवली. तिने नंतर द्वारकेच्या नर्तकींना शिकविली व तेथून ती जगभर पसरली अशी आख्यायिका आहे. भारतातील देवळांच्या भिंती अशा देवांगना व सूरसुंदरींच्या शिल्पांनी सजलेल्या आहेत.
खिद्रापूर मंदिरातील काही शिल्पे.
स्त्री पुरुष नृत्य करताना.....
या सुरसुंदरींचे दागिने, त्यांचे सौंदर्य बघताना आपले भान हरपते. बरे त्यांच्या मूर्तीही अशा युक्तीने घडविल्या आहेत की त्यांच्यासमोर उभे राहिल्यावर एक मूर्ती आपल्याला समोरुन दिसते तर त्याचवेळी एक बाजूने. अशा काही सुंदरींच्या शिल्पांची छायाचित्रे खाली दिलेली आहेत. नृत्यकले खालोखाल वादन व गायनाच्या कलेत या अप्सरा पारंगत होत्या. वादनाची बरीच शिल्पे दिसतात पण गायन करतानाची तुलनेने विशेष दिसत नाहीत. (निदान महाराष्ट्रात तरी)
मृदंग वाजविणार्या स्त्रीचे शिल्प......
वाद्य वाजविणारी स्त्री.....
वाद्ये वाजविणार्या स्त्रियांची सगळ्यात जास्त शिल्पे कोणार्कच्या सूर्यमंदिरात आढळतात.
महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमधे गावाबाहेर आपल्याला बर्याच शिळा दिसतील. त्यांना म्हणतात वीरगळ. हे फार प्राचीन असतात. गावासाठी ज्या शूरांनी प्राणार्पण केले आहे अशांच्या वीरस्मृतीसाठी हे घडविले जात. यात ही आपल्याला स्त्रीशिल्प दिसते. खालच्या भागात लढाई करताना योद्धा दाखविला आहे तर मधील भागात, अप्सरा त्याला विरगती प्राप्त झाल्यावर उचलून स्वर्गात घेऊन जाताना दिसतात. त्याच्या वरच्या भागात स्त्रिया पूजा करताना दिसतात. अत्यंत दुर्गम गावात, सुंदर नसले तरी हे शिल्प आपल्याला आढळेलच.
वीरगळ......
असो. परत देवळांकडे वळूया. मध्ययुगीन भारतात देवळांच्या बाहेरील भिंतींवर देवांगना,सूरसुंदरी, अप्सरा व आलसिकांच्या मूर्ती लावण्याची पद्धतच पडून गेली. या सुंदरींची शिल्पे नुसती सुंदरच नसून त्या जिवंत वाटाव्यात, निर्जिव दगडातील एक जिवंत काव्य वाटाव्यात एवढ्या रसरशीत आहेत. आपण शक्यतो महाराष्ट्रातील उदाहरणे घेतली आहेत नाहीतर मध्य भारत ओरिसा व खाली दक्षिणेकडे अशा शिल्पांची खाणच आहे. स्त्रीशिल्पांमधे दागिन्यांची रेलचेल दिसते. गळ्यातील हार व कमरेवरील मेखला हा एक आवडता दागिना असावा. कानातील कुंडले, केसांची रचना, पायातील पैंजण प्रत्येक शिल्पामधे अत्यंत बारकाईने कोरले गेले आहे. बर्याच स्त्रियांनी सध्या वापरतात तसा आखुड स्कर्ट किंवा कुडता घातलेला दिसतो.
काही सुंदर स्त्रीशिल्पे
भुलेश्वर येथील एक शिल्प. .....
ही शिल्पे झाली सौंदर्यवतींची, पण घाबरवणार्या स्त्रीशिल्पांचीही काही कमी नाही. उदा. काली, चामुंडा यांच्या मूर्ती. चामुंडाच्या बरगड्या व विद्रुप शरीर बघून आपल्या अंगावर काटा उभा राहतो. खाली चामुंडाच्या एका शिल्पाचे छायाचित्र दिलेले आहे त्यावरुन आपल्याला कल्पना येईल.
चामुंडाचे शिल्प .........
साजशृंगार ही स्त्रीची सहजप्रवृत्ती आहे. या सहजवृत्तीचा प्रभाव शिल्पांवर पडला नसता तर नवलच. महाराष्ट्राच्या आद्य साहित्यात म्हणजे गाथासप्तशतीमधे (2000 वर्षापूर्वी) स्त्रियांच्या शृंगाराबद्दल एक गाथा अशी आढळते-
त्या काळात सणही साजरे होत त्यांचे उल्लेख छण म्हणजे सण, फग्गुच्छण म्हणजे फाल्गुनोत्सव (होळी), मअण म्हणजे मदनोत्सव ( हा अर्थात वैयक्तिक पातळीवर साजरा व्हायचा पण त्यालाही उत्सव म्हटले आहे), बाकीचे वसंतोत्सव इत्यादी नावाने आले आहेत.
दइअकरग्घलुलिओ धम्मिल्लो सीहगन्धिअं वअणम ।
मअणम्मि एत्तिअं चिअ पसाहणं हरइ तरूणीणम्॥
याचा अर्थ -प्रियकरामुळे विस्कटलेले केस आणि मद्यामुळे धुंद झालेले मुख, या उत्सवात एवढाही शृंगार तरूणींना बास होतो....तर शृंगारांवर बेतलेली अनेक शिल्पे आपल्याला दिसतात. अशाच दोन सुंदरींची ही दोन शिल्पे. यांना शृंगारनायिका असे संबोधत.
खिद्रापूर मर्कटलिलातील सुंदरी .........
खिद्रापूर. मागे वळून बघतानाचे एक शिल्प. .......
जर आपण भारतभर पसरलेल्या विविध संग्रहालयांना भेट दिलीत किंवा देवळांना भेट दिलीत तर आपल्याला सप्तमातृकांचे शिल्प हमखास आढळेल. त्यांची नावे आहेत ब्राह्मणी, कुमारी, महेश्वरी, वैष्णवी, वराही, इन्द्राणी व चामुंडा. यातील वराहीला वराहाचे तोंड लावलेले दिसते. खाली जयपूरमधील अल्बर्ट हॉल म्युझियममधील सप्तमातृकांचे एका शिल्पाचे छायाचित्र दिले आहे. आपल्याला वेरुळमधेही सप्तमातृकांचे शिल्प बघायला मिळते.
सप्तमातृका.....
सप्तमातृकांचा भारतीय विविध पुराणांमधे उल्लेख आहे. खुद्द शंकराने त्यांना एका राक्षसाचा वध करण्यासाठी त्यांना जन्माला घातले अशी आख्यायिका आहे. शंकर व विष्णू एकत्र अंधकासूराबरोबर लढत असताना त्यांना आढळले की त्या राक्षसाचे जेवढे रक्त जमिनीवर पडत होते त्या प्रत्येक थेंबापासून अगणित राक्षस निर्माण होत होते. ते बघताच त्यांनी या सप्तमातृका निर्माण करुन त्यांना ते पडणारे रक्त पिण्यास सांगितले व शेवटी त्याचा वध केला. त्यामुळे पुराणात या मातृकांचे जे वर्णन केले गेले आहे ते भयानक या एका शब्दानेच करता येईल. पण आपल्याला जी शिल्पे दिसतात त्यात त्या अत्यंत मृदू व प्रेमळ दिसतात.
ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकापासून ही शिल्पे आढळतात. त्यांच्या शिल्पात साहजिकच काळानुसार बदल होत गेला. तिसर्या ते सहाव्या शतकात गुप्तकाळात शिल्पकलेची मोठी भरभराट झाली त्यात ही शिल्पेही बहरली. नंतर गुजरातमधे प्रतिहारांच्या काळात म्हणजे अंदाजे 8ते 10व्या शतकात, तसेच चंदेला राजवटीत (9 ते 12 व्या शतकात) तसेच चालुक्य (11 ते 13 वे शतक), पल्लव व चोलांच्या काळात (7 व्या शतकात) या शिल्पांमधे अनेक सुधारणा म्हणण्यापेक्षा बदल होत गेले ते आजही आपण बघू शकतो. योगिनींचे देऊळ आढळते पण सप्तमातृकांचे वेगळे असे देऊळ आढळत नाही.
आत्तापर्यंत आपण भारतीय शिल्पकलेतील स्त्रीशिल्पे बघितली. या सर्व शिल्पांना प्राचीन ग्रंथात आधार आहे. पाश्चात्य जगतातही शिल्पकला प्रगल्भ अवस्थेत होती. पण त्याचा प्रकार वेगळा. बहुदा सर्व शिल्पे ही संगमरवरी दगडात असत. त्या शिल्पकारांनाही दाद देण्यासाठी खाली एका शिल्पाचे छायाचित्र देत आहे. पाश्चात्य शिल्पकारांच्या कलाकृतींविषयी लिहायचे म्हणजे अजून एक लेख होईल त्यामुळे त्या शिल्पांबद्दल परत केव्हातरी.
रॉडिन नावाच्या इटालियन शिल्पकाराचे संगमरवरातील एक तुलनेने नवीन शिल्प.......
या लेखात आपण स्त्रीशिल्पांचा धावता आढावा घेतला आहे. यातील प्रत्येक शिल्पाकडे अनेक दृष्टीकोनातून बघता येते व त्या दृष्टीकोनांतून त्याचे परीक्षणही करता येईल पण जागेअभावी ते येथे करता येणे शक्य नाही. असो. या शिल्पांविषयी अधिक माहिती आपण निश्चितच परत केव्हातरी बघू.....
आभार व संदर्भ : श्री. वर्हाडपांडे यांचे या विषयावरचे पुस्तक. व माझा कॅमेरा.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
8 Nov 2013 - 5:15 pm | प्रसाद प्रसाद
सर्व फोटो सुंदर आहेत. मोडतोड झालेली नसताना या शिल्पांचे सौंदर्य काय असेल याची फक्त कल्पनाच करू शकतो. क्र. १८ चे स्त्री शिल्प नाही आहे.
8 Nov 2013 - 7:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख अभ्यासपूर्ण आहे. पण चित्रे दिसत नाहीत.
8 Nov 2013 - 11:18 pm | पैसा
ही फक्त पोच आहे. टेराकोटापासून आधुनिक संगमरवरी शिल्पांमधल्या स्त्री मूर्तींचा आढावा अतिशय छान घेतला आहे. माहितीही अगदी भरपूर! मस्त वाटलं वाचून. कोणत्याही शब्दात तुमच्या फोटोग्राफीला पुरेशी दाद देता येणार नाही याची जाणीव आहे! :)
(मात्र वर प्रसाद यांनी म्हटल्याप्रमाणे १८ क्रमांकाच्या मूर्तीबद्दल जरा खात्री करून घ्या.)
9 Nov 2013 - 12:42 am | प्यारे१
अगदी सुंदर लेख नि प्रकाशचित्रे.
खूप छान.
(कंस वरीलप्रमाणेच. तांत्रिक चूक असू शकतो. मूर्तीतला रेखीवपणा स्त्रीत्वाची जाणीव करुन देत असला तरी थोडा आगाऊपणा करुन 'उघडा डोळे बघा नीट' असं म्हणावंसं वाटतंय! =)) )
9 Nov 2013 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा
छान! :)
अ वांतर~फोटु क्रमांक२- हृतिकच्या "जादू" ची बायको! =))
9 Nov 2013 - 12:28 am | जेनी...
=))
9 Nov 2013 - 1:07 am | शहराजाद
लेखातील काही भाग शब्दन शब्द एका उर्दू वेच्यातून घेतल्यासारखा वाटतो.
योग्य श्रेय देण्याची अपेक्षा होती.
9 Nov 2013 - 1:51 am | शहराजाद
सुधारणा- झिया मोहेद्दीन या उर्दू अभिनेत्याने वाचलेला इंग्रजी वेचा.
9 Nov 2013 - 9:52 am | पैसा
चौर्याचा एवढा गंभीर आरोप करण्यापूर्वी आपण पूर्ण लेख वाचला असता तर बरे झाले असते. असो.
10 Nov 2013 - 6:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
उचलून उचलून असा chauvinist परिच्छेद का उचलावा?
(मी लेखही वाचला आणि पाकिस्तानी/उर्दू लेखकाचं अभिवाचनही ऐकलं.)
11 Nov 2013 - 4:50 am | शहराजाद
वाङमयचौर्य हा शब्द मी वापरलेला नाही. श्रेय नीट दिलेलं नाही इतकंच म्हणायचं आहे.
'आभार व संदर्भ : श्री. वर्हाडपांडे यांचे या विषयावरचे पुस्तक. व माझा कॅमेरा.' हे वाचून पहिले दोन परिच्छेद त्या पुस्तकातून शब्दशः भाषांतरित केलेले आहेत हे कळत नाही. ते लेखाचा बेमालूमपणे भाग होणं योग्य नव्हतं इतकंच. त्या परिच्छेदाभोवती अवतरण चिन्हं टाकून, खाली कंसात इ. लिहिलं असतं तर अधिक स्पष्ट झालं असतं.
11 Nov 2013 - 7:38 am | जयंत कुलकर्णी
बरे माफ करा.... पुढच्यावेळेपासून प्रत्येक वाक्यानंतर सगळ्यांना श्रेय देत जाईन...........पण तुम्ही म्हणता त्या उर्दू अभिनेत्याला श्रेय द्यायला पाहिजे. आता कोणाला देऊ तेही सांगा व कसे द्यायचे तेही सांगा.......त्याच्या अगोदर हे संस्कृत वचन आहे. आपला अभ्यास दाणगा असल्यामुळे कृपया संस्कृत वचन कोणाचे आहे व आत्तापर्यंत किती जणांनी हे वाचले आहे व लिहिले आहे तेही शोधून सांगितलेत तर त्यांनाही श्रेय द्यावे म्हणतो. (कारण आपण त्या उर्दू अभिनेत्याखालचे कॉमेंट्स वाचले नाहीत किंवा त्याचा उल्लेखही केला नाहीत ) असो...ही शेवटची प्रतिक्रिया
13 Nov 2013 - 5:07 am | शहराजाद
असा त्रागा करण्याची गरज नाही. योग्य ठिकाणी योग्य ते श्रेय द्यावं इतकीच माफक अपेक्षा मांडली होती.
उर्दू अभिनेत्याला श्रेय द्यायला हवं असं म्हटलं नव्हतं. मला साम्य आढळलं. त्यावरून तुमच्या लेखनातले पहिले दोन परिच्छेद ओरिजिनल नाहीत एवढंच मला म्हणता येतं. तुम्हाला ते जिथे सापडले तो स्रोत तुम्ही उद्धृत करून श्रेय द्यायला हवं होतं इतकंच. ते बेमालूमपणे तुमच्या शब्द्कळेचा, कल्पनालालित्याचा भाग म्हणून यायला नको होते. कशा प्रकारे श्रेय द्यावे ते वरच्या पतिसादात मी लिहिलेच आहे- अवतरणात, तिरक्या ठशात इ इ.
ही माझी जबाबदारी नाही. मी फक्त साम्य दाखवलं. योग्य ठिकाणी श्रेय देण्याची जबाबदारी लेखक म्हणून तुमची, ती तुम्ही पूर्ण केली नाहीत हे उघड आहे. त्यानंतरचा त्रागा पाहून शूटिंग द मेसेंजर चालू आहे असं दिसतंय, तेव्हा मलाही हा विषय पुढे वाढवण्याची इच्छा नाही.
13 Nov 2013 - 7:31 am | जयंत कुलकर्णी
त्रागा नाही पण आपण काय लिहियतो आहे याचे भान आपल्याला नाही. माझी वरील पोस्ट शेवटचे हे माझे विधान मी मागे घेतो आहे. यावर आपण आता चर्चा करु शकता.
//असा त्रागा करण्याची गरज नाही. योग्य ठिकाणी योग्य ते श्रेय द्यावं इतकीच माफक अपेक्षा मांडली होत////
१ श्रेय देण्याच्या विचिध पद्धती असतात.
//उर्दू अभिनेत्याला श्रेय द्यायला हवं असं म्हटलं नव्हतं. मला साम्य आढळलं. त्यावरून तुमच्या लेखनातले पहिले दोन परिच्छेद ओरिजिनल नाहीत एवढंच मला म्हणता येतं. तुम्हाला ते जिथे सापडले तो स्रोत तुम्ही उद्धृत करून श्रेय द्यायला हवं होतं इतकंच. ते बेमालूमपणे तुमच्या शब्द्कळेचा, कल्पनालालित्याचा भाग म्हणून यायला नको होते. कशा प्रकारे श्रेय द्यावे ते वरच्या पतिसादात मी लिहिलेच आहे- अवतरणात, तिरक्या ठशात इ इ.///
//उर्दू अभिनेत्याला श्रेय द्यायला हवं असं म्हटलं नव्हतं. मला साम्य आढळलं.//
जेव्हा श्रेय दिले नाही असे म्हणायचे व ते दुसरीकडे कुठे लिहिले आहे त्याचा स्त्रोत द्यायचा याचाच अर्थ तो. शब्दच्चल करुन काय होणार."
अहो हे १००० वर्षापूर्वीचे संस्कृत फॅबल आहे. मला जेथे ते पहिल्यांदी सापडले त्या लेखकाचे नाव शेवटी दिलेले आहे.
२ प्रत्येक ठिकाणी श्रेय देणे शक्य नसते तेव्हा शेवटी ते देण्याची पद्धत गेली अनेक वर्से वापरली जात आहे किमान १०० वर्से. ती मी वापरली आहे,
३ दुसर्या परिच्छेदातील पहिले वाक्य हे सिद्ध करते की हे वाक्य मला माझेच म्हणून खपवायचे नव्हते.
असो... लेखातील छायाचित्रे आपल्याला आवडली की नाही या बद्दल दुर्दैवाने आपण काहीच लिहिले नाहीत.......
9 Nov 2013 - 2:05 pm | जयंत कुलकर्णी
हे मुळ संस्कृत आहे व ज्याने हे वाचले आहे त्याने कसलेही श्रेय न देता ते चोरले आहे असे मानायला जागा आहे......कारण त्याच व्हिडिओखाली लोक बोंबलून सांगत आहेत की हे संस्कृतमधील आहे.....असो....शहराजाद मी सहजा अशा चुका करत नाही........
13 Nov 2013 - 5:09 am | शहराजाद
ह्या लेखावरी आक्षेपात त्यामुळे फरक पडत नाही.
वरील प्रतिसाद बघावा.
9 Nov 2013 - 1:15 am | अग्निकोल्हा
स्त्रीया अन त्यांची शिल्पे दोनीही....
9 Nov 2013 - 7:33 am | जयंत कुलकर्णी
त्याने वाचले आणि मी लिहिले एवढाच फरक आहे. याचे मूळ शोधलेत तर बरे होईल........असो.. त्याने मुळ लेखकाला श्रेय दिले आहे का हा प्रश्न आहे. मी ज्याला द्यायचे आहे ते शेवटी लिहिले आहे ते कृपया वाचलेत तर बरे होईल.........
13 Nov 2013 - 5:08 am | शहराजाद
वरील प्रतिसाद बघावा.
9 Nov 2013 - 8:10 am | यशोधरा
श्री. वर्हाडपांडे ह्यांच्या पुस्तकाचे नाव काय?
9 Nov 2013 - 2:06 pm | जयंत कुलकर्णी
वुमेन इन इंडियन स्कल्प्चर.......हे त्या पुस्तकाचे नाव आहे.
11 Nov 2013 - 8:04 am | यशोधरा
धन्यवाद.
9 Nov 2013 - 8:17 am | जयंत कुलकर्णी
आत्ता मे बाहेर आहे, पण नेटवर आहे.....
9 Nov 2013 - 8:37 am | मुक्त विहारि
मला अजिबात शिल्पकला समजत नाही.
पण तुम्ही फार उत्तम रितीने ह्या शिल्पांची ओळख करून दिली.
9 Nov 2013 - 9:05 am | अमेय६३७७
सर्व फोटो आणि माहिती उत्कृष्ट. परदेशात जिथे अनेक काळ शिल्पकला केवळ धार्मिक /पौराणिक संदर्भातच अडकलेली होती तिथे भारतात मात्र या कलेद्वारे सामाजिक जीवन, चालीरीती इ.वरही भाष्य होत होते हे लक्षवेधी वाटते.
रोदाँ (रोदिन) हा फ्रेंच शिल्पकार. १८४० ते १९१७ या काळात कार्यरत असताना त्याने जाणीवपूर्वक शिल्पकलेला वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला. शिल्पे अधिकाधिक मानवी केली. त्याचे द थिंकर (हनुवटीवर हात घेऊन विचारात मग्न असा माणूस) हे शिल्प जगप्रसिद्ध आहेच.
10 Nov 2013 - 7:14 am | चित्रगुप्त
@ अमेय६३७७: रोदाँ या विख्यात शिल्पकाराची शिल्पे अद्भुत आहेत. परंतु "त्याने जाणीवपूर्वक शिल्पकलेला वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला. शिल्पे अधिकाधिक मानवी केली" याचा नेमका अर्थ काय? ग्रीक-रोमन काळापासून रेनासां, बरोक, निओ- क्लासिकल वगैरे काळातील शिल्पे 'मानवी' नव्हती काय? याविषयी अधिक प्रकाश टाकावा.
10 Nov 2013 - 2:14 pm | अमेय६३७७
मी कलाइतिहास अथवा शिल्पकला यातला तज्ञ वगैरे नाही हे आधी नमूद करू इच्छितो. केवळ वैयक्तिक आवडीमुळे आणि नावाजलेली शिल्पे प्रत्यक्ष आस्वादायची संधी मिळाली त्यानुसार मला जे वाटले ते लिहिलेय. मला ग्रीक / क्लासिकल शैलीतील शिल्पे ही भव्यता, प्रमाणबद्धता, एकेक स्नायू दाखवण्याची कलाकुसर यामुळे मनोवेधक वाटली तरी 'मानवी' न वाटता दैवत्वाच्या जवळ जाणारी किंवा 'आदर्श मानवी' भासतात. रेनेसॉं आणि पुढे बरोक काळात काही प्रमाणात बदलाला सुरुवात झाली (मायकेलँजेलोच्या पिएतामधील मेरी यादृष्टीने उल्लेखनीय आहे) पण बव्हंशी परफेक्शनवर भर राहिलाच. या तुलनेत रोदाँचे विषय आणि शिल्पे (द किस, एज ऑफ ब्राँझ, ले बूर्ज्वा द कॅले इ.)ही धार्मिक/पौराणिकपेक्षा सामाजिक संदर्भांशी जास्त निगडित होती, म्हणूनच कदाचित अधिक 'मानवी' होती असे मला वाटल्याने वरील वाक्य लिहिले आहे.
9 Nov 2013 - 12:30 pm | मनीषा
सुरेख छायाचित्रे आणि लेखन .
10 Nov 2013 - 7:06 am | चित्रगुप्त
उत्तम लेख आणि प्रतिमा.
प्राचीन भारतातील ही दैवी शिल्पे बनवणार्या शिल्पकारांचे ऐहिक जीवन कसे होते, चतुर्वर्ण समाजात त्यांचे स्थान कोणते असे, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला कितपत मिळत असे, अभ्यासासाठी ते मॉडेल वापरत का? या आणि अश्या प्रश्नांची उकल होईल, असे उल्लेख सापडतात का?
13 Nov 2013 - 10:03 pm | शशिकांत ओक
शिल्पे, ती लावण्यवतींची! असा विषय विविध फोटो व लालित्यपुर्ण लेखनाची भर असताना, प्रतिसादाच्या भोवऱ्यात अडकून काहीसा झाकोळला गेला आहे. याचा खेद वाटला. असो.
चित्रगुप्तांनी प्रकट केलेल्या शिल्पकारांच्या संबंधित विचाराणांना त्यांनी वेगळ्या धाग्यातून सुरवात केली असती तर? इतक्या खाली गेलेल्या प्रतिसादामुळे त्याविषयाची गंभीरता जरा कमी झाल्याचे वाटते तरीही...
नुकताच दक्षिणेत विविध मंदिरांच्या भेटीत नेमकी हीच उत्सुकता मला होती. हे शिल्पी कोण? त्यांनी त्या त्या कलेच्या प्राविण्यात कसे शिक्षण घेतले असावेत. सौंदर्यशास्त्रातील बारकावे व मॉडेल समोर नसताना स्त्रीदेहाचे अनुपम नमुने कसे केले असावेत याचे आश्चर्य वाटत होते. म्हैसूर या ठिकाणी अशी शिल्पे तयार करणाऱ्या एकदा कलाकाराशी संपर्क करायची संधी मिळाली होती. कमी वेळात झालेल्या संभाषणातून फक्त जुजबी माहितीवरून त्यांनी अशा शिल्पासाठी प्रशिक्षण असे काहीही मिळाले नाही. पण पुर्व अनुभवावरून मी कामे हाती घेतो. कधी कधी फोटो दिला जातो. बोलणाऱ्या कलाकाराला एकसंघ प्रचंड कातळाला 100 चाकांच्या ट्रेलरवर घालून 300-400 किमी वाहून आणून त्याचे हनुमानाच्या अति प्रचंड शिल्पात रुपांतराचे काम दिले होते. ते त्याने कसे लीलया पार केले. ते इथे पहा
14 Nov 2013 - 5:27 pm | बॅटमॅन
डिस्कव्हरीच्या डाकुमेंट्रीत कधीकाळी याबद्दल काही पाहिल्यासारखे वाटते. यात मलाही लै इंट्रेष्ट आहे, कुठे मिळाले काही तर पाहतो. अन अजून एक हाईट म्हणजे, दक्षिणेतील बर्याच देवळांतले दगडी खांब अगदी ताशीव असल्यासारखे, तुळतुळीत असतात. सकृद्दर्शनी पाहिले तर ते लेथ मशीनवर टर्न केलेला जॉब असतो अगदी तस्से दिसतात. मग इतक्या जुन्या काळी, म्ह. हजार-पाचशे वर्षांपूर्वी आपल्याकडे इतकी मोठी लेथ्स होती???? असली तर इतका मोठा जॉब त्यावर माउंट करता यायचा??? अन जर समजा नसेल तर ते पिलर्स कसे बनवले असतील???
हे सगळे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे, फेबुवरील 'अॅन्शिअंट मॉन्युमेंट्स ऑफ इंडिया-अ फोटो जर्नी' नामक अप्रतिम ग्रूप आहे. जगभरचे तज्ञ-अतज्ञ सर्व लोक विविध भारतीय देवळांचे व शिल्पांचे फटू टाकून त्यातल्या विविध गोष्टींवर चर्चा करतात. आपण तिथे जॉइन झाला तर खूप मजा येईल. धागाकर्ते श्री. जयंत कुलकर्णी हे त्या ग्रूपच्या मुख्य अॅडमिन लोकांपैकी आहेत.
14 Nov 2013 - 6:11 pm | जयंत कुलकर्णी
लेथ होते ना पण वेगळ्या पद्धतीचे. यात जॉब फिरत नसे तर जॉब भोवती टूल फिरत असे. जॉब दोन टोकाला मध्यबिंदूवर धरला जाई. आजही भल्यामोठ्या जॉबला ही पद्धत वापरतात. (निदान ३० वर्षापूर्वीपर्यंत तरी)
14 Nov 2013 - 6:21 pm | बॅटमॅन
धन्यवाद. तरीही एक प्रश्न उरतोच, की जॉबभोवती टूल फिरत असतील तर तितकी प्रिसिजन कशी मेंटेन होणार? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, इतके अॅक्युरेट काम करायचे तर टूलची मोशन कंट्रोल करायचा मेकॅनिझम बर्यापैकी सोफिस्टिकेटेड पाहिजे. पुली, बेल्ट, इ. भानगडी लागणार त्यासाठी. पुली ठीके, पण बेल्ट तेव्हा होता काय? शिवाय इतकी पॉवर आणायचे कुठून? नेटवर कुठेतरी वाचले होते की रोमन काळात लेथ वापरायचे तेव्हा पुली वापरून स्पीड आणायचे इ.इ. त्याबाबत भारतीय केसमध्ये काही ठोस पुरावे असतील तर वाचायची फार फार इच्छा आहे.
14 Nov 2013 - 9:19 pm | जयंत कुलकर्णी
कोणा जाणकाराला विचार्ले पाहिजे......
13 Nov 2013 - 10:35 am | आंबट चिंच
मुळात पुस्तकातले उतारे,चित्र, इथे तसेच्या तसे डकवायला मि.पा परवानगी देत असेल तर मीहि माझ्या आवडीच्या विषया वरिल लिखाण, इथे डकवु शकतो काय.?
13 Nov 2013 - 10:29 pm | पैसा
कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याची तक्रार कोणी केली आणि तुम्ही जर तुमचा उद्देश चर्चा/समीक्षा घडवण्याचा आहे असे सिद्ध करू शकला नाहीत तर जबाबदारी तुमची राहील.
14 Nov 2013 - 4:30 pm | प्यारे१
खिक्कुशा
- शहजादा ;)
14 Nov 2013 - 4:22 pm | अनुप ढेरे
फोटो आणि वर्णन प्रचंड आवडले !
17 Nov 2013 - 11:43 am | कंजूस
जयंतराव उपक्रम छान आहे .सांचि स्तुप तोरणावर आंब्याची डहाळी धरून उभी स्त्रीचे शिल्पाचा फोटो टाकाल का ?ऐहोळे 'दुर्ग मंदिरावरची अप्सरा' फोटोची लिँक अप्सरा आणि कलश http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Photo3100_zps8171be96.jpg