मूळ ऑनलाईन छोटे पुस्तक: एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह लँग्वेज
स्रोत: इंटरनेट
अनुवाद : निमिष न. सोनार
प्रस्तावना:
महात्मा गांधी एकदा म्हणाले होते :
" शब्द नेहमी सकारात्मक ठेवा . शब्दानुसार आपली वागणूक बनते. आपली वागणूक, वर्तन सकारात्मक ठेवा कारण तेच आपल्या सवयी बनतात . आपल्या सवयी सकारात्मक ठेवा कारण सवयी पुढे मूल्ये बनतात. मूल्ये आपलं नशीब होतात. जीवन चांगले जगण्यासाठी आपले नशीब सकारात्मक बनवा. त्यासाठी शब्द नेहमी सकारात्मक ठेवा "
आजही बाजारातली असंख्य स्व-विकास आणि व्यवस्थापन शिकवणारी सगळी पुस्तके आपल्याला मुळात एकाच गोष्ट करायला सांगतात: सकारात्मक विचार, दृष्टिकोन आणि सकारात्मक भाषेचा वापर!
आपण आपल्या नकळतपणे आपले सर्वाधिक शब्द वापरतो. त्यामुळे त्यात थोडे सकारात्मक बदल करून युक्तीने शब्द अधिक प्रभावी करता येतात आणि सकारात्मक भावना व विश्वास त्यातून व्यक्त करता येतो. शब्द ऐकण्यासाठी आहेत आणि लक्षात ठेवा लोक आपल्या बोलण्यावरून आपल्याबद्दल मत बनवत असतात. मग ते मत सकारात्मक होण्यासाठी सकारात्मक भाषा आणि शब्द आपण का वापरू नये?
आणि लक्षात ठेवा की आपण बोललेले शब्द हे जसे समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीवर परिणाम करतात तसेच ते आपल्यावरही परिणाम करतात कारण ते आपण जसे "बोलतो" तसे आपण स्वतः: सुद्धा "ऐकतो" आणि त्यामुळे आपल्या मनावर त्याचे सकारात्मक परिणाम नोंदवले जातात . आपल्या मनात भले एखाद्या घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार येत असतील तरी शक्य होईल तेवढे त्यात बदल करून बोलताना वाक्ये मात्र सकारात्मक वापरण्याचा सराव करावा. हे घरात , सामाजिक ठिकाणी आणि कार्यालयात सारखेच लागू पडते. तसा सराव केल्यास सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो आणि मग सकारात्मक विचार करायची सवय लागते आणि मग सकारात्मक भाषा आपोआप बाहेर पडते.
येथे काही शब्द समूह आहेत आपण कदाचित ते नकळतपणे म्हणत असू पण त्याऐवजी आपण कसे सकारात्मक बोलू शकतो त्याचे काही सूचित विकल्प. त्यांचा सराव करा. आजपासूनच ते वापरायची सवय जाणून बुजून करा म्हणजे ते मनावर सकारात्मक परिणाम करून हळूहळू तुमचे विचार सुद्धा सकारात्मक बनवतील.
" मी भाग्यवान आहे की ज्यामुळे हे माझे काम होवू शकले "
लक्षात ठेवा, निर्णय काळजीपूर्वक घेतल्याने आणि योग्य ते नियोजन केल्यानेच येथपर्यंत आपण आलो आहोत.
"उद्देश साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले " असे नेहमी म्हणा. भाग्यामुळे नाही.
" मी आपला अहवाल शुक्रवार पर्यंत देण्याचा प्रयत्न करतो."
शक्यता दर्शवणारे शब्द टाळा आणि म्हणा:
"मी शुक्रवार पर्यंत हे नक्की करेन "
परिणाम: असे म्हणाल्याने समोरच्यालाही आपल्याबद्दल आत्मविश्वास वाटतो आणि आपल्याला स्वतः लाही आठवत राहते की आपण शुक्रवार पर्यंत हे "नक्की" करणार आहोत.
"ओह! तुमच्या कामासाठी मला माझी इतर कामं बदलावी लागतील"
लक्षात ठेवा, "लागतील" म्हणण्यापेक्षा तेच वेगळ्या शब्दात सांगा आणि म्हणा:
"मी माझ्या इतर कामात बदल करून हे तुमचे काम करून देईन" (येथे ते काम आपण करणार आहोत हे गृहीत धरले आहे.)
"मी हे कधीच करू शकत नाही. "
लक्षात ठेवा: आपण काय करू शकता यावर मर्यादा लावू नका
म्हणा: "मी अद्याप ते केलेले नाही पण मी करू शकतो"
"मी अनेक समस्या आहेत , कुठून सुरुवात करू तेच समाजात नाही हो! "
लक्षात ठेवा: समस्या आहेत म्हणण्यापेक्षा असे म्हणा:
"माझ्यासमोर सध्या अनेक आव्हाने आहेत, एकेक आव्हानाला एकवेळेस सामोरे जाईन म्हणतो!"
"मी दोन तास त्या परिसंवादावर खर्च केले"
लक्षात ठेवा, खर्च, तोटा असे नुकसान सूचित करण्या ऐवजी "गुंतवणूक" शब्द वापरून पुन्हा वाक्य म्हणा आणि बघा काय फरक जाणवतो ते! आपण त्यातून एक सकारात्मक निर्मिती करतो.
"हे अशक्य काम आहे आणि ते शुक्रवार पर्यंत पूर्ण केले जाऊच शकत नाही"
आपण करू शकत नाही असे म्हणण्याऐवजी असे म्हणा "तुम्हाला रविवारी मी हे पूर्ण करून देतो"
"मला तर शंका वाटतेय की तुम्ही मला मदत करायला वेळ देऊ शकाल की नाही "
साशंक वाक्ये दूर ठेवा. त्याऐवजी म्हणा:
"तुमचा फक्त अर्धा तास मला हवाय. तुम्ही फ्री केव्हा असाल?"
"मला आपले पत्र आवडतात, पण शुद्धलेखन चुका भरपूर असतात."
पण चा वापर सहसा टाळा त्याऐवजी म्हणा:
"पत्र छान झाले आहे. थोडे शुद्धलेखनाचे तेवढे एकदा नजरेखालून घाला म्हणजे फायनल करून पाठवून टाकू!"
"असे नेहमी माझ्यासोबतच का घडते, काय माहीत?"
सार्वत्रिक अटी टाळा जसे नेहमी आणि सर्वकाही . विशेषतः स्वतःवर किंवा इतरांवर टीका करताना!
त्याऐवजी "कधीकधी" हा शब्द वापरा.
" मी त्या बैठकीत उपस्थित राहू शकत नाही याचे वाईट वाटते "
बोलताना नाही; वाईट वाटते काढून टाका. त्याऐवजी काहीतरी पर्यायी व्यवस्था सुचवा:
उदा: "जरी मी आपल्या बैठकीत उपस्थित राहू शकत नाही , तरी मी एक प्रतिनिधी पाठवून देतो/पर्यायी व्यवस्था करतो "
" मी बारीक असतो तर किती छान झाले असते "
जर तर करून बोलण्यापेक्षा असे म्हणा:
"मी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याद्वारे बारीक होणार आहे"
" ती जे करते ते मी करू शकत नाही . "
आपण काय करू शकता यावर मर्यादा लावू नका. त्याऐवजी सकारात्मक अपेक्षा करा आणि म्हणा -
" मी अजून प्रयत्न केला नाही म्हणून ते आजपर्यंत केले नाही आणि मी हे प्रयत्नांती करू शकतो . "
" प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला याचे उत्तर खरेच माहीत नाही"
याचा अर्थ तुम्ही इतर वेळेस प्रामाणिक नसता असा होईल . त्याऐवजी म्हणा:
" तो एक चांगला प्रश्न आहे , मला उत्तर माहीत नाही पण मी उत्तर शोधून आणतो. "
" मी केवळ त्यांचा सहाय्यक आहे. त्यांचे काम मी नाही करू शकत!"
आपण काय करू शकता यावर मर्यादा लावू नका. म्हणा:
"हे काम जरी माझ्या बॉसचे असले तरी ठीक आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो की मी या कामात किती मदत करू शकतो ते! "
"तुम्ही वाईट आहात. "
नाही! एखाद्या प्रसंगात व्यक्ती वाईट वागली तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वाईट ठरवण्यापेक्षा त्यावेळच्या त्याच्या वर्तनावर/वागणुकीवर ठपका ठेवा. म्हणा की, "तुमचे हे वर्तन अयोग्य आहे जे मला पटले नाही. पुन्हा असे वर्तन मला आवडणार नाही "
"माझ्याकडून नेहमी गोंधळ उडतो. माझ्या कामात नेहमी काहीतरी चूक राहतेच"
नाही! नेहमी नाही!
"हे काम अधिक चांगले होवू शकले नाही. पुढच्या वेळेस मी गोंधळणार नाही याची काळजी मी नक्की घेईन"
एखाद्या टीममध्ये "मी" पेक्षा "आम्ही" महत्त्वाचे असते.
"ही चूक मिस्टर अमुक मुळे झाली " असे एखादा टीम लीडर म्हणतो तेव्हा ते नकारात्मक असते.
त्याऐवजी "ही चूक टीमकडून झाली आहे खरे ! पण पुढच्या वेळेस होणार नाही याची ग्वाही मी घेतो." असे म्हणायला हवे.
असा सराव रोज करा.
उपसंहार:
तुम्ही रोज बोलता ती वाक्ये आठवून एके दिवशी लिहून काढा आणि ती वाक्ये अधिक कशी सकारात्मक बोलता येतील त्याचा सराव करा. फरक नक्की जाणवेल.
प्रतिक्रिया
7 Oct 2013 - 11:07 am | चित्रगुप्त
चांगला उपयोगी विषय आहे. आता धागालेखकाने हापिसाखेरीज घरगुती संभाषणे, मित्रांमधील गप्पा, लहान मुलांशी बोलणे, वृद्ध आई-वडिलांशी, सासू-सासर्यांशी, शेजार्यांशी वगैरे सकारात्मक कसे बोलावे, याची उदाहरणेही द्यावीत, म्हणजे लेखाला परिपूर्णता येईल.
7 Oct 2013 - 11:20 am | आतिवास
कल्पना चांगली आहे. कदाचित आपण उगीच जास्त नकारात्मक तर बोलत नाही ना हे तपासून पाहायला याची मदत होईल.
पण दरवेळी स्पष्ट चूक दाखवून देणे (एखादी व्यक्ती वारंवार त्याच चुका करत असेल तर टीम लीडरला असे बोलावे लागतेच; व्यवस्थापनात 'नरो वा कुंजरो' जास्त घोटाळा घडवून आणते) अथवा स्वतःच्या मर्यादा मान्य करणे या गोष्टी नेहमी नकारात्मक असतात असं नाही. उलट अनेकदा त्याचे सकारात्मक परिणाम होताना दिसतात. (आता हा परिच्छेद नकारात्मक वाटत असल्यास सकारात्मक कसा लिहायचा याबद्दल जरुर कुतूहल आहे - आणि मी हे उपरोधाने लिहित नाहीये.)
7 Oct 2013 - 5:34 pm | मंदार कात्रे
सहमत
7 Oct 2013 - 11:37 am | विटेकर
जवळ्पास याच विषयावर गेल्या आठवड्यात लोकसत्तामध्ये एक सुंदर लेख आला होता.डॉ.अल्बर्ट एलीस यांच्या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीवर. त्यातही सकारात्मक दॄष्टीकोन दिला आहे. पूर्ण लेख माझ्याकडे आहे. लिंक मिळाल्यास डकवीन.
7 Oct 2013 - 12:57 pm | निमिष सोनार
डॉ.अल्बर्ट एलीस यांचेवर एक पुस्तक(आत्मचरित्रात्मक)बाजारत उपलब्ध आहे. डॉ. अंजली जोशी यांनी मराठीत अनुवाद केलेले. ते मी वाचले आहे. यात विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती बद्दल विश्लेषणात्मक विचार मांडले आहेत.
ते खरेच छान आहेवाच्लेले पाहिजेत.
पुस्तकाचे नांवः मी अल्बर्ट एलिस
7 Oct 2013 - 1:01 pm | संजय क्षीरसागर
त्यामुळे भाषा बदलून परिणाम साधत नाही. हेतू निखळ असला की काम झालं!
भाषा संयोजनात खरं तर माणूस दुटप्पी होतो. म्हणजे त्याला राग आला असेल तर उगीच शब्दयोजनेत अडकल्यानं भावना व्यक्त होत नाहीत; ते निष्कारण सफोकेटींग होतं. वन लूजेस हिज ऑथेंटिसिटी.
स्वतःविषयी नेगटिव बोलणं ही तुमच्या मनात असलेल्या स्वप्रतिमेची बाह्याविभक्ती आहे. जोपर्यंत आपण स्वतःबरोबर कंफर्टेबल नाही तोपर्यंत बाह्योपचाराचा विषेश उपयोग होत नाही.
ते थोडक्यात असं आहे : शुद्ध हेतू > आंतरिक एकवाक्यता > क्लिअरकट अभिव्यक्ती > हवा तो परिणाम > आणि (परिणाम साधला नाही तरी कधीही) पश्चात्ताप नाही!
7 Oct 2013 - 5:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
कार्यालयीन कामकाजात एखाद्याव्यक्तीला न दुखावता त्याच्या चूकांची जाणीव करुन देणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मला वाटते.
प्रत्येक वेळेला कोण चूक किंवा कोण बरोबर हा वाद घालणे श्रेयस्कर नसते.
प्रत्येक कर्मचार्याला हेच वाटत असते की आपण आपल्या संस्थे करता काहितरी योगदान देत आहोत. त्याने केलेली चूकही त्याच भावनेच्या भरात झालेली असते. सकारात्मक बोलण्याने कर्मचार्याच्या या भावनेचा आदर ठेवत त्याला त्याची चूक समजावता येते.
त्या पुढेही जाउन कर्मचार्याला आपणहुन झालेली चूक कबुल करायला लावणे हेच खर्या व्यवस्थापकाचे कौशल्य आहे. दुसर्याने दाखवुन दिलेली चुक सर्वसामान्य कामगारांना नेहमीच अपमानास्पद वाटते. चूक कबुल केल्या नंतर सुध्दा ती गोष्ट परत कशी होणार नाही या साठी उपाय योजना करणे चूकीची शिक्षा देण्या पेक्षा जास्त महत्वाचे असते.
या उलट जर त्या कर्मचार्याला त्याचा व्यवस्थापक सतत चूकांची जाणिव करुन द्यायला लागला तर तो कर्मचारी एका कोशात जाउन काम करु लागतो. (ठेचलेल्या बैला सारखे वागु लागतो) व त्याच्या कडून काहि सृजनशील काम करुन घेणे अशक्य होते
आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला (मग ती कोणीही असो) न दुखावता सांगता आले तर ते केव्हाही श्रेयस्कर असते
7 Oct 2013 - 5:35 pm | मंदार कात्रे
सहमत
7 Oct 2013 - 5:36 pm | मंदार कात्रे
सहमत
7 Oct 2013 - 10:42 pm | चित्रगुप्त
संक्षिंनी जे सांगितले आहे, ते अगदी यथायोग्य वाटले. परंतु बहुशः बोलण्याची पद्धत ही लहानपणापासून ऐकलेल्या पद्धतीची नक्कल असते. हेतु वा स्वभाव वाईट नसूनही निव्वळ सवयीमुळे अयोग्य बोलले जात असते. अश्या वेळी असे प्रयत्न उपयोगी ठरु शकतात. यासाठी सतत जागरूक राहणे आवश्यक ठरते. असे सजग बोलणे फक्त कामाच्या जागी, घरी आल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या, असे घडू नये.
सदा स्वरूपानुसंधान, हे मुख्य साधुचे लक्षण, जनी असोन आपण, जनावेगळा.... समर्थ.
22 Oct 2013 - 12:02 am | निमिष सोनार
ओके