मिपा गणेशोत्सव स्पर्धेतील मिपाकरांनी केलेल्या विविध सुंदर सजावटी, मखरे पाहून मलाही कैतरी फोटू द्यावेसे वाटू लागले. पण सजावट करायच्या कामात मी अगदीच ढ आणि त्यातून उत्साहाने असे काही करायचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे स्वतः कै करायच्या ऐवजी मध्ययुगीन कालखंडात निर्मिती झालेल्या काही मंदिरांवर असलेल्या मखरांचे फोटू द्यायचा विचार केला.
मखर, याचा उगम मकर अथवा मगरापासून होतो. मगरीच्या (मकराच्या) मुखातून निघालेले तोरण म्हणजे मकरतोरण. याचाच पुढे अपभ्रंश होत जाऊन आजचे मखर तयार झाले. काळानुरूप बदल होत जाऊन हल्ली तोरणाचा उगम मूळ मकरमुख जरी फारसे दिसत नसले तरी नक्षी मात्र अगदी तशीच आहे.
१. वेरूळच्या कैलास लेण्यातील गंगा. बघा ही मकरावर आरूढ असून तिच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरतोरण आहे.
२. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील महावीराची प्रतिमा. मस्तकी असलेल्या कळसावर मकरतोरण आहे.
३. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरण
४. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरणांकित प्रतिमा
५. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील स्तंभावरील माहेश्वरी (प्रतिहारी)
६. गोंदेश्वराच्याच स्तंभावरील अजून एक मकरतोरण
७. अंजनेरीच्य विष्णूमंदिरातील वैष्णव प्रतिहार
८. अंजनेरीच्या विष्णूमंदिराच्या बाह्य भागावरील मकरतोरणात असलेला विदारण नरसिंह
९. नारायणपूरच्या नारायणेश्वराच्या राऊळातील शैव प्रतिहार
१०. भुलेश्वर मंदिरातीलल मकरतोरण सभोवती असलेला भैरव प्रतिहारी
११. भुलेश्वरातील मकरतोरणांकित मूषकारूढ विनायकी, नंदीवर आरूढ असलेली माहेश्वरी आणि मयुरारूढ कौमारी
१२. भुलेश्वरातील मकरतोरणांकित प्रेतवाहिनी चामुंडा, गजारूढ ऐन्द्री
१३. सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील अत्यंत देखणे मकरतोरण. मध्यभागी शिवतांडवनृत्य
१४. हे मकरतोरण मात्र सर्वात अर्वाचीन. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भिंतीवर. १८ व्या शतकातील.
प्रतिक्रिया
15 Sep 2013 - 12:55 pm | स्वाती दिनेश
माहिती आणि शिल्पे दोन्ही आवडले.
स्वाती
15 Sep 2013 - 12:55 pm | पैसा
मखराची कूळकथा आवडली. तोरणात मकराला स्थान द्यायचं काय विशेष कारण असावं? मकर हे गंगेचं वाहन मानलं गेलं. गजेंन्द्र मोक्षाची कथा मकराशी संबंधित. तसाच "सुंदर ते ध्यान" अभंगात "मकर कुंडले तळपती श्रवणी" असा उल्लेख विठोबाच्या बाबत आहे. यात कुंडलांनाही मकराचा आकार आहे का?
15 Sep 2013 - 3:16 pm | प्रचेतस
तोरणात मकराला स्थान द्यायचे नक्की कारण माहीत नाही बहुतेक शिल्पात येणारी लयबद्धता हेही कारण असावे किंवा मकर पवित्र मानले जात असावे. बाकी मकर हे गंगेबरोबरच वरूणाचेही वाहन आहे. बाकी विष्णूच्या कानात मकर कुंडले असतात त्यामुळे विठोबाच्याही ती असल्यास त्यात काही नवल नाही.
हा वेरूळ लेणीतील मकरारूढ वरूण
आणि ही दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक)
15 Sep 2013 - 1:07 pm | त्रिवेणी
मखराची नवीन ओळख आवडली.
15 Sep 2013 - 1:41 pm | अभ्या..
वल्लीबुवा सुरेख तोरण लावलेत तुम्ही कलादालनात. धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे.
भुलेश्वरातील तोरणावरील डिझाईन अप्रतिम, सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील तोरण पाहून हे दगडात कोरलेले मानवनिर्मित काम वाटतच नाही.
सध्या दिसणार्या मंदिरातील सोनेचांदीच्या प्रभावळीतपण मकर आहेच. पण या तोरणाच्या शीर्षस्थानी असणार्या मुखासंबंधी सांग ना. काही म्हणतात तो वीरभद्र तर काही महिष.
15 Sep 2013 - 3:17 pm | प्रचेतस
तोरणाच्या शीर्षस्थानी किर्तीमुख असते. थोडक्यात सिंहमुख.
मंदिरात येऊ पाहणार्या दुष्ट शक्तींना किर्तीमुखे रोखत असतात अशी मूळ धारणा.
17 Sep 2013 - 12:31 pm | नि३सोलपुरकर
खुपच छान माहिती दिलीत मकर आणी सिंहमुखाबाबत.
साउथ मध्ये बर्याच घरांवर/ मंदिरांवर सिंहमुखाची प्रतिमा दिसते.
अवांतर:आपल्या अभ्यानेही लावलेले आहे"सिंहमुखाची प्रतिमा "त्याने घरी गणपतीसाठी केलेल्या सजावटीवर...हो की नाही रे अभ्या.
15 Sep 2013 - 2:38 pm | प्यारे१
अॅज युज्वल छानच लेख!
15 Sep 2013 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा
+१
16 Sep 2013 - 12:52 am | मोदक
+२
15 Sep 2013 - 2:47 pm | चित्रगुप्त
व्वा. छानच.
अगदी पूर्वी वास्तु लाकडाच्या असत, त्यातील अवश्यक बाबी (उदा. लाकडी खांबांवर तुळया टाकताना दिलेले रुंद टेकू, तसेच तुळयांची भिंतींच्या बाहेर निघणारी टोके इ.) पुढे लेणी खोदताना आवश्यक नसूनही त्या खोदल्या जात. याची उदाहरणे आहेत का काही तुमच्या फोटोंमधे?
..
15 Sep 2013 - 3:23 pm | प्रचेतस
तशी बरीच उदाहरणे आहेत.
हे पहा वेरूळचे सुतार लेणे. हे चैत्यगृह आहे. पण याची रचना हुबेहूब लाकडी कामासारखी केलीय.
हा पहा अजिंठ्याचा चैत्य. इथे छतावरील लाकडी फासळ्यांची जागा अखंड कोरीव दगडी फासळ्यांनीच घेतलीय.
आणि तुम्ही वर दिलेत तशा शैलीत असणारा देवगिरी किल्ल्यातील हा दगडी सज्जा.
15 Sep 2013 - 3:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतिव सुंदर ! तुमचा जुन्या शिल्पकलेचा अभ्यास आणि त्यांच्या चित्रांचा खजिना आश्चर्यचकीत करणारा आहे.
मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय? ड्रॅगनही असाच प्रवेशद्वारावर अथवा घरावर पहारा देत दुष्ट शक्तींना पिटाळून लावतो असे तिकडे समजतात.
15 Sep 2013 - 7:41 pm | प्रचेतस
त्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. पण जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींमध्ये काही ना काही गोष्टी समान आहेत. ड्रॅगनचे मूळ कितपत जुने ते काही माहित नाही.
पण हा अजिंठा लेणीतील १७ च्या क्रमांकाच्या विहारातील हे चित्र रोचक ठरावे.
15 Sep 2013 - 4:35 pm | चित्रगुप्त
यावरून आठवले, मी बरेच वर्षांपूर्वी नाशिकची लेणी बघत एकटाच फिरत होतो, अजिबात गर्दी नव्हती. एका लहान खोलीत असणार्या दगडी पलंगावर आडवा झालो तेंव्हा अगदी सिनेमातल्या प्रमाणे मला भास झाला, की मी पूर्वी (पूर्वजन्मी??) याच खोलीत रहात असे, आणि माझी काहीतरी महत्वाची वस्तु खोलीबाहेरच्या लहानश्या खोबणीत राहून गेली होती. बाहेर येऊन बघतो तो आधी नजरेस न पडलेली लहानशी खोबण खरोखरच तिथे होती. मी यंत्रवत त्या खोबणीत हात घालून काही शोधण्याचा प्रयत्न करत राहिलो. नंतर एका मोठ्या दालनात गेल्यावर माझा तिथे भर सभेत वध झाल्याचा भास झाला...
15 Sep 2013 - 7:43 pm | पाषाणभेद
तुमी ना काका लगीच सुरू व्हत्यात.
बाकी वेगळाच विषय अन फोटोही वेगळेच. या लेणी खोदणार्यांची कमाल आहे.
दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक) असलेला फोटो तर कमाल आहे. आजकालच्या नट्या मेकअप करून चेहेरा गुळगुळीत करतात. ही तर दगडी मुर्ती असून किती गुळगुळीत चेहेर्याची आहे. कमाल आहे अगदी.
15 Sep 2013 - 9:39 pm | चित्रगुप्त
अहो खरेच घडले होते असे. चेष्टा नव्हे. पार विसरून गेलो होतो, हा धागा वाचताना एकदम आठवले म्हणून लिहिले.
15 Sep 2013 - 10:27 pm | चिगो
वल्ली म्हणजे एक कलंदर माणूस आहे.. कामाच्या रहाटगाड्यात अशी चिकीत्सक वृत्ती आणि सौंदर्यदृष्टी जिवंत ठेवायची म्हणजे काही साधेसुधे काम नाही..
धाग्यातील माहिती आणि छायाचित्रे अत्यंत आवडली..
15 Sep 2013 - 10:33 pm | sanjivanik१
फोटो अप्रतिम , माहिती पण intresting
16 Sep 2013 - 8:42 am | साती
अप्रतिम चित्रे आणि माहिती.
वल्ली, धन्यवाद.
मखरचा अर्थं खरेच माहिती नव्हता.
17 Sep 2013 - 7:13 am | स्पंदना
देवा! डोळे मिटुन परंपरा पाळणारे आम्ही मूढ! उगा वल्ली बाबा सांगतात म्हणुन नजर जाते, नाहीतर "लय भारी" म्हणा अन व्हा पुढे!
17 Sep 2013 - 12:50 pm | मृत्युन्जय
तुझ्या अभ्यासाला दंडवत. फोटोही सुरेख.
8 Oct 2013 - 6:30 pm | विटेकर
दंडवत ..
17 Sep 2013 - 6:03 pm | बॅटमॅन
अप्रतिम चित्रे!!!! खिद्रापूर, सिन्नर आणि भुलेश्वर येथली तोरणे निव्वळ थोर!!!!
वल्लीच्या अभ्यासाला एक कडक सॅल्यूट _/\_
17 Sep 2013 - 6:18 pm | निश
वल्ली साहेब, खरच ऐकदम सुंदर. तुम्ही ही व इतर अजुन तुमचे काही लेख पुस्तक रुपात संकलित का करत नाहीत. ह्यात तुम्ही दिलेली माहीती व फोटो फार ऊपयुक्त व ईतिहासाची आवड असणार्या लोकांना फार मोलाची मदत करु शकतील.
18 Sep 2013 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा
+++++१११११
8 Oct 2013 - 5:49 pm | kalpana joshi
अप्रतिम
10 Oct 2013 - 10:45 am | सुमीत भातखंडे
छान. सगळीच चित्रं सुरेख
10 Oct 2013 - 12:28 pm | सस्नेह
शिल्पे नुसती पाहणे अन संकलन -विश्लेषण यांसहित पाहणे यात किती फरक आहे हे जाणवले.
बादवे, मखराचे महत्त्व काय होते हे जाणून घ्यायला आवडेल.
5 Mar 2014 - 11:16 pm | आयुर्हित
बरीच मेहनत करावी लागलेली आहे हे सर्व ठिकाणे भेट देण्यासाठी.....
उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण लेख व एक अप्रतिम छायाचित्रे संग्रह!
धन्यवाद.
9 Mar 2014 - 7:09 am | सुधीर कांदळकर
या दर्जाची इतक्या संख्येने, एवढ्या विविध ठिकाणाहून काढलेली छायाचित्रे? वा! व्यासंग असावा तर असा!