जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
27 Aug 2013 - 5:50 pm

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

              या आधीच्या लेखांकामध्ये मी साप-विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचारपद्धती कशी असते, या विषयी लिहिले. ह्या उपचारपद्धती जश्या आहे तशाच स्वरूपात पिढोनपिढ्या चालत आल्या असाव्यात. उपचार करणार्‍या व्यक्ती स्वतः प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या नसल्याने व रोगी त्याचे म्हणणे ऐकत नसल्याने त्याने "हे मी करत नाही, माझ्या हातून देव करून घेतो" अशी भूमिका घेऊन उपचाराच्या सोबतीला पुजा-अर्चा करण्याचा देखावा निर्माण केला असावा. रोग्याची श्रद्धा देवावर असल्याने रोग्याला मानसिक बळ यातून आपोआपच मिळून उपचार अधिक प्रभावी होण्यास नक्कीच मदत झाली असावी.

              हे पारंपरिक उपचार आहेत. त्यात बदलत्या काळानुरूप संशोधन झालेले नाही. प्रयोगशीलता नसल्याने हे शास्त्र अविकसित राहिले. जे शास्त्र काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, ते फार काळ स्वतःचे उपयोगमुल्य शाबूत राखू शकत नाही. आज अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेने पारंपरिक उपचार शास्त्र मागे पडले किंवा प्रभावहीन झाले, त्याचे प्रयोगशीलता नसणे, हेच प्रमुख कारण आहे. साप चावला तर पारंपरिक उपचार पद्धतीचा उपयोग करणे धोकादायक आहेच, मात्र याचा अर्थ असाही नाही की सर्पदंशावर वैद्यकियशास्त्र फारच प्रभावी आहे. साप चावलेला रोगी ताबडतोब दाखल होऊन वेळेच्या आत उपचार सुरू झाले नाहीत तर रोग्याला हमखास वाचवू शकेल असे औषध आधुनिक वैद्यकशास्त्राकडे नाही. येथे औषधीपेक्षा आणि उपचारपद्धतीपेक्षा रोगी वेळेच्या आत उपचारस्थळी दाखल होणे, हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सर्पदंश झाला तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये वैद्यकीय उपचार हाच एकमेव पर्याय परिणामकारक आहे, यात दुमत नाही. आधुनिक वैद्यकियशास्त्र आता सर्वमान्य झालेले आहे पण सर्पदंश झाला तर इस्पितळात पोहचण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तेथे जो कोणता पर्याय उपलब्ध असेल तो स्वीकारणे रोग्याची अपरिहार्यता असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे वैद्यकियशास्त्र वगळता अन्य पारंपरिक उपचार करून घेण्याचे व्यक्तीचे पर्यायस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. या कलमामुळे विनामूल्य पारंपरिक उपचार करणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार होईल आणि काळाच्या ओघात ही पारंपरिक उपचार पद्धती नामशेष होईल. सरकार जर जनतेला आहे त्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर उपलब्ध असलेला पर्याय हिसकावून घेण्याचा हक्क सरकारला असूच नये आणि तो जनतेने मान्य करू नये. 

हास्यास्पद कलम : जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." येथे "यासारखे उपचार करणे" हा शब्द फारच संभ्रम निर्माण करणारा आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार वगळता अन्य सर्व उपचार कायद्याने बेकायदेशीर ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. कुणी कितीही म्हणोत की हा कायदा केवळ बळजबरीने अघोरी उपचार करणार्‍या मांत्रिकासाठी आहे, तर त्यात अजिबात तथ्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कलमाच्या संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की, "घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून" हे शब्द निव्वळ कुचकामी आहेत, कारण कोणताही मांत्रिक हातात तलवार, कट्यार, बिचवा, चाकूसारखे धारदार शस्त्र किंवा AK-47 अथवा स्टेनगनचा धाक दाखवून ज्याला दंश झाला आहे त्याव्यक्तीस बळजबरीने अडवून (बलात्कार करावा तसा) मंत्रतंत्र, गंडेदोरेचा उपचार करणार नाही तोपर्यंत "रोखणे/प्रतिबंध करणे" या सारखे कलमच लागू पडणार नाही, त्याअर्थी या कायद्यातले हे कलम हास्यास्पदच म्हणावे लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा अपराध्यास शिक्षा करत नाही, न्यायाधीश करत असते. शिक्षा न्यायाधीशाच्या स्वमर्जीने ठरत नसते, तर ते वकिलांच्या ऑर्ग्यूमेंटवर ठरत असते. कायदा किंवा कायद्याचे कलम अस्पष्ट किंवा संदिग्ध असेल तर न्यायप्रक्रियेत जो वकील अधिक चांगल्यातर्‍हेने युक्तिवाद करेल त्याच्या पक्षाने न्याय झुकण्याची शक्यता असते. कायदा किंवा कायद्याच्या कलमाच्या अस्पष्ट किंवा संदिग्धपणामुळेच निष्णात वकील न्याय आपल्या बाजूने झुकवून घेण्यास यशस्वी ठरत असतो. 

उपद्रवी कलम : या कलमान्वये कायदेशीर कारवाई करूनही पुरावे गोळा करणे अशक्य आहे असे पोलिस खात्याला वाटले आणि कायदेशीर कारवाई करूनही पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयात खटला दाखल करणे उपयोगशून्य आहे अशी खात्री झाली तर लाचलुचपत घेऊन तिकडेच निपटारा केला जाईल. त्यामुळे पोलिस खात्याचा अशा केसेसमध्ये उपद्रव वाढीस लागेल.

सूडबुद्धीने वागणारे कलम :  कलम ११ (क) बघा "स्वतःत विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःत पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे"

या तर्‍हेची वर्तणूक करणार्‍याला शिक्षेची कायद्यात तरतूद असणे समर्थनीयच आहे पण;

- तुला माझ्या संस्थेत नोकरी देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी संस्थाचालक लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून शिक्षणमहर्षी घोषित करायचे? 

- एखादा राजकीय नेता तुला निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी तो राजकीय पुढारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून मंत्रिपद देऊन त्याचे हात अधिक मजबूत करायचे? 

- एखादा प्रशासकीय कर्मचारी तुझे काम करून देतो असे सांगून, जर एखाद्या गरजू स्त्री सोबत तो कर्मचारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून राष्ट्रपतिपदक देऊन त्याचे सत्कार करायचे? 

              गुन्हा जर समान असेल तर असा गुन्हा करणार्‍यापैकी निवडून एखाद्याला शिक्षा देणारा कायदा बनविणे, हे "समान न्याय तत्त्वाला" छेद देणारे ठरते. अशा स्वरूपाच्या कायदा निर्मितीमुळे कायदा आपल्याशी समान न्यायाने नव्हे तर सूडबुद्धीने वागतो, अशी भावना काही निवडक जनवर्गाच्या मनात उत्पन्न होऊन त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडून कायद्याबद्दल चीड आणि द्वेष उत्पन्न होऊ शकते. हा फार गंभीर धोका आहे.

अव्यवहार्य कलम 

माझा या कायद्याच्या कलम नऊला विरोध आहे कारण;

१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते.

२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही.

३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल.

४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे.

              हा कायदा केवळ शहरी किंवा जेथे वैद्यकीयसेवा सहज उपलब्ध आहे अशा शहराच्या आसपासच्याच जनतेसाठीच लागू नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर जनसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथे अजून पिण्याचे पिण्यायोग्य पाणीसुद्धा पोचलेले नाही. काही गावात रस्तेच नाहीत. अनेक दुर्गम भाग असे आहेत की, जेथे बारमाही संचार सुविधा उपलब्ध नाही. पावसाळा सुरू झाला की काही गावात पायदळ चालत जाणे ही एकमेव संचार सुविधा उपलब्ध असते. पुर आला की काही गावांचा अन्य गावांशी आणि शहरांशी संपर्क तुटून जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर असे दिसेल की शेतात जायला पक्के रस्ते नाहीत. केवळ पांधनरस्ते, शीवरस्ते किंवा पायवाटाच आहेत. पावसाळाभर चप्पल नावाची वहाण जेथे चालत नाही तेथे अन्य वाहने चालण्याचा प्रश्नच येत नाही. गावाकडून शहराकडे जायला शेतक्र्‍यांजवळ स्वतःचे वाहन नाही. बर्‍याच गावांना अजून एसटीचे दर्शन झालेले नाही. ज्या गावात एस टी जाते तेथे एक किंवा दोनच टायमिंग आहेत. आपण २०१३ मध्ये जगत असलो तरी खेड्यातील रोग्यास घ्यायला अ‍ॅम्बुलन्स येणे, ही सुविधासंस्कृतीच अजून जन्माला यायची आहे.

              सर्पदंश झालेल्या व्यक्तीस अत्यंत तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. अनेक गावांची स्थिती अशी की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात पोचवायला किमान ४-५ तास लागू शकतात. समजा जेथे सर्पदंशावर वैद्यकसेवा उपलब्ध आहे अशा आरोग्य केंद्रापासून ७०-८० किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावात श्याम नावाच्या व्यक्तीला गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावरील शेतात सर्पदंश झाला तर दवाखान्यात न्यायचे वाहन उपलब्ध होईपर्यंत श्यामने किंवा त्याच्या नातेवाइकाने काय करायचे? जर वैद्यकीय उपचार उपलब्धच नसेल तर अन्य पर्यायी उपचार नाही करायचे? देवाचा धावा केल्याने मरणारा माणूस वाचत नाही, हे माहीत आहे म्हणून "देवा वाचव" असा धावा करण्यास मनाई करायची? पारंपरिक उपचार करायचेच नाहीत? 

              चावा घेण्यासाठी साप माणसावर चाल करून बाहेर मोकळ्या जागेत येत नसतो. झुडुपात, जमिनीच्या भेगांत, कचरा टोपलीत, कचर्‍याच्या ढिगात किंवा एखाद्या वस्तूच्या खाली बुडाशी बसलेला असतो. माणसाच्या ज्या भागाचा स्पर्श त्याला होईल त्या भागाला तो चावा घेत असतो. कधी कधी तो दिसतच नाही. अंधार असेल तर अजिबातच दिसत नाही. अशावेळी साप विषारी की अविषारी हा मुद्दाच गौण असतो. साप विषारी असेल तरीही त्याने किती मात्रेत विष शरीरात टाकले, हे कसे ठरवणार? सापाचे वजन, दंश झालेल्या व्यक्तीचे वजन यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. अशावेळी दंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार दिला तर तो कदाचित वाचेल सुद्धा. आमच्या भागात डोम्या नाग व गव्हाळ्या नाग प्रसिद्ध आहेत. हे साप चावले तर माणसाला "पाणी सुद्धा मागू देत नाही" अशी म्हण आहे. या प्रजातीचा मोठ्या आकाराचा साप चावला तर दोन तासात सर्वकाही संपून जाऊ शकते. वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत जर त्याच्यावर पारंपरिक उपचार केले तर कदाचित हा काळ आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे म्हणून काय अशा प्रसंगी हातावर हात ठेवून बसायचे? वेळेच्या आत वैद्यकीय सेवा जर उपलब्ध झालीच नाही तर डोक्यावर हात ठेवून त्याला मरताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे? 

              अनेकजण यावर युक्तिवाद करतात की, पारंपरिक उपचारांना बंदी घातलेली नाही. पण माझ्या मते ही बंदीच आहे. समजा श्यामवर पारंपरिक उपचार सुरू केले आणि श्याम दगावला. त्याला दोन मुले आहेत एक पुण्याला आणि एक मुंबईला. ते दोघेही येणार पण तो पर्यंत बाप मेला असणार. या मुलांनी जर का बापाच्या मृत्यूपश्चात ठाण्यात तक्रार नोंदवली की, माझ्या बापावर मांत्रिकाने जबरदस्ती करून उपचार केले तर पुढे काय होईल कल्पना करा. शिवाय प्रत्येक गावात गटबाजी असते. ते अशावेळी एकमेकावर सूड उगवू शकतात. सत्ताधारी पक्ष गैरफायदा घेऊ शकतो.

              वास्तवाची एवढीशी जाणीव नसणे हा दुर्गम भागातील ग्रामीण लोकजीवनाशी राज्यकर्त्यांची नाळ तुटली असल्याचा पुरावा आहे. राजकारणाबाहेरील व्यक्तींना समाजसुधारणा करायची असेल तर त्यांनी प्रबोधन करावे, सक्ती करणे म्हणजे विचारसामर्थ्याचा पराभव मान्य करण्यासारखे आहे. सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने विचार केला तर ज्यांना स्वतःच्याच विचारावर भरवसा नाही तेच सक्तीची भाषा वापरत असतात, असेही म्हणता येईल. 

सरकारला जर खरेच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू थांबवायचे असतील तर;

१) प्रत्येक गावात पक्का रस्ता तयार करावा.

२) प्रत्येक गावात अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी.

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.

४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)

कायदाच करायचा असेल तर असा करावा;

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."

              या तर्‍हेचा कायदा जर अस्तित्वात आला आणि लागू झाला तर पुरोगामी महाराष्ट्रातील बर्‍याचशा अंधश्रद्धा संपुष्टात येतील. डॉक्टर नेमणुकीच्या प्रक्रियेत अंधश्रद्धा निर्मूलनाला स्वेच्छेने उत्सुक आणि कटिबद्ध असलेल्या डॉक्टर मंडळींना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम आणखी गतिमान करता येईल.

                                                                                                                           - गंगाधर मुटे

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(समाप्त)

जीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारविज्ञानप्रकटन

प्रतिक्रिया

"जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा" या लेखमालेशी आणि त्यातही विशेषतः विषबाधेवरील औषधोपचाराशी असहमत.

तसेच उल्लेखलेले अनेक सामाजिक मुद्दे उदा. गटबाजी, सूड, कायद्याचा गैरफायदा वगैरे कायदा आला / नाही तरी अस्तित्वात राहणार आहेतच त्यामुळे कायदा आल्याने त्या समस्या आणखी वाढतील याच्याशीही असहमत.

पुढील लेखमालेला शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2013 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदक आभारी.

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

27 Aug 2013 - 10:03 pm | गंगाधर मुटे

<<< विशेषतः विषबाधेवरील औषधोपचाराशी असहमत.>>>

वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही. मग कशाशी असहमती दाखवता आहात ते कळले नाही.

रामपुरी's picture

29 Aug 2013 - 1:46 am | रामपुरी

"वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे समर्थन केलेले नाही"?
मग एवढे चार चार लेख कशावर लिहीलेत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2013 - 2:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> वैद्यकीय उपचाराच्या तुलनेत मी पारंपरिक उपचार पद्धतीचे
समर्थन केलेले नाही.

अरे देवा.....! असं काय करुन राह्यले साहेब चारही लेख पारंपरिक उपचार, गंडे, ताड़े तोड़े, चे समर्थन करणारेच आहेत सोबत आधुनिक उपचार वेळेत मिळत नाही तेव्हा असे उपचार घेण्यास हरकत नाही असे आशयाचे लेख दूर्देवाने अपेक्षाभंग करणारे ठरले.

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

29 Aug 2013 - 4:14 pm | गंगाधर मुटे

असा विपर्यास होण्याची भिती होती म्हणूनच मी लेखांक-२ लिहिला.
विषय समजून घेण्यासाठी तुलनात्मक माहिती सादर करणे म्हणजे समर्थन करणे नव्हे हो साहेब.

शिवाय ज्या गोष्टीचे समर्थन मला करायचे ते मी निर्भिडपणे केले आहे, करत राहणार आहे.

मुळात अंधश्रद्धा म्हणजे काय हाच प्रश्न अजूनही शिल्लकच आहे.
त्यासाठी अजून काही लेखांक लिहिणार आहेच. :)

आधुनिक उपचार त्याला घेता येईल, अशी तुम्ही व्यवस्थाच करणार नसाल तर अंधश्रद्धा निर्मुलनाची भाषा म्हणजे एक नवे आधुनिक थोतांड ठरेल.

समाज सुधारणा म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. आयूष्य झोकून द्यावे लागते त्यासाठी.

आधुनिक उपचार त्याला घेता येईल, अशी तुम्ही व्यवस्थाच करणार नसाल तर अंधश्रद्धा निर्मुलनाची भाषा म्हणजे एक नवे आधुनिक थोतांड ठरेल.

हां.. या मुद्द्यात तथ्य आहे. याचा अर्थ तुम्ही दिलेली मांत्रिक, अतार्किक पण रुढ असलेल्या उपचारांविषयी दिलेली तपशीलवार माहिती हे सर्व केवळ समाजात काय चालू आहे ते दाखवण्यापुरतंच होतं आणि ते तुम्हाला खात्रीपूर्वक मान्य नाही आणि आधुनिक वैद्यक हेच फॉलो करणं श्रेयस्कर आहे असं तुमचं म्हणणं आहे.. हा एक मुद्दा क्लियर झाल्याने मुख्य आक्षेप (अशा उपचारपद्धतीचं तुम्ही समर्थन करता) हा गैरसमज ठरला असं म्हणून दूर करण्यास हरकत नसावी.

आता उरला प्रश्न वरील विधानाचा. हो.. मेनस्ट्रीम मेडिसिनची सोय न करता चालू उपचार घेण्यास कायद्याने बंदी घालणं म्हणजे साधारण जागोजागी सार्वजनिक मुतार्‍या न ठेवता रस्त्यात मूत्रविसर्जनाला दंड करणं किंवा मैलभर अंतरावरही कचरापेटी न ठेवता कचरा टाकण्याबद्दल दंड करणं अशातला प्रकार आहे असं तुमचं म्हणणं आहे. ते काही प्रमाणात रास्त आहे.

फक्त त्यावर एकदोन मुद्दे मनात येतात ते असे:

१. उपचार घेण्यावर कायद्याने बंदी नसून अंधश्रद्धेवर बेस्ड उपचार (रुग्णाला अन्य मार्गापासून रोखून) करण्यावर आहे.
२. बहुतांश केसेसमधे या उपचारांनी उपायापेक्षा अपायच जास्त भयंकर होतो. अशा वेळी एकवेळ रुग्ण स्वतःहून बरा होईल पण या उपचारांनी तो बिघडतो (मानसिक झटक्यांवरचे भयानक उपाय वगैरे) किंवा आता जमत नाही म्हणून शेवटी झक मारत आधुनिक उपचारांपर्यंत पोहोचतो तेव्हा कालापव्यय आणि "त्या" आधीच्या उपायांनी झालेले दुष्परिणाम / कॉम्प्लिकेशन्स केस आणखी बिकट करुन ठेवतात.

आधुनिक सोय उपलब्ध नाही म्हणून कायच्याकाय अशी जी लोकल सोय आहे ती वापरणं हा पर्याय होऊ शकत नाही. अगदी वाईटात वाईट सिनारियो गृहीत धरुनही आधुनिक उपचार जिथे आहेत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न हाच अशा वेळी शहाणपणाचा आहे.

त्याउपर कोणाला मुळी, धूर किंवा आणखी काही उपचार विश्वासाने करायचेच असतील तर त्याला खरोखर करु द्यावेत आणि जे काय बरेवाईट होईल ते भोगू द्यावे.. याखेरीज काय बोलणार?

थोडं स्केल्ड अप उदाहरण देतो.. कबूल आहे की मी शहरात राहतो, मी आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे. इथे भरपूर मेडिकल सेवा आहेत.. पण तरीही समजा.. समजा.. मला हार्ट अ‍ॅटॅक आला. सुरुवातीचे अ‍ॅट्रोपिन की काहीबाही देऊन झाल्यावर डॉक्टरांना समजलं की बुवा या प्रकारच्या झटक्यावर होणारी ट्रीटमेंट आपल्या उपनगरात होत नाही.. त्यांनी माझ्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही बांद्र्याला लीलावतीमधे घेऊन जा किंवा माहीमला हिंदुजा..

अशा वेळी अँब्युलन्स मागवली पाहिजे.. तीही श्वसनयंत्रणावाली.. त्यातून तास-दोन तास प्रवास.. पुन्हा घरच्यांनी माझं उपनगर सोडून तिथे यायचं..

माझ्याकडे खर्च करण्याची क्षमता असली तरी माझ्या सध्याच्या अवस्थेत इतक्या लांब जाणं ही एक वाढीव पीडाच आहे. अशा वेळी उदा. विरारला किंवा बोरिवलीला ते उपचार उपलब्ध असलेलं हॉस्पिटल सरकारने उपलब्ध केलेलं नाही म्हणून मग विरारमधे किंवा बोरिवलीमधे जे काही आहे तेच करा बुवा.. जळवा लावा हवं तर पण माझ्यावर काहीतरी उपचार कराच.. असं म्हणणं शहाणपणाचं आहे का?

उदाहरण खेडेगावातलं नाही. गरीबाचं नाही. किमान वैद्यकीय सुविधांची ओढाताण नाही. पण त्यातली मजबुरीची पातळी अगदी समकक्ष आहे.. विचार करुन पहा. अगदी कॉमनली घडणारं उदाहरण आहे.

गंगाधर मुटे's picture

29 Aug 2013 - 10:37 pm | गंगाधर मुटे

माझ्याकडे खर्च करण्याची क्षमता ................अगदी कॉमनली घडणारं उदाहरण आहे.

हे ऐच्छीक आहे ना? सजीव कोणताही असो तो त्याला उपलब्ध असलेल्या पर्यायामधून त्याला सर्वोत्तम वाटेल असा पर्यायच निवडत असतो. हे तत्व निसर्गसिद्ध असल्याने स्विकारण्यास अडचन असू नये. तुरळक बदल सोडले तर सगळे परिवर्तन हे पर्यायांच्या उपलब्धतेतूनच आले आहेत.

अडाणी माणसेसुद्धा "योग्य ते स्विकारण्यास" सक्षम असतात, असा विश्वास असला पाहिजे.
माझे म्हणणे एवढेच की, सक्तीची अजिबात गरज नाहीये.

आणखी एक उदाहरण सांगतो. लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही, विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही, आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही. उद्या ह्याच बाबीवर सरकारने कायदा आणून उघड्यावर संडासला मनाई केली तर मी त्या कायद्याला विरोध करणार.
पुन्हा आंतरजालावर एकटा पडणार. तुम्ही सर्व मला संडासचे फायदे आणि रोगराईनिर्मूलनाचे महत्व समजावून सांगणार...! :)

मोदक's picture

29 Aug 2013 - 11:41 pm | मोदक

आणखी एक उदाहरण सांगतो. लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही, विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही, आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही

सन २००५ साली सरकारने एक योजना आणली होती. साधारणपणे ४००० ते ६००० रूपयांचा संडास बांधायला सरकार अनुदान देणार. फक्त इच्छुक कुटुंबाने सरकारकडे १८०० रू. भरायचे होते. किती जणांनी लाभ घेतला व खरोखरी संडास बांधले असावेत..? मी पाहिलेल्या ७ ते ८ गावांमध्ये ~ २०% ठिकाणी प्रत्यक्ष संडास बांधले गेले. बाकी अनुदानाचा हिशेब "विहीरी चोरीला गेल्याप्रमाणे संडास चोरीला गेले" म्हणून उघडकीस येईल. अशा अनुदानात्मक योजनेनंतर जर उघड्यावर संडासला बसण्यास मनाई करणारा वटहुकूम आला तर..? तरीही विरोधच करणार का..?

तसेच गावामध्ये संडाससाठी ६ बाय ६ फूट जागा उपलब्ध नाही या गोष्टीवर मी विश्वास ठेवायला तयार नाही. (फक्त संडाससाठी चारही भिंती ९ इंची बांधूनही ६ बाय ६ फूट हेही मोठे माप आहे)

पुन्हा आंतरजालावर एकटा पडणार. तुम्ही सर्व मला संडासचे फायदे आणि रोगराईनिर्मूलनाचे महत्व समजावून सांगणार...

शेतकर्‍यांविषयी बाकी लेखांच्या बाबतीत तुम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला असतानाही केवळ एका लेखमालेवरून तुम्ही हे विधान करणे पटले नाही.

आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा तेच करतात.

१. हा प्रकार काही फक्त गरिबांनाच लागू नाही. सरसकट मनुष्य जातीलाच लागू आहे. जेवढी उदाहरणे तुम्हाला गरीबलोकांमध्ये सापडली त्याच्या दहापट उदाहरणे आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकांचीही मी देऊ शकतो. हा एकंदरित मनुष्यस्वभावच असल्याने ही कसोटी फक्त गरिबांना लावण्यात काहीही तथ्य नाहिये.

२. प्रत्येक माणसाचा कामे करण्यासाठी त्याने एक प्राधान्यक्रम आखलेला असतो. जर एखाद्या गरिबाने पहिले प्राधान्य मुलीचे लग्न, दुसरा प्राधान्यक्रम मुलाचे उच्चशिक्षण असा निश्चित केला असेल तर त्याच्यासाठी "स्वतःला राहण्यासाठी घर" ही बाब प्राधान्यक्रमात फार मागे ढकलली जाईल.
अशा वेळी शासन त्याला लग्न किंवा शिक्षण सोडून घर देत असेल तर तो त्याला संधी मिळताच मिळालेले घर विकून त्याचे प्रथमस्थानी असलेले प्राधान्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच.
आणि नेमके हे झालेले आहे. अनेक लोकांनी मिळालेले आवास विकले हे खरे आहे.

मुलीच्या लग्नासाठी आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचे घर किंवा शेत विकण्याची वेळ या समाजघटकांवर येते, हेही खरे आहे.

३. पण जेव्हा यासंदर्भात फक्त ग्रामीण माणसालाच दोष देऊन त्याचेवर दोषारोपन केले जाते, तेव्हा खरे व्दंद सुरू होते.
उदा. कल्पना करा की, दुधाची आणि दही-तुपाची गरज सर्वांनाच आहे म्हणून मुंबई-पुण्यातल्या प्रत्येक कुटंबाला सक्तीने दर चार व्यक्तिमागे एक गाय आणि एक म्हैस शासनाने विनामुल्य १०० टक्के अनुदानावर दिली तर काय होईल?

निदान ९५ टक्के लोक त्या विकून टाकतील. जरी ते मुंबई-पुण्यातले आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोक असले तरीही. कारण तेथे प्रत्येक कुटूंबाने गाय/म्हैस पाळणे अव्यवहार्य ठरेल.

लोकांचं जाऊ द्या पण वारवांर बोजवारा उडालेल्या योजना शासन पुन्हा पुन्हा घेऊन येते. त्यापासून काही धडा घेऊन नेमकेपणाने व्यवहार्य भूमिका घेत नाही तेव्हा या देशातल्या शासकांना, तज्ज्ञांना, समाजधुरिनांना उद्देशून एवढे नक्कीच म्हणता येईल की त्यांचे एकंदरीत वागणे "हम नहीं सुधरेंगे." असेच असते.

पुण्या-मुंबईतील लोकांना संडास बांधण्यासाठी शासनाने अनुदान दिले काय? नाही ना? त्यांनी स्वकष्टाच्या मिळकतीतून बांधलेत. गरिब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदल्या द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल.

मोदक's picture

30 Aug 2013 - 10:05 pm | मोदक

आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा तेच करतात.

जोरदार असहमत!!!!

मुटे सर.. आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकं चुका करतात म्हणून खेड्यातील लोकांच्या चुका क्षम्य / चुकाच नाहीत - या मुद्द्याशी संपूर्णपणे असहमत.

१. हा प्रकार काही फक्त गरिबांनाच लागू नाही. सरसकट मनुष्य जातीलाच लागू आहे. जेवढी उदाहरणे तुम्हाला गरीबलोकांमध्ये सापडली त्याच्या दहापट उदाहरणे आर्थिकसंपन्न आणि उच्चविद्याविभूषित लोकांचीही मी देऊ शकतो. हा एकंदरित मनुष्यस्वभावच असल्याने ही कसोटी फक्त गरिबांना लावण्यात काहीही तथ्य नाहिये.

तुम्ही संडासचे उदाहरण दिले म्हणून मी वस्तुस्थिती सांगीतली. गरीब / श्रीमंत भेदाभेद कुठेही केलेला नाही. तस्मात "ही कसोटी फक्त गरीबांनाच लावण्यात तथ्य नाही" या मुद्द्यातच मुळात तथ्य नाहीये.

तुमचे उदाहरण,

लोकांकडे घरात संडास बांधायला जागा नाही. विकत घ्यायची म्हटले तर विकाऊ जागा उपलब्ध नाही

किमान जागा उपलब्ध आहे - जागा विकत घेण्यासंदर्भात "आर्थिक परिस्थिती" बाबत - कल्पना नाही.

आणि सरकार म्हणते गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही. उद्या ह्याच बाबीवर सरकारने कायदा आणून उघड्यावर संडासला मनाई केली तर मी त्या कायद्याला विरोध करणार.

अनुदानात्मक योजनेतून सरकार बदल घडवू इच्छित आहे किमान याबाबतीत कोणी असहमत नसावे. त्याचप्रमाणे, नाक दाबले की तोंड उघडते या उक्तीप्रमाणे "गावाबाहेर उघड्यावर संडासला बसायचे नाही" हा कायदा आला की लोकं घरात संडास बांधतील व सरकारला जे साध्य करायचे आहे ते प्रत्यक्षपणे / अप्रत्यक्षपणे साध्य होईलच!

गरिब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदल्या द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल.

तुमचा आशावाद कौतुकास्पद आहे परंतु कष्टाचा योग्य मोबदला मिळाला की सर्व गोष्टी त्रेतायुगातील रामराज्याप्रमाणे सुरळीत होतील हा आजच्या घडीला भाबडा आशावाद वाटतो आहे.

तुमचा नक्की मुद्दा काय आहे..? फक्त अनुदान, गरीब / श्रीमंत इतक्या मर्यादेत न राहता तुमची या चर्चेसंदर्भातली नक्की भुमीका सांगता का..?

बाळ सप्रे's picture

30 Aug 2013 - 12:12 pm | बाळ सप्रे

कसलीही सक्ति सरकारने करायची नाही. सरकारने घर द्यावं, रोजगार द्यावा, अन्नपाणी पुरवावं, आरोग्यसुविधा, संडासला जागा ..... पण मी काही हातपाय हलवणार नाही.. आपणहून civilized होण्याचा कुठलाही प्रयत्न करणार नाही.. सरकारने चांगल्या हेतुने केल्यास तो हाणून पाडणार..
ही वृत्ती दिसुन येते यातून..

गंगाधर मुटे's picture

30 Aug 2013 - 12:30 pm | गंगाधर मुटे

<<<< गरीब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदला द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल. >>>

श्रम काय हातपाय न हलवल्याने होतात?

गंगाधर मुटे's picture

30 Aug 2013 - 12:34 pm | गंगाधर मुटे

मी "गरीब लोकांसाठी सुद्धा अशा भिकेच्या योजना राबवण्याऐवजी त्याला त्याच्या श्रमाचा हक्काचा मोबदला द्या. म्हणजे आपोआप बदल घडून येईल."

असे म्हटले आहे. म्हणजे त्याला कमी मजूरी देऊन त्याचे शोषण थांबवा. श्रम काय हातपाय न हालवल्यानेच होतात?

बाळ सप्रे's picture

30 Aug 2013 - 1:20 pm | बाळ सप्रे

म्हणजे आपोआप बदल घडून येईल

ज्यांना हक्काचा मोबदला मिळतोय अशा सगळ्यांनी संडास बांधलेत असं वाटतय का तुम्हाला??
गावाचे पाटील सरपंच लोकसुद्धा उघड्यावर बसतात.

श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे यात वाद नाही पण तो मिळाल्यावर सगळं आपोआप घडेल या भ्रमात राहु नका. काही ठिकाणी सक्ती करावी लागते.. त्यात थोड्यांवर अन्याय होतही असेल पण कायदा वगैरे करताना एकंदरीत समाजाच भलं होत असेल तर करावा असच वाटतं.. कुठलाच कायदा एवढा foolproof असु शकत नाही..

मोदक's picture

1 Sep 2013 - 10:39 pm | मोदक

कुठलाच कायदा एवढा foolproof असु शकत नाही..

सहमत.

रामपुरी's picture

30 Aug 2013 - 10:43 pm | रामपुरी

वाट्टेल ती उदाहरणे, अक्षरे ठळक करणे इत्यादी गोष्टी "माझाच मुद्दा बरोबर(चूक लक्षात आली तरी)" हे सिद्ध करण्याची धडपड दर्शवितात काय?

रामपुरी's picture

30 Aug 2013 - 10:47 pm | रामपुरी

पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलन आणि संडास ची तुलना नंतर संडास आणि गाई म्हशी पाळण्याची तुलना..
काय वाट्टेल ते चालू आहे. आता पुढचं उदाहरण कुठलं येतंय याची उत्सुकता आहे.

आनन्दा's picture

27 Aug 2013 - 6:36 pm | आनन्दा

आखाती देशांमध्ये अशा काहीतरी अर्थाचा कायदा आहे, की कोणत्याही वैद्यकीय पदवीधारक नसलेल्या व्यक्तीने प्रथमोपचारही करू नयेत.. प्रथमोपचारात काही चूक झाल्यास, किंवा कर्मधर्मसंयोगाने ती व्यक्ती दगावल्यास त्याची जबाबदारी त्या प्रथमोपचार करण्यार्‍या व्यक्तीवर येते.. म्हणून इमर्जन्सीमध्ये लोक इमर्जन्सी हेल्प लाइन ला फोन करतात, पण स्वतः मदत मात्र काही करत नाहीत, असे ऐकले होते.

गंगाधर मुटे's picture

27 Aug 2013 - 10:06 pm | गंगाधर मुटे

अहो, इथे तर तसा कायदा नाही पण सरकारी दवाखान्यात भरती केल्यानंतर पेशंटला हात लावायला डॉक्टरला काही तास लागतात. त्यानंतर औषधोपचार.

बाबा पाटील's picture

28 Aug 2013 - 5:29 pm | बाबा पाटील

मी स्वत: सरकारी दवाखान्यात काम केले आहे,तुटपुंजक्या साधनसामुग्रीवर जिवाचे रान करतात सरकारी डॉक्टर ,भयानक दबाव असतो सायबा,एका पेशंट्ला जर चुकुन काही झाल्,तर कधीही हॉस्पीटल व डॉक्टर दोघांची तोडफोड होते.वरिष्ठ अधिकारी,ज्याला वैद्यकिय पेशाविषयी घंटा काही माहिती नसते, असा प्राणी डायरेक्ट सिव्हील सर्व्हीस म्हणुन बॉस म्हणुन आलेला असतो,गावचा सरपंच ,पाटील्,गावतला टग्या,तहसिलदार,बि डी ओ,पंचायत समिती सदस्य,जि.परिषद सदस्य,तालुक्याचा आमदार्,टी एम ओ,डी डी एच ओ,डी एच ओ,विविध सामाजिक संघटना,एनजीओ आणी सगळ्यात वाईट प्रकार मिडिया, एतके सगळे नवरे त्या सरकारी डॉक्टरला असतात्,तरीही तो त्याच काम करतच असतो,
मी पाहिलय्,तालुक्याच्या आमदाराच्या आणी जिल्हा परिषद सदस्याच्या वादात एका अतिशय प्रामाणीक डॉक्टरची अक्षरशः वाताहात झालीय,
इंर्ट्नशिप मध्ये कित्येकदा सलग ४८ ते ६० तास काम करुन कित्येक जिव वाचवलेत्,सायबा त्या ठिकानी स्वतः काम करुन बघा मग समजेल. आणी आम्ही शिकाउ डॉक्टरच नाही तर सगळा स्टाफ अगदी मामा पासुन स्वतः सुपरिडेंट पर्यंत सगळेच राबत होते, एकदा फक्त रुग्नालयात जागाच शिल्लक नव्ह्ती,म्हणून डिलेव्हरीची पेशंट जिल्हा रुग्नालयात पाठवली तर्,पेशंट नातेवाइकांनी नेतो म्ह्णुन सांगितले व घरी घेउन गेले, घरीच डिलेव्हरी कुठल्यातरी सुइणीने केली,त्यात ते बाळ दगावले,यावर एका गावच्या राजकारण्याने सरकारी डॉक्टरने निष्काळजीपणा केला म्हणुन केस टाकली,मिडीयाने हे प्रकरण उचलुन धरले,आर एम ओ,सस्पेंड, सुपरिडेंटची अत्यंत गैरसोइच्या ठिकाणी बदली तरी शिव्या सरकारी डॉक्टरलाच...... लय म्हणजे लयच भारी.....

गंगाधर मुटे's picture

28 Aug 2013 - 6:22 pm | गंगाधर मुटे

एका अतिशय प्रामाणीक डॉक्टरची अक्षरशः वाताहात झालीय

अशी उदाहरणे आहेत. नाही असे नाही. पण फार कमी आहेत हो. शेवटी तो माणूसच असतो.
पण सर्व माणसे तरी कुठे सारखी असतात?
दोन वर्षापूर्वी एक सिरियस पेशंट नागपूरच्या सरकारी मेडीकलमध्ये भरती केला होता. विलंब किती व्हावा तपासायला? अहो सात तास! डॉक्टर काय करत होते तर टेबलवर काम. मी पोचल्यानंतर डॉक्टरला जाब विचारला, तेव्हा डॉक्टरचे हातपाय हललेत.
ग्रामीण भागात तर विचारूच नका. बहुतांश लोक खिशात पैसे असेल तर खाजगी दवाखाने पसंत करतात, याचे काही अंशी हेच कारण असते.

पण सर्व डॉक्टर असेच असतात, असे मला म्हणायचे नाही. प्रमाण ५० टक्क्याच्या वर आहे, हे नक्की.

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 6:48 pm | अनिरुद्ध प

+१११ मुटे काकान्शी सहमत.

विकास's picture

27 Aug 2013 - 7:59 pm | विकास

"कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे."

अधोरेखीत भाग हा कळीचा मुद्दा आहे. जर कोणी वैद्यकीय उपचार घेत असताना इतर श्रद्धेने (अथवा अंधश्रद्धेने) मंत्रतंत्र, जपजाप्य वगैरे करत असेल तर कुणाचीच काही हरकत नसावी.

आत्ता एक उदाहरण आठवले म्हणूनः कुलीच्या सेटवर अमिताभला अपघात झाला आणि त्या वेळेस तो मरणाच्या दारात होता. डॉक्टरांचे अथक प्रयत्न एकीकडे चालू असताना, अमिताभचे चाहते सर्व देवांना आवाहन करण्यापासून ते मृत्युंजय यज्ञ/जप वगैरे पण करत होते. आता बच्चन फॅमिलीने वैद्यकीय उपाय सोडून जर नुसताच मृत्युंजय यज्ञ/जप वगैरे करायचा असे ठरवले असते तर काय झाले असते?

मात्र अजून पर्यंत एका प्रश्नाचे उत्तर मिळत नाही: वटहुकूम कोठे आहे आणि त्याची भाषा काय आहे? कारण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संस्थळावर शासननिर्णयात (जी आर मधे) तसेच त्यावर ज्यांनी सही केली त्या राज्यपालांच्या संस्थळावर त्याच्या मागचे पुढचे सर्वप्रकारचे दुवे मिळत आहेत पण अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही दिसत नाही. :(

प्रसाद गोडबोले's picture

27 Aug 2013 - 10:24 pm | प्रसाद गोडबोले

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."

....एवडे शिक्षण घेवुन , ग्रामीण भागात राहुन , सदोष मनुष्यवधाचे रिस्क डोक्यावर घेवुन काम करणार्‍या अशा डॉक्ट॑रला किती पगार द्यायचा लोकांचा जीव वाचवण्यासाठी??

गंगाधर मुटे's picture

27 Aug 2013 - 11:29 pm | गंगाधर मुटे

म्हणजे याचा अर्थ असा होईल की, सर्पदंश झालेला व्यक्ती वाचवणे हा सरकारचा एजेंडाच नाहीये. फक्त अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून मांत्रीकला तुरुंगात डांबणे तेवढे महत्वाचे.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2013 - 12:00 pm | प्रसाद गोडबोले

एक छोटीशी आकडेवारी

मांत्रिकाने सर्पदंशातुन बर्‍या केलेल्या किती व्यक्ती आपण पाहिल्या आहेत ? अन दगावलेल्या किती व्यक्ती पाहिल्या आहेत ?

( अवांतर : बाकी सरकारचा काय अजेंडा आहे मला माहीत नाही पण ह्या असल्या सगळ्या मांत्रिकांना तुरुंगात डांबलेच पाहिजे साल्या असल्या लोकांमुळे हिंदु धर्म बदनाम होतो . राष्टीय स्वयंसेवक संघानेच श्रध्दा सबलीकरण संघ अशी एक छोटी संस्था काढावी अन हिंदु धर्माच्या नावाखाली असले काहीबाही खपवणार्‍यांना चोप देवु काढावा )

मालोजीराव's picture

28 Aug 2013 - 3:00 pm | मालोजीराव

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."

:))

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Aug 2013 - 11:50 pm | लॉरी टांगटूंगकर

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास ??? हजर राहण्याची सक्ती करावी.

४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)

कायदाच करायचा असेल तर असा करावा;

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."

हा परिच्छेद अशक्य डोक्यात गेला..

आणि एक वेळ मानलं तुमचं म्हणणं, तर या केस मध्ये डॉक्टरच्या कलमाने अंधश्रद्धा कशा कमी होतील?

गंगाधर मुटे's picture

28 Aug 2013 - 10:32 am | गंगाधर मुटे

हा परिच्छेद अशक्य डोक्यात गेला.

हे सर्व कठीन कार्य आहे, हे मान्य आहे. मग निष्कारण अंधश्रद्धा निर्मुलनाच्या गोष्टी तरी करून काय उपयोग आहे. समाज सुधारणा म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. आयूष्य झोकून द्यावे लागते त्यासाठी.

डॉक्टरच्या कलमाने अंधश्रद्धा कशा कमी होतील?

चांगल्यात चांगला पर्याय निवडायचा प्रयत्न करणे हा निसर्गतः मानवी स्वभाव आहे. त्यामुळे उपलब्ध असेल तर लोक चांगलाच पर्याय निवडतील.

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Aug 2013 - 11:18 am | लॉरी टांगटूंगकर

डॉक्टर आणि मांत्रीक एकमेकांचे पर्याय असू शकत नाहीत या ग्रुहीतकावर प्रतिसाद दिला होता..

उद्दाम's picture

28 Aug 2013 - 9:33 am | उद्दाम

मुटेसाहेब, या विषायावर बरेच लिहायचे आहे.

१. तुम्ही लिहिले आहे. साप चावला की एक तासात उपचार घ्यावेत, अन्यथा माणुस मरतो. ते खोटे आहे. भारतात विषारी सापांच्या फक्त चार जाती आढळतात. कोब्रा, फुरसे ( कोकणात) , मण्यार आणि समुद्रसाप. इतर जाती बिनविषारीच असतात. त्यावर गंडेदोरेच काय, काहीही केले / न केले तरी फरक पडणार नसतो.

२. या चारही सापांच्या विषाची लक्षणे भिन्न भिन्न असतात. मी कोकणात मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले आहे. एक वर्षाच्या ड्युटीत साधारणपणे १०० म्हणजे आठवड्याला दोन रुग्ण ट्रीट केले आहेत. कोकणात साप चावालेलेले रुग्ण खूप लांबून खूप उशीराने दवाखान्यात पोहोचतात. कितीतरी वेळा ज्या पायाला साप चावला त्याच पायाने काही मै चालून मग ते दवाखान्यात पोहोचतात. यामुळे विष आणखी वेगाने शरीरात पसरते. पण तरीही ते सर्पदंशाच्या इण्जेक्शनने बरे होतात.

३. भारतात जे सर्पदंशाचे सरकारी औषध मिळते ते पॉलि वॅलंट प्रकारचे आहे. म्हणजे भारतात जे चार साप आहेत, त्या सगळ्या प्रकारांच्या विषावर चालेल असे एकच औषध, जे सर्वांच्या मिश्रणातून तयार केले जाते. त्यामुळे कुठलाही साप चावला तर कुठल्याही दवाखान्यात हेच एक औषध असते.

हे औषध म्हणजे पांढरी भुकटी असते. एका बाटलीत. त्यात दहा मिली पाणी मिसळून औषध तयार करायचे आणि डायरेक्ट शिरेत किंवा सलाइनात द्यायचे.

या बाटलीला वायल म्हणतात. फुरसे चावले तर एक किंवा दोन वायल लावल्या की पेशंट बरा होतो.

पण कोब्रा चावला की अशा ५० - ५० वायलही लागू शकतात. कोब्रा चावल्याची जखमही लवकर सुजून जास्ती लवकर सडते. म्हणून त्याचीही खबरदारी घ्यावी लागते.

सर्पदंशाच्या या इंजेक्शनची अगदी गंभीर रिअ‍ॅक्शन येऊ शकते. म्हणजे पेशंट त्या रिअ‍ॅक्शनने जाग्यावरच मेला इतपत. त्यामुळे आधी हे इंजेशन एक थेंबभर पेशंतच्या हातावर टोचून अर्धा तास थांबायचे असते. त्याने इंजेक्शनच्या जागी सूज, खाज, लालसरपणा नाही झाला, तरच आता रिअ‍ॅक्शन येणार नाही असे मानून पूर्ण डॉस देता येय्तो.

कधी कधी या टेस्ट डोसनेही माणुस मरू शकतो.

म्हणून पेशंट, पेशंट्चे नातेवाईक यांची लेखी परवानगी घेऊनच आणि कोब्रा वगैरे असेल तर आय सी यु तच उपचार करावे लागतात.

अँटी स्नेक वेनम दिल्यावर डेक्झा, एविल अशी इंजेक्शने तरीही रिअ‍ॅक्शन येऊ नये म्हणून द्यावी लागतात.

विषाने मेंदूत रक्तस्त्राव, छातीचा पॅरॅलिसिस झाला तर वेंटिलेटर उपचार करावे लागतात. आम्ही मेडिकल कॉलेजात शिकत असताना सरकारी सिविल हॉस्पिटलातही वेंटि नसायचे. मग असे अचानक सिरियस झालेले पेशंट खाजगी रुग्णालयात आम्हीच शिफ्ट करायचो.

आता सुदैवाने वेंटि उपलब्ध आहेत.

सापाच्या विषाने किडनी फेल झाली तर डायलिसिस करावे लागते.

हे सगळ्म घरी करण्याइतकं सोपं नाहे, अशी अपेक्षा करतो.

४. कोकणातले साप फुरसे असल्याने आणि त्याला १-२ वायल पुरत असल्याने अगदी प्राथमिक केंद्रातल्या डॉक्टरलाही हे उपचार करता येतात. एक दिवसात सलाइन संपले की दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी पेशंत घरी जातो.

देशावरले विषारी साप हे मुख्यतः कोब्रा, मण्यार असल्याने आणि त्यांचे कंप्लिकेशन्स आणि डोस मोठा असल्याने प्राथमिक केंद्रात उपचार होऊ शकत नाही. वर लिहिलेले आहेच . सिविल किंवा मेडिकल कॉलेजच गाठलेले चांगले.

५. तुमची कुठली तरी देवी साप. विंचू यावर आशिर्वादाने उपचार करत असेल तर आनंदच आहे. मग तिला विचारा की फक्त साप आणि विंचू दंशावर तुझी स्पेश्यालिटी कश्याला? सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील.

( .... आणि मग तुमचे असले धागेही आपोआप बंद होतील. )

गंगाधर मुटे's picture

28 Aug 2013 - 10:41 am | गंगाधर मुटे

तुम्ही लिहिले आहे. साप चावला की एक तासात उपचार घ्यावेत, अन्यथा माणुस मरतो. ते खोटे आहे.

इथे क्रित्येक माणसे मरताना मी डोळ्यानी पाहिली आहेत आणि तुम्ही म्हणता खोटे आहे. नावा-गावासहीत तपशीलवार मृतांची यादी टाकू इथे?

तुमची कुठली तरी देवी साप. विंचू यावर आशिर्वादाने उपचार करत असेल तर आनंदच आहे. मग तिला विचारा की फक्त साप आणि विंचू दंशावर तुझी स्पेश्यालिटी कश्याला? सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील.

मी असे काहीही म्हटले नाही किंवा त्याचे समर्थनही केलेले नाही. तरी तुम्ही माझ्यावर आरोप ठेवताच ना! अंधश्रद्धेचे आधुनिक क्वालिफाईड स्वरूप आहे हे.

दादा कोंडके's picture

28 Aug 2013 - 11:54 am | दादा कोंडके

इथे क्रित्येक माणसे मरताना मी डोळ्यानी पाहिली आहेत आणि तुम्ही म्हणता खोटे आहे.

मध्येच चोंबडेपणा करत असल्याबद्दल क्षमस्व. पण एका तासात मरणारी लोकं हार्टफेलनीसुद्धा मरू शकतात. अशी एक घटणा गावाकडे (कुदनूर) बघितली आहे (ऐकली नव्हे). कापसाच्या गोदामात काम करणार्‍या मजूराला पायाला काहीतरी टोचलं. बी वगैरे असेल म्हणून त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. साधारण पाउण तास कोणताही त्रास न होता त्याने सगळी पोती हलवली. कोपर्‍यातलं शेवटचं पोतं काढल्यावर त्याखाली त्याला साप दिसला. आपल्याला टोचणारं दुसरं तिसरं काही नसून सर्पदंश होता याची जाणीव झाल्यावर तो तिथेच कोसळला.

इथे व्यक्तिगत अनुभव लिहीणार नव्हतो पण कोंकणात लहानपणापासून राहिलो असल्याने घरात साप निघणं ही भयंकर धास्तीची गोष्ट अजिबात वाटू नये इतपत कॉमन होती. माझ्या वडिलांना फुरसे, मण्यार (दोनदा), आणि नाग हे तीन साप चावलेले आहेत. पैकी नाग कारखान्यातल्या मशीनरीत लपून बसलेला होता आणि त्याखाली हात घालून ती उचलायला मदत करताना काहीतरी कापल्यासारखाच फील त्यांना आला होता. नंतर काम कंटिन्यू करत पाऊण तास गेल्यावर जीभ आत ओढली जायला लागली, चक्कर आणि अस्वस्थता येऊ लागली. तरीही सापाचा अंदाज आला नाही. नंतर घाम येऊ लागला तेव्हा तो टिपण्यासाठी रुमाल काढला तेव्हा कोणीतरी त्यांच्या तळहाताच्या मागे कसली जखम आहे असं विचारलं तेव्हा सर्वांचं लक्ष गेलं. ते सापाचे दात उमटलेले होते. मग जिथे "बोचल्याची" जाणीव झाली त्या मशीनच्या पोकळीत शोध घेतला तर अजूनही तो साप तिथेच होता. (बहुधा अडकून पडला असावा). तो नाग असल्याचं दिसल्यावर इतर लोकांनी त्याला मारला आणि पिशवीत भरला. कोणत्याही वाहनाची सोय नसल्याने बाबा स्वतः त्रास होत असूनही अर्धग्लानी अवस्थेत मोटारसायकल चालवत त्यानंतर पाऊणेक तासाने सिव्हिल हॉस्पिटलला दाखल झाले. तिथे अ‍ॅडमिट करुन सलाईनमधून औषध लावले. पण एक दिवस तिथे बर्‍यापैकी अस्वस्थ स्थितीत अ‍ॅडमिट रहावं लागलं आणि हात बराच काळ काळा पडला होता.

त्यामानाने मण्यार आणि फुरश्याचे चावे तितकेच खोल असूनही उघडपणे चावलेले असल्याने तुलनेत लवकर दवाखान्यात गेल्याने अ‍ॅडमिट होण्याची वेळ आली नाही.

मुद्दा असा की सर्वच केसेसमधे मनुष्य तासाभरात दगावत नाही.

-कोणता साप चावला? (विषाचाप्रकार,विषाची व्हिस्कॉसिटी - घट्टपणा इत्यादि)
-शरीरावर कुठे चावला ?(मुख्य शिरांमधे, मान, डोके अशा लोकेशनला की पेरिफेरल म्हणजे हात, पंजा, बोट याजागी आणि दुय्यम आकाराच्या शिरांना चावला. चुकून चावलेला साप हातापायांना चावण्याची शक्यता जास्त असते. डोक्याला वा गळ्याशी अगदी खास अपवादांतच.- म्हणजे हाताळताना वगैरेच होऊ शकतं.)
-किती प्रमाणात विष सोडलं?
-या आधीचा त्याचा विषत्याग किती आधी झाला होता? (नुकताच अन्य भक्ष्य किंवा अन्य कारणाने विषत्याग झाला असेल तर विष पुन्हा हळूहळू तयार व्हायला वेळ लागतो. त्यावर विषाची क्वांटिटी ठरते.)

त्यामुळे सरसकट काही म्हणणं अयोग्य.

बाकी माझा स्वतःचा फर्स्टहँड (की फर्स्टलेग म्हणू?) अनुभव इतर एका प्रतिसादात उल्लेखलेल्या कोंकणातल्या लहान (आणि प्राणघातक) विंचवाच्या चावण्याचा आहे. मी त्यावेळी लहानच होतो. पण ती ठणाणा करायला लावणारी वेदना आयुष्यभर लक्षात राहील. मला अर्ध्या तासाच्या आत कसलेले इंजेक्शन देण्यात आले होते. बावस्कर पद्धती त्यावेळी होती का हे माहीत नाही.

गंगाधर मुटे's picture

28 Aug 2013 - 12:32 pm | गंगाधर मुटे

<<<< कोणता साप चावला? (विषाचाप्रकार,विषाची व्हिस्कॉसिटी - घट्टपणा इत्यादि)
-शरीरावर कुठे चावला ?(मुख्य शिरांमधे, मान, डोके अशा लोकेशनला की पेरिफेरल म्हणजे हात, पंजा, बोट याजागी आणि दुय्यम आकाराच्या शिरांना चावला. चुकून चावलेला साप हातापायांना चावण्याची शक्यता जास्त असते. डोक्याला वा गळ्याशी अगदी खास अपवादांतच.- म्हणजे हाताळताना वगैरेच होऊ शकतं.)
-किती प्रमाणात विष सोडलं?
-या आधीचा त्याचा विषत्याग किती आधी झाला होता? (नुकताच अन्य भक्ष्य किंवा अन्य कारणाने विषत्याग झाला असेल तर विष पुन्हा हळूहळू तयार व्हायला वेळ लागतो. त्यावर विषाची क्वांटिटी ठरते.)>>>

सहमत.

पण अशा केसेसमध्ये उपचार करायचा विषय येतो तेव्हा आपण "दगावण्याच्या शक्यतेचा सर्वात कमी कालावधी" असेल तीच कालावधी गृहित धरून उपचाराची दिशा ठरवणे योग्य राहिल.

एक उदाहरण म्हणून देतोयः

दोन वर्षापूर्वी ९ वर्षाचा मुलगा सर्पदंशानंतर ३० मिनिटाच्या आत दगावला. मुलाच्या उंचीपेक्षा सापाची लांबी १ फूट जास्त होती. गव्हाळ्या रंगाचा साप (नाग)

दोन वर्षापूर्वी ९ वर्षाचा मुलगा सर्पदंशानंतर ३० मिनिटाच्या आत दगावला. मुलाच्या उंचीपेक्षा सापाची लांबी १ फूट जास्त होती. गव्हाळ्या रंगाचा साप (नाग)

एखादा नाग चावल्यावर तो साधारणपणे ५० एमजी ते ३५० एमजी पर्यंत विष सोडू शकतो, ९ वर्षांचा मुलगा होता म्हणजे जर २५० एमजी विष जरी त्याच्या शरीरात गेले असेल तर त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम अर्ध्या तासात बंद पडायला पुरेसे आहे…म्हणजे ह्या केस मध्ये विषाची क्वाण्टीटी जास्त असावी.

पोचण्यास उशीर होऊनही वैद्यकीय उपचार मिळालेले आहेत अश्या रुग्णांपैकी दगावणार्या रुग्णांची टक्केवारी फक्त ५ ते ७% आहे.

गंगाधर मुटे's picture

28 Aug 2013 - 6:30 pm | गंगाधर मुटे

<<< पोचण्यास उशीर होऊनही वैद्यकीय उपचार मिळालेले आहेत अश्या रुग्णांपैकी दगावणार्या रुग्णांची टक्केवारी फक्त ५ ते ७% आहे. >>>>

आकडेवारीबद्दल धन्यवाद.

उद्दाम's picture

28 Aug 2013 - 12:26 pm | उद्दाम

मुटेसाहेब,

सापांचे विविध प्रकार आहेत. सापाच्या दंशातून बाहेर पडलेली विषाची क्वांटिटीही कमीजास्त असते. साप उघड्या पायाला चावला की कपड्यावरुन चावला, यावरही बरेच अवलंबून असते. फुरसे हा अगदी टीचभर आणि अगदी बारीक असतो. त्यामुळे तो तळपाय, घोटा यांच्याजवळच चावतो. पण नागासारखा जाड साप स्वतः फूटभर फणा काढून चावला, तर तो मांडीच्या लेवलला चावेल ना? मग त्याचे परिणाम जास्ती घातक असतात. पेशंट एक तासाच्या आतही मरु शकतो.

एक तासच कशाला, नगीना षिनेमात अमरिश पुरी साप चावल्यावर दहाच मिनिटात मरतो आणि षिनेमा संपतो. पण बहुरानी का कुठल्यातरी सिनेमात ललिता पवार सासूचे विष चोखताना सूनबाई रेखा की कुणीतरी स्वतः बेशुद्ध पडते. मग तिला कधीतरी तासाभराने हॉस्पिटलात हलवतात, तरीही ती जगते. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना !

ते मंत्र कानात फुंकणे वगैरे तुम्ही मागच्या कुठल्या तरी लेखात लिवले आहे. ती त्यावरची माझी कमेंट आहे.

सध्या माझ्या मायबोली आय डी ला अ‍ॅडमिनरुपी साप डसला आहे. माझा आय डी आय शी यु तून बाहेर आला की हे तिथेही लिहीन.

गंगाधर मुटे's picture

28 Aug 2013 - 12:34 pm | गंगाधर मुटे

सहमत.

जॅक डनियल्स's picture

29 Aug 2013 - 3:36 am | जॅक डनियल्स

खूप चांगली माहिती दिली आहे.
मी कधी उपचार केले नाही, पण साप चावल्यावर लोकांना ससून (पुणे) ला उपचारासाठी घेऊन गेलो आहे. अँटी स्नेक वेनम देणे किती कठीण आहे आणि ते देऊन पण किती शरीरात गुंतागुंत होते याचा पूर्ण अनुभव आहे. मांत्रिकाकडे गेलेला स्नेक बाईट चा रोगी मी पहिला अजून पहिला नाही पण त्या बिचाऱ्या रोग्याची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच करू शकतो.

पुणे सर्पोद्यान चे सगळ्या महाराष्ट्रातील मांत्रिकांना खुले १,००००० रु. चे आव्हान होते (अजुन आहे) की "मंत्र वापरून नाग -मण्यार चावलेला रोगी बरा करून दाखवा " अजून तरी कोणी मांत्रिक पुढे आलेला नाही.

"सर्दी खोक्लयापासून एडसपर्यंत सगळेच आजार कानात मंत्र म्हणून बरे कर असे त्या देवीला सांगावे, म्हणजे मग सगळ्या मेडिकल कॉलेजिसना कुलपं घालता येतील." १००% सहमत आहे.

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 12:35 pm | बाळ सप्रे

सूडबुद्धीने वागणारे कलम : कलम ११ (क) बघा

नोकरीचे आमिष, निवडणूकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून गैरफायदा घेणे गैर असले तरी त्यात अंधश्रद्धानिर्मूलनाचा काहीच संबंध नाही त्यामुळे त्यांना या किंवा अन्य कायद्याने शिक्षा होत नाही म्हणून या कायद्याला अयोग्य ठरवणे हास्यास्पद आहे..

बाबा बंगाली, वशीकरण, करणी आणि तशा स्वरुपाचा थेट मजकूर असलेल्या जाहिराती पेपरातून गायब झालेल्या दिसतात. मी मुख्य एकदोन पेपर पाहिले आहेत. इतरही कोणाची निरीक्षणं असतील तर लिहावीत.

मात्र

-कृष्णमूर्ती पद्धतीचे ज्योतिष अभ्यास वर्ग
-सकारात्मक एनर्जीने तुम्हाला कोणत्याही समस्येतून बाहेर काढू शकतो
- हस्तरेखा तज्ञ / फेस रीडिंग समस्यांचे निराकरण ९ दिवसांत.

अशा "सेफ" शब्दवाल्या तीन जाहिरातीच केवळ दिसल्या.

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 1:14 pm | बाळ सप्रे

बडगा उगारायच्या आधीच?
असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे..

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 1:20 pm | बाळ सप्रे

खरच असं झालय की काय म्हणून सहज गुगलबाबांना विचारलं "baba bangali ad disappeared"
तर काय आश्चर्य बाबा बंगालीच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजच्या लिंका दिल्या गुगलबाबानी!!!

छापील पेपरांतलं मार्केटिंग आता ऑनलाईन शिफ्ट होऊ शकेल असं वाटतं. ऑनलाईन गोष्टींवर कारवाई करणं म्हणजे आणखी एक लेव्हलचा अडथळा, सायबर लॉ.

भम्पक's picture

29 Aug 2013 - 2:47 pm | भम्पक

लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे ...?
काही कळेना झालेय.....