पुन्हा अनोळखी होऊ .... !!

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
26 Aug 2013 - 2:59 pm

संधीकाळी सुखावत होता जो
गंध वाऱ्याचा तो विसरू,
दिलासा एकमेकां देऊ....
अन पुन्हा अनोळखी होऊ .... !!

नको आठवण काढू
झंकारणाऱ्या स्वरांची,
वादळात विखुरला जो
मेणा खांद्यावर घेऊ....
सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!!

विसरू ती गुंफण
कुरवाळणाऱ्या हातांची,
नको आवाज झुल्यांचा
मन बंदिशीत ठेऊ......
पुन्हा अनोळखी होऊ .....!!

एकमेकांच्या पाऊलखुणांवर
अंधारून छाया आली,
ते व्रण वाळूतले सखे
चल, आपणच पुसून पाहू......
सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!!

आहे उमटले प्रतिबिंब
एकत्र दोघांचे जळी,
छोटासा फेकून खडा
विस्कटून त्याला टाकू .....
अन…. पुन्हा अनोळखी होऊ

ठेवताना अर्धीच कविता
त्रास तुला, यातना मलाही,
थिटेच होते हात आपुले
चल, त्यांनाही कलम करू ......
सखे गं पुन्हा अनोळखी होऊ

श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी (सांगली)

करुणकविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

26 Aug 2013 - 5:20 pm | प्रसाद गोडबोले

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो !!

वाह !!

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 8:58 am | kalpana joshi

आई

असा एकही दिवस नाही,तुझी आठवण येत नाही,
सतत डोळ्यासमोर असते तू ,भू लोकी नसूनही करते पाखरण आमची I

मनात हूर हूर दाटून येते ,तू असतीस तर किती बरे वाटले असते,
मार्ग दर्शन तुझे लाभले असते ,काही वेळा काही सुचतच नाही I

चलबिचल मनाची होई ,तुझ्या फोटो समोर येऊन मी उभा राही,
तू गेल्याने झालेले नुकसान कसे बरे भरून येई?

मनातील पोकळी कशी बरे भरून येणार ?
तुझ्यावर भार टाकून अश्रूंना मोकळी वाट करून कशी देऊ ?

प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आई तू , दुरून का होईना पाखरण करतेस तू ,
माया ,ममता प्रेमाचा तुझा स्पर्श , आठवणीत जपून ठेवला तो,

सुरक्षित असे आशीर्वाद रुपी कवच ,सौरक्षण करते आमचे ,
निर्भय पणे वावरतो आम्ही ,टप्पे टोणपे पचवतो आम्ही I

तू दाखविलेला कष्टाचा मार्ग ,अवलंबितो आम्ही,
तुझ्याच मार्गदर्शनाने पुढची वाट चालतो आम्ही ,
पण तू नाही ,याचे शल्य जाणवत असते मनी I

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 9:08 am | kalpana joshi

बाबा

चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो ,
स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो ।

असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो,
उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो।

माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो ।

घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो,
दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो।

उच्च अधिकारी होतो तो,
गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I

कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो।
जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 9:14 am | kalpana joshi

गुलाब
तू राजा असे सर्व फुलांचा,
मानही मिळतो तुझ्या गुणांना।
सौंदर्याची बरसात करतो
आवडतो तू सर्वांना सर्व रूपांत।
फूल होता, तू
सुकुमार दिसे।
साठवता सौंदर्य तुझे,

सौंदर्याचा वरदहस्त तुला
पहिला मान गुलाबाला,
विविध रंग रूप तू घेऊन येतो।
आम्हांस तू चकित करतो -

प्रसन्न होऊनी आम्ही वाहतो, तुला `श्री' चरणी,
दिमाखात, तू कोठेही विराजतो,
सौंदर्याने बघणारायाचे मन जिंकतो,
किती रंगात रंगून जातो तू,
स्वरक्षण करण्या काटे आणतोस तू,
जीवनाचे सत्य जाणण्या, काटेरी वाट करतोस तू,
तुझ्या सौंदर्याने घायाळ आम्ही, बोचवितो तो काटा तू।
आधी काटे मग गुलाब,
आधी कष्ट मग सुख
हेच शिकवतो आम्हांस तू।।

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 11:32 am | kalpana joshi

अंतरीचा दिवा मालवू देऊ नको ,
प्रज्वलित ठेव ती ज्योत अंतापर्यत I
तिच देईल तुला आधार,
कार्य करण्या तत्पर होशील तू तयार I
अंधारातून मार्ग दाखवते ,
प्रगतीपथावर ती नेते ,वाट ती किती बिकट ,
खाच खळगे किती असती त्यावरी I
प्रयत्न कष्ट ,आत्माविशासाचा मार्ग दाखवते ती आम्हास,
असाध्य ते साध्य कराया सायास ,
तू जा या वाटेवरुनी उज्वल भविष्याची ती वाट मोकळी I
कवी म्हणतो ,
चालून आली नामी संधी ,
नाही दवडणार मी कधी ,
प्रकाश पडला अंतरीच्या मन चक्षुवरी ,
योग्य दिशा ,मार्ग सापडे त्यास,
तेवत राहू दे अंतरीचा दिवा अंतापर्यत I

कल्पनाताई... तुम्ही तुमच्या कवितांचा वेगळा धागा तयार करू शकता, म्हणजे इतर त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतील.

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 6:32 pm | kalpana joshi

कसा धागा तयार करु? शोध चालु आहे. धन्यवाद.