शोध माझ्यातला
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?
लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?
घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी?
धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी?
पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
भुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी?
एकांती बसता कोणताच विचार नाही मनी
लागली समाधी त्यावेळी जिवंत जागेपणी?
रूप रंग गंध हुंगले कधी श्वासात
असे झाले कधी हरवून गेलो त्यात?
दिला का कधी ठोसा एखाद्या उन्मत्त ठगाला?
मार जरी खाल्ला तरी एकतरी फटका लगावला?
चिड आली का सार्या दुनियेची, इतरांच्या वागण्याची?
खरेच का, सबूरीने वागण्याची खोटी रीत जगण्याची?
ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे
उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे
का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले?
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
- पाभे
प्रतिक्रिया
22 Aug 2013 - 6:11 am | स्पंदना
हे सगळ कुणी दुसर्याने करावे अशीच माझी धारणा आहे.
कविता बोचरी, टोचरी अन....काटेरी आहे.
22 Aug 2013 - 4:16 pm | अत्रुप्त आत्मा
@ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे
उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे
का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले?
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले >>> __/\__ सलाम या शेवटावर!
आंम्ही पाभेंना दिलेलं भेदकपाषाण,हे नाव सार्थ आहे!
22 Aug 2013 - 6:03 pm | प्रभाकर पेठकर
हा शोध आयुष्याच्या फक्त एखाद्या हळव्या वळणावर घ्यायचा नसतो तर सतत घेत राहायचा असतो.
कविता आवडली. चांगल्या विचारांना प्रवृत्त करणारी आहे. अभिनंदन.
22 Aug 2013 - 10:22 pm | सुधीर
कविता आणि प्रतिसाद आवडला.
22 Aug 2013 - 10:48 pm | किसन शिंदे
+२
कविता आवडली आणि पेठकर काकांशी सहमत.
23 Aug 2013 - 8:34 am | चित्रगुप्त
कविता अतिशय आवडली.

हा तुमचा शोध पूर्ण होइल, आणि तुमच्या सर्व प्रश्नांची, तुम्हाला हवी तीच उत्तरे नक्की मिळतील, याची खात्री बाळगा.
तुम्ही फक्त या मार्गावरून चालत रहा.
24 Aug 2013 - 9:07 am | निरन्जन वहालेकर
आपलेच लेखा परिक्षण करायला लावणारी! ! कविता आवडली ! !
24 Aug 2013 - 11:01 am | भम्पक
सुंदर कविता , आणि खरेच विचार करायला लावणारी.......पाभेंच अभिनंदन...