ऐकले जाहीर येथे, झुंड माणुसकी तुडवणारे
वाचले जाहीर येथे, रत्न कन्या नाकारणारे ll १ ll
जोडपे कैक नादान, येथे पालकत्वी रंगणारे
तो असेल कि ती?, व्यर्थ शंका काढणारे ll २ ll
माजले क्रूर बाजारी, गैर कर्मे रुजवणारे
विवेक विसरून पालक, वाट आंधळी जोखणारे ll ३ ll
अवैध पैसा अमाप, गर्भश्रीमंत मिरवणारे
कष्टी भगवंत येथे, पाहून गर्भ चिरणारे ll ४ ll
लिखित काही और तरीही, वंशदिवा शोधणारे
हातचे टाकून पायी, कळ्या नाजूक तुडविणारे ll ५ ll
विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे
नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll
नका टाकू स्त्री उद्याची, घसे कोरडे बोलणारे
हात कानावरी त्यांचे, ठार बहिरे ऐकणारे ll ७ ll
- सार्थबोध
प्रतिक्रिया
19 Aug 2013 - 10:41 am | दत्ता काळे
विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे
नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll
.. वा ! छान कल्पना