डोळ्यांनी बघीतले दृष्यातले सुख।
अंतरी वाढली कामाची भुख।
डोळ्यांनी देवाचे रुप बघायचे असते
हे मात्र कधी कळ्लेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥१॥
हातांनी दिला लोकांना मार।
अंतरी वाढली क्रोधाची धार।
हातांनी देवाला नमस्कार करायचा असतो
हे मात्र कधी कळलेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥२॥
मनाचा नाही कळला हा डाव।
अंतरी वाढला लोभाचा भाव।
मनानेच देवाचे नामस्मरण करायचे असते
हे मात्र कधी कळलेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥३॥
नाकाने घेतला भलताच वास।
अंतरी वाढली लोभाची रास।
नाकातुनच जपाअजपा चालू असते
हे मात्र कधी कळलेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥४॥
बुध्दीकडे नेहमी होते कुविचार।
अंतरी वाढला मत्सर फार।
बुध्दीने सारासाराचा निवाडा करायचा असतो
हे मात्र कधी कळलेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥५॥
जिव्हेने केली लोकांची निंदा।
अंतरी वाढला दंभाचा धंदा।
जिव्हेवरच श्रीशारदा नांदत असते
हे मात्र कधी कळलेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥६॥
पायांनी मारल्या नको तिथ लाथा।
अंतरी वाधले संशय आणि चिंता।
चरणंम पवित्रंम वितितंम पुराणंम
हे मात्र कधी कळलेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥७॥
कानांनी ऐकली स्वतःचीच स्तुती।
अंतरी वाढली अहंकाराची मती।
कानांनी देवाचे गुणगान ऐकायचे असते
हे मात्र कधी कळलेच नाही।
आमचे मन......
कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥८॥
श्रीसद्गुरु कृपा झाली जेंव्हा।
विषयांच कार्य थांबल तेंव्हा।
अंतरी अखंड नामस्मरण करायचे असते
हे आता आम्हाला पक्के कळ्ले।
आमचे मन.....
आता कुठे सत्कर्माकडे वळले ॥९॥