बर्फाळ, गोठवणारी रात्र. काकडलेलं लंडन शहर झोपलेलं. याच रात्री एक सुप्रसिद्ध सुपरमॉडेल आपल्या घराच्या गच्चीतून पडते. (दिव्या भारतीची आठवण झाली की नाही!) पोलिस आत्महत्येचा निकाल देतात. पण तिच्या भावाला काही हे पटत नाही. तो सत्याचा शोध घेण्याचा निश्चय करतो.
कारमोरन स्ट्राईक ब्रिटनच्या लष्करी पोलिसांच्या सेवेत असतो. अफगाणिस्तानात सेवा करत असताना एका दहशतवादी हल्ल्यात त्याचा पाय तुटतो. त्यामुळे तो लष्करातून मुदतपूर्व निवृत्ती घेऊन लंडनमध्ये खासगी डिटेक्टिव्हचा व्यवसाय सुरू करतो. पण त्याचा व्यवसाय नीट चालत नाही. वाग्दत्त वधूबरोबर भांडणं होतात आणि ती त्याला घराबाहेर काढते. मग तो ऑफिसमध्ये मुक्काम टाकतो.
त्याच सकाळी नोकरी सोडून गेलेल्या पहिल्या सेक्रेटरीच्या जागी रॉबिन नावाची एक तात्पुरती सेक्रेटरी येते. छोट्या शहरातून लंडनमध्ये आलेली रॉबिन चांगली नोकरी मिळेपर्यंत अशा छोट्या छोट्या नोकऱ्या करत असते. त्यांची भेट होताना घडलेल्या प्रसंगामुळे दोघंही एकमेकांबरोबर संवाद साधताना अवघडलेले असतात.
त्या सुपर मॉडेलचा भाऊ कारमोरन स्ट्राईकला शोधत येतो. तिच्या मृत्यूचा तपास करायची विनंती करतो. कारमोरनला केसमध्ये काही दम वाटत नाही - उपलब्ध माहितीवरून ही आत्महत्त्याच आहे असं वाटत असतं. पण कारमोरनकडे एकच अशील असतो, आणि पैशांची चणचण. त्यामुळे तो लठ्ठ रक्कम घेऊन तपासाला सुरुवात करतो.
त्याला काय सत्य सापडतं? ती आत्महत्त्या असते का खून? लंडनच्या फॅशन जगतातल्या मुखवट्यांच्या आड काय असतं?
रोलिंगची खासियत - ठसठशीत पात्रनिर्मिती - याही पुस्तकात दिसून येते. प्रत्येक पात्र घडवताना रोलिंग त्या पात्राची संपूर्ण कुंडली स्वत:जवळ मांडते. तिच्याजवळ असलेल्या मसाल्यापैकी निम्माच भाग ती कदाचित पुस्तकात वापरेल, पण तिची पात्रं अस्सल वाटतात ती याचमुळे. परिस्थितीचे फटके खात असलेला, पण आपल्या एक-दोनच का होईना पण तत्त्वांशी तडजोड न करणारा कारमोरन स्ट्राईक झकास जमला आहे. शरीरावर मनस्थितीचा होणारा परिणाम शब्दांत मांडणं फार अवघड (पडद्यावर दाखवणं तुलनेने सोपं). नैराश्यग्रस्त स्ट्राईकचा तुटका पाय हुळहुळतो. पण आत्मविश्वासाने भारलेल्या स्ट्राईकला आपल्या पायाला काही अपाय झाला आहे हेही जाणवत नाही!
सेक्रेटरी रॉबिन हे मात्र रोलिंगचं स्टॉक कॅरेक्टर आहे. तिनेच वेबसाईटवर कबूल केल्याप्रमाणे रॉबिन ही तिच्या सेक्रेटरीगिरीच्या अनुभवांवर बेतलेली आहे. रॉबिनच्या रूपाचं वर्णनही तरूणपणीच्या रोलिंगच्या जवळपास जाणारं असावं. (हॅरी पॉटर वाचलेल्यांसाठी - हर्मोयनी मोठी झाल्यावर तिची रॉबिन होईल!) त्यामुळे रॉबिन झकास चितारली जाण्यात आश्चर्य नाही.
प्रेयसीने घराबाहेर काढलेला कारमोरन आणि नुकतीच प्रेमाच्या आणाभाका घेतलेली रॉबिन यांचं नातं हा पुस्तकाचा सर्वोच्च बिंदू असावा. एकमेकांभोवती दोघंही अवघडून वावरतात. कारमोरन बेघर आहे, ऑफिसात रहातो हे आपल्याला माहीत आहे हे त्याला कळून न देण्याचा रॉबिन चा निश्चय; तर आपल्या चिकण्या सेक्रेटरीवर आपण लाईन मारतोय असं तिला वाटू नये यासाठी कारमोरनची खटपट! पुढच्या पुस्तकांत हे नातं हळूहळू उमलत जाईल.
त्यामानाने कथावास्तूत (plot) फारसा दम नाही. मुळात "खून की आत्महत्त्या" हा प्रश्न सवाई माधवरावांपासून ते दिव्या भारतीपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत विचारला गेलाय. त्यातून त्या कथेत किमान दोन तरी कच्चे दुवे मला सापडले.
प्रसंग आणि वर्णनं मात्र फारच झकास आहेत. हॅरी पॉटर सिनेमे इतके देखणे झाले याचं एक कारण म्हणजे रोलिंगची चित्रदर्शी लेखनशैली. आपल्या प्रेयसीच्या साखरपुड्याची बातमी ऐकून स्ट्राईक भरपूर दारू पितो, आणि रॉबिन त्याला ऑफिसपर्यंत आणून सोडते, हा प्रसंग लाजवाब जमला आहे. तसाच ते दोघं एका कपड्यांच्या बुटीकमध्ये एका सुरागाचा तपास करायला जातात तोसुद्धा. विशेषत: आजचं लंडन पुस्तकात भेटतं ते आवडण्यासारखं आहे.
प्रौढांसाठी असलेल्या प्रत्येक पुस्तकात सेक्स शीन असलाच पाहिजे असा नियम असावा. (पूर्वी मराठी शिणुमात एक लावणी आणि एक हिंदी गाण्यांचं विडंबन असलंच पाहिजे असा नियम होता तसं.) या पुस्तकातला सेक्स शीन मात्र अगदी ओढूनताणून घातल्यासारखा वाटतो. ना त्याचा काही पात्रनिर्मितीला उपयोग, ना कथेच्या प्रवाहाला. "पाहिजे ना सेक्स शीन, हा घे" यातला प्रकार आहे.
स्त्री-लेखिकांनी लिहिलेल्या रहस्यकथा या प्रकारात दोन महत्त्वाची नावं म्हणजे अगाथा ख्रिस्ती आणि डोरोथी सेयर्स. रोलिंगच्या पुस्तकाचं दोघींच्याही लेखनाशी साम्य आहे. अगाथा ख्रिस्तीसारखा मर्यादित संशयित असलेला प्लॉट आहे. सेयर्सच्या लॉर्ड विमसे आणि हॅरियट वेन सारखं अस्फुट नातं आहे.
उत्तम साहित्याची लक्षणं कोणती? अनेक उत्तरं, बहुतांशी हुच्चभ्रू. माझी गरीबाची साधी अपेक्षा म्हणजे (किमान) मनोरंजन झालं पाहिजे आणि (कमाल) काहीतरी शाश्वत सुंदर असं हाती लागलं पाहिजे. या पुस्तकाने मनोरंजन नक्कीच केलं. शाश्वत सुंदर बिंदर काही मिळालं नाही. एक मात्र खरं, पुस्तक वाचून संपल्यावरसुद्धा संपल्यासारखं वाटत नव्ह्तं. त्यातली पात्रं मनात ठसा पाडून गेली आहेत. हे एक यशच म्हणावं लागेल.
पुढची "कारमोरन स्ट्राईक" पुस्तकं चढत्या भांजणीने वाचनीय असावीत, हीच एडिंबराच्या ग्रामदेवतेकडे प्रार्थना!
प्रतिक्रिया
5 Aug 2013 - 10:44 pm | जॅक डनियल्स
एडिंबराच्या ग्रामदेवता तुझी प्रार्थना ऐकू देत.
लिखाण मस्त, मी फिक्शन वाचत नाही, त्यामुळे हे पुस्तक वाचणार नाही, तुलाच नंतर विचारीन की नक्की खून का आत्महत्या ;)
सेक्स शीन च्या बाबतीत ब्रिटीश लेखक कंजूसपणा नेहमी करतात हा माझा अनुभव आहे , त्यामुळे मी शाळेत असताना अमेरिकन लेखकाची पुस्तके वाचायचो...;)
5 Aug 2013 - 11:05 pm | कवितानागेश
वाचायला हवं. मराठीत आलं का? :P
5 Aug 2013 - 11:46 pm | प्रचेतस
छान परिक्षण.
3 Aug 2015 - 10:47 pm | मेघना भुस्कुटे
हं. आता दोन्हेी वाचेीन.
3 Aug 2015 - 10:53 pm | एस
इतक्या चांगल्या पुस्तकपरीक्षण-ओळखीच्या धाग्यावर इन-मिन-तीनच प्रतिसाद आहेत!
शक्यतो सबळ कारण असल्याशिवाय जुने धागे वर काढू नयेत. पण हा धागा फारच आवडल्याने प्रतिसाद देत आहे. 'राँबर्ट गालब्रेथ' च्या नवीन पुस्तकाच्या प्रतीक्षेत...! :-)
4 Aug 2015 - 12:04 am | बहुगुणी
आता द सिल्कवर्म आणि करियर ऑफ एव्हिलबद्दलही लिहा. तिन्ही वाचावीत असा विचार आहे. तिन्ही कादंबर्यांचे एकंदरीत कथाविषय वाचून बाईंची शैली थोडीशी स्यू ग्रॅफ्टन यांच्यासारखी वाटली का?
4 Aug 2015 - 12:47 am | बोका-ए-आझम
Cuckoo Calling तरी बरं होतं पण The Silkworm मला अजिबात आवडलं नाही. कृत्रिमरीत्या रंगवलेले प्रसंग, अजिबात न पटणारी रहस्याची उकल आणि ओढून-ताणून आणलेले twists यांनी डोकं फिरवलं. राॅबिनची व्यक्तिरेखा मात्र झक्क रंगवलेलीे आहे. व्यक्तिरेखा रहस्यावर हावी होऊ लागल्या की वाट लागलीच. ही कसरत आर्थर काॅनन डाॅईल आणि आगाथा ख्रिस्ती यांना मस्त जमली. राॅलिंग बाई मात्र चाचपडत आहेत असंच वाटतंय.
4 Aug 2015 - 3:29 am | आदूबाळ
धन्यवाद!
सिल्कवर्म मलाही फारसं आवडलं नाही. पण ते काही खरं नाही. अगाथा ख्रिस्तीची काही पुस्तकंही अशीच डोक्यात जातात. होम्सचा सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रकार कधीकधी पोरकट वाटतो. पण गोळाबेरीज बघायची झाली तर गाल्ब्रेथ मालिकेवर मी तरी खूष आहे.
करियर ऑफ एव्हिल सध्या परवडत नाहीये. :प प्रकाशनपूर्व सवलत पण देत नाहीत लेकाचे.
@बहुगुणी: स्यू ग्रॅफ्टन हे नाव आधी कधीच ऐकलं नव्हतं. सुचवल्याबद्दल धन्यवाद.
4 Aug 2015 - 6:29 am | बोका-ए-आझम
गूगल स्टोअरवर ₹२९७ वर आहे - प्रकाशनपूर्व सवलत. कालच तुमचा लेख वाचल्यावर मी चेक केलंय.
4 Aug 2015 - 7:56 am | जडभरत
हॅरी पाॅटर सर्व भाग अधाशासारखे वाचलेत. रोलिंगबाईंना दैवी देणगीच आहे. असो तुम्ही छान माहिती दिलीत. पण पुस्तकावर ते राबट गालबोट लिहिलंय ते कोण?
4 Aug 2015 - 10:49 am | रुस्तम
J. K. Rowling = Robert Galbraith
4 Aug 2015 - 9:08 am | अभिजितमोहोळकर
मला वाट्तं रोलिंग्बाई विविध प्रकार हताळून पहात आहेत.कॅजुअल व्हेकसन्सी ही सामाजिक कादंबरीसुद्धा मला आवडली. बाईंची मुख्य शक्ती ही पात्र अन प्रसंग वर्णन करण्याची आहे असे वाटते.
4 Aug 2015 - 9:09 am | अभिजितमोहोळकर
क्षमस्व