अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
24 Jul 2013 - 11:49 am

अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती

छोट्याश्या अंधाऱ्या खोलीत, काही कुरबुर चालू होती
काळ्या अंधारात दुर्बुद्धीने, विवेकावर मात केली होती ll १ ll

कापसावाणी मऊ पाऊले, तिथेच बांधून घातली होती
हातांची ती कोमल पर्णे, बेडीमध्ये अडकवली होती ll २ ll

चंद्रावाणी नितळ चेहरा, सशावाणी पिटुकले डोळे
अंधश्रधेच्या विखारी बुरख्याने, मिटून झाले भळभळलेले ll ३ ll

काहीच घडले नव्हते, काही अस्तित्वातच आले नव्हते
एका गोजिऱ्या निष्पाप जीवावर,काळे सावट घेरले होते ll ४ ll

कुणाची तरी गाढवी बुद्धी,गैरसमजाचे ओझे वाहत होती
मायेची भक्कम गोधडीच, उबेऐवजी चटके देत होती ll ५ ll

सरस्वतीच्या विणेची तार, छेडण्या आधीच तुटली होती
पाप करण्याची बुद्धी द्यायला, देवाला इतकी का घाई होती? ll ६ ll

प्रत्येक जीवाला भोग असतात, याची मला माहिती होती
पण इतक्या कोवळ्या जीवाला?. मला उत्तरे मिळत नव्हती? ll ७ ll

कोणाचा "नाच रे मोराचा" नाच, पिसाप्रमाणे झडणार होता
छोटीशी टिकली; केसांचा बो, बांधायचा राहणार होता ll ८ ll

बहिण; कोणाची भावी अर्धांगिनी, व्हायचीच राहिली होती
कुणाच्या तरी जनावरी मेंदूत, हि क्रूर कल्पना आली होती ll ९ ll

माणसातील जनावराने एक, स्त्री भ्रूण हत्या केली होती
कुणीतरी उमलण्याआधीच एक, गोंडस कळी खुडली होती ll १० ll

विज्ञानाने इतकी प्रगती का केली? याची मला चीड होती
देवाच्या डोळाल्याही आज वाटे, दाट अश्रूंची झालर होती ll ११ ll

कोणाची ती बिनडोक बुद्धी, वंशाचा दिवा हुडकत होती
पण अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती ll १२ ll

- सार्थबोध

कविता