निमित्त कॉफीचं

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
10 Jul 2013 - 12:48 pm

वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.

वैभवने मला हुकूम सोडला. “साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.”

छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून अनेकदा वैभवने आम्हाला असं मेन्यू कार्ड वाचताना पाहिलेलं आहे. हातात पैसे आले तरी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होतेच अजूनही. वैभव आणि भवतालची ‘जनरेशन नेक्स्ट’ आमच्या या सवयीची ‘उर्दू वाचन’ म्हणून संभावना करते.

आता वैभव मोठा झालाय, तो भरपूर पैसे कमावतो. ही नवी पिढी त्यांच्या पगाराबद्दल बोलते तेव्हा तो महिन्याचा पगार असतो की वर्षाचा असतो याबाबत माझा अनेकदा गोंधळ होतो. एकदा माझे एक सहकारी मला सांगत होते की ‘त्यांच्या जावयाला वीस हजाराची वाढ मिळालीय.’ त्यावर मी ‘वा! छान!’ असं म्हटलं खरं; पण मी बहुतेक फार प्रभावित नव्हते झाले. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं ‘वर्षाची नाही, महिन्याची पगारवाढ सांगतोय मी’. माझे हे सहकारी माझ्याहून जुन्या काळातले असल्याने ‘महिन्याच्या’ पगाराबद्दल बोलले. नाहीतर आजकाल कोण मासिक उत्पन्नाबद्दल बोलतंय? वैभवही मला लहान असला तरी आता या भरपूर पैसे कमावणा-या गटात मोडतो. पैसे भरपूर कमावत असल्यामुळे या लोकांचा खर्चही अफाट असतो. ‘एवढे पैसे कशाला लागतात?’ या माझ्या प्रश्नावर वैभव आणि त्याच्या वयाच्या मुला-मुलीचं एकचं उत्तर असतं – “जाऊ दे, तुला नाही कळायचं ते!’ ते बरोबरचं असणार त्यामुळे मीही जास्त खोलात कधी जात नाही.

“काय घेणार मावशी तू?”, वैभवने अगदी मायेनं विचारलं मला.

“अरे, हे कॉफी शॉप आहे ना? मग कॉफीच घेणार ना, दुसरं काय?” माझ्या मते मी अत्यंत तर्कशुद्ध मत व्यक्त केलं होतं.

वैभव समंजसपणे हसला. मग मी त्याच्या लहानपणी त्याला ज्या थाटात त्याला समजावून सांगायचे त्याच पद्धतीने म्हणाला, “अगं, असं नाही मावशी. इथं कॉफीच्या आधी खायचे पदार्थ मिळतात, कॉफीसोबत खायचे पदार्थ मिळतात. कॉफीचे तर असंख्य प्रकार आहेत. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. आणि प्लीज, किंमत पाहून नको ठरवूस काय मागवायचं ते! मी काही आता लहान नाही राहिलो ..मला आज पैसे खर्च करायचेत, तुझ्यासाठी खर्च करायचेत. तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस.”

मला वैभवची भावना समजली. पण असल्या भपकेबाज ठिकाणी माझी आणखी एक अडचण असते. ब-याच पदार्थांची नावं वाचून मला नेमकं काहीच कळत नाही. मागवलेला पदार्थ आवडला नाही तरी ‘ताटात काही टाकून द्यायचं नाही’ या सवयीने संपवला जातो. पदार्थांची नावं लक्षात रहात नसल्याने मागच्या वेळी कोणता पदार्थ आवडला नव्हता हेही लक्षात रहात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माझ्या प्रयोगशील वृत्तीला मी गप्प बसवते. त्यातल्या त्यात ‘चीज सॅन्डविच’ मला माहिती आहे – मग मी तेच पाहिजे म्हटलं. मी खायला इतकं स्वस्त काहीतरी निवडावं याचं वैभवला वाईट वाटलं, पण तो घेऊन आला ते माझ्यासाठी.

आम्ही गप्पा मारत बसलो. वैभवचे आई-बाबा माझे मित्र असले तरी वैभवचं आणि माझंही चांगलं गूळपीठ आहे. तो अनेक गोष्टी मला सांगतो, अनेक विषयांवर आमच्या गप्पा होतात. मी ब्लॉग लिहिते, मी फेसबुक वापरते – अशा गोष्टींमुळे वैभवला मी नव्या जगाशी जुळवून घेणारी वाटते. मी पहिल्यांदा मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा काही अडचण आली की वैभवकडे मी धाव घ्यायचे. एस एम एस कसा करायचा, ब्लू टूथ म्हणजे काय, ते कसं वापरायचं – असं काहीबाही वैभवने मला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला विषयांची कधी वानवा नसते.

मग कॉफीची वेळ. मीही वैभवबरोबर काउंटरपाशी गेले.

तिथल्या तरुण मुलाने विचारलं, “काय घेणार?”
“कॉफी”, मी सांगितलं.
"कोणती?"
मी एक नाव सांगितलं.
“साखर हवी की नको?” त्या मुलाने विचारलं.
“पाहिजे”, मी सांगितलं.
“किती?” पुढचा प्रश्न – त्याचंही उत्तर मी दिलं.
“दूध?” आणखी एक प्रश्न.
“हो” माझं उत्तर.
“गरम का थंड?” प्रश्न – त्याचंही उत्तर दिलं.
“ क्रीम हवं?” प्रश्न काही संपेनात.

“अरे बाबा, मी साधी एक कप कॉफी प्यायला इथं आलेय तर किती प्रश्न विचारशील मला?” मी हसत पण काहीशा वैतागाने त्या मुलाला म्हटलं . वैभव आणि तो मुलगा दोघांच्याही चेह-यावर हसू होतं.

काउंटरवरच्या त्या मुलाला माझ्या पिढीला तोंड द्यावं लागत असणार नेहमी – किंवा त्यांना प्रशिक्षण देणारी व्यक्ती थोर असेल. कारण तो मुलगा मिस्कीलपणे मला म्हणाला, “आपल्या आवडीचं काही हवं असेल आयुष्यात तर अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात शांतपणे आणि निर्णय करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर ...”

मला त्याच्या या उत्तराचं आश्चर्य वाटलं. तो जे काही म्हणाला त्यात तथ्यही होतंच म्हणा. पण माझ्या चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्याला राहवलं नाही. तो पुढे म्हणाला, “असं परवाच ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांच्या एका विद्यार्थ्याला इथं सांगत होते ...” तो हसून पुढच्या ग्राहकाकडे वळला आणि आम्ही आमच्या टेबलाकडे परतलो. वैभवने एकही प्रश्न विचारायला न लागता त्याला काय हवं ते सांगितलं होतं आणि मिळवलंही होतं, हे माझ्या लक्षात आलं.

एक तर प्रश्न माहिती पाहिजेत किंवा त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. नाहीतर मग नको ते वाट्याला येईल आणि त्याचा आनंद न मिळता ते फक्त एक ओझं होईल – हे मला पटलंच! साधं कॉफी शॉपमध्येही शिकण्यापासून सुटका नाही.

या प्रसंगानंतर काही महिन्यांनी मी पॉन्डिचेरी आणि कन्याकुमारीला गेले. एकटीच होते मी. कन्याकुमारीला पोचल्यावर कॅन्टीनमध्ये गेले आणि ‘कॉफी’ एवढंच सांगितलं. माझ्यासमोर मला आवडते तशी – अगदी पहिजे तितकी साखर, दूध, पाहिजे त्या चवीची गरमागरम कॉफी समोर आली. तिचा वास, तिची चव, तिचं रूप – सगळं अगदी माझ्या आवडीचं – मुख्य म्हणजे एकही प्रश्न मला न विचारला जाताच! अशी कॉफी मी एक दिवस, दोन दिवस नाही तर पुढचे दहा दिवस घेत राहते. मला कॉफी या विषयाचा काही विचार करावा लागत नाही, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागत नाहीत (साखर किती वगैरे...). मला ज्यातून आनंद मिळतो ती कॉफी मिळवण्यासाठी मला डोकेफोड करावी लागत नाही, धडपड करावी लागत नाही.

cofee

कॉफी शॉपमध्ये एक ग्राहक म्हणून माझी आवडनिवड लक्षात घेऊन कॉफी बनवली जाते – निदान तसा प्रयत्न तरी असतो. पण तिथं मला मजा येत नाही. मला हव्या त्या चवीची कॉफी तिथं मिळत नाही सहसा. इथं सगळ्यांसाठी जी कॉफी बनते, तीच माझ्या समोर येते. इथं मला काही खास वागणूक मिळत नाही, पण इथल्या कॉफीचा आस्वाद मी सहाही इंद्रियांनी घेऊ शकते, घेते. हो, इथं ग्लासातून वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!

माझ्या मनात नकळत या दोन्ही प्रसंगांची तुलना होते. कॉफी शॉपमध्ये जे हवं त्यासाठी धडपड करावी लागत तर होती, पण जे हवं तेच हाती येईल अशी खात्री नव्हती. दुस-या परिस्थितीत फार धडपड न करावी लागता जे पाहिजे ते मिळत होतं. पहिली कॉफी दुसरीच्या कैक पट महाग होती (असते) हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो. यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.

मग निमित्त कॉफीचं असेल किंवा नसेल ...

**

जीवनमानराहणीआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Jul 2013 - 12:51 pm | यशोधरा

:)

लेख आवडला. शेवटचा परिच्छेद तर खूपच छान.

पैसा's picture

10 Jul 2013 - 1:19 pm | पैसा

नेमक्या शब्दात लिहिलंत. अतिशय आवडलं!!

सुहास झेले's picture

10 Jul 2013 - 2:04 pm | सुहास झेले

अगदी अगदी.... :) :)

मूकवाचक's picture

10 Jul 2013 - 2:13 pm | मूकवाचक

+१

सन्दीप's picture

10 Jul 2013 - 1:29 pm | सन्दीप

+१००

जयंत कुलकर्णी's picture

10 Jul 2013 - 1:32 pm | जयंत कुलकर्णी

माझ्या मनात गेले काही दिवस कॉफीवर एक लेखमाला लिहायचा विचार बळकावतोय...... तुमच्या या लेखाने तो जवळ जवळ पक्का होतोय......:-)

सुहास झेले's picture

10 Jul 2013 - 2:09 pm | सुहास झेले

नक्की मनावर घ्या काका :) :)

आतिवास's picture

10 Jul 2013 - 2:42 pm | आतिवास

नक्की लिहा .... वाट पाहते लेखमालेची :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2013 - 2:12 pm | बिपिन कार्यकर्ते

(Y)

निवांत पोपट's picture

10 Jul 2013 - 2:20 pm | निवांत पोपट

नेमके आणि अचूक शव्द्,संयत लय ही नेहमीची खासियत कथेत आहेच.कथा आवडली.

vnbhise's picture

10 Jul 2013 - 2:38 pm | vnbhise

The whole purpose of places like Starbucks is for people with no decision-making ability whatsoever to make six decisions just to buy one cup of coffee. Short, tall, light, dark, caf, decaf, low-fat, non-fat, etc. So people who don't know what the hell they're doing or who on earth they are can, for only $2.95, get not just a cup of coffee but an absolutely defining sense of self: Tall. Decaf. Cappuccino
-You've got mail (1998)

आतिवास's picture

10 Jul 2013 - 2:45 pm | आतिवास

रोचक आहे वाक्य.
'जागतिकीकरण' या विषयाचा अभ्यास करताना 'मॅक्डोनाल्ड'बद्दल 'फक्त काही ठराविक पदार्थ उपलब्ध असण्याचा पर्याय आणि त्याचे परिणाम' याबद्दल बरंच काही वाचलं होतं त्याची आठवण आली हे वाक्य वाचून.

राही's picture

10 Jul 2013 - 3:01 pm | राही

लेख नेहमीप्रमाणेच अतिशय आवडला.

विटेकर's picture

10 Jul 2013 - 3:15 pm | विटेकर

क्या बात है | आवडेश...
बर्याच वेळा असे असते , फारसे सायास न करता सुख अलगदं आपल्यापर्यंत पोहोचतं . फक्त ते आप्ल्याला कवेत घेता यायला हवे. त्याचा कार्यकारण भाव न शोधता ! पाणी म्ह्णजे एच टू ओ , इथेच सारे थांबले . प्रुथक्करण पाण्याचे कराय्चे तहानेचे नाही ( इति वपु )

मुक्तपीठावर चांगला शोभला असता लेख !

पिंपातला उंदीर's picture

10 Jul 2013 - 5:46 pm | पिंपातला उंदीर

हा हा हा. हेच म्हणणार होतो ; )

मदनबाण's picture

10 Jul 2013 - 3:32 pm | मदनबाण

हल्ली गरजा वाढल्या आहेत... प्रत्येक बाबतीत.

ऋषिकेश's picture

10 Jul 2013 - 3:33 pm | ऋषिकेश

उत्तम!
लेखन विषय, शैली वगैरे नेहमीप्रमाणे उत्तम आहेच. त्याच बरोबर "तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस" वगैरे वाक्यातून हल्लीची बोली मराठी नेमकी पकडली आहे :)

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2013 - 3:41 pm | प्रभाकर पेठकर

असाच प्रकार 'सब-वे' सँडविचचा. एक चिकन सँडविच मागितलं तर ब्रेड कुठला हवा? १ फूट की १/२ फूट?, सॅलड कुठलं कुठलं हवं? (६-७ भाज्या निवडीसाठी), सॉस कुठले पाहिजेत? (पुन्हा ६-७ वेगवेगळ्या रंगाचे सॉस), हालपिनो (की जालपिनो? मला कधीच लक्षात राहात नाही) पाहीजे की नको?, कोल्ड पाहिजे, वॉर्म पाहिजे की हॉट पाहिजे. एक सँडविच घ्यायचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रश्नपत्रिकेला सामोरे जावे लागते हे पाहिल्यावर पुन्हा 'सब-वे' च्या वाटेला गेलो नाही.

आपला मुंबईतला, नाक्यावरचा, सँडविचवाला आवडतो. 'व्हेज सँडविच दे' म्हंटल की 'चिझ चाहिए?' हा, विश्वामित्रासमोर अप्सरेने नृत्य करावे असा, प्रश्न फक्त तापदायक ('नही' म्हणायला) असतो बाकी सँडविचाने पोट आणि मन दोन्ही भरते.

गवि's picture

10 Jul 2013 - 4:18 pm | गवि

पण सबवेमधे किंवा तत्सम ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं देणं कंपल्सरी नसतं हे नक्की. सबवेमधे ज्याला हवं तो अगदी एकेक घटक कस्टमाईझ करुन घेऊ शकतो. त्यातून आपली खास स्टाईल उभी करता येते.

इतर अनेकजण म्हणजे:

अ. ज्यांना प्रश्नावलीचा कंटाळा येतो.
ब. हनी-मस्टर्ड, बारबेक्यू, गार्लिक मेयो अशांच्या चवीच्या फरकाची माहिती नसल्याने नक्की काय मागवले म्हणजे चांगले ठरेल हे कळत नाही.
क. वेळ नसतो
ड. फोनवर डिलिव्हरी मागवायची असते.

अशा सर्वांना कोणतेही स्पेशल कस्टमायझेसन न सांगताही सब मिळू शकते. किंवा निदान (भारतातल्या सबवेमधे)फक्त "जास्त आंबट नको" किंवा "वो तीखा मिर्ची जैसा क्या है, वो मत डालो.. बाकी सब डालो" अशा अत्यंत देसी पद्धतीनेही ते फटाफट बनवून घेता येतं असा स्वतःचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

असे ट्रायल एररने काही काळात आपोआप प्रमाण सांगणं सोपं होतं किंवा पुन्हा एकदा आपल्या देशी हॉटेलच्या पद्धतीप्रमाणे सबवेमधला मनुष्यही वरचेवर येणार्‍या गिर्‍हाईकाची आवड लक्षात ठेवतो आणि आपसूक सँडविच लावतो.

कोणत्याही ब्रँडचे देशीकरण आपल्याच हाती आहे.. ;)

:)

अत्यंत सहमत. अनेक वर्ष मॅक-डी, पिझ्झा हट, डॉमिनो आणी तत्सम दुकानांमधे हेच करत आलोय :)

भुमन्यु's picture

10 Jul 2013 - 3:42 pm | भुमन्यु

सुन्दर आणि सहज लिखाण... लेख खरच मस्त झालाय ...

राहुल

किसन शिंदे's picture

10 Jul 2013 - 3:53 pm | किसन शिंदे

लेख सुंदरच. जे सांगायचं ते अगदी नेमक्या शब्दात मांडल्यामुळे वाचतानाही फार गडबड न करता आपण वाचतो आणि मग काहितरी 'वेगळंच' वाचल्याचं समाधानही मिळतं.

अनन्न्या's picture

10 Jul 2013 - 4:18 pm | अनन्न्या

मुद्देसुद, सहज सोपे लिखाण!

पण आता चाहाचा टपरीवाला आणि नाक्यावरचा सँडविचवाला कमी होत चालेत आणि कॉफी शॉप/ सब-वे जास्त चालतात, त्यामुळे आता सहज आनन्द मिळ्ण्याचे चान्सेस कमी, आपल्यापुर्ती सगळ्या प्रश्नान्चि उत्तर आलेलि बरी

अभ्या..'s picture

10 Jul 2013 - 5:10 pm | अभ्या..

मस्त लिखाण अतिवासतै.
एकदम घोटीव आणि परफेक्ट शब्दरचना असते तुमची.

स्पंदना's picture

11 Jul 2013 - 4:25 am | स्पंदना

घोटीव आणि परफेक्ट

__/\__

प्यारे१'s picture

10 Jul 2013 - 5:19 pm | प्यारे१

कशाचंही निमित्त आनंदासाठी पुरेसं व्हावं हे आनंद आत आहे, बाहेर साधनात नाही हे सांगण्यासाठी पुरेसं ठरावं.
तुमचा अभिषेक त्याला तिकडे सुख म्हणतो नि इकडे तुम्ही.

थोडक्यात नि महत्त्वाचं म्हणजे सहज लेखन. हॅट्स ऑफ.

(एवढ्यासाठी कितीक लेख नि कितीक प्रतिसाद. तरी जमत नाही ते नाहीच्च. ;) तहानेचं अ‍ॅनॅलिसिस करावं पण ते आतल्या आत. बरं असतंय. )

स्वाती दिनेश's picture

10 Jul 2013 - 5:28 pm | स्वाती दिनेश

कॉफी आणि तिचे निमित्त दोन्ही आवडले,
स्वाती

सोत्रि's picture

10 Jul 2013 - 6:35 pm | सोत्रि

तुफान!
आणि आमच्या साउथच्या फिल्टर कॉफीचा फोटो एकदम सुखावून गेला :)

चला एका कॉफी घेऊन येतो, तो पर्यंत तुम्ही ही गाथा कॉफीची १ आणि गाथा कॉफीची २ वाचा!

प्यारे१'s picture

10 Jul 2013 - 7:18 pm | प्यारे१

>>>>आमच्या साउथच्या

ऑऑऑऑऑ? साऊथ तुमचं? कधीपास्नं नि कुठल्या अर्थे म्हणे? ;)

सुधीर's picture

10 Jul 2013 - 7:33 pm | सुधीर

सहज आणि सुंदर! तितकाच विचार करायला लावणारा लेख.

अर्धवटराव's picture

10 Jul 2013 - 9:50 pm | अर्धवटराव

याला म्हणतात सुलझीहुइ बाते.

अर्धवटराव

लेखन खूप आवडले....अगदी प्रश्न न विचारता समोर आलेल्या कॉफीएवढे!

विजुभाऊ's picture

11 Jul 2013 - 12:33 am | विजुभाऊ

सहज सोपे मूड फ्रेश करणारी कॉफीसारखेच लिखाण

उपास's picture

11 Jul 2013 - 1:31 am | उपास

लिखाणाची शैली नेहमीसारखीच ओघवती.. आवडली.
'कॉफी' ची तुलना रोचक वाटली. मुळात आपल्या काय हवय ते कुठेतरी खोल आधीच डिफाईंड असतच्, ते वरती येण बाकी असतं. त्याची ती डेफिनेशन आपण ज्या वातावरणात वाढलोय त्यात तयार होते. त्यामुळे भारतियांना जगात कुठेही गेलं तरी स्टीलच्या ग्लासातलीच कॉफी अपिल करेल हीच शक्यता जास्त.
तुमच्या जागी एखाद्या अमेरिकन माणसाला बसवा आणि कन्याकुमारीला कॉफि प्यायला न्या, तो बिचारा स्टार बक्सच्या आठवणीने झुरेल कदाचित!
थोडं अनुषंगिक अवांतर - मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की वेगवेगळे पर्याय शोधण्याचं. अजमावण्याच आणि त्यांना कस्टमाईज करण्याच आर्थिक, मानसिक स्वातंत्र्य आणि बळ पुढच्या पिढीस आहे. तेवढे विकल्प त्यांच्यापुढे आहेत आणि ते चोखंदळपणे निवडतायत त्यांना काय हवं ते. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण पुढच्या पिढीला जास्त समजून घेऊ असं वाटतय!

स्पंदना's picture

11 Jul 2013 - 4:22 am | स्पंदना

थोडं अनुषंगिक अवांतर - मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की वेगवेगळे पर्याय शोधण्याचं. अजमावण्याच आणि त्यांना कस्टमाईज करण्याच आर्थिक, मानसिक स्वातंत्र्य आणि बळ पुढच्या पिढीस आहे. तेवढे विकल्प त्यांच्यापुढे आहेत आणि ते चोखंदळपणे निवडतायत त्यांना काय हवं ते. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण पुढच्या पिढीला जास्त समजून घेऊ असं वाटतय!
फार आवडल. बरीच मदत होइल मुलांच्या अपेक्षा समजुन घ्यायला, त्यांचे दृष्टीकोण समजुन घ्यायला. आमच्याच पिढीच सगळ योग्य अन तुमच सगळ वाईट हा विचार गुंडाळुन ठेवलेलाच बरा.

मी_आहे_ना's picture

11 Jul 2013 - 1:29 pm | मी_आहे_ना

अगदी अगदी. (अर्थात मी ह्या विचारांशी माझ्या पन्नाशीतही सहमत असेन की नाही, नो ग्यारंटी. पण प्रयत्न नक्की करेन, हा विचार आठवून तरी..)
:)

आतिवास's picture

15 Jul 2013 - 2:10 pm | आतिवास

उपास,
सहमत आहे.
पुढच्या पिढीलाच काय पण कुणालाही समजून घेताना 'आपल्याला समजलं नसण्याची शक्यता आहे' हे लक्षात घेतलं की समजून घेण्याची प्रक्रिया जरा सोपी होते. अर्थात त्यामुळे लगेच कुणी अथवा काही समजेल अशातला भाग नाहीच म्हणा :-)

रामपुरी's picture

11 Jul 2013 - 1:58 am | रामपुरी

आवडलं

स्पंदना's picture

11 Jul 2013 - 4:24 am | स्पंदना

अतिवास....साध्या साध्या गोष्टीतुन अस बरच काही उमजत जात नाही? फक्त मन अन विचारांची कवाडे उघडी पाहिजेत.
खरच ओघवत, अन सुरेख लिखाण.

आतिवास's picture

11 Jul 2013 - 12:56 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

चित्रगुप्त's picture

11 Jul 2013 - 5:14 pm | चित्रगुप्त

वाहवा. अगदी मनातले लिहिलेत. आमचाही अनुभव अगदी अस्साच. उजवीकडील किंमती आधी वाचणे, वगैरे सकट सर्व अगदी डिट्टो.
वरकरणी सहज सोप्या वाटणार्‍या प्रसंगातून गहन जीवनसत्ये सांगण्याची हातोटी औरच.
खूप आवडले लिखाण.

कोमल's picture

15 Jul 2013 - 2:39 pm | कोमल

मस्तच..
लेख सुध्दा आणि कॉफिचा फोटो सुध्दा..

आवडेश :)

आतिवासताई, लेख नेहेमीप्रमाणेच झकास!

मला वाटतं दुसरी स्थिती (पहिल्या फटक्यात पाहिजे ते मिळणं) ही पहिल्या स्थितीच्या वारंवार केलेल्या प्रयोगाने येते. याचं बेष्ट उदाहरण पानाच्या दुकानात. नवीन पानवाल्याकडे पहिल्यांदा गेलं की "कलकत्ता, किमाम, कत्री, लच्छा,इलायची नहीं" असा संपूर्ण मंत्र म्हणावा लागतो (पहिली स्थिती). रोज त्याच्याचकडे जात राहिलं तर त्याला आवड बरोब्बर लक्षात येते, आणि दुरून येताना दिसलो की तो पर्फेक्ट पान बनवूनच हातात ठेवतो (दुसरी स्थिती).

मोठमोठ्या कंपन्या (विशेषतः ऑटो क्षेत्रातल्या*) अशा व्हेंडर डेव्हलपमेंट वर भरपूर वेळ आणि पैसे खर्च करतात.

*कारण एका कारमध्ये त्यांच्या अ‍ॅन्सिलरी कारखान्यांनी बनवलेल्या अनेक वस्तू असतात. उदा. सां गोबेनच्या काचा, ब्रेंबोचे ब्रेक वगैरे.

ब़जरबट्टू's picture

16 Jul 2013 - 9:07 am | ब़जरबट्टू

मस्त लिखाण !! खरच पहिल्यादा सबवे ला गेलो तेव्हा "ब्रेड नको पण प्रश्न आवर" अशी गत झाली होती... :)

त्रिवेणी's picture

17 Jul 2013 - 2:24 pm | त्रिवेणी

मस्त लिहील आहे. कॉफीचा फोटो मस्तच.

सर्वसाक्षी's picture

20 Jul 2013 - 2:16 pm | सर्वसाक्षी

अगदी सहज आणि मनोमन पटणारं लिखाण. अनुभव अगदी खरा.

अवांतर - आपण ग्राहकला ओळखुन पदार्थ बनविणार्‍यांचे उपभोक्ते आणि भोक्तेही. कमीत कमी प्रश्न विचारुन हवे ते देणारे हे खरे ग्राहकाभिमुख. कालच सकाळी पॉण्डिचेरी चेन्नै प्रवासात 'घेतलीच पाहिजे' अशी 'मधुरंगदम' येथली 'कॉफी ओन्ली' ची मस्त कॉफी प्यायलो. फक्त एकच विचारणा - 'स्ट्राँग की मिडिअम?' पाठोपाठ लखलखीत पितळी पेला-पातेलीतुन वाफाळ कॉफी आणि पातेलीच्या काठावर सांडलेली चार कण साखर. ती जीभेनं टिपण्यात एक विलक्षण आनंद असतो. न मागता मिळालेलं सुख.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2013 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर

जळवा..जळवा आम्हाला. भटकंती करा, छायाचित्रण करा, कॉफ्या प्या आणि जळवा आम्हाला.

नंदन's picture

20 Jul 2013 - 2:47 pm | नंदन

लेख आवडला. 'द पॅरॉडॉक्स ऑफ चॉईस: व्हाय मोअर इज लेस' हे पुस्तक आठवलं.

आतिवास's picture

21 Jul 2013 - 11:57 am | आतिवास

मोअर इज लेस - हा एक रोचक पॅरॉडॉक्स आहे खरा. पुस्तक वाचेन सवडीने.

सहज's picture

20 Jul 2013 - 6:33 pm | सहज

वैभवचे कौतुक वाटले!

फक्त एका कॉफीच्या निमित्ताने केवढे ते तत्वज्ञान!! मावशीला कॉफी नसुन लेख हवा आहे हे वैभव अगदी ओळखून आहे व तो बरोबर मिळवून दिला!!

ब्राव्हो वैभव!

बाकीच्या वैभवांना विनंती, प्लीज तुमचीच मावशी आहे, तिला काय आवडते नाही आवडत हे तुम्हाला चांगले माहीत आहे कृपया पुढच्या वेळी तुम्हीच ऑर्डर करा मावशीसाठी!!

बादवे जेवण झाल्यावर पानवाल्याकडून लोक परफेक्ट पान बनवून घेतात तसे काही लोक सबवे मधून... गविंशी सहमत! सबवे चांगला पर्याय आहे.

मला प्रो. देसाई व तळे आठवण झाली.