"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
11 Jul 2008 - 6:33 pm

राम राम मंडळी,

शीर्षक वाचून दचकलात ना? :)

पण घाबरू नका, मी काही इथे आपल्याला गाणं शिकवण्याकरता आलेलो नाहीये कारण मी स्वत:च अजून एक विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखाचं शीर्षक मी, 'चला गाणं शिकवतो, समजावतो!' असं न देता 'चला, गाणं शिकुया, समजून घेऊया!' असं दिलं आहे! :)

असो..!

एक गोष्ट नमूद करू इच्छितो ती अशी की इथे मी गाण्यातल्या काव्याविषयी, त्याच्या चाली/संगीताविषयी न बोलता ते गाणं कश्या रितीने गायलं गेलं आहे या विषयावर बहुत करून बोलणार आहे. प्रत्येक गाण्याला एक गायकी असते. मी त्या गायकीविषयी बोलणार आहे. मला ती गायकी कशी दिसली, कुठे आवडली याबाबत माझं म्हणणं मी आपल्याशी शेयर करणार आहे. त्यामुळे कदाचित येथील काही वाचक मंडळींचा एखाद्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूही शकेल, ती मंडळी ते गाणं अधिक चांगल्या प्रकारे, डोळसपणे एन्जॉय करू शकतील असं मला वाटतं म्हणून हा लेखनप्रपंच! एखाद्या गाण्याच्या गायकीविषयी काही गोष्टी समजून घेतल्या तर आपल्यालाच ते गाणं अधिक चांगल्या रितीने गाता येईल, ते ऐकतांना अधिक चांगल्या रितीने ऐकल्याचा आनंद मिळेल. कारण प्रत्येक मनुष्य जेव्हा गाणं ऐकत असतो तेव्हा तोही ते गाणं मनातल्या मनात गातच असतो. त्याकरता कुठे जाहीर गायलं पाहिजे असं नाही, ष्टेजशो वगैरे केले पाहिजेत असंही नाही. गाण्यासारखा दुसरा सोबती नाही, त्यामुळे एखादं गाणं समजून घेऊन स्वत:पुरतं गातांनाही मजा येते. त्यातला स्वानंद सर्वात महत्वाचा! सबब, गाण्यातली काही सौंदर्यस्थळे समजून घेऊन, जाणीवपूर्वक ते गाणं मनातल्या मनात का होईना, परंतु अधिक चांगल्या रितीने गाता यावं, गुणगुणता यावं असं वाटणार्‍यांकरता हा लेखनप्रपंच! :)

एखादं गाणं आपल्याला का आवडतं? याची ढोबळमानाने उत्तरं द्यायची झाली तर त्या गाण्याची चाल/संगीत खूप छान असतं, संबंधित गायक/गायिकेचा आवाज खूप छान असतो, त्या गायक/गयिकेने ते गाणं खूप चांगल्या रितीने गायलेलं असतं, इत्यादी काही उत्तरे मिळतील. यापैकी आपण 'गायक/गायिकेने ते गाणं खूप चांगल्या तर्‍हेने गायलेलं असतं' या मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत.

बाबूजी, दिदी, आशाताई इत्यादी मंडळी एखादं गाणं खूप छान गातात तसं मला गाता येत नाही. असं का बरं होतं? फक्त त्यांचा आवाज माझ्यापेक्षा कितीतरी अधिक छान असतो म्हणून? नाही, एवढं एकच कारण नक्कीच नाही. इतरही अनेक कारणं आहेत. ह्या मंडळींनी गायलेलं एखादं गाणं ऐकायला खूप छान वाटतं यामागे ह्या मंडळींचा आवाज, त्याचा पोत हे मुख्य क्वालिफिकेशन आहे/असतं हे मान्य! परंतु 'आवाज' हे एवढं एकच कारण नसतं! मुख्य मुद्दा असतो तो त्यांच्या गायकीचा. स्वर ठेवण्याच्या, स्वर लावण्याच्या पद्धतीचा. गाण्यातली अदृष्य लय अतिशय लीलया सांभाळण्याचा, संगीतकाराने त्या गाण्यात ठेवलेल्या खास खास जागांचा, शब्दांच्या उच्चारांचा!

आता पहिलं उदाहरण म्हणून आपण खूबसूरत सिनेमातलं पंचमदांनी संगीत दिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'पिया बावरी' हे गाणं पाहू. हे माझ अतिशय आवडतं गाणं आहे. हे गाणं आपल्याला येथे ऐकता येईल व येथे पाहताही येईल. आज पहिलाच भाग आहे म्हणून आज आपण फक्त या गाण्याच्या अस्थाईबद्दल बोलू, त्यातली गायकी समजून घ्यायचा प्रयत्न करू. आज आपल्या सगळ्यांच्या गुरू आहेत या गाण्याच्या गायिका आशाताई! चला तर मंडळी. आशाताईंना मनोमन वंदन करून व्हा तैय्यार! गाणं समजून घेण्याचा हा पहिला धडा गिरवायचा आपण सगळेच प्रयत्न करू! आधी म्हटल्याप्रमाणे मीही एक विद्यार्थीच आहे तेव्हा माझंही काही चुकू शकतं. तसं काही चुकलं तर अवश्य सांगा, मला ती चूक कबूल करायला जराही संकोच वा कमीपणा वाटणार नाही! :)

'निसागम निधप' या सरगमने या गाण्याची सुरवात होते. यात 'निसागम' हा आरोह आहे व 'निधप' हा अवरोह आहे. 'निसागम' या आरोहानंतर 'निधप' हा अवरोह आशाताईंनी किती सुरेख गायला आहे पाहा! 'नि' वरून किती सुरेख वळण घेऊन त्या 'धप' या अवरोहावर येतात ही माझ्या मते शिकण्यासारखी गोष्ट आहे!

हा सरगम पूर्ण करून लागलीच त्या 'पिया बावरी..' ही अध्ध्या त्रितालातली चीज गाऊ लागतात व अतिशय सुरेलतेने 'बावरी' शब्दातल्या 'री' वर सम घेतात. एका क्षणात त्यांची स्वर-ताल-लय यांच्यावरची हुकुमत दिसून येते व आशाताईंनी या गाण्याचा संपूर्ण ताबा घेतल्याचे आपल्या लक्षात येते!

पिया बावरी, पिया बावरी, पी कहा, पी कहा, पिया पिया बोले रे, पिया बावरी!

'पी कहा, पी कहा' हे शब्द कसे टाकले आहेत पाहा व त्यानंतर लगेच 'पिया पिया बोले रे' या शब्दांतलं लयीला धरून असलेलं चापल्य किती सुरेख आहे पाहा! चापल्य हा शब्द मी अश्याकरता वापरला की पुढे लगेच 'पिया बावरी' हे शब्द घेऊन सम गाठणं महत्वाचं आहे! 'पिया पिया बोले रे' या शब्दांनंतर 'पिया बावरी' हे शब्द घेऊन आशाताई इतक्या सुंदर रितीने समेवर येतात की अगदी ऐकत रहावसं वाटतं. तालास्वरालयीवर घट्ट पकड, कुठेही शब्दांची खेचाखेच नाही की मोडतोड नाही! इथे आपल्याला आशाताईंच्या गायकीचा आनंद मिळतो अन् मन प्रसन्न होतं! लगेच पुढच्या आवर्तनात त्यांनी 'बावरी' शब्दातल्या 'बा' वर इतकी जीवघेणी जागा घेतली आहे की की क्या केहेने! साला, दिल एकदम खुश होऊन जातो! :)

असो,

तर मंडळी, आज प्रस्तावनेचा हा पहिलाच भाग आहे तेव्हा आपल्याला जास्त त्रास न देता इथेच थांबतो. पुढील प्रत्येक भागात आपण एखाद्या गाण्यातलं धृवपद व एखादा अंतरा यातलं सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते मी माझ्या परिने शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन. बसंतच लग्न या मालिकेत मी मला आवडणार्‍या काही रागांचं सौंदर्य उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे. तशी मला आवडणार्‍या काही गाण्यांबद्दल लिहिण्यासाठी मी ही लेखमाला सुरू करत आहे. आपल्याला आवडली, त्यातून काही चांगले विचार मिळाले तर चांगलंच आहे, नाय आवडली तर द्या सोडून...! :)

-- तात्या अभ्यंकर.

संगीतशिक्षणआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 6:38 pm | विसोबा खेचर

या गाण्याचं पडद्यामागचं क्रेडिट हे अर्थातच कवीचं, पंचमदांचं, वादकांचं, व ऍरेंजरचं आहे!

त्या सर्वांनाही माझं वंदन...!

आपला,
(विद्यार्थी) तात्या.

वरदा's picture

11 Jul 2008 - 6:41 pm | वरदा

त्याकरता कुठे जाहीर गायलं पाहिजे असं नाही, ष्टेजशो वगैरे केले पाहिजेत असंही नाही. गाण्यासारखा दुसरा सोबती नाही, त्यामुळे एखादं गाणं समजून घेऊन स्वत:पुरतं गातांनाही मजा येते.

१०१% सहमत्..मलाही असच गायला आवडतं फक्त माझ्यासाठी....:)
हे गाणं तर सुरेखच तुम्ही समजावलयही छान आज घरी जाऊन ऐकून परत गायचा प्रयत्न नक्की करणार
(बाथरुम सिंगर)
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

आनंदयात्री's picture

14 Jul 2008 - 12:18 pm | आनंदयात्री

चांगला लेख .. पुढच्या लेखांची वाट पहातो.

पुष्कर's picture

11 Jul 2008 - 6:47 pm | पुष्कर

तात्या, तुमचा उत्साह समजू शकतो. तुम्ही याविषयातले तर अगदी अधिकारी जाणकार आहात, पण मला स्वत:ला हा प्रयोग नाही आवडला बुवा! कवितेचा आनंद घेण्याऐवजी त्याचं रसग्रहण झाल्यावर जे वाटतं, तसं वाटलं. (रसग्रहण म्हणजे कवितेच्या रसाला लागलेलं ग्रहण)

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 6:51 pm | विसोबा खेचर

पण मला स्वत:ला हा प्रयोग नाही आवडला बुवा!

हरकत नाही, प्रत्येकाच्या आवडीनिवडी! :)

परंतु यातलं काय नाही आवडलं ते सांगाल? काय चुकलं आहे ते सांगाल? म्हणजे मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. की तुम्हाला रसग्रहण हा प्रकारच आवडत नाही? :)

तात्या.

वाटाड्या...'s picture

11 Jul 2008 - 7:30 pm | वाटाड्या...

बर्‍याच दिवसांनी आपण सुरु केलेली संगीत विषयक चर्चा पाहून आनंद झाला. त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि धन्यवाद...

जसे आपण संगिताचे विद्यार्थी तसेच आम्हीही...पण सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यातून पहायचे झाल्यास काही प्रश्ण उभे राहतात ते फक्त मी इथे नमूद करू इछितो...आपण रागावणार नाहीत अशी अपेक्षा...

१. सम म्हणजे काय?
२. अस्थाई म्हणजे काय?

असे जे प्रश्ण उभे राहतात त्या बद्दल जर पटकन तिथेच माहीती दिलीत तर लेख अजुनच परिपुर्ण होईल ह्यात काही शंका नाही. माझा अनूभव असा की ज्या लोकाना शास्त्रिय संगीत नकोस वाट्ट त्याचं मुख्य कारण त्याची आणि त्यातल्या शब्दांची माहीती नसणे हे मुख्य आहे. ती माहीती जर शक्य तिथे पटकन मिळाली तर हे प्रेम वाढीस लागेल...कोण जाणे ह्यातुन एखादा विचारी गायक / वादक निर्माण होइल.

बाकी गाण्यातली सौंदर्य स्थळं दाखवण्याचा आपला हा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे ह्यात काहीच शंका नाही. परत एकदा आपलं अभिनंदन...

अवांतर : लोकप्रभामध्ये येणारा अंजली किर्तने यांचे लेख वाचता का? एक अतिशय माहीतीपुर्ण लेख असतात..आपण तर त्यांचे पंखा झालो आहोत...

धन्यवाद,

मुकुल

गिरिजा's picture

11 Jul 2008 - 8:16 pm | गिरिजा

सम म्हणजे काय?
तालाची पहिली मात्रा म्हणजे सम. जसं, त्रितालामध्ये १६ मात्रा असतात आणि ज्या अक्षरावर सम येते तेव्हा १६ मधली पहिली मात्रा (तबल्यावर थाप) पडते. १६-१६ ची आवर्तनं असतात, पुढच्या आवर्तनांमध्येही ते अक्षर समेवरच येते.

तात्या, मी बाळ आहे बरं गाण्यामध्ये, चुकलं असेल तर सांगा..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

नारायणी's picture

11 Jul 2008 - 9:57 pm | नारायणी

मस्त तात्या. हे गाणं कधीचं माझ्या संग्रही नव्हतं पण तुमचा लेख वाचुन हे गाणं ऐकलं आणि गाणं एकदम आवडुन गेलं. आता डाउनलोड करीन.खरचं सुंदर मालिका सुरु केली आहे तुम्ही. धन्यवाद.
मुकुल ने सुचवलेलंही अगदी बरोबर आहे.

नारायणी's picture

11 Jul 2008 - 10:08 pm | नारायणी

आणखी एका गझलेसाठी तुम्हाला धन्यवाद. मागे तुम्ही "आज जानेकी जिद ना करो.." या गझलेचं असचं सुंदर रसग्रहण केलं होतं.मला ही गझल माहित होती पण कधी ऐकायचा प्रयत्न केला नव्हता. तात्या तुमचा लेख वाचला,गझल ऐकली आणि काय सांगु ,ऐकतचं राहीले. अनेकवेळा ऐकली त्या दिवशी.एवढचं नाही तर गझल संपल्यावर आपोआप मी टळ्या वाजवल्या जणु काही मी प्रत्यक्श मैफीलित बसलेली आहे.आजुबाजुचे सगळे लोक चमकुन माझ्याकडे बघु लागले.अजुन एकदा धन्यवाद.

ऋषिकेश's picture

11 Jul 2008 - 10:21 pm | ऋषिकेश

तात्या,
या मालिकेबद्दल अभिनंदन आणि आभार!
"मला गाणं आवडतं" याच्या पुढे जावसं सगळ्यांनाच वाटतं पण शास्त्रीय खाचाखोचा माहित नसताही कळेल अश्या भाषेत कोणी सांगत नाहि ही खंत असते. ती आपण दूर केलीत. अगदी मन लाऊन लेख तीनदा वाचला व एकीकडे गाणं ऐकलं आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एखाद्याने एखाद्या सौदर्यस्थळाकडे लक्ष वेधलं तर आनंद होतो तो वेगळाच. शिवाय "खरच इतके वेळा हे गाणं ऐकूनही कसं बर कळलं नाहि हे आपल्याला" असंही वाटून जातं :)

गाण्यातली काही सौंदर्यस्थळे समजून घेऊन, जाणीवपूर्वक ते गाणं मनातल्या मनात का होईना, परंतु अधिक चांगल्या रितीने गाता यावं, गुणगुणता यावं असं वाटणार्‍यांकरता हा लेखनप्रपंच!

आपले उद्दीष्ट सफल झालंय ,तात्या :)

तेव्हा आपल्याला जास्त त्रास न देता इथेच थांबतो

का हो? अजून असा त्रास आवडला असता :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय's picture

12 Jul 2008 - 3:37 am | धनंजय

आशाताईंवर मी कधीचाच फिदा आहे. पण असे थोडे लक्षपूर्वक ऐकू लागलो तर "फ्यान"चा "रसिक" होण्याची वाटचाल सुरू होईल.

बेसनलाडू's picture

12 Jul 2008 - 11:19 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

चकली's picture

11 Jul 2008 - 10:42 pm | चकली

माझ्यासारख्या गाण्यात ढ असणार्‍या पण गाणे समजवून ऐकावे अशी इच्छा असणार्‍याना पर्वणी आहे.

चकली
http://chakali.blogspot.com

मनिष's picture

11 Jul 2008 - 11:27 pm | मनिष

अजून येऊ द्या!

मेघना भुस्कुटे's picture

14 Jul 2008 - 11:48 am | मेघना भुस्कुटे

येऊ द्या आणखी. मजा येतेय.

नंदन's picture

12 Jul 2008 - 12:33 am | नंदन

असेच म्हणतो. उत्तम उपक्रम.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2008 - 8:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या सर,
आवडला आपला उपक्रम

माझ्यासारख्या गाण्यात ढ असणार्‍या पण गाणे समजवून ऐकावे अशी इच्छा असणार्‍याना पर्वणी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस's picture

12 Jul 2008 - 12:31 am | पिवळा डांबिस

तात्या, ही अगदी छान लेखमाला सुरू केलीस रे तू!!
आमच्यासारख्या संगीत गाऊ न शकणार्‍या, पण ऐकायला आवडणार्‍या कानसेनांसाठी तू देत असलेली माहिती अगदी उपयुक्त आहे बघ!! आणि ती तुझ्या शैलीत असल्याने अगदी रंजक अणि सोपी पण आहे.
आम्हाला बघ, लहानपणी संगीत शिकण्याचं कधी सुचलंच नाही.....
अभ्यास एके अभ्यास (पांढरपेशे ना आम्ही!) आणि उरलेल्या वेळात तालीम एके तालीम करत र्‍हायलो बघ!!:)
संगीत ऐकायला खूप आवडतं पण त्यातली घट-पटाची चर्चा उमगत नाही रे! आता तुझ्या लेखमालेची खूप मदत होईल...
वर मुकुलने सांगितल्याप्रमाणे 'सम' अस्ताई' वगैरे सुद्धा समजावून सांग एकदा! काय करणार, तुला शिष्यवर्ग आमच्या सारखा ढ भेटलाय ना! ते तुझं प्राक्तन म्हणायचं.....
आमच्यासारख्या "औरंगझेबांना" शिकवायचं!!!:)
पण असू दे, तू आपला सांगत जा, आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे शिकत जाऊ. काही शंका असेल तर विचारू.
तुझा,
पिवळा डांबिस
(अवांतरः अरेंजर्स आणि फुल ऑर्केस्ट्राच्या संगीताच्या जमान्यात वाढलेली आमची पिढी! पण मग सैगलचं "बाबुल मोरा" किंवा बालगंधर्वांचं "सुजन कसा मन चोरी" ऐकतांना कुणीतरी काळजावर धारदार सुरी चालवतंय असं का वाटतं रे?)

चित्रा's picture

12 Jul 2008 - 12:33 am | चित्रा

हेच.
पुढच्या भागांची उत्सुकतेने वाट पाहते.

मुक्तसुनीत's picture

12 Jul 2008 - 12:42 am | मुक्तसुनीत

असेच म्हणतो ! :-) या निमित्ताने पुष्कळ शिकायला मिळणार !

आशाबाईंच्या आवाजात "लोच" आहे असे म्हण्टले जाते. ती या गाण्यात दिसते असे मला वाटते. तात्या, तुम्हाला काय वाटते ?

वरदा's picture

12 Jul 2008 - 12:43 am | वरदा

बोल्लात डांबिसकाका
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 12:39 am | विसोबा खेचर

या गाण्यात नृत्य करणारी, मन मोहवून टाकणारी रेखा, या चित्रपटातील तिचा सहजसुंदर अभिनय, हा एक स्वतंत्र विषय आहे! केवळ सुरेख..!
गाण्यातली शशिकलाही छान! हा चित्रपटदेखील अतिशय सुरेख होता!

आमचे अतिशय आवडते, लाडके कलाकार दादामुनी यांनी या गाण्यात फार सुंदर परण म्हटली आहे. छान चालीत, तालालयीत उत्तम परण म्हणता येणं तसं मुश्कील काम आहे. दादामुनींनी ते खूप छान केलं आहे! :)

आपला,
(दादामुनींचाप्रेमी आणि त्यांच्या सर्वात धाकट्या भावाचा भक्त) तात्या गांगुली.

मुक्तसुनीत's picture

12 Jul 2008 - 12:45 am | मुक्तसुनीत

या चित्रपटाबद्दल कै. शांताबाई शेळक्यानी आठवण सांगितली आहे. त्या सेन्सॉर बोर्डावर होत्या त्यावेळी. हा चित्रपट एकही कट न होता पास झाला. हृषिदा त्याना पास करतेवेळी भेटले तेव्हा त्या म्हणाल्या " देखिये ना कितनी अच्छी पिक्चर आपने बनाई है. अब तो वो पास भी हो गई है. क्या आप ये हमारे घरवालोंको दिखाएंगे ?" आणि खरोखरच त्यांच्या नातेवाईकांकरता त्यानी "स्पेशल शो" केला !

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 1:10 pm | विसोबा खेचर

चांगली आठवण आहे!

तात्या.

प्राजु's picture

12 Jul 2008 - 2:52 am | प्राजु

वाचला लेख तात्या. हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे. त्या गाण्याच्या गायकीचं विश्लेषण खूप सुंदर केलं आहे. या गाण्यानंतर उत्तरायण या मराठी सिनेमातल्या "धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना" याचं कराल का?
तेही अतिशय सुंदर आहे गाणं.. तरल आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

12 Jul 2008 - 4:09 am | शितल

मला आवडणार्‍या काही गाण्यांबद्दल लिहिण्यासाठी मी ही लेखमाला सुरू करत आहे. आपल्याला आवडली, त्यातून काही चांगले विचार मिळाले तर चांगलंच आहे, नाय आवडली तर द्या सोडून...!

अहो तात्या काय बोलता तुम्ही हे
मस्तच माहिती आम्हाला देत आहात आणि नाय आवडणार कशाला, वाट पहात आहोत कधी तुम्हाला वेळ मिळतो आणि आम्हाला पुढील लेख वाचायला मिळतो :)

सहज's picture

12 Jul 2008 - 7:32 am | सहज

आधी ऐकले असले तरी इथले रसग्रहण करुन परत ते गाणं ऐकायला जास्त मजा येते.

अश्या हिंदी फिल्म म्युझीक ने आपले आयुष्य काय सुखी केले आहे!

पुढच्या भागाची वाट बघतोय.

शिप्रा's picture

12 Jul 2008 - 9:20 am | शिप्रा

भाग २ येऊ द्या...वाट बघत आहोत...:)

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

साती's picture

12 Jul 2008 - 1:25 pm | साती

तात्या,लिहित रहा ,आम्ही वाचत रहातो.
साती

प्रमोद देव's picture

12 Jul 2008 - 1:43 pm | प्रमोद देव

तात्या गुरुजी फार मस्त गाणं निवडलंत! आशाताईंच्या गायकीबद्दल आमच्यासारखे पामर काय बोलणार? त्यांच्या अष्टपैलुत्वाला आम्ही नेहमीच मुजरा करत असतो.
माझ्या लहानपणी ४ थी पर्यंत मी पालिकेच्या शाळेत शिकलो तोवर तिथे गायन गुरुजी हा प्रकार नव्हता. मी पाचवीत खाजगी शाळेत दाखल झालो आणि मग मला कळले की माझ्या जुन्या शाळेत त्यावेळचे रेडिओ स्टार आणि कुमार गंधर्वांचे गुरु बंधू श्री. रतिलाल भावसार ह्यांची गायन गुरुजी म्हणून नेमणूक झालेय. काय विचित्र योगायोग बघा. माझी गाणं शिकण्याची आयती संधी गेली.
पुढील आयुष्यात अशी संधी आली पण तिही नीटपणे साधता आली नाही. एकूण आमचे दूर्दैवच म्हणायचे( आम्हा श्रोत्यांचे सुदैव! दुसरे काय? ;) .. कोण बोललं? ~X( बाकी तुम्ही म्हणताय ते खरं आहे म्हणा :( )
तेव्हा आता इथे तात्या गुरुजी जे काही शिकवताहेत ते डोळसपणे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय पण आता वाढलेल्या वयामुळे येणारे विस्मरण आडवे येतेय. कोणतीही नवीन गोष्ट फार काळ लक्षात राहात नाही. पण तात्यानु तुम्ही सांगत राहा. बघू ! आमच्यासारख्या मंदबुद्धी आणि त्यात भरीस भर म्हणून विस्मरणाचा वर लाभलेल्या लोकांना ह्याचा कितपत फायदा होतोय ते!

तात्या जरा ते तालाचं तंत्रही नीट समजावून सांगा बॉ. कारण आम्ही नेहमीच बे'ताल' होतो(गाण्यात बरं का! उगाच दुसरी शंका नको!)

आपला एक मंदबुद्धी विद्यार्थी
प्रमोदकाका

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jul 2008 - 11:32 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या, नविन उपक्रम छान आहे. पुढील लेखांची वाट बघतो आहे.

बिपिन.

अन्या दातार's picture

14 Jul 2008 - 12:13 pm | अन्या दातार

काही वर्षापूर्वी कोल्हापुरात प्रा. श्रीकृष्ण कालगावकर व प्रभाकर तांबट यांनी असाच हिंदी-मराठी संगीताच्या रसग्रहणासाठी स्मृतीगंध लिसनर्स क्लब स्थापन केला आहे. मी गेली ३-४ वर्षात त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. त्याआधी बहुदा १-२ वर्षे तरी त्यांचा एकही कार्यक्रम चुकवला नव्हता. आज तात्यांनी ती आठवण जागी केली.
तात्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय. कधी तरी कोल्हापुरात चक्कर टाका; प्रा. कालगावकरांकडे जाऊ.

अवांतरः तात्यांच्या या उपक्रमाला मिसळपाव लिसनर्स क्लब असे नाव देउयात का???

आपला,
(लिसनर) अन्या दातार

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jul 2008 - 12:25 pm | डॉ.प्रसाद दाढे

तात्या मस्त रसग्रहण केल॑ आहेत. राहुलदेव बर्मन उर्फ प॑चमदा हा माणूसच एकूण अफाट होता. (प॑चमवर एक वेगळा लेखच लिहिला पाहिजे!) त्याने हि॑दी फिल्म स॑गितात जास्तीत जास्त प्रयोग केले आहेत. त्याच्या स॑गिताचे वेगवेगळ्या ऍ॑गलमधून अवलोकन व चर्चा पुण्यात प॑चमच्या जय॑तीला व पुण्यतिथीला होते. त्यावेळी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या प॑चमशी स॑ब॑धित व्यक्ति॑च्या मुलाखती व त्या॑च्या कलेच्या सादरीकरणाचा अप्रतिम कार्यक्रम होतो. इ.स. २०० सालापासून मु॑बईचे अ॑कुश चि॑चणकर, पुण्याचे राज नागूल, आशुतोष सोमण, प्रसाद स॑वत्सरकर ही प॑चम फॅन म॑डळी हा कार्यक्रम आयोजित करतात (नेहमीच हाऊसफुल्ल असतो, तिकिटे मोठ्या मुश्किलीने मिळतात)
प॑चम प्रेमी॑नी खालील वेबसाईटला जरूर भेट द्यावी.
www.panchammagic.org

पक्या's picture

15 Jul 2008 - 12:51 pm | पक्या

तात्या, एक चांगला उपक्रम सुरू केल्याबद्द्ल धन्यवाद.
गाणं ऐकायला मलाही आवडत पण गायकी समजून घेण्यात अगदीच ढ. आता या उपक्रमामुळे नक्कीच समजायला लागेल हा विश्वास आहे.
त्या आधी काही शब्दांचा अर्थ सांगितला तर बरे होईल.
आरोह , अवरोह म्हणजे काय? सम , त्रिताल, अस्थाई हा काय प्रकार आहे?
सरगम म्हणजे सप्तसूर हाच अर्थ की अजून काही?
ताल व लय यात फरक काय आहे?
हे बेसिकच जर कळ्ले नाही तर पुढचे काहीही डोक्यात जाणार नाही असं वाटतयं.

विसोबा खेचर's picture

17 Jul 2008 - 9:25 am | विसोबा खेचर

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मन:पूर्वक आभार...

मुकुल,

१. सम म्हणजे काय?

गिरिजाने जे उत्तर दिले आहे, तेच!

२. अस्थाई म्हणजे काय?

बंदिशीचा, गाण्याचा मुखडा. गाण्यात याला धृवपद म्हणतात, बंदीश असेल तर अस्थाई म्हणतात..

अवांतर : लोकप्रभामध्ये येणारा अंजली किर्तने यांचे लेख वाचता का? एक अतिशय माहीतीपुर्ण लेख असतात..आपण तर त्यांचे पंखा झालो आहोत...

हो, त्यांचे लेख छान असतात.

नारायणी,

आणखी एका गझलेसाठी तुम्हाला धन्यवाद. मागे तुम्ही "आज जानेकी जिद ना करो.." या गझलेचं असचं सुंदर रसग्रहण केलं होतं.मला ही गझल माहित होती पण कधी ऐकायचा प्रयत्न केला नव्हता. तात्या तुमचा लेख वाचला,गझल ऐकली आणि काय सांगु ,ऐकतचं राहीले. अनेकवेळा ऐकली त्या दिवशी.एवढचं नाही तर गझल संपल्यावर आपोआप मी टळ्या वाजवल्या जणु काही मी प्रत्यक्श मैफीलित बसलेली आहे.आजुबाजुचे सगळे लोक चमकुन माझ्याकडे बघु लागले.अजुन एकदा धन्यवाद.

उत्तमच गाणं आहे ते! :)

डांबिसराव,

(अवांतरः अरेंजर्स आणि फुल ऑर्केस्ट्राच्या संगीताच्या जमान्यात वाढलेली आमची पिढी! पण मग सैगलचं "बाबुल मोरा" किंवा बालगंधर्वांचं "सुजन कसा मन चोरी" ऐकतांना कुणीतरी काळजावर धारदार सुरी चालवतंय असं का वाटतं रे?)

हीच तर आपल्या अभिजात अभिजात संगीताची ताकद आहे! :)

मुक्तराव,

आशाबाईंच्या आवाजात "लोच" आहे असे म्हण्टले जाते. ती या गाण्यात दिसते असे मला वाटते. तात्या, तुम्हाला काय वाटते ?

अगदी खरं!

प्राजू,

या मराठी सिनेमातल्या "धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना" याचं कराल का?

केव्हातरी नक्की प्रयत्न करेन..

देवकाका,

पण तात्यानु तुम्ही सांगत राहा. बघू ! आमच्यासारख्या मंदबुद्धी आणि त्यात भरीस भर म्हणून विस्मरणाचा वर लाभलेल्या लोकांना ह्याचा कितपत फायदा होतोय ते!

नक्कीच होईल. तेवढी रसिकता आपल्यापाशी आहे! :)

अन्या दातार,

अवांतरः तात्यांच्या या उपक्रमाला मिसळपाव लिसनर्स क्लब असे नाव देउयात का???

उत्तम कल्पना आहे! :)

पक्या,

आरोह , अवरोह म्हणजे काय? सम , त्रिताल, अस्थाई हा काय प्रकार आहे?
सरगम म्हणजे सप्तसूर हाच अर्थ की अजून काही?
ताल व लय यात फरक काय आहे?

अरे बापरे! एवढे प्रश्न एकदम? :)

असो, यातील 'लय' य विषयावर सांगायचा प्रयत्न करणारा एक वेगळा लेख आज किंवा उद्या लिहीन...

असो,

सर्वांचेच पुन्हा एकदा आभार..

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

पुढचं गाणं - बिती ना बिताई रैना.. (चित्रपट : परिचय)