मास्तर कायम म्हणायचा मला, राजा, राजा लेका दुसर्याला मदत केली की देव तुला मदत करेल. जो अडलेला दिसेल त्याला मदत कर, जो मदत मागेल त्याला मदत कर. आता मास्तर म्हणाले म्हणजे करायला नको का? तेव्हा पासून मनाला जे वळण लागले ते त्यामुळे अंगावर वळ उठले तरी सुटले नाही बघा. मास्तरांनी सांगितले मागेल त्याला मदत कर. परिक्षेत एका मुलाला काय बी येत नव्हतं.. त्याने माझाकडे मदत नजरेनेच मागीतली गुपचुप व मी ती त्याला दिली. आता पन्नास कॉप्या अंगाखांद्यावर! दिल्या चारपाच काढून. देवानं कसे गुपचुप पुण्य जमा करून टाकायचे की नाही.. पण नाही. कॉप्या देताना मास्तरानंच पकडला, पापाचा हिशोब वाढवला. धु धु धुतला. वरून ६५ अंक कमी केले त्या पेपराचे.. नाय तर १०० पैकी १०० मिळाले असते. अहो तेवढा अभ्यास केलाच होता, तेवढी धावपळ केलीच होती.. ५ किमी तंगड्या तोडत चालत जाऊन, रातच्याला शाळेच्या गोडाऊन मधून पेपर लंपास करून त्या च्या नुसार रात्रभर जागून कॉप्या तयार केल्या हुत्या. १०० पैकी १०० मला नाही तर कोणाला मिळणार हुते तुम्ही सांगा बघु? पण नाय! मास्तर काय वधारला नाय.. भाव पण वाढवला हुता म्या, त्या काळी पन्नास देतो म्हणालो होतो... भर वर्गात मला.. मला मास्तराला लाच देतोस होय.. असे म्हणून मास्तरानं अजून बदडला! हे मास्तर लोक म्हणजे डोक्याला शॉट असतात बघा. पण आमचा मास्तर चांगला हुता, नंतर गुपचुप पन्नास घेऊन पास केला मला नीट मार्काने, तरी लेकाने ५३ मार्क खल्लेच.
पण म्या बधलो नाय, त्यानंतर पण अनेक वेळा अनेकांची लै मदत केली बघा. घेतले व्रत टाकू नये असे कायसं आमची आय म्हणायची सारखी म्हणून श्यान. शाळेतली एक सटवी.. नाय.. सटवी आता वाटते, म्या एवढं पुढं पुढं करायचो पण मला सोडून शेवटच्या बेंच वर बसणार्या हण्म्या बरोबर लाईन जुळवली ना तीने.. तर ती सटवी हणम्या बरोबर लाईन जुळाच्या आधी.. म्हणजे जेव्हा म्या पुढं पुढं करायचो तिच्या तेव्हा बघा.. एकदा डब्बा खाता खाता.. म्हणजे माझाच डब्बा ती खाता खाता म्हणाली.. इतनं कुणी पडलं तर किती लागेल? हात मोडेल की पाय मोडेल पडणार्याचा? लैच गहन इचारात पडली इचार करता करता माझा बी डब्बा खल्ला आणं तिचा बी तिनंच खल्ला. आन मला म्हणाली सांग ना राज! आता बघा असं कुणी प्रेमानं राज बीज म्हणाले की आपलं टाळक्कं होतय ऑउट.. त्यात ती म्हणजे आमची त्यावेळची श्रीदेवी.. नाय तर हेलन! मग तिने एवढं लाडालाडानं आपल्या प्रश्नाचं उत्तर मागितलं म्हणजे मदत करायला नको? समोरचं ढोला पक्क्या उभा हुता रेलिंगला टेकून.. दिला ढकलून..! मेल्याचं फक्त एकच हाताचं हाड मोडलं! दुसर्या मजल्यावरून पडल्यावर किमान दोन हाताचे.. एकादं दुसरं पायचं हाड मोडायला पाहीजे का नको तुम्ही सांगा! पण नाय खाऊन खाऊन माजला हुता लै.. फक्त हातच तुटला. आख्या शाळे समोर बोंबलुन सागिंतले की मदत करत हुतो.. मदत करत हुतो पण त्याच बा पैलवान गडी.. ऐकतोय होय माझं! पळवत पळवत मारला नव्हं मला बैलावानी!
त्यानंतर साळा सुटली.. नदीच्या काटावर बोंबा मारत हिंडण्याचं दिसं! आमची पंचगंगा कशी नागिणीवानी धावते.. मग आम्ही त्याच्या या काटावरून त्या काटावर बेडकावानी उड्या मारत पोहायचो..शिवाजी फुलाची मच्छिंद्री झाली की भोवरा शोधून शोधून त्यावर उड्या मारून भोवरा तोडायला बघायचो.. पाच-धा वर्षात भोवर्यात सापडून कोणी मेला नसल्यामुळं मोठी माणसं बी मज्जा बघायची..पाणसापं सपासपा पाणी कापत जायचे व पुलावरून त्यांना बघून जनतेची टरकायची.. मज्जा असायची त्या दिवसात! वरून पाऊस धपाधपा आंगावर बालटी नं पाणी ओतल्या गतं कोसळायचा... आणी आम्ही पोहायचं! त्या दिवशी बी नेहमी पैज लागली हुती भवरा तोडायची.. म्या दोन तोडलं.. समोरच्या विज्यानं ४ तोडलं हुतं! आधीच डोकं गरम झालं हुतं! त्यात त्यानं पाचवी उडी मारली भोवर्यात.. पण भोवरा वरून मुंगी एवढा व आतून हात्ती एवढा निघाला.. विज्या भवर्यात आडकला.. भवरा गारगार फिरत हुता... त्यात विज्या बिंगरीगत.. काय बी कळतं नव्हतं.. पब्लिक बोंबलली.. मदत करा त्याला.. वाचवा त्याला.. रांडेचे बघत बसले हुते.. म्या मारली उडी.... सरळ भवर्यात! भवरा गचकन तुटला..! त्या बरोबर विज्या पण तुटला. माझी उडी बरोबर त्याच्या पायावर पडली. त्याची आय व त्याचा पिंडका बाप गल्लीभर दंगा करून घेले आय बापाच्या आय बापाचां उध्द्धार करून गेले. बापानं पिसाळलेल्या कुत्र्याला मारावा तसा तसा.. धरून मारला.. मी निसटून पळायचो.. तो परत पकडून धुवायचा... साला खर्याची दुनियाच नाय राहीली.. नाय नाय माझा डायलॉक नाय हा.. तो अमिताब म्हणाला हुता परवा दुरदर्शनवर लागलेल्या पिच्चरमध्ये.
त्यानंतर बी मी कुणाला मदतीला नाय नाय म्हणालो नाय! पाटलाचं विक्या मदत पाहीजे मदत पाहिजे म्हणून गल्लीत बोंबलत हुतं..काय झालं म्हणून म्या पण बघायला पुढं गेलो तर लेकाचा कसला तरी सेनेचा बिल्ला विकत हुता.. म्हणाला शाळेनं ५० दिल्यात खपवायला.. नाय खपवलं तर परीक्षेत खपवतो असं मास्तर म्हणाला... म्हणून सांगितलं त्यानं! मायला या मास्तरांच्या जातीला तर! पण आता मागीतली मदत.. करायला नको? पाच पैसात रावलगाम मिळायची तेव्हाची गोष्ट.. कुठं रुपयाला हा फुकटचा बिनकामाचा बिल्ला त्याच्याकडून कोण घेणारं! त्याला नीट समजावला. रातच्याला गल्लीच्या पवार साहेबाच्यां नवीन घराचे बाधंकाम चालु असलेल्या जागे वरून लोखंडाच्या सळ्या पळवल्या... दुसर्या दिवशी सायकलवर बांधून सकाळ सकाळी भंगारामध्ये विकून टाकल्या! त्याला पन्नास पाहिजे हुतं.. १०० मिळाले! ५० पन्नासचे काय करायचे म्हणून त्याची शाळा चुकवून त्याला पिच्चर दाखिवला उमा मध्ये. साळोंख्येची लस्सी पाजली कॉलेज समोरची.. तरी बी २०-३० राहीलेच.. राहु दे माझ्याकडे म्हणून ठेऊन घेतलं. पण बेणं हरिचद्राची अवलाद.. मास्तराला पैसे बी दिले व ते सेनेचे बिल्ले बी दिले! मास्तरानं एक लगावली व सालं सगळं बका बका ओकलं! कोणाच्या मदतीला जाण्यात काय राम नाय हे मला.. त्या रामचंद्रानं वेताच्या काठीनं बडवलं तेव्हा समजलं बघा... रामचंद्राचं पुर्ण नाव.. रामचंद्र् पवार! त्या सळ्याचा मालक! व त्यानं का धुतला म्हणून बानं परत धुतला.. बोनसं! मायला ते तिकडं मुंबईत बोनस मिळत नाय म्हणून शान संप करत्यात व आम्हाला काय बी कारण नसताना ढिगानं बोनसं मिळतोय.. तो बी फुकटात.. अंगावर !
प्रतिक्रिया
20 May 2013 - 8:18 pm | मुक्त विहारि
झक्कास..
20 May 2013 - 8:19 pm | सौंदाळा
छान.लिहीत रहा.
लेखणीत ताकद आहे हो तुमच्या.
'नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या' चालीवर वाचावे.
20 May 2013 - 8:25 pm | प्यारे१
धुरळाच....!
लय भारी राजा. :)
20 May 2013 - 8:26 pm | लाल टोपी
छान लिहिलं आहे. पु.ले.शु.
20 May 2013 - 8:32 pm | निवांत पोपट
आपण एकाच गल्लीत तर राहत होतो. त्यावेळी का भेटला नाहीत?;)
20 May 2013 - 8:36 pm | दशानन
हा हा हा!
तेव्हा भेटलो असतो तर आख्खं कोल्हापूर पिसाळल्यागत माझ्या मागे लागलं असतं, एका सज्जन पोराला बिघडवला म्हणून ;)
20 May 2013 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
धम्माल लिहिलय. हहपुवा...
20 May 2013 - 9:01 pm | किसन शिंदे
हाहाहा :D
क लिवलंय क लिवलंय राजा. लैच भारी!!!
20 May 2013 - 9:04 pm | आदूबाळ
राज्या, भिडत रहा!
20 May 2013 - 10:58 pm | पैसा
मस्त आहे! थोड्या दिवसांनी लोक मदत नको म्हणायला लागतील बहुधा!
20 May 2013 - 11:00 pm | उपास
दरम्यान काही वर्षापूर्वी एक कॅसेट ऐकली मराठी, त्याचाही बाज असा कोल्हापूरी आणि सोलापूरी.. शिव्या सुद्धा अगदी प्रेमाने!
लेख आवड्लाच.. अजून लिहाच!
20 May 2013 - 11:47 pm | चिगो
एकदम जबराट.. अतिशय मदतगार (म्हणजे मदत करुन गार होणारे ;-) ) ब्वाॅ तुम्ही.. :-)
21 May 2013 - 8:50 am | सुधीर
झ्याक लिवलयं.
21 May 2013 - 9:31 am | सामान्य वाचक
...
21 May 2013 - 9:47 am | चाणक्य
मस्त लिहिलंय
21 May 2013 - 9:48 am | ऋषिकेश
:)
21 May 2013 - 10:05 am | जेपी
*****
21 May 2013 - 10:25 am | शिल्पा ब
झ्याक लिवलंय ..
21 May 2013 - 1:42 pm | धनुअमिता
खुप छन लिहीले आहे.पुलेशु
हहपुवा...
21 May 2013 - 1:52 pm | तुमचा अभिषेक
आधी वाचलेले.. पुन्हा मजा आली.. शैली खासच
21 May 2013 - 2:38 pm | सस्नेह
भारी लिवलंय
21 May 2013 - 9:19 pm | पिंगू
हाहाहा..
21 May 2013 - 10:02 pm | दशानन
सर्वांचे आभार, हा धागा आवडेल वाचकांना असे जेव्हा मी लिहले होते तेव्हा दिली वाटले नव्हते व मिपावर प्रकाशित केले तेव्हा देखील.
पण तुम्ही रसिक वाचकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आनंद झाला.
21 May 2013 - 10:03 pm | दशानन
*दिली - देखील असे वाचावे!
22 May 2013 - 4:48 pm | स्पंदना
उमात पिकचर? कोणत ओ?
मस्ताड लिखाण.
25 Aug 2013 - 10:13 pm | दशानन
त्यावेळी सांगण्यासाठी आम्ही सांगायचो, जॅकी चॅनचा पाहिला म्हणून ;)
24 May 2013 - 4:20 pm | परिकथेतील राजकुमार
मला आधी वाटले प्रभु मास्तरांच्या शिकवणीवरती लिखाण आहे का काय. ;)
भारी लिहिले आहेस रे राजा. आवडेश.
('पलीकडे ह्या आधी वाचले होते, बरे आहे.' अशी रावसाहेबांसारखी प्रतिक्रिया देण्याची उबळ आतल्या आत दाबली आहे.)
बाकी,
ह्या वरुन, "खुबसुरत लडकीयोंको इज्जत दो... : हे आठवले. ;)