संमोहरमल

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
7 Apr 2013 - 10:50 am

भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी

नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी

काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी

.....................अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

8 Apr 2013 - 4:14 pm | यशोधरा

वा, सुरेख!

इन्दुसुता's picture

9 Apr 2013 - 7:14 am | इन्दुसुता

कवितेतील लय आवडली.
दोन शब्दांचे अर्थ मात्र समजले नाहीत, कावेडी आणि संमोहरमल. त्यामुळे कविता थोडीफार समजली असे वाटत असले तरी नीट समजाऊन घ्यायला आवडेल.
कविने येथे रसग्रहण द्यावे अशी विनंती करते.

अहाहा! काय वर्णावी शब्दांनी मम या काव्याची गोडी!

वेगळे शब्द! छान आहे कविता.

अज्ञातकुल's picture

9 Apr 2013 - 8:30 pm | अज्ञातकुल

इंदुसुता,
आपल्या विनंतीचा आदर करून कवितेचा आशय थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे. आशा आहे आपल्याला अपेक्षित आनंद आणि समाधान मिळेल .

भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी

कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीची भली पहाट. अत्यंत नाजुक रेखीव चंद्रकोर उगवलीय. दूर कुठूनशी मनातल्या प्रसन्नतेशी सुसंगत कोकिळेची शीळ घुमते आहे. झुळुकेच्या लाघवी स्पर्शासोबत पक्षांची लगबग, चिवचिव, गुटुर घू चालू आहे.क्षितिजावर लाली उमलत चालली आहे पनाफुलांवर वसंताचा बहर सजलेला आहे कुणी अनामिक साद घालतोय असा भास होतोय. अशा अनेक कधीही न उमजलेल्या परंतू नेमाने न चुकता घडणार्‍या गोष्टी आजुबाजूला वावरताहेत.

नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी

वरती नील सरोवराप्रमाणे भासणारे कुठल्याही प्रतिबिंबाचा अद्याप स्पर्श न झालेले अथांग खोल आकाश आहे. त्यातूनच एखादा मेघ आपले जीवन सुखकर करणारे ऋतू साकार करत असतो. तशीच आपल्या नकळत आपल्या अंतरंगात अकल्पित स्वप्ने साकर होत असतात. ह्या प्राणमय विश्वाच्या वाटचालीत सुख दु:खाची जोडी मात्र एकमेकांच्या कडव्या साथीने अखेरपर्यंत मार्ग क्रमीत असते.

काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी

या सर्व घडामोडींचा घेतल्या जात असलेला अस्वाद शब्दांच्या काठावर सुखद क्षणांच्या कावेडी घेऊन स्थिरावतोय; चिरंजीव होतोय. गतकाळातील संमोहनाचे गारूडासोबत आणि आयुष्याच्या अनाकललीय मृगजळावर ही तन होडी आपोआप तरंगते आहे.

......................अज्ञात

यशोधरा's picture

9 Apr 2013 - 8:35 pm | यशोधरा

सुंदर. फार आवडले.

जेनी...'s picture

10 Apr 2013 - 12:41 am | जेनी...

:)

सुधीर's picture

10 Apr 2013 - 1:55 pm | सुधीर

मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
सुंदर!

प्यारे१'s picture

9 Apr 2013 - 9:16 pm | प्यारे१

सुंदर कविता.
अवांतरः कावेडी नसावं. 'कावड/ कावडी' असावं. एका आडव्या काठी च्या दोन टोकांना बांधलेल्या घागरी. जुन्या काळची (जनरल) पाणी वाहण्याची पद्धत.

आतिवास's picture

9 Apr 2013 - 10:58 pm | आतिवास

'संमोहरमल'या शब्दाचा अर्थ शोधला - तो सापडला नाही.

संमोह (bewilderment,infatuation, stupefaction... )आणि रमल (mode of fortune telling by means of dice )असे अर्थ या संस्थळावर शोध घेता आढळले.

गतकाळातील संमोहनाचे गारूड असा तुम्ही प्रतिसादात त्या शब्दाचा दिलेला अर्थ नीटसा कळला नाही. म्हणजे 'गतकाळातील संमोहनाचे गारुड' हे कळते आहे पण संमोहरमल कळत नाही :-(

बॅटमॅन's picture

9 Apr 2013 - 11:33 pm | बॅटमॅन

आहा!!!!!!!!! बोरकरांची आठवण करून देणारी कविता एकदम. पक्व रसदार गोड फळे लगडलेल्या झाडांची आठवण होते अशी कविता वाचली की. फार आवडली :)

पाषाणभेद's picture

10 Apr 2013 - 1:54 am | पाषाणभेद

फारच सुंदर मनमोहक!

इन्दुसुता's picture

12 Apr 2013 - 8:12 pm | इन्दुसुता

कवितेचा आशय देण्याबद्दल धन्यवाद.
कविता अतिशय आवडली, मोठयाने वाचून बघितली, कर्ण मधूर वाटली.

कवितानागेश's picture

14 Apr 2013 - 12:08 am | कवितानागेश

आहा!!

मेघवेडा's picture

14 Apr 2013 - 2:15 pm | मेघवेडा

व्वा! खूप आवडली!

संमोहरमल शब्द आवडूनच गेला! ब्याटम्यानशी सहमत आहे.

सुमीत भातखंडे's picture

18 Apr 2013 - 4:48 pm | सुमीत भातखंडे

रचना...
आशय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद

भावना कल्लोळ's picture

18 Apr 2013 - 5:02 pm | भावना कल्लोळ

आवडली शब्द सुरेख