सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानी

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
29 Mar 2013 - 9:36 pm

आलेल्या नवीन वर्षापासून माझे ग्रह तरी १८० अंशात फिरले असावेत किंवा तारे तरी ! कारण भर दिवसा डोळ्यासमोर तारे चमकण्याचे प्रसंग नवीन वर्षात वरचेवर यायला लागलेत हो ! एक निस्तरते तोवर दुसरंच काही तरी समोर उभं ठाकलंय, असंच सारखं होऊ लागलंय. काय विचारू नका ससेहोलपट, …पायाखाली फटाक्यांची माळ लावावी तसं. अगदी खुळ्याची चावडी अन मीराबाईची मशीद अशी गत झालीये बघा !
आता तुम्ही म्हणाल असं काय बॉ आभाळ कोसळलंय तुमच्यावर ? अहो, आभाळ कोसळलं तर पाण्यात तरी उडी मारता येते. इथे आम्ही ना तळ्यात ना मळ्यात अशी बिकट अवस्था झालीय.
सुरुवात झाली ती नवीन वर्षाच्या प्रथम चरणात, म्हणजे पहिल्याच सप्ताहात. दिवसा ढवळ्या हापिसातून, लॉक केलेल्या कपाटातून, पर्समधले दोन हजार रु. की हो गेले ! अन तेही माझे नव्हे, ऑफिसचे ! माझे पाचशे जागच्या जागी ! सांगायचीही चोरी ! (हो, ‘फक्त ऑफिसचेच कसे काय चोरीला गेले ?’ ‘ चोर ऑफीशियल आहे वाटतं ?’ इ. कुत्सित शेरे ऐकावे लागले असते ना.) करते काय ? मुकाट्यानं पदरचे दोन हजार काढले ये.टी.येमातनं अन भरले हापिसात. ( वैताग वैताग....१)
जानेवारीच्या अखेरीला दुसरा झटका बसला. रोजचा ३० किमी जाता अन ३० किमी येता असा प्रवास हापिसचा. तोपण मायबाप सरकारी यष्टीनं. घरातून निघून टू-व्हीलर ष्ट्यांडावर पार्किंगमध्ये लावायची अन यष्टीत उडी मारायची. ही प्रथा. त्या दिवशी पार्किंगवाला कुठं मरायला चहा प्यायला गेला होता, कोण जाणे. गाडी चुकेल म्हणून टू-व्हीलर पे-पार्कऐवजी जनरल पार्किंगमध्ये लावली. संध्याकाळी परत आल्यावर बघते तर तिचा उजवा हात कुणीतरी इतक्या प्रेमानं पिरगाळलेला की तो लाजून जमिनीकडे झुकलेला. ढकलत तिला घरी नेली. तिच्या डाकदर ला बोलावणे धाडले.
‘दोन्ही ह्यांडल बदलावी लागतील.’ त्याने झटक्यात निदान केले. ‘४५० रु. फक्त.’
शस्त्रक्रिया केली ! न करून सांगताय कुणाला ? (.....वैताग, वैताग...२.)
डिसेंबरच्या अखेरीपासून सर्दीने पिच्छा पुरवलेला. रोजच्या प्रवासामुळे की काय, कोण जाणे, तीनदा औषध अन दोनदा डॉक्टर बदलला, तरी ती बरी व्हायचं लक्षण नाही. दुखणे पार सायनसपर्यंत गेले. नाकाचा टोमॅटो अन हजारेक रुपयांचा खुर्दा झालेला. डॉक्टर म्हणतात प्रवास टाळा, विश्रांती घ्या. बॉस म्हणतो मार्च आला, विश्रांती टाळा..! उन्हाळा तेजीत आलेला, घरी सगळे माठातले पाणी, कोल्ड्रिंक्स अन आईस्क्रीम खाताहेत अन मी गरम पाणी अन सितोपलादी चूर्ण ! (.......वैताग, वैताग ..३)
मार्चच्या पहिल्या आठवड्यात हापिसाची टूर होती मुंबईला. एक दिवसाचे काम अन दोन दिवस प्रवास. सोमवार प्रवास, मंगळावर काम अन बुधवार परत. जाण्यापूर्वी सहज भावाला फोन केला. अहो भाग्यम, तो मंगळवारीच पहाटे कार घेऊन मुंबईला जाणार होता. चला, सोमवारचा एक दिवस आयती सुट्टी मिळाली ! सोमवार हलगु-मलगु करत घालवला अन संध्याकाळी भावाकडे गेले. म्हटलं काय नियोजन उद्याचं ? तर पठ्ठ्या म्हणे, अगं ताई, माझी मुंबई ट्रीप पोस्टपोन झालीये उद्याची !
मी उडालेच ! ‘अरे, मग आधी सांगायचं नाहीस का ?’
देवा रे, आता रात्रीच्या travel चं बुकिंग शोधायला पाहिजे !
‘विसरलो गं !’ भावानं खजिलपणे travel वाल्याला फोनाफोनी केली.
मला काही सुचेना. जागेपणीच स्वप्न दिसू लागले... मी मिटिंगमध्ये लेट पोचले आहे,.. बॉसची क्रुद्ध मुद्रा माझ्या डोळ्यासमोर त्याच्या टकलापेक्षा तेजस्वीपणे चकाकू लागली. हे राम , धाव धाव ! (............वै वै.....४)
मी आठवतील त्या सगळ्या देवांचा आळीपाळीने धावा सुरु केला. नक्की कोणत्या देवाला करंट बसला, देवच जाणे, पण अर्ध्या एक तासानं वरच्या ऑफिसमधल्या सहकारिणीचा फोन आला. ‘अगं, मिटिंगमध्ये फक्त डिविजनल हेडनाच आत घेणारेत. तू सावकाश आलीस तरी चालेल..’
हुश्श झाले. सुखेनैव पहाटे उठून निघाले अन दुपारी एकला पोचले. मिटिंग सुरळीत झाली. मंगळवारी रात्री पुण्यात येऊन थांबले. बुधवारी सक्काळी सक्काळी शिवनेरी गाठली. गावात आले. आणि उतरताना घात झाला ! मागच्या प्रवाशानं स्वत:चं लँडिग करण्यापूर्वी आपल्या बॅगेचं अ‍ॅडव्हान्स लँडिग केले ते थेट शेवटची पायरी उतरत असलेल्या माझ्या उजव्या पायावरच ! परिणामस्वरूप माझ्या पार्श्वभागाचे इमर्जन्सी लँडिग बसच्या शेवटच्या पायरीवर होऊन तो भाग चांगला झेन्जारून निघाला ! त्यानंतर दोन दिवस, उठता-बसताना होणाऱ्या यातनांचे दु;ख अधिक की दोन दिवस सुट्टी मिळाल्याचा आनंद अधिक , हा प्रश्न मला सतावत राहिला. (,,,,,,,,,,,,,,वै वै........५)
तर मंडळी, गेल्या दोन महिन्यातले असे किती प्रसंग सांगू ? अहो, साध्या साध्या किरकोळ बाबीसुद्धा दमवू लागल्याहेत. आम्हाला लेट झाला की बसेस अगदी टायमात अन आम्ही लवकर गेलो की बस ब्रेकडाउन ! घरी लवकर जायचं असेल त्या दिवशी नेमकी मिटिंग लांबणार नाहीतर बॉस ठिय्या मारून बसणार. रविवार साधून घरी साफसफाई मोहीम काढली की कामवालीची दांडी पडणार, हे तर आता आम्हाला नाष्ट्याच्या पोहे-उप्पिटाइतकं अंगवळणी पडलंय !
आता तुम्ही म्हणाल हे तर आमच्या आयुष्यात पण घडते. त्यात नवे काय ? पण तुमच्या आयुष्यात असे आमच्यासारखे दोन-तीन महिन्यात लागोपाठ बडगे हाणल्यासारखे रट्टे बसलेयत का कधी ? आं, आं.. ? बोला ना आता, बोला ?
तेव्हा या सगळ्या पिडेतून सुखरूप पार पडण्यासाठी म्हसोबाला नारळ फोडायचा का पिराला कोंबडी कापायची अशा दुविधेत मी पडलेली असताना काल अगदी कळस झाला.
दोन महिन्यापासून चप्पल फाटायला आलेली. यष्टीप्रवासात कितीकांचे पदाघात झेलून झेलून बिचारी अगदी जीर्ण झालेली. मला काही मनासारखे पादत्राण-शॉपिंग करायला पुरेशी सवड मिळेना. हो, पादत्राणांच्या बाबतीत मी बै अगदी चोखंदळ आहे, हां ! ‘पाया’ सुरक्षित अन मजबूत तर इमारत सलामत !
प्रवास-समर-प्रसंगात आघात-प्रतिघातासाठी विशेष उपयुक्त म्हणून शूज बरे, असे ठरवले. एका शुभ-शनिवारी (रविवारी आमच्या गावी दुकाने बंद असतात.) मी शूज-खरेदी मोहीम काढली. चांगली आठ-दहा दुकाने पालथी घातली तरी दणकट खासे सुबक मुलायम असे शूज मिळेनात. मेले एकजात नाजूकच सगळे ! यष्टी-प्रवासी-पदाघात-भार सोसण्याची क्षमता एकातही दिसेना. मग स्पोर्ट्स ट्राय करून पाहिले. ते घालून दुकानात चालून पाहिल्यावर ‘अय्या, डोनाल्ड डक !’ असे एक कॉलेजकन्यका हळूच खिदळली. ती शब्दत्रयी कानी पडल्यावर स्पोर्ट्स शूज बाजूला सारले अन शब्दच स्पोर्टीव्हली घेतले अन बाहेर पडले.
अखेर एका सु-दुकानी, माझ्या स्वप्नकल्पनेतल्या शूजशी बऱ्यापैकी तादात्म्य असणारे शूज दिसले. किंमत रु. ५५० फक्त. बापरे, शूजच्या किमती इतक्या वाढल्यात हे माझ्या ध्यानी आले नव्हते ! दोनशे फार तर तीनशे. त्यापेक्षा जास्त रक्कम पादत्राणासाठी घालवणे म्हणजे माझ्या लेखी पैशाचा अपव्यय ! पण इलाज नव्हता. तेच एकमेव शूज माझ्या ‘मापात’ बसत होते किंवा मी त्याच्या मापात बसत होते !
बारकाईने पाहिल्यावर त्याचा तळ अंमळ पातळ असल्याचे माझ्या लक्षात आले. आमच्या गल्लीतल्या रस्त्यावरच्या धारदार बाणेदार दगड-धोंड्यांनी त्या तळाला भीक न घालता माझ्या सुकुमार तळपायाशी नक्की लाडीगोडी केली असती. तथापि आणखी दुकाने गावात शिल्लक नसल्याने मी तडजोड केली. त्याला जाड सोल लावून देण्याचे दुकानदाराकडून कबूल करवून घेतले. त्याबद्दल त्याने मोठ्या उदारपणे फक्त शंभर रु. जादा आकारले.
सहाशेपन्नास रुपयांचे शूज घेऊन मी जड अंत:करणाने अन हलक्या पर्सने घरी आले. दुसऱ्या दिवशी नवीन शूज घालून गेल्यावर ते पायाला इथे तिथे नक्की चावणार, हे गृहीत धरले. पण अहो आश्चर्यम, ते गुणी शूज इतके मऊ की चार दिवस झाले तरी कुठेही चावले नाहीत. ‘चला, सहाशेपन्नास सार्थकी लागले,..’. मी मनातल्या मनात स्वत:ला पैशाच्या अपव्ययाबद्दल माफ केले.
असे हे गुणी शूज बाहेर दारात रॅकवर ठेवून चौथ्या रात्री झोपले होते अन उठल्यावर पाहते तर सिंड्रेलाच्या बुटासारखा एकच बूट विरही प्रियकराप्रमाणे रॅकवर पहुडलेला ! माझ्या काळजात धस्स का काय म्हणतात ते झाले. तातडीने बुटाच्या जोडीदाराचा शोध घेतला. बागेत, गाडीखाली, झाडामागे, सगळीकडे शोधले. घराभोवती गेटच्या आतून अन कंपाउंडच्या बाहेरून दोन चकरा मारल्या. छे, नाही मिळाला ! रात्री गेटवर उडी मारून कुत्रं आलं असावं बहुधा अन त्यानं घात केला. सहाशेपन्नास रुपयांची वाट लावली ! (..................वै वै........६)
हाय हाय. आता मात्र कहर झाला ! डोस्क्याचा गोइंदा झाला. झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जुनेच शूज घालून पाय फरफटवत हापिसला गेले. आता शनिवारी पुन्हा दुकाने धुंडाळणे आले. पुन्हा सहाशेपन्नास ! हर हर !
संध्याकाळी घरी आले. नवीनच लागलेल्या कामवालीला ओढलेल्या सुरात विचारले,
‘येत-जाताना कुठं बूट दिसला का गं माझा, शीला, तुला ?’
‘आई, शीला कोण ? ‘शीला की जवानी’तली का ?’ चिरंजीवाचा कान नको तिथे तिखट !
‘अरे गप’ मी त्याच्या आवाजावर वरकडी करून ओरडले. ‘ती नवीन कामवाली मावशी आहे ना, तिचं नाव शीला.’
‘अव्वा, तुमचं बूट ग्येलं काय वयनी ?’ शीलानं माझ्या आवाजावर वरकडी केली..
‘अवो, बरं झालं बगा ! पिडा गेली !’
‘अगं ? सहाशेपन्नास रुपयांचे बूट गेले अन तू म्हणतेस बरं झालं ?’ बूट गेले तरी सहाशेपन्नास रु. काही माझ्या मनातून जाईनात.
‘अवो, आमच्या गावाकडं, का नै, लै चांगलं म्हंतात बगा चप्पल गेल्यावर. आपली पिडा चप्पल-चोराकडं जाती म्हनं ! आता तुमची पिडा संपली आन त्या कुत्र्याला लागली बगा ! ‘
‘काय म्हणतेस काय ? म्हणजे माझी दोन महिन्यापासूनची इडा पिडा आता संपणार ? खरंच ?’
‘आयच्यान, हो वयनी !’
‘जीव भरला, भरला, भरला, खरं वाटंना, वाटंना, वाटंना,.’ .अशी माझी अवस्था झाली. मी सहाशेपन्नास रुपये क्षणार्धात विसरले.
.....आता मी नारळ-कोंबडी यांचा नाद सोडून दिला आहे अन पिडा जाण्याची उत्सुकतेने वाट पाहते आहे. अजून थोडीफार जायची शिल्लक असली तर आणखी सहाशेपन्नास रुपयांचा एक बूटजोड खरेदी करून पुन्हा श्वान-शर्विलकाला आमंत्रण देण्याचीसुद्धा मी तयारी केली आहे. कसं ?.

विनोदप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

29 Mar 2013 - 9:56 pm | सोत्रि

हा हा हा!
झक्कास!

- (इडा पिडा घालवण्याचा 'बूट' आवडलेला) सोकाजी

जेनी...'s picture

29 Mar 2013 - 10:18 pm | जेनी...

हिहिहि .... एकदम झॅक्पॅक :D

यशोधरा's picture

29 Mar 2013 - 10:39 pm | यशोधरा

:D

आतिवास's picture

29 Mar 2013 - 10:48 pm | आतिवास

आपली पिडा चप्पल-चोराकडं जाती म्हनं !

या वाक्याचे आणखीही वेगळे अर्थ लागतात ?? :-)

सस्नेह's picture

30 Mar 2013 - 12:59 pm | सस्नेह

वेगळा अर्थ नाही समजला ! a

तुम्हाला राग येणार नाही आणि/किंवा तुमच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असं गृहित धरुन चालण्याइतपत आपली ओळख नाही - म्हणून मनात आलेला तद्दन विनोदी विचार आधी लिहिला नव्हता. पण आता विचारताच आहात तर सांगते.

चप्पल-चोराकडे पीडा जातात - मग तुम्ही जानेवारीत नेमकं काय केलं होतं म्हणून इतकी पीडा तुमच्याकडे आली? - असा प्रश्न (अर्थातच गंमतीने) मनात आला!!

(हे वाक्य तुम्हाला आवडले नसल्यास सांगा - पुढच्या वेळी असं काहीही लिहिणार नाही.)

अभ्या..'s picture

30 Mar 2013 - 3:26 pm | अभ्या..

चपलाच्या दुकानात आठवणीने पैसे देऊन आली होतीस ना स्नेहातै? ;)
नाहीतर दुकानदाराची पीडा तुझ्याकडे यायची. :(
(ह्या प्रतिसादाला तुला गंमतीत घे असे सांगावे लागणारच नै. कारण एवढ्या पीडा सुध्दा तू हलकेच घेतल्यात असे वाटते :) )

सस्नेह's picture

30 Mar 2013 - 5:29 pm | सस्नेह

नै हो आतिवासतै, ही पिडा वोरीजीनल माझीच !
दुसर्‍या कुणाची चप्पल मला बसताच नै इतका माझा पाय लहान आहे...!

=))

म्हन्जे ं बगा आमची स्नेहा केव्डी लाने ;)
नाजुक पायांची सोल्लिड ़जैरात =))

प्यारे१'s picture

29 Mar 2013 - 10:49 pm | प्यारे१

मस्त खुसखुशीत!

उपास's picture

29 Mar 2013 - 10:53 pm | उपास

खूप आवडलं.. कुत्र्याची रास काय होती, काही कळलं? :))
एरवी सरळमार्गी असणारे ग्रह वक्री झाले की एकामागोमाग संकटे देऊन आपली परीक्षाच पहात असतात ;)

कुत्र्याची रास बहुधा 'मेष' असावी. त्याशिवाय ते भाकरी सोडून चप्पलच्या नादाला लागलं नसतं ! a

वा! वा! मस्त खुसखुशीत! मंगला गोडबोलेंच्या ष्टायलीतलं लेखन!

दादा कोंडके's picture

30 Mar 2013 - 12:34 pm | दादा कोंडके

मंगला गोडबोलेंच्या ष्टायलीतलं लेखन!

सहमत.

शिल्पा ब's picture

29 Mar 2013 - 11:04 pm | शिल्पा ब

आवडलं..

अर्धवटराव's picture

29 Mar 2013 - 11:54 pm | अर्धवटराव

त्या कुत्र्याला तुमची पिडा नकोशी झाली तर तो सरळ आपल्या बत्तीशीने (बाय द वे, कुत्र्याला दात किती असतात? आणि त्यातले माणसाला चावण्याचे ठेवणीतले किती?) तुम्हाला "रिटर्न विथ थॅन्क्स" म्हणायचा... आणि पिडाबाई १४ इंजेक्श्नसह परत मुक्कामी यायची :)

(हां हां... अर्ध्या, हलकटा... सगळं सगळं ऐकु येतय हं मला :P )

अर्धवटराव

कपिलमुनी's picture

30 Mar 2013 - 1:09 am | कपिलमुनी

अहो ,
मिपाकराना बोलावून १-२ कोंबड्या ओवाळून टाकल्या असत्या ना नक्की सर्व ग्रह जागेवर गपगार बसले असते..

उलट्या पंखाच्या दोन कोंबड्या हेरून ठेवल्या आहेत! कधी येताय ?

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Apr 2013 - 6:41 pm | श्री गावसेना प्रमुख

कशाला चोरायला,नाही म्हणजे मी बजरंग लेप आणुन ठेवतो

जेनी...'s picture

3 Apr 2013 - 12:09 am | जेनी...

हिहिहि !!!
आमच्या गावाला अश्या कोंब्या आय मीन अश्या कोंबड्यांना उपारड्या पकाच्या कोंबड्या म्हणतात :D

अभ्या..'s picture

30 Mar 2013 - 1:29 am | अभ्या..

असंय होय?
मी पण आता उद्यापासून माझे बुटं बाहेर ठेवतो.

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2013 - 2:37 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेखन.

यावरून एक प्रसंग आठवला. महाविद्यालयात शिकत असताना दोन वर्गमित्र नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनाला गेले होते. तेथे एकाची चप्पल गहाळ झाली त्याने लगेच इतर कुणाची ठेवलेली चप्पल पायात बसते का बघायला सुरू केले.

तर सोबत गेलेला म्हणतो कसा, अरे वेडा आहेस का, ज्याची चप्पल तू घेशील त्याच्या पायातला शनी तुझ्या पायात जाईल... हे शनिमाहात्म्य सांगणारा नंतरचे अनेक दिवस चेष्टेचा विषय बनला होता. क्रिकेटच्या मैदानावरही बॅटीमधून शनी अंगात येईल असे चिडवले जात होते ;-).

व्हायरसगत शनीसुद्धा पायातून वैग्रे पसरतो तर!! सहीये :ड

=)) =))

अभ्या..'s picture

30 Mar 2013 - 2:45 am | अभ्या..

शनि व्यनितून सुध्दा पसरतो म्हणे. ;)

(खलीबलीच्या चालीवर) शनिव्यनि शनीव्यनी शनीव्यनी ;)

अभ्या..'s picture

30 Mar 2013 - 3:08 am | अभ्या..

नो प्रॉब्लेम ;)
पण हे कसंय?
अपना सपना शनि व्यनि :)

आदूबाळ's picture

30 Mar 2013 - 3:22 am | आदूबाळ

ब्याटम्यान आणि अभ्या - __/\__

:))

५० फक्त's picture

30 Mar 2013 - 12:22 pm | ५० फक्त

शनि,व्यनि, यासगळ्यांत सनि लिऑनांची, ती कशी नाय आठवली कुणाला, प्रत्येक विवाहित पुरुषासाठी सनि लिऑनांची शनिपेक्षा कमी नाय.

बॅटमॅन's picture

31 Mar 2013 - 1:07 am | बॅटमॅन

हा हा हा हेही भारीये ;)

राही's picture

30 Mar 2013 - 4:53 pm | राही

शनीव्यनी नको बुवा. उगीचच 'च्या गोष्टी'ची आठवण होते.(किंवा मग चालेलही बहुधा!)

रेवती's picture

30 Mar 2013 - 3:44 am | रेवती

लई भारी.

तिमा's picture

30 Mar 2013 - 11:00 am | तिमा

खुसखुशीत लेख. नांवावरुन मात्र गैरसमज झाला होता. वाटलं, यांत पिडाकाकांचा काय संबंध?
तुम्हाला किनै, ३१ मे २०१३ नंतर चांगले दिवस येतील बघा.

पिवळा डांबिस's picture

30 Mar 2013 - 11:05 am | पिवळा डांबिस

:)

राजेश घासकडवी's picture

30 Mar 2013 - 9:07 pm | राजेश घासकडवी

एक्झॅक्टली हेच म्हणायला आलो होतो. पिडा चोर आहेत? आणि त्यांनी निव्वळ सहाशेपन्नास रुपये चोरले? ते काही पटलं नाही. मग मला वाटलं की पिडा-चोर म्हणजे 'पिडांना ज्याने चोरून नेलं आहे असा तो' असा बहुव्रीहि का काय म्हणतात तसला समास आहे. मग म्हटलं मिपावर जाहीर दुःखोत्सव (आणि मनातल्या मनात आनंदोत्सव ;) ) सुरू होईल. पण तसंही काही दिसलं नाही, म्हणून लेख वाचला. आणि जानेवारीपासून मागे लागलेल्या अडिचीने गांजल्याचं इतकं छान वर्णन होतं की मग त्या पिडांकाकांचं काय झालं वगैरे विचारायचं विसरून गेलो.

श्रीरंग_जोशी's picture

2 Apr 2013 - 11:48 pm | श्रीरंग_जोशी

निव्वळ सहाशेपन्नास रुपये चोरले?

(चौर्य) कलेला काही मानच नाही हे खरे.
६५० मिलियन डॉलर्स किंवा सहा हजार पाचशे कोटी रुपये चोरले की कसे सगळे जग सलाम करते ;-).

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Mar 2013 - 11:06 am | ज्ञानोबाचे पैजार

लवकरच त्या कुत्र्याची पिडेमधुन मुक्तता होवो ही इश्र्वर चरणी प्रार्थना.

पिडा - चोर इतकेच वाचले आणि कुतुहलाने धागा उघडला.

पण ही पिडा वेगळी होती.

कवितानागेश's picture

30 Mar 2013 - 11:20 am | कवितानागेश

गमतीदार. :)

स्वगतः माझी चप्पल कधी हरवेल बरं? ;)

माऊताई, एकदा सुंदर चप्पल घालून देवदर्शनाला सिद्धिविनायकाला (प्रसिद्ध देवस्थानी) जाऊन ये. चप्पलच काय माणूसही हरवेल आणि कळणार नाही इतकी गर्दी. लोक आपली समजून दुसर्‍यांची मुले घेऊन गेली असतील तरी कळणार नाही. असो. मला एक प्रश्न पडलाय. लग्नात नवर्‍यामुलाचे जुते का लपवत असावेत? त्यामुळी बायकोची पिडा टळेल थोडीच? ;)

चप्पलच काय माणूसही हरवेल आणि कळणार नाही इतकी गर्दी.

आयला आधी नाय सुचल हे. आता आमच्या हिला घेऊन जातो सिद्धिविनायकाला. नक्की पिडा टळेल.

कुणाची ? तुमची की वैनींची ? a

स्पा's picture

30 Mar 2013 - 11:22 am | स्पा

=)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Mar 2013 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

:)) :)) :))

अच्छा! तर अशी तुमची पिडा 'पास ऑन' झाली तर.. :)

नुकत्याच कढाईतून काढलेल्या चकलीसारखा खुसखुशीत लेख.

राघवेंद्र's picture

2 Apr 2013 - 1:37 am | राघवेंद्र

"नुकत्याच कढाईतून काढलेल्या चकलीसारखा खुसखुशीत लेख. "

छान प्रतिक्रिया.. मराठी व्याकरणाप्रमाणे छान उपमा ( चकलीची)

५० फक्त's picture

30 Mar 2013 - 12:24 pm | ५० फक्त

फुलपाखरं किंवा किडे जसे, फुलातले केसर इकडुन तिकडं वाहुन नेतात तसं कुत्री पिडावाहकांचं काम करत असावेत अशी थेअरी मांडावी काय या अनुभवाच्या जीवावर असा विचार येतो आहे.

अवांतर - स्नेहांकितातै, तुम्ही मुंबईत तुमच्या हापिसच्याच खानावळीत जेवता का हो, ज्याम डँबिस जेवण असते तिथं निदान गडावर तरी, गंगेतलं नक्की माहित नाही.

सस्नेह's picture

30 Mar 2013 - 5:31 pm | सस्नेह

गडावरचं जेवण खरंच डँबिस असतं. गंगेवरचं जरा 'हुच्च' असतं !

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2013 - 12:50 pm | प्रभाकर पेठकर

मस्त खुसखुशीत लेख.

(फक्त वैताग वैतागचा जरा वैतागच आला).

सस्नेह's picture

30 Mar 2013 - 1:58 pm | सस्नेह

लेखनचुकी बद्दल ज्येष्ठांची माफी असावी. पुढच्या लेखनात चूक सुधारत आहे.

चेतन माने's picture

30 Mar 2013 - 1:01 pm | चेतन माने

:D :D :D
अजून एक थिअरी :जितके बूट महाग तितकी जास्त पीडा टळली असती तर !!!!!
म्हणजे बुटाची किंमत आपल्याला लागलेल्या पिडेच्या व्यस्त प्रमाणात............

दिपक.कुवेत's picture

30 Mar 2013 - 1:07 pm | दिपक.कुवेत

मस्त मजा आली वाचुन.....

मनराव's picture

1 Apr 2013 - 6:38 pm | मनराव

हेच म्हणतो.......

NiluMP's picture

30 Mar 2013 - 2:11 pm | NiluMP

मस्त.

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2013 - 2:18 pm | तुमचा अभिषेक

मस्त मजेशीर.. मला इथे हासायच्या स्माईली नाही सापडत आहेत.. पोट धरून हसणार्‍या धरून चला.. :)

धनुअमिता's picture

30 Mar 2013 - 2:57 pm | धनुअमिता

आवडले.........
aaaa

राही's picture

30 Mar 2013 - 5:03 pm | राही

खुसखुशीत लेख.
(मनाशीच): आजकाल नेतेमंडळीप्रती वहाणफेकीच्या खेळाची लोकप्रियता वाढल्याने वहाणउचलेही वाढले असावेत काय? त्यामुळे आता गल्लीतल्या दहा ओवर्सच्या क्रिकेटप्रमाणे वहाणफेकीच्या स्पर्धाही गल्लीसेनांना बॅनरसकट प्रायोजित करायला मिळण्याचे लोकसंपर्कघबाड मिळण्याची शक्यता वाढली आहे का?

भावना कल्लोळ's picture

30 Mar 2013 - 5:09 pm | भावना कल्लोळ

एकदम खुमासदार लेख…

किसन शिंदे's picture

30 Mar 2013 - 7:26 pm | किसन शिंदे

आयला ह्या हिशोबात तर आमच्याकडचे एकदा कोल्हापुरी चपलेचा जोड नि एकदा लेदर शुजचा नवा कोराहहहजोड गेलाहहहोता तरी सुध्दा आमच्या मागची पीडा अजून काय टळली नाही. ;)

आनन्दिता's picture

30 Mar 2013 - 7:43 pm | आनन्दिता

आवड्लं.......

(चप्पल निवडायला देवळात जाणारी) आनंदिता

केशवराव's picture

30 Mar 2013 - 8:03 pm | केशवराव

लिखाण खरच आवडले, म्हणजे लेखन शैली आवडलि.

मराठे's picture

30 Mar 2013 - 9:37 pm | मराठे

मस्त !

सुधीर मुतालीक's picture

30 Mar 2013 - 10:36 pm | सुधीर मुतालीक

एकच उपाय. तेव्हढा करा, म्हंजे हमखास फरक पडेल. निपाणीला दर्गा गल्ली आहे एक. गल्लीत एक दर्गा आहे. दर्ग्यात एक अदभुत झाड अहे. तिथं जिमनीवर लोळत जौन झाडाला धडकायचं. अंगाला चिकटलेला शनिचा त्रास एका पेटात गळून पडतो. येताना मलिद्याचा निवद दावून माघारी फिरायचं. उतारा न्हाई पडला तर नाव नै सांगनार. बाकी तुमचा लेख एकदम फरडू झालाय, मस्त.

निपाणीला दर्गा गल्ली आहे एक. गल्लीत एक दर्गा आहे.

"हे हितून असे शिद्दे जा. शालेपर्यंत. मग काय लागेल? शाला."

याची आठवण झाली. (ह घ्या!)

साळसकर's picture

30 Mar 2013 - 11:45 pm | साळसकर

साध्याच घटना पण हसून हसून पुरेवाट ... :)

श्रिया's picture

31 Mar 2013 - 10:59 am | श्रिया

खूप मस्त! मजा आली वाचताना!

चावटमेला's picture

31 Mar 2013 - 11:22 am | चावटमेला

साधं आणि छान. आवडलं.

स्पंदना's picture

31 Mar 2013 - 4:08 pm | स्पंदना

साध आनी छान?

यात साध काय दिसलं म्हणते मी? सगळा आगडोंब तिखट वैताग बिचारीचा.
मोजुन बघा, मोजुन बघा. पहिले २०००/- मग मुंबईच तिकिट ऐन वेळी काढलेलं, ४५०/- असतील का गं? मग चप्पल ६५०/- त्याच्या आधी बुड शेकुन निघाले, ( मोजदाद ज्याने त्याने स्वतःला त्या अव्स्थेत नेउन करावी), हँडल ४५०/- एकुण मार्च गाठेपर्यंत ४०००/- पर्यंत विनाकारण फटका.
आता स्नेहा जरा हसर्‍या मिजाजाची असल्याने तिने अस खुसखुशीत लिहिलंय, आणि म्हणौन तुम्हाला त्या मागची कळ नाही जाणवली, पण हसरी माणस जगण सुसह्य करतात हो तुमच आमच.

प्यारे१'s picture

31 Mar 2013 - 4:16 pm | प्यारे१

>>>>त्याच्या आधी बुड शेकुन निघाले

आसनस्तं बोलाचं.... आसन बोलाचं आसन! ;)
-यदाकदाचित मधला भीम प्यारे

जेनी...'s picture

31 Mar 2013 - 11:07 pm | जेनी...

=))
प्यारे काकु ... =))

मुपो अल्जीरिया इसरला वाट्टं ;)

प्यारे१'s picture

1 Apr 2013 - 2:06 am | प्यारे१

ते मुक्काम पोष्ट आहे ब्याटमॅना.... अभ्यास वाढव.
सारखा त्या कॅट्वुमनच्या मागं मेला!

- पूजादादाचा प्यारे काकू. :)

बॅटमॅन's picture

1 Apr 2013 - 2:11 am | बॅटमॅन

हम्म प्यारेकाकू :)

कॅटवुमनच्या मागे नै हो निस्ता , आता आमी दोगं हाओत म्हन्लं ;)

दादा कोंडके's picture

1 Apr 2013 - 1:34 am | दादा कोंडके

आता स्नेहा जरा हसर्‍या मिजाजाची असल्याने...

हा हा. पहिल्यांदा कै कळलच नाही. मटा वाचतोय का काय असं वाटलं. ;)

मटाच पढून राहिलो की काय असा खयाल मनात थोडी देर ठाण मांडून बसला होता माझ्याही :)

५० फक्त's picture

1 Apr 2013 - 10:42 am | ५० फक्त

'मनात' च्या जागी, ' दिमागात' असं हवं होतं, म्हंजे जास्त मटिय वाटलं असतं.

"मटिय" वाचून आँखे पानीसे भरून गेली आहेत ;)

श्रावण मोडक's picture

31 Mar 2013 - 5:22 pm | श्रावण मोडक

साधं, सरळ आणि म्हणून खुसखुशीत.

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2013 - 6:09 pm | स्वप्नांची राणी

मस्त हलकं फुलकं...

फारच छान लिहिलं आहे. वाचताना हसु आले.

मृत्युन्जय's picture

1 Apr 2013 - 10:52 am | मृत्युन्जय

मस्तच. साधे पण छान लिहिले आहे.

ऋषिकेश's picture

1 Apr 2013 - 11:06 am | ऋषिकेश

छान! :)

मी_आहे_ना's picture

1 Apr 2013 - 1:28 pm | मी_आहे_ना

हाहाहा,मस्त खुमासदार लेखन. (बादवे, कुत्र्यानी एकच चप्पल पळवली तरी पूर्ण पीडा जाते, आणि चोरानी जोड पळवला तरी...हे कसं काय बुवा?)

खबो जाप's picture

1 Apr 2013 - 4:21 pm | खबो जाप

माझ्या पार्श्वभागाचे इमर्जन्सी लँडिग बसच्या शेवटच्या पायरीवर होऊन तो भाग चांगला झेन्जारून निघाला !
ह्यातला " झेन्जारून" ( झेजरून ) हा शब्द वाचून तुम्ही कोल्हापूर कडच्या असाल असे वाटले मग तुमची वैयक्तिक माहिती बघून खात्री पटली.
येकदम बेष्ट आणि चपखळ शब्द....

सविता००१'s picture

2 Apr 2013 - 5:10 pm | सविता००१

मस्त लिहिलंय. एकदम पटेश आणि आवडेश :)

पिशी अबोली's picture

2 Apr 2013 - 6:00 pm | पिशी अबोली

=)) शॉल्लिड लिहिलंय
असा बोर्ड लावला तर?'आमचे येथे नवीन चप्पल चोरुन पिडा घालवण्यात येईल'
-सारमेयभगवान की जय

ह भ प's picture

3 Apr 2013 - 8:59 pm | ह भ प

जवळ जवळ एक महिन्याने मिपावर आलो.. अन हा लेख.. व्वाह..!! दिल खुश जालं..

सस्नेह's picture

3 Apr 2013 - 9:00 pm | सस्नेह

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार.
गमतीदार प्रतिसाद वाचून माझी इडा पिडा सुसह्य झाली आहे...! a

इन्दुसुता's picture

5 Apr 2013 - 9:04 am | इन्दुसुता

शीलाकी बुद्धिमानी आवडली. आता माझ्या सोयीप्रमाणे मी त्यात भर घालणार ड्राय क्लीनर कडे कपडे हरवल्यावर, मित्रमैत्रिणींनी पुस्तके हरवल्यावर ई. ई.

अमोल केळकर's picture

5 Apr 2013 - 12:12 pm | अमोल केळकर

छान लिहिले आहे

अमोल केळकर

चाणक्य's picture

6 Apr 2013 - 7:16 am | चाणक्य

लिखाण. मजा आली...

लिलि काळे's picture

6 Apr 2013 - 1:31 pm | लिलि काळे

आवडले.