-पाऊस -
हिरव्यागार शेताचा मालक मी जरी
सोबत आता फक्त रणरणती सावली ,
खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी
भरलेली विहीर तर कधीच आटली ,
ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी
ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली
…पण उजळेल आता तिची कुस
……उद्या पडेलच की पाऊस …!!!
गावात खांब आलाय विजेचा
अजून काम राहिलंय थोडं ,
लावेन मग दिवा शंभर चा
लकाकेल मस्त माझं झोपडं ,
देव आहे माझ्या पाठीशी
कसं होईल काही वेडंवाकडं,
....तोरण म्हणून बांधीन ऊस
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
एक सर झाली की पेरणी करेन ,
गुरांबरोबर चार दिस मीही राबेन ,
तरारेल मग शेत जोमाने ,
डाव सगळा मांडेन मी नव्याने,
भुईला करून टाकेन हिरवं शिवार ,
बैल गाडीवर मग होईल सवार ,
.....कापडं नवीन घालेन असेल माझाच कापूस
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
मातीत मिसळले बरेच
आधीच हाय खाऊन ,
प्रश्न सुटतील का पण
अशी आत्महत्या करून ,
दोन दिवस नुसतं पाणी पिऊन
आता कळशी गेलीये संपून ,
उद्या पाऊस पडला की
ठेवील गच्च भरून ,
आजची रात्र फक्त सरायला हवी ......
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
----फिझा.
प्रतिक्रिया
7 Mar 2013 - 11:11 am | मिसळलेला काव्यप्रेमी
विरोधाभास छान पकडलाय.
अवांतरः काय योगायोग आहे, ह्याच विषयावर मीही लिहीले कालपरवा.
8 Mar 2013 - 6:49 pm | जेनी...
आवडली कविता ....
8 Mar 2013 - 6:52 pm | जेनी...
आजची रात्र फक्त सरायला हवी ......
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
फक्त ह्या ओळीत यमक जुळायला हवं होतं असं वाटलं .. बाकि व्यथा , कारुण्य सगळं नजरेस पडतय .
कीप इट डीअर :)
9 Mar 2013 - 3:30 am | फिझा
यमक जुळवणे अवघड नाहीये !! या ओळीत जरा वेगळा अर्थ आहे ....म्हणून मुद्दाम यमक जुळवले नाहीये !!!
9 Mar 2013 - 1:58 pm | सुधीर
कविता आवडली. दुर्दैवाने या वर्षीचा दुष्काळही भिषण आहे. आशा आहे की "....उद्या पडेलच की पाऊस !!!"
10 Mar 2013 - 10:58 am | अत्रुप्त आत्मा
कविता आवडली :-)