निरोप घेताना चेहरा हसरा ठेवलेला असतो ....
निघण्याचा क्षण आता निसटून गेलेला असतो ...
राहिलेली असते ...ती फक्त एक खिडकी ..!!
विचारांचा कल्लोळ उडालेलं मन ...
अडखळत टाकलेली काही पावले ..
नव्या जगाचा , नवा ध्यास ..
जुन्या फक्त ओळखीच्या आठवणी ...
आणि एक अनोळखी खिडकी ..!!
आपल्याला घेऊन उडणारा
तो अफाट मोठा पक्षी ...
आभाळाला जाऊन भिडण्यासाठी
त्याने घेतलेला तो तुफान वेग ....
भरून आलेले डोळे , दबलेला एक हुंदका ...
आणि सोबतीला ..फक्त ती खिडकी ..!!
थरारणारे काहीतरी , उडणारे काहीतरी ...
नवीन वेगाने जुन्या वेगाला मागे टाकत घेतलेली भरारी..
क्षणार्धात खाली राहिलेली लुकलुकणारी जमीन ...
दूर दूर होत चाललेले ते ठिपके ...
आणि जवळची होत चाललेली ...ती खिडकी ..!!
दुरावत चाललंय ते काहीतरी ...
जग ,पृथ्वी , जमीन कि आपलं घर .. कुणास ठाऊक !
विचारातच गर्क असणारं हे वेडे मन ...
एका विलक्षण सुंदर दृष्याने स्थिरावते ...
नेहमी नजर वर केल्यावर दिसणारे ढग ...
आता नजरेसमोर दाखवत असते...ती खिडकी..!!
एक एक ढग एक एक आठवणी सारखा ..
धरूनही ठेवता येत नाही ,पुसता ही येत नाही ..
कसलीच सीमा नाही,क्षितिजही नाही ...
चंद्रच फक्त मग डोकावून पाहणारा ...
आता पलीकडे तो आणि अलीकडे मी .....
कारण मध्ये ....हि खिडकी...!!
चंद्राशी हसता हसता ...
एक नजर पडतेच मग काचेवर ..
डोळ्यातले पाणी ,ओठावरचे हसू ..
आणि जगाशी कि स्वताशी च ताटातूट झालेले आपण ....
फक्त एवढंच ......
मग एक टाकलेला उसासा ....
आणि बंद केलेली ...ती खिडकी .......!!
प्रतिक्रिया
1 Feb 2013 - 12:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे खासचं
1 Feb 2013 - 2:58 pm | अभ्या..
खिडकी आवडली आहे अत्यंत. अप्रतिम
2 Feb 2013 - 8:17 am | स्पंदना
पहिल्यांदा देश सोडला ती आठ्वण अगदी जशीच्या तश्शी मांडल्यासारख वाटल.
सुरेख फिजाबाई? भाई?
2 Feb 2013 - 11:03 am | फिझा
फिझा ताइ.
2 Feb 2013 - 8:17 pm | पैसा
कविता आवडली.
3 Feb 2013 - 12:01 am | अग्निकोल्हा
आधि वाटलं ती खोली च विडंबन आहे की काय...
3 Feb 2013 - 11:50 am | क्रान्ति
खूप आवडली कविता.