सखे ...

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
18 Jan 2013 - 6:55 pm

वळणांवळणांवरती सखे
तव आठवणींची भरती सखे
कसे विस्मरू सांग तुला मी
हे श्वास श्वास तुज स्मरती सखे |

पाऊस हा घनगर्द सखे
अन् तुझ्या मिठीचा गंध सखे
कसा सुटावा असा रेशमी
तव बाहुंचा बंध सखे

रक्तवर्णित तव लज्जित चर्या
श्वासा श्वासांवरि भीति सखे
अनामिकशा त्या ओढीने
रोमांचित तव कांती सखे

चिंब चिंब ही तुझी कुंतले
चेहर्‍यावरी मम रुळती सखे
थेंब थेंब हा तुला स्पर्षता
न कळत होई मोती सखे

थरथरत्या तव अधरांची
मग पडे घट्ट ती मिठी सखे
असे गुंतलो एकामेकीं
जणु जन्मांतरीची भेटी सखे

श्रावणातल्या सायंकाळी
मला गवसले मीच सखे
विरुन गेले तुझ्यात अलगद
सायुज्यता का हीच सखे

ही भोगाची उर्मी म्हणु की
तल्लीनतेची समाधी सखे
की त्याच्याही पलकडली, मी
राधा , तु घनश्याम सखे

------------------------------------------

नाहीस जरी तू इथे सोबती
नाहीस जरी तू माझी सखे
माझे माझे कशा म्हणु मी
माझी "मी" च तुझी सखे !!

शृंगारमुक्तक

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2013 - 6:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अप्रतिम रचना...
___/\___

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 7:26 pm | शैलेन्द्र

कविता छानच आहे

पण,

थरथरत्या तव अधरांची
मग पडे घट्ट ती मिठी सखे
असे गुंतलो एकामेकीं
जणु जन्मांतरीची भेटी सखे

श्रावणातल्या सायंकाळी
मला गवसले मीच सखे
विरुन गेले तुझ्यात अलगद
सायुज्यता का हीच सखे

या ओळींचा कीस पडणार बघा..

धन्या's picture

18 Jan 2013 - 7:31 pm | धन्या

मी राधा , तु घनश्याम सखे

माझी "मी" च तुझी सखे !!

या ओळींवरुन भलतंच प्रकरण वाटतंय. :)

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 7:36 pm | शैलेन्द्र

मला गवसले मीच सखे
विरुन गेले तुझ्यात अलगद

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2013 - 6:48 pm | अत्रुप्त आत्मा

या ओळींवरुन भलतंच प्रकरण वाटतंय.

__/\____/\____/\____/\____/\__

दादा कोंडके's picture

20 Jan 2013 - 6:59 pm | दादा कोंडके

आरारारा... कलीयुग आलं हो कलीयुग! :)

कवितानागेश's picture

20 Jan 2013 - 7:01 pm | कवितानागेश

सुंदर रचना.

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2013 - 12:29 am | संजय क्षीरसागर

सखा सखीला म्हणतोय अशी सुरूवात आहे (१ ते ५ कडवी)
मग सखी सखीला म्हणतीये (६ आणि ७)
पण अंडरलाईन नंतर फुल बाऊंसर आहे.

मिका बहुदा सांगू शकेल

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2013 - 12:30 pm | प्रसाद गोडबोले

सखा सखीला म्हणतोय अशी सुरूवात आहे (१ ते ५ कडवी)
>> हे नक्की कोणत्या कडव्यात जाणवलय ?

काही गैरसम होत असल्यास क्षमस्व !

कविता पहिल्या पासुन शेवट पर्यंत एक सखी दुसर्‍या सखीला म्हणत आहे :)

पाऊस हा घनगर्द सखे
अन् तुझ्या मिठीचा गंध सखे
कसा सुटावा असा रेशमी
तव बाहुंचा बंध सखे

आणि

थरथरत्या तव अधरांची
मग पडे घट्ट ती मिठी सखे
असे गुंतलो एकामेकीं
जणु जन्मांतरीची भेटी सखे

हे नॉर्मली `सखा आणि सखीत होतं' असा समज आहे

हे नॉर्मली `सखा आणि सखीत होतं' असा समज आहे

तुम्हाला नॉर्मलीच्या ऐवजी जनरली असं म्हणायचं आहे का? कारण जे काही होतं ते अ‍ॅबनॉर्मल नसतं असं म्हणतात. ;)

संजय क्षीरसागर's picture

22 Jan 2013 - 11:22 am | संजय क्षीरसागर

हे एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत

कवितानागेश's picture

22 Jan 2013 - 12:50 pm | कवितानागेश

general: involving, relating to, or applicable to every member of a class, kind, or group

Normal: Normal is also used to describe when someone's behaviour conforms to the most common behaviour in society (known as conforming to the norm). Definitions of normality vary by person, time, place, and situation – it changes along with changing societal standards and norms.

मनीषा's picture

21 Jan 2013 - 10:30 am | मनीषा

कविता सुरेख आहे..
परंतु पाचव्या कडव्यानंतर तिने वेगळेच वळण घेतले आहे.
कवयित्रीला तसेच अभिप्रेत असेल तर ही भलतीच 'नव*' कविता आहे.

* - पचण्यास अंम्मळ कठिण =)

व्हिआदेश's picture

21 Jan 2013 - 12:07 pm | व्हिआदेश

सुंदर

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2013 - 12:33 pm | प्रसाद गोडबोले

पचण्यास अंम्मळ कठिण
>> ह्म्म ... कल्पना होती ह्या बद्दल ....
पण ओरियंटेशन ने प्रेमाला फरक पडत नसावा माझ्या मते ...प्रेम प्रेम असतं ...कोणी का करत असेना !
असो.
अवांतर :हा सखीचा स्वयं संवाद आहे असाही अर्थ लावता येईल ...पचण्यास सोप्पा :)

सर्व प्रतिसादकांचे आभार !

शैलेन्द्र's picture

21 Jan 2013 - 1:40 pm | शैलेन्द्र

ह्म्म ... कल्पना होती ह्या बद्दल ....
पण ओरियंटेशन ने प्रेमाला फरक पडत नसावा माझ्या मते ...प्रेम प्रेम असतं ...कोणी का करत असेना !

तुम्ही मुद्दामच तस लिहील असेल तर ठीकच आहे.. कविता छान आहे, बाकी गोष्टींना पास्स !!

नाही हो फार फरक पडतो!

अवांतर :हा सखीचा स्वयं संवाद आहे असाही अर्थ लावता येईल

तुम्ही असं अधांतरी ठेवू नका. एकदा का लोक अर्थ लावायला लागले की काही खरं नाही!

धन्या's picture

22 Jan 2013 - 12:46 am | धन्या

हा सखीचा स्वयं संवाद आहे असाही अर्थ लावता येईल

आधी आपल्याला हवा तो अर्थ समोर ठेवून लिहायचं आणि कुणी चौकशा केल्या की "असाही अर्थ लावता येईल" म्हणायचं. :)

बाकी मराठीतील ही बहुधा पहिली "ती"न सात सात कविता असावी.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2013 - 11:14 am | प्रसाद गोडबोले

पहिली "ती"न सात सात कविता म्हणजे काय ?

:हा सखीचा स्वयं संवाद आहे असाही अर्थ लावता येईल ...पचण्यास सोप्पा

नाही हो, तसा अर्थ लावता येत नाहीये.

नाना चेंगट's picture

21 Jan 2013 - 12:50 pm | नाना चेंगट

माय नेम इज शीला गाणे आठवले

अनिल तापकीर's picture

21 Jan 2013 - 3:23 pm | अनिल तापकीर

छान आहे आवडली

आधी प्रतिसाद वाचुन मग कविता वाचल्यावर अप्रतिम वाटली .
किपिटप .

शैलेन्द्र's picture

22 Jan 2013 - 11:34 am | शैलेन्द्र

कविता वाचनाची ही पद्धत आवडली, आम्ही मराठीच्या पेपराला कवितेखालचे उतार्‍याखालचे प्रश्न असेच सोडवायचो..

किपिटप .
कविता वाचल्यावर अप्रतिम वाटली.
....आधी प्रतिसाद वाचुन मग!!!

इन्दुसुता's picture

22 Jan 2013 - 12:30 am | इन्दुसुता

कविता आवडली.
गिरिजा स्वत: म्हणतातच, मलाही कुठेच सखा आणि सखी या दोघांमधील संवाद वाटला नाही.

हा सखीचा स्वयं संवाद आहे >>
असेच मला वाटले, पण दोन सख्यांमधील संवाद देखील पूर्ण पटण्यासारखा आहे.

किसन शिंदे's picture

22 Jan 2013 - 12:43 pm | किसन शिंदे

अप्रतिम लिहलंय!

अहिरावण's picture

26 Aug 2023 - 7:44 pm | अहिरावण

मस्त कविता !