सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
8 Dec 2012 - 1:48 pm

धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना
सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी
देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना

हे कायदे निजामी, का लावता फुलांना
भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना

अंधार दाटताना, रंगून सांज यावी
थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना

ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी
कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना

संध्या

शृंगारशांतरसकविता

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

8 Dec 2012 - 2:12 pm | ज्ञानराम

तरल कविता... छान..

अविनाशकुलकर्णी's picture

8 Dec 2012 - 2:23 pm | अविनाशकुलकर्णी

वा दिल गार्डन गार्डन हो गया..
मस्त

प्रचेतस's picture

8 Dec 2012 - 5:41 pm | प्रचेतस

कविता आवडली नाही.
तुझ्या कविता हळूहळू टाइपकास्ट व्हायला लागल्यात असे वाटतेय.

मोदक's picture

8 Dec 2012 - 6:04 pm | मोदक

श्री वल्ली,

तुम्हाला कवितेतले काय आवडले नाही हे सांगितले तर नक्की काय सुधारणा अपेक्षीत आहे हे सर्वांनाच कळेल. कितीही म्हटले तरी काव्यप्रकटीकरण प्रक्रियेमध्ये कवि / कवयित्रीने काहीतरी विचार केलेला असतो, तो विचार जर आपणांस कळाला असेल तर कविता जास्ती चांगल्या पद्धतीने पोहोचू शकते.

किमान त्या विचाराचा उल्लेख आला असता तरी ठीक होते, अन्यथा आपल्या प्रतिसादाचे "मताची एक पिंक" या पलिकडे मूल्य काहीच नाही.

कवितेतला टाइपकास्टपणा आवडला नाही.

चौकटराजा's picture

8 Dec 2012 - 6:08 pm | चौकटराजा

मी सहमत आहे. संध्याबाई , समजा गजल टाईपचेच काम करावयाचे आहे तरीही वेगवेगळे विषय हाताळा ना जरा !
उदा म्हणून सांगतो . ओ पी नय्यर तसे टाईपकास्ट संगीतकार होते. तरीही रविद्र नाथांच्या मूळ एकला चलो रे या रचनेवर कवि प्रदीप यानी केलेल्या चल अकेला चल अकेला ला चाल लावताना त्यानी आपले नय्यरपण त्यात सोडले नाही. तुम्हाला गजल या आकृतीबंध अतिप्रिय असल्यास आपले गजलीपण कायम ठेवून विषयाची विविधता आणता येईल ना !

सांजसंध्या's picture

9 Dec 2012 - 7:16 am | सांजसंध्या

:अओ:
चौराकाका, इतर विषयांवरच्या कविता पोष्टल्यात ना मी :) चुकून राहील्या असतील पहायच्या. हे आनंदकंद वृत्त आहे. यात लाखो गीतं लिहीली गेली आहेत. कवितेबद्दल काही सूचना असतील तर अवश्य कराव्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2012 - 6:03 pm | अत्रुप्त आत्मा

वन मोअर बेस्ट.......... :-)

प्रत्येक कडवं म्हणजे एकेक रूपक,पण विषयसूत्र एकच....त्यामुळे ही रचना गजर्‍यासारखी टवटवित झालेली आहे.

जेनी...'s picture

8 Dec 2012 - 9:10 pm | जेनी...

संध्या ..... :)

निरन्जन वहालेकर's picture

8 Dec 2012 - 10:31 pm | निरन्जन वहालेकर

व्वा ! क्या बात है !! सुन्दर ! ! !

सांजसंध्या's picture

9 Dec 2012 - 7:16 am | सांजसंध्या

सर्वांचे आभार.

सुरेख मला तर आवड्ली बै कविता

गालाला खळी पडणारी पियु ;)

वपाडाव's picture

20 Dec 2012 - 1:08 pm | वपाडाव

खळ्या पाडायला BEML ला बोलावुन घेतलं होतं का...
किती दिवस लागले??

सुहास..'s picture

10 Dec 2012 - 10:13 am | सुहास..

आयला परत कच्चा माल ;)

वपाडाव's picture

20 Dec 2012 - 1:10 pm | वपाडाव

का रे, सध्या १५ चा आहे का? मग थांब की एखाद xxxx ????

जयवी's picture

10 Dec 2012 - 11:57 am | जयवी

अगदी नाजुक साजुक....गोड... कविता :)

अनिल तापकीर's picture

13 Dec 2012 - 10:10 am | अनिल तापकीर

मला सुद्धा खुप आवडली

सु.द.मोरे's picture

19 Dec 2012 - 3:52 pm | सु.द.मोरे

मला तर आवडली बरका....

सुबक ठेंगणी's picture

20 Dec 2012 - 12:45 pm | सुबक ठेंगणी

गालातल्या खळ्या? की गालावरच्या खळ्या?
माफ करा पण "प्रथमग्रासे मक्षिकापातः" असं वाटलं.

चौकटराजा's picture

20 Dec 2012 - 5:02 pm | चौकटराजा

खळया हे अनेकवचन आहे अनेकवचनांचे आज्ञार्थी एकवचनी कसे काय बॉ ? अत: मला वाटते सांभाळा का म्हणावे गालातल्या खळ्यांना असे असावे की नाही ?

सुबक ठेंगणी's picture

20 Dec 2012 - 5:35 pm | सुबक ठेंगणी

अखेर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कविता वाचलीच!:)
उत्तर एकः सांभाळा हा शब्द गझल वृत्तात बसत नाही.
उत्तर दोनः खळ्यांच्या/गालाच्या मालकाला/मालकिणीला कवी एकेरीत संबोधतो आहे.
(जर कळ्यांना धुंदीत तारुण्याचा अर्थ कळाला तर "गालावरच्या खळ्यांना सांभाळ हो तू" असं का बरं म्हणावं कुणी कुणाला?)
अ‍ॅम आय राईट कवी?

चौकटराजा's picture

21 Dec 2012 - 9:22 am | चौकटराजा

कविता वाचता असे वाटत नाही की पूर्ण कविता खळ्यांच्या मालकिणीला उद्देशून लिहिली आहे . उद्देशून कविता साठी ने मजसि ने ही सावरकरांची कविता समोर आणावी
दुसरे असे की सांभाळा हे वृत्तात बसत नसेल तर सांभाळ वापरा हा दृषटीकोन फारच चुकीचा म्हणावा लागेल कारण कवितेत अर्थ महत्वाचा ( खरे तर अर्थ हाच साहित्याचा- भाषेचा मूल हेतू आहे ).आता वृत्ताला ही मान व अर्थालाही याचे उदाहरण देतो. त्यासाठी मराठी काव्यात संस्कुत विभक्तिचा कसा चपखल उपयोग केला आहे पहा.
रामे धनुष्य मोडीले , नाते सीतेसी जोडीले . यात रामे हा शब्द मराठीत रामाने असे वापरला पाहिजे पण " रामाने हा शब्द वृत्तात बसत नाही म्हणून रामे या शब्दाचा वापर केलेला दिसतो. हंसे मुक्ता नेली ही काव्यपंक्ति अशीच आहे.
वृत्तात बसावे या साठी गीतरामायणात रामासाठी श्री, राम, राघव , रामचंद्र , रघुनंदन, पतितपावन, रघुकुलदीपक अशा विविध अक्षरी शब्दांचा वापर गदिमानी केला होता. ही त्यांची कल्पकताच त्याना शब्दप्रभू ही उपाधि देवून जाते.

सांजसंध्या's picture

2 Jan 2013 - 8:28 pm | सांजसंध्या

येस्स :)
थँक्स सुबक ठेंगणी. उशिराने पाहिल्याबद्दल क्षमस्व

इरसाल's picture

20 Dec 2012 - 5:09 pm | इरसाल

गुराख्याला : "सांभाळ आपल्या गायींना" ( त्याला अरेतुरे करु शकतो)
मालकाला: " सांभाळा आपल्या दिवट्यांना/गायींना " वगैरे वगैरे