ही कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी
माझी विनंती आहे की आपण सगळे एक क्षणभर मौन पाळूया
अकरा सप्टेंबर रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि
पेंटागॉन इथं मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ
आणि त्यानंतर अजून एक क्षणभराचं मौन
त्या सगळ्यांसाठी ज्यांना तपासाच्या कारणास्तव
सतावलं गेलं कैद केलं गेलं
जे हरवून गेले ज्यांना यातना देण्यात आल्या
ज्यांच्यावर बलात्कार झाले. एक क्षणभराचं मौन
अफगाणीस्तानातील दुर्घटनाग्रस्तांसाठी
आणि जर आपण अनुमती दिलीत तर
एक पूर्ण दिवसभराचं मौन
हजारो फिलीस्तानी लोकांसाठी
ज्यांना त्यांच्या देशावर दशकानुदशकं कब्जा करून
इस्राइली फौजांनी अमेरिकेच्या संरक्षणाखाली मारून टाकलं
सहा महिन्यांचं मौन त्या पंधरा लाख इराकी लोकांसाठी
त्या इराकी मुलांसाठी
ज्यांना मारून टाकलं अकरा वर्षं लांबलेल्या
कर्फ्यू भूक आणि अमेरिकी बॉम्बवर्षावानं
ही कविता मी वाचण्यास सुरुवात करण्याआधी
दोन महिन्यांचं मौन दक्षिण आफ्रिकेतल्या अश्वेत लोकांसाठी
ज्यांना वर्णवादी सरकारनं
आपल्याच मुलखात परकं ठरवलं. नऊ महिन्यांचं मौन
हिरोशिमा आणि नागासाकी इथं मृत्यू पावलेल्यांसाठी, जिथं मृत्यू वर्षला
कातडी जमीन पोलाद आणि काँक्रीटचा प्रत्येक थर उखडवत
जिथं शिल्लक राहिलेले लोक असे काही चालत-फिरत राहिले की जणू ते जिवंत आहेत.
एक वर्षाचं मौन व्हिएतनामच्या लाखो प्रेतांसाठी -
की व्हिएतनाम कुणा युद्धाचं नव्हे, एका देशाचं नाव आहे.
एक वर्षाचं मौन कंबोडिया आणि लाओसच्या मृत लोकांसाठी जे
एका गुप्त युद्धाचे बळी होते... आणि जरा हळू बोला,
मला असं वाटतंय की त्यांना हे समजू नये की ते मरून गेले आहेत. दोन महिन्यांचं मौन
कोलंबियाच्या दीर्घकालीन मृतांसाठी, ज्यांची नावं
त्यांच्या प्रेतांप्रमाणे जमा होत राहिली
मग हरवली आणि ओठांवरून निसटून गेली.
ही कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी
एका तासाचं मौन एल साल्वादोरसाठी
एका दुपारभरचं मौन निकारागुआसाठी
दोन दिवसांचं मौन ग्वातेमालावासीयांसाठी
ज्यांना आयुष्यभरात किंचितही निवांतपणा लाभला नाही.
पंचेचाळीस सेकंदांचं मौन आकतिआल, चिआपास इथं मेलेल्या पंचेचाळीस लोकांसाठी
आणि पंचवीस वर्षांचं मौन त्या करोडो गुलाम आफ्रिकनांसाठी
ज्यांची थडगी समुद्रात आहेत इतकी खोल की
जितकी एखादी गगनचुंबी इमारतही नसेल.
त्यांच्या ओळखीसाठी कुठली डीएनए टेस्ट होणार नाही
दंतचिकित्सेचं रेकॉर्ड तपासलं जाणार नाही.
त्या अश्वेत लोकांसाठी ज्यांची प्रेतं उंबराच्या झाडांवर डुलत होती
दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम
एका युगाचं मौन
इथं या अमेरिकी महाद्वीपावरील करोडो मूळ रहिवाशांसाठी
ज्यांच्या जमिनी आणि जीवन त्यांच्यापासून हिरावण्यात आलं
चित्रमय पोस्टकार्डावरील मनोरम प्रांतांमधून
उदा. पाइन रिज वुंडेड नी, सँड क्रीक, फॉलन टिंबर्स
वा ट्रेल ऑफ टिअर्स.
आता ही नावं आमच्या जाणिवेच्या फ्रिजवर
डकवलेल्या चुंबकीय काव्यपंक्ती तेवढी आहेत.
तर तुम्हांला हवा आहे मौनाचा एक क्षण?
प्रत्यक्षात आम्ही आवाजहीन आहोत
आमच्या तोंडातून उपसून काढल्याहेत जिभा
आमचे डोळे शिवून टाकले गेलेत
मौनाचा एक क्षण
प्रत्यक्षात सगळे कवी गाडून टाकले गेलेत
माती बनली आहे सार्या नगार्यांची.
ही कविता मी वाचण्याआधी
तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तुम्हांला दु:ख वाटतंय की हे जग
आता बहुतेक पूर्वीसारखं राहणार नाही
खरंतर इकडं आम्हांला वाटतंय की ते पूर्वीसारखं राहूच नये अजिबात
किमान तसं तरी जसं आजवर चालत आलंय
कारण ही कविता ९/११ विषयी नाहीये
ही ९/१० विषयी आहे
ही ९/९ विषयी आहे
९/८ आणि ९/७ विषयी आहे
ही कविता त्या गोष्टींविषयी आहे
ज्या अशा कवितेसाठी कारणीभूत असतात
आणि ही कविता जर ९/११ विषयी आहे, तर मग
ही सप्टेंबर ९, १९७१ च्या चिली या देशाविषयी आहे
ही सप्टेंबर १२, १९७७ च्या दक्षिण आफ्रिका आणि
सिटवेन बिकोविषयी आहे
ही १३ सप्टेंबर १९७१ आणि एटिका जेल, न्यूयार्क इथं
कैदेत असलेल्या आमच्या भावंडांविषयी आहे.
ही कविता सोमालिया, १४ सप्टेंबर १९९२ विषयी आहे.
ही कविता त्या प्रत्येक तारखेविषयी आहे
जी धुवूनपुसून मिटवून टाकली जाते.
ही कविता त्या ११० कथांविषयी आहे
ज्या कधी सांगितल्या गेल्या नाहीत
११० कथा
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात
ज्यांचा कुठे उल्लेख सापडत नाही
ज्यांच्यासाठी सीएनएन बीबीसी न्यूयार्क टाइम्स
आणि न्यूजवीकमध्ये
काही जागेची शक्यताच नसते.
ही कविता या कार्यक्रमात व्यत्यय आणण्यासाठी आहे.
तुम्हांला तरीदेखील आपल्या मृत व्यक्तीच्या स्मरणाखातर
एक क्षणभराचं मौन हवं आहे?
आम्ही आपल्याला देऊ शकतो आयुष्यभराचं रिकामेपण :
निनावी थडगी
कायमच्या हरवलेल्या भाषा
मुळांपासून उखडलेले वृक्ष, मुळांपासून उखडलेले इतिहास
अनाम मुलांच्या चेहर्यांवरून डोकावणारी प्रेतवत एकटक नजर.
ही कविता वाचण्याआधी आम्ही
कायमचे मौन होऊ शकतो
किंवा इतके की आम्हांला धुळीनं झाकून टाकावं
तरीही तुम्हांला हवं आहे
आमच्याकडून अजून थोडं मौन
जर तुम्हांला क्षणभराचं मौन हवं आहे
तर थांबवा पेट्रोलपंप
बंद करा इंजिनं आणि टीव्ही
बुडवा समुद्रसफरी घडवणारी जहाजं
फोडून टाका आपले शेअरबाजार
विझवून टाका हे सगळे रंगीत दिवे
डिलिट करा सगळे इन्स्टंट मेसेज
उतरू द्या रुळांवरून आपल्या रेल्वे आणि
विजेवर चालणारी रेल्वे वाहतूक.
जर तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तर टॅको बॅल या फास्टफूडचेनच्या खिडकीवर वीट फेकून मारा
आणि तिथल्या हरवलेल्या मजुरांचे पगार परत मागा
उदध्वस्त करा सगळी दारूची दुकानं
सगळेच्या सगळे टाउनहाऊस, व्हाइट हाऊस, जेलहाऊस, पेंटहाऊस आणि प्लेबाय.
जर तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तर रहा मौन रविवारच्या सुपरबॉल मॅचच्या वेळी
चार जुलै या अमेरिकी स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी
डेटन या डिपार्टमेंटल स्टोअरच्या विराट १३ तासांच्या सेलच्या दिवशी
किंवा पुढच्या खेपेला जेव्हा या खोलीत आमची देखणी माणसं जमलेली असतील
आणि तुमची गोरी अपराधी भावना तुम्हांला सतावू लागेल.
जर तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तर हाच आहे तो क्षण
ही कविता सुरू होण्याआधी.
( ११ सप्टेंबर २००२ )
प्रतिक्रिया
8 Sep 2012 - 11:56 am | श्रावण मोडक
हे शीर्षक चुकीचं असू शकेल, कारण त्यात एक आनंदाची भावना असते, असे (आपल्या मनात तरी) मानले जाते. पण गंभीरपणे तीच भावना कविता वाचल्यानंतर मनात आली. कवितेइतकीच दाद अनुवादाला. सलाम.
या कवितेवरून 'आधी ते ...साठी आले' अशा आशयाच्या एका कवितेची आठवण झाली. कुणाची ते आत्ता आठवत नाही.
8 Sep 2012 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेइतकीच दाद अनुवादाला. सलाम.
-दिलीप बिरुटे
10 Sep 2012 - 9:01 am | स्पंदना
अनुवाद आहे की त्यांची स्वतःची आहे ही कविता?
काहीही असो आम्ही तरी अमेरिकेला एम एफ हुसेन म्हणतो. लै राग हाय मनात. विशेषतः हिलरी क्लिंटन्च्या तर प्रत्येक स्टेज अॅपिअरन्स वर मला निर्ल्लज्ज्पणाच्या नवनव्या कळसाची जाणिव होते.
11 Sep 2012 - 3:00 am | शुचि
अनुवाद दिसतोय.
http://www.rainforestinfo.org.au/Peace/silence.html
8 Sep 2012 - 4:01 pm | पैसा
माणुसकीला काळिमा लावणार्या अनेक घटना की ज्या आमच्या जाणीवेत सामान्यतः नसतात, त्यांची आठवण करून देण्यासाठी धन्यवाद! चरचरीत वास्तवाची दाहक ओळख करून देणार्या या अनुवादाने खरोखरच मूक केलं.
8 Sep 2012 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा
8 Sep 2012 - 7:45 pm | शुचि
कविता ताई,
बराच पूर्वी आपला एक ब्लॉग आणि त्यावरच्या कविता मी वाचल्या होत्या. त्या कविता अतिशय हृद्य, मनाला भिडणार्या होत्या इतक्या की त्यांची दखल कोणाही संवेदनशील मनास घ्यावीच लागेल. ही कविता देखील तशीच. खरं पाहता अनेक भाषांमध्ये या कवितेचा अनुवाद व्हायला पाहीजे, आणि अनेक मनांपर्यंत ती पोचली पाहीजे.
मिपावर आपले लेखन प्रथमच पाहते आहे . आपण येथे लिहावेत असे मनापासून वाटते.
(आपली फॅन)
शुचि
10 Sep 2012 - 3:13 pm | llपुण्याचे पेशवेll
छान. रडत रहाण्यासाठी हजारो गोष्टी आहेत. पुन्हा रडू यायची वेळ नको असेल तर सशक्त व्हा कारण युद्ध हाच मानवजातीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य आहे. महान ज्योतिषी डार्विनने सांगितलेले एक त्रिकालाबाधित भविष्य 'Survival of the fittest'
10 Sep 2012 - 2:35 pm | नाना चेंगट
हुच्चभ्रु कविता.
10 Sep 2012 - 8:13 pm | प्रदीप
वेगवेगळ्या स्थळकाळातल्या अनेक घटनांची, नरसंहरांची आठवण ९/११ च्या निमीत्ताने करून देण्याचा कविचा प्रयत्न उल्लेखनीय खरा, पण काही विशीष्ट स्थळांतील, काही विशीष्ट समाजांशी संदर्भित विदारक घटनाच कशा अचूक ह्या जंत्रीतून वगळल्या गेल्या, हे कोडेच आहे. ह्याला प्रामाणिक विस्मरण म्हणायचे, की disingeneous lapse of memory?
तेव्हा ही जंत्री अपुरी असल्याने, बच्चे लोग, एक हाथ से ताली बजाव!
आता त्या जंत्रीत थोडी भर टाकूयात.
* दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान ज्यूंचे झालेले सर्वांगीण हत्याकांड
* रशियन गुलॅग्स्मध्ये वर्षांनूवर्षे लुप्त झालेले अनेक जीव
* चीनमधील पन्नाशीच्या दशकाच्या शेवटी घडवून आणलेल्या महाप्रचंड दुष्काळांत मेलेले अनेकानेक
* चीनमधील सांस्कृतिक क्रांतीत भरडलेले गेलेली अगणित जीवने
आता जन्त्री थोडीशी 'बॅलन्स्ड' वाटते, नाही? तेव्हा बच्चे लोग, अब दोनो हाथों से ताली बजाव!
10 Sep 2012 - 8:27 pm | विकास
(विषय "..." असा दिला कारण तेंव्हा सुचवल्याप्रमाणे मौन पाळले होते)
वर आवडल्याच्या प्रतिक्रीया आलेल्या पाहूनही, मी "महाजनो येन गतः स पंथः" करायचे टाळत आहे. माफ करा आणि कृपया हा प्रतिसाद व्यक्तीगत घेऊ नका, कारण तसा उद्देश नाही, पण ही कविता मला आवडली नाही, त्यातील अनेक ऐतिहासीक मुद्दे पटू शकतील त्यावर चर्चा देखील होऊ शकेल. पण त्यांचा संदर्भ देत, एका हल्ल्याचे (९/११ चे) जस्टीफिकेशन करणारी ही कविता एकांगी वाटली.
वरील कविता ही ११ सप्टेंबर २००२ ची आहे. अर्थातच १३ डिसेंबर २००१ नंतरची आहे, ज्यावेळेस जगातील सर्वात (लोकसंख्येने) मोठ्या लोकशाही देशाच्या लोकशाहीचे प्रतिक असलेल्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. पण कवीला ते माहीत नसावे अथवा लोकशाही मान्य नसावी अथवा त्याबाबतीत "मौनं सर्वार्थ साधनम" असे वाटले असावे. अर्थातच त्यानंतरचे ७/११, २६/११ सहीत अनेक दहशतवादी हल्ले सांगता येतील याबाबत कुणामधे दुमत नसावे.
बाकी ९/११ चे मौन हे अमेरीकन्स अमेरीकेत झालेल्या हल्यासंदर्भात पाळतात आणि ते मला काही गैर वाटत नाही. इतरत्र झालेल्या हल्यांच्या संदर्भात जर कोणी असेच शोक केले तर त्यात काही गैर नाही.
अजून एक प्रश्न पडतो की तुम्ही ९/११ चे आणि त्यात अनेक भारतीयांसमवेत बिनलष्करी जनतेचे बळी पडले, त्याचे समर्थन करत आहात का? का इतरत्र झाले म्हणून असे येथे झाले म्हणून काय बिघडते असे म्हणायचे आहे?
विझवून टाका हे सगळे रंगीत दिवे, डिलिट करा सगळे इन्स्टंट मेसेज
ही तर वाक्ये विनोदी आहेत कारण ते सांगायला तुम्ही अमेरीकन टेक्नॉलॉजी, उर्जेसाठी वापरलेले खनीज तेल, आदीचा वापर करत आहात हे विसरले जात आहे.
असो.
10 Sep 2012 - 9:10 pm | मदनबाण
आमचे पंतप्रधान उत्तम मौन पाळतात ! आणि वॉशिंगटन पोस्टवाले त्यांची खिल्ली उडवतात !
संदर्भः- http://alturl.com/pv8ud
10 Sep 2012 - 10:42 pm | श्रावण मोडक
प्रदीप आणि विकास (आणि नाना चेंगटदेखील) यांच्या प्रतिसादांनी पुन्हा लिहिते केले. त्यातही विकास यांच्या महाजनो... वगैरे एरवी मला सहजी न कळणाऱ्या टिपणीमुळे.
मी मौनाचा संदर्भ जोडला तो कवितेच्या रचनेशी. तिचा प्रवाह आणि त्यात टप्प्याटप्प्यावर वाचक म्हणून होत गेलेले माझे विराम. आता, या रचनेतून समग्र राजकीय भाष्य होते आहे का, वगैरे माझ्यालेखी तपशिलाचे मुद्दे. खरं तर, तिथंही एक समर्थन करता येतं. मी ते करतोय असं नाही, पण करता येतं. हा कवी मौखीक परंपरेतला आहे, या परंपरेत सादरीकरण महत्त्वाचे. ते उत्स्फुर्तपणे होते, असे मला वाटते. तसे असेल तर त्यात समग्र ऐतिहासीक आणि समकालीन संदर्भ पाहणे, उचित असले तरी, वाजवी असेलच असे नाही. त्या नजरेतून कवितेकडे पाहिले तर ती रचनेसाठी भावेल, त्यातील सामाजिक-राजकीय भाष्यही तेवढ्यापुरते भावेलच. आणि याच भूमिकेतून मला हा प्रवाही अनुवाद आवडला. रादर, मी त्यामुळेच प्रभावित झालो.
प्रदीप आणि विकास यांनी या कवितेकडे पाहण्याची संदर्भदृष्टी व्यापक केली हे मात्र निश्चित. आणि समग्र राजकीय भाष्य म्हणून मी ही कविता उजवी (राजकीय विचार म्हणून नव्हे, वजनकाट्यातील वजन म्हणून) ठरवणार नाही हे नक्की.
10 Sep 2012 - 11:18 pm | विकास
मी मौनाचा संदर्भ जोडला तो कवितेच्या रचनेशी. तिचा प्रवाह आणि त्यात टप्प्याटप्प्यावर वाचक म्हणून होत गेलेले माझे विराम.
तेव्हढ्यापुरते ते बरोबरच आहे आणि आपल्याशी सहमत देखील आहे.
आता, या रचनेतून समग्र राजकीय भाष्य होते आहे का, वगैरे माझ्यालेखी तपशिलाचे मुद्दे. खरं तर, तिथंही एक समर्थन करता येतं. मी ते करतोय असं नाही,
माझ्या लेखी राजकीय भाष्य, ते देखील युद्धविरोधात (antiwar) करण्यात देखील गैर नाही. अमेरीकेस नावे ठेवण्यामुळे काहीच फरक पडत नाही. मुद्दा केवळ आपण नक्की त्यातून काय काय (एकांगी) संदेश दिले जातात हा आहे. केवळ त्या संदर्भात माझे भाष्य आहे - आठवण करूनच द्यायची असेल तर भरपूर करून देता येईल, असे.
@ मदनबाण: आमचे पंतप्रधान उत्तम मौन पाळतात !
मग त्यांना आपण मौनमोहन म्हणूयात का? ;)
11 Sep 2012 - 10:12 pm | मदनबाण
@ मदनबाण: आमचे पंतप्रधान उत्तम मौन पाळतात !
मग त्यांना आपण मौनमोहन म्हणूयात का?
हा.हा.हा... चालेल की ! ;)
11 Sep 2012 - 6:17 am | नगरीनिरंजन
भावानुवाद प्रचंड भिडला.
11 Sep 2012 - 7:09 am | सहज
प्रदीप व विकास दोघांना धन्यवाद.
असो कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जास्त महत्वाचे!
कलाप्रेमींनो काव्य हे स्वताच वाचनात तेवढा आनंद नाही ना? ते सादर होताना बघा, नृत्याविष्कार बघा मग रसीकांनो तुम्हीच कला कला तुस्सी ग्रेट हो चित्कारत आनंद्विभोर व्हाल!!
15 Sep 2012 - 1:12 pm | प्रदीप
ह्या व्हिडीयोत तांत्रिकी चलाखी नसेल तर, हा नृत्याविष्कार अमेरिकेतच साक्षात कॅपिटल हिल्सच्या समोरच केला आहे, असे दिसते. असे करण्यास थोडेफार धैर्य लागते.
ह्या सादरीकरणामुळे आता ह्या कलाकारांचे मनोबल उंचावले असेल अशी आशा करूया.
आणि ते मनोबल इतके वृद्धिंगत व्हावे, की चिनी राजवटीचे असेच गोडवे गाणारा आविष्कार ही मंडळी, साक्षात जोंगनानहाईच्या समोरच्या पटांगणात लवकरच करोत, अशी श्रीमाओचरणी प्रार्थना करूयात.
11 Sep 2012 - 9:24 am | मनीषा
मौनं सर्वार्थ साधनम् ... असे म्हणतात खरे , पण आता हे मौन असह्य होते आहे.
सुरेख भावानुवाद !!
11 Sep 2012 - 3:32 pm | ऋषिकेश
प्रदीप व विकास यांच्याशी व त्याच बरोबर श्रमोंशीही सहमती.. :)
एक कविता - कवीला जे सांगायचे आहे ते आणि तितके प्रभावी पणे पोच(व)णारी कलाकृती - म्हणून अतिशय आवडली
12 Sep 2012 - 10:19 am | ५० फक्त
श्री. प्रदीप आणि श्री. विकास , दोघांचे प्रतिसाद जास्त पटले, धन्यवाद.
आणि हो, जर कविता अनुवादित असेल तर मुळ कविला / कवयित्रीला श्रेय देणं का टाळलं गेलं ते समजलं नाही, त्याबद्दल सुद्धा मौन पाळावं काय ?
13 Sep 2012 - 1:53 pm | Kavita Mahajan
मूळ कवीला पूर्णपणे श्रेय दिले गेले आहे. कवितेच्या शीर्षकासोबत जे ना आहे - एमनुएल ओर्तीज - हे मूळ कवीचे नाव आहे.
कविता ही शीर्षकापासून काळजीपूर्वक व गांभीर्याने वाचण्याची बाब असते. आपल्याकडे जे यमकजुळव्या कवींचे पीक येत असते, ते कविता या प्रकाराचे गांभीर्य घालवून तिला हास्यास्पद बनवते. इतर कुठे या कविता छापल्या जाणार नसतील तर फेसबुक, ब्लॉग आणि मिपा सारख्या साइट्सचे मोकळे रान असतेच.
दुसरे म्हणजे सरसकट सामाजिक, विद्रोही या विभागात ज्या कविता नोंदवल्या जातात, त्यांपेक्षा ही कविता कितीतरी 'पुढची' आहे. जे सांगायचे आहे ते कोणताही आक्रस्ताळेपणा न करता किंवा बाळबोध मांडणी न करता अत्यंत प्रगल्भ शांतपणे सांगितले आहे. अस्सल कविता कशी असते, हे समजून घेण्यासाठी मी या कवितेचा अनुवाद केला.
तिसरे म्हणजे कवितेविषयीचे बाळबोध व पारंपरिक समज. जे आता मोडले व बदलले पाहिजेत. कवितेत एक 'रस' असतो, हे कवितेच्या विभागात रसनिवडीचा कॉलम ठेवून मिपाकर्त्यांनी गृहित धरले आहे. ते आज आधुनिकोत्तर काळात नक्कीच विनोदी वाटते. पहिला कॉलम किमान सुसह्य आहे. खरेतर कविता अशी विभागणे हे आता कालबाह्य झाले आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
13 Sep 2012 - 4:35 pm | चेतन
१. प्रत्येक कविता ही गंभीर असावी असा काही नियम नाही आहे.
२. कविता ह्या हलक्याफुलक्या अथवा विडंबन या प्रकारात ही असु शकतात.
३. कविता कुठे छापावी हा प्रत्येकाच्या निवडिचा प्रश्न आहे.
४. ही कविता ' प्रगल्भ' आहे की 'विचारजंतीय निबंध' हे प्रत्येकाचे वयक्तीक मत असु शकते.
५. कवितेत एक 'रस' असतो तुम्ही एकापेक्षा जास्त रस निवडु शकता अथवा "None" हा पर्याय उपलब्ध आहे.
कृपया हा प्रतिसाद ही नोंद समजावी
काय होई करुनिया बाष्कळ बड्बड
उगाच कळ्फलक बडविले
("मौनं सर्वार्थ साधनम् " का "माझे अबोलणेही विपरीत होत आहे" या कात्रीत सापडलेला)
यमकजुळव्या
चेतन
13 Sep 2012 - 6:31 pm | प्रदीप
आक्रस्ताळेपणा नाही, संयत मांडणी हे खरे आहे, पणं मला हीच बाब तर कविची पोझ वाटली. त्यात, मी अगोदरच माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सगळे एकांगी आहे, कवितेचा उगम मुळात एका अॅजेंड्याने झाला आहे, असे मलातरी सारखे वाटत राहिले.
बदलत्या काळानुसार कविही बाळबोध रहात नाहीत, बरोबर 'चुकचुक हळहळ' कशी जमा करायची हे त्यांनाही आता चांगले अवगत झालेले आहे. सदर कविता त्याचे एक उदाहरण आहे, असे मला वाटते.
13 Sep 2012 - 7:01 pm | चेतन
>>कवितेचा उगम मुळात एका अॅजेंड्याने झाला आहे (नक्किच)
आणि याला 'TRP ' साठी लिहलेली कविता का म्हणु नये हा प्रश्न पडला.
असो आता थोडा आक्रस्ताळेपणा
हीच कविता
१. मुंबई हल्ला (किंवा कोणताही बॉम्बस्फोट) समोर ठेवुन आणि मुसलमानांवर झालेले अन्याय दाखवुन लिहता येईल.
कींवा
२. गुजरात दंगल समोर ठेवुन आणि हिंदुवर झालेले अन्याय दाखवुन लिहता येईल.
कींवा
३. संसद हल्ला समोर ठेवुन आणि काश्मिरी मुसलमानांवर झालेले अन्याय दाखवुन लिहता येईल.
खरे काय तर कुंपणाच्या कुठल्या बाजुला आपण आहोत त्यावरुन एखादी कविता किती भावते ते ठरावे.
13 Sep 2012 - 6:51 pm | नाना चेंगट
>>>कविता ही शीर्षकापासून काळजीपूर्वक व गांभीर्याने वाचण्याची बाब असते. आपल्याकडे जे यमकजुळव्या कवींचे पीक येत असते, ते कविता या प्रकाराचे गांभीर्य घालवून तिला हास्यास्पद बनवते.
हो का? यमक जुळवणे हे हास्यास्पद का? बर बर ! असेल असेल. आमची समज जरा याबाबतीत कमीच आहे.
>>>इतर कुठे या कविता छापल्या जाणार नसतील तर फेसबुक, ब्लॉग आणि मिपा सारख्या साइट्सचे मोकळे रान असतेच.
अच्छा ! म्हणजे कुठेतरी "छापले" जाणे महान आणि मिपावर लिहिणे हे रान मोकळे तर. असेल असेल. आमची समज जरा याबाबतीत कमीच आहे.
>>>दुसरे म्हणजे सरसकट सामाजिक, विद्रोही या विभागात ज्या कविता नोंदवल्या जातात, त्यांपेक्षा ही कविता कितीतरी 'पुढची' आहे.
कशावरुन? तुम्ही म्हणता म्हणून? मग ते फक्त तुमचे एक "मत" आहे. सत्य अथवा वास्तव सांगण्यासारखे सांगू नये. आम्हाला ही कविता इतर कवितांच्या बरोबरीचीच वाटली. उलट शोधल्यास त्रूटीच सापडतील, ज्या अनेकांनी दाखवल्या आहेतच. असो तरीही ही "पुढची" असेल तर असेल असेल. आमची समज जरा याबाबतीत कमीच आहे.
>>> जे सांगायचे आहे ते कोणताही आक्रस्ताळेपणा न करता किंवा बाळबोध मांडणी न करता अत्यंत प्रगल्भ शांतपणे सांगितले आहे. अस्सल कविता कशी असते, हे समजून घेण्यासाठी मी या कवितेचा अनुवाद केला.
पुन्हा एकदा ही कविता तुम्हाला अस्सल वाटली, इतरांना तशीच वाटावी हा दुराग्रह होतो. तरीही अस्सल असेल तर असेल असेल. आमची समज जरा याबाबतीत कमीच आहे.
>>तिसरे म्हणजे कवितेविषयीचे बाळबोध व पारंपरिक समज. जे आता मोडले व बदलले पाहिजेत. कवितेत एक 'रस' असतो, हे कवितेच्या विभागात रसनिवडीचा कॉलम ठेवून मिपाकर्त्यांनी गृहित धरले आहे. ते आज आधुनिकोत्तर काळात नक्कीच विनोदी वाटते. पहिला कॉलम किमान सुसह्य आहे. खरेतर कविता अशी विभागणे हे आता कालबाह्य झाले आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
अरेच्या ! तुम्हाला विभाग आवडत असोत नसोत, अनेक आमच्यासारखे बाळबोध आणि पारंपरीक समजेचे लोक आहेत त्यांना आवडते. उद्या आम्हाला तसे आवडते म्हणून तुम्ही आमचे जगणे पण नाकारणार का? "तुम्हाला जगण्याचा हक्क नाही !" असा फतवा काढणार? हे असले स्वतःचा वेगळा प्रतिभावंत असल्याचा आव बरा नाही. तरीही कालबाह्य असेल तर असेल असेल. आमची समज जरा याबाबतीत कमीच आहे.
14 Sep 2012 - 2:16 pm | Kavita Mahajan
आमची समज जरा याबाबतीत कमीच आहे.
मान्य.
14 Sep 2012 - 3:12 pm | नाना चेंगट
हॅ हॅ हॅ