हट्ट!

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जे न देखे रवी...
26 Jul 2012 - 12:01 pm

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे |

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |

असंख्य वेळा अशी भेटशी
मिठीत घेशी हळुवार
'थांबवून ठेवावे तुज' ही
इच्छा अपुरी, अनिवार |
हट्ट सांग मी करू कोणता?
थांबशील जो पुरवाया,
थांबशील का अजून थोडी
आज एवढे ठरवाया?

-चैतन्य दीक्षित

शृंगारकविता

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

26 Jul 2012 - 12:23 pm | संजय क्षीरसागर

>म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |

इथे काही तरी हुकलय, पण कविता सुरेख.

अर्धवट's picture

26 Jul 2012 - 3:00 pm | अर्धवट

चैत्या..

काजळगहिरे तम
झिणिझिणि वलये

बोरकर आठवले..

कविता मस्तच..

पक पक पक's picture

29 Jul 2012 - 7:16 pm | पक पक पक

मस्त मस्त ... :)

आम्हाला करंदीकर आठवले... ;)

चैतन्य दीक्षित's picture

27 Jul 2012 - 9:54 am | चैतन्य दीक्षित

संजय, अर्ध्या..
धन्यवाद :)

अर्धवटराव's picture

30 Jul 2012 - 10:22 pm | अर्धवटराव

संजयजींनी पॉईण्ट केलं तिथे "सोडुनी" च्या ऐवजी "छेडुनी" टाकण्यामागे काहि विषेश रसग्रहण आहे काय ?

कविता सुंदर आहे. (अशा कविता निदान कळतात तरी. नाहितर काव्य वगैरे बाबतीत आमची बोंब आहे)

अर्धवटराव

चैतन्य दीक्षित's picture

31 Jul 2012 - 10:57 am | चैतन्य दीक्षित

अर्धवटराव,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ती खरं तर मिठी सोडुनीच जाते... त्या मिठीच्या आठवणीत माझं मन आणि देह दोन्ही हरवून जातात.
त्यामुळे जणू सतारीच्या तारा छेडाव्यात तशी ती माझ्या मिठीतून दूर झाली आणि म्हणून 'मिठी छेडुनी' असं लिहिलंय.
पुढच्या 'झिणिझिणि वलये गात्रांत' शी अन्वय लावलात की लक्षात येईल असे वाटते.
-चैतन्य

अर्धवटराव's picture

31 Jul 2012 - 8:47 pm | अर्धवटराव

ते "छेडुनी " आणि "झिणिझिणि वलये..." चा संबंध अदरवाईज मच्या लक्षात आला नसता :)

अर्धवटराव