अंगाई मज गाती..

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
23 Jun 2012 - 9:39 am

अंगाई मज गाती

इथे ओळखीचेही पक्षी, अनोळखी का होती
रंगभूमीची गाणी कसली, रंग असेतो गाती

भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे
नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती

कुशल हातांचा स्पर्श लाभता, विराणशा माळाला
फुललेल्या बागेतुन होते, भ्रमरांची या दाटी

गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी
कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती

हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी
निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती

- संध्या

करुणकविता

प्रतिक्रिया

संध्या ..
ह्यावेळी काहि तरी .....म्हणजे बरच काही तरी कमी कमी वाटलं गं ..कवितेत :(

काय असेल ते शोधण्याचा प्रयत्न करतेय .....

चौकटराजा's picture

23 Jun 2012 - 11:28 am | चौकटराजा

गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी
कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती

उच्च दर्जाची चित्रमयता या दोन ओळीत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2012 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा

विषय चांगलाच निवडला-गेलेला आहे...

पण का कोण जाणे..? रचना(नेहमी सारखी) सहजगम्य होत नाहीये...

सांजसंध्या's picture

23 Jun 2012 - 6:32 pm | सांजसंध्या

रचना(नेहमी सारखी) सहजगम्य होत नाहीये...

हा दोष कवयित्री म्हणून माझ्याकडे घेते आहे. कवितेत प्रतिमा उभ्या करून चित्रांची शृंखला उभी करायचा प्रयत्न आहे हा. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्टप्रमाणे अर्थ प्रत्येकाच्या अनुभुतीप्रमाणे यावा यासाठी अर्थ सांगितला जात नाही.

तरी पण या प्रतिमांकडे कवयित्री कशा प्रकारे पाहते याचं उदाहरण म्हणून शेवटच्या दोन पंक्ती उलगडून दाखवतेय.

हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी
निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती

हिरवा रंग हा जीवनाचा म्हणूनच आसक्तीचा आहे. मोहमायेकडे एक डोळा आहे तर दुस-या डोळ्याला अंतिम ज्ञानाचा निळा रंग खुणावतो आहे. पणती म्हणजे प्राणज्योत ! पक्षांची घरटी म्हणजे मुलाबाळांच्या संसाराची मोहमाया खुणावते आहे पण आत्म्याला आता परमात्म्याचं ज्ञान होत चाललं आहे... ही अंगाई आहे.

कविता वाचल्याबद्दल सर्वांची मनापासून आभारी आहे.

पक पक पक's picture

24 Jun 2012 - 10:39 pm | पक पक पक

भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे
नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती

हे खास आहे... :) आवड्ल...

स्पंदना's picture

25 Jun 2012 - 8:34 am | स्पंदना

सुरेख !

सांजसंध्या's picture

26 Jun 2012 - 7:37 am | सांजसंध्या

सर्वांचे आभार.

हा मा़झ्यासाठी एक प्रयत्न आहे. जाणकारांकडून त्रुटी , प्रतिमांची भाषा, संकेत याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे. इथल्या अनेक कवींचा अधिकार मोठा आहे. मला जे अपेक्षित आहे ते थोडक्यात द्यायचा प्रयत्न करते.

पहिले कडवे : यश, प्रसिद्धी असेपर्यंत सगळेच ओळख दाखवतात ( मुलाबाळांचाही यात समावेश आहे. )

दुसरे कडवे : आकाश म्हणजे छप्पर. कुटुंबासाठी हे छप्पर म्हणजे घरातील कर्ता मनुष्य (आई / वडील). हे छप्पर घरासाठी भिरभिरणारं आहे. जेव्हां सद्दी संपते आणि कुणी ओळख देईनासं होतं तेव्हा क्षितिजामागे ( आधाराचे ठिकाण या अर्थाने तसेच दूर जिथे कुणी येत नाही अशा ठिकाणी या ही अर्थाने ) हे दु:ख समोर येतं.

चंद्र हा पृथ्वीचा गोळा मानला गेलाय. जेव्हां जेव्हां हा दूर गेलेला पोटचा गोळा समोर दिसतो तेव्हां मायेची भरती येते.

तिसरे कडवे : एखादा माळी विराण माळावरही बाग फुलवतो. तिथं फुलं उमलू लागतात. पण ही फुलं म्हणजेच मुलं जेव्हां मोठी होतात तेव्हां भ्रमरांची दाटीमधे हरवून जातात. माळ्याची कुणाला आठवण राहत नाही

चौथे कडवे : कातरवेळ ही म्हातारपण या अर्थी आहे. लांबलेल्या छाया ही अंताची चाहूल..

शेवटच्या कडव्याचा अर्थ याआधीच दिलेला आहे.

काही चुकलं असल्यास क्षमा असावी.