आई पाझरत्या डोळ्यांनी तू जेव्हा मला पाठमोरा पहात होतीस जाताना...
तेव्हा माझे पाय अडखळले....मी मागे वळून पाहिल्यावर मला दिसला...
बाभलीखाली उभी राहिलेली तू अन तुझा तो फाटका पदर...
ते रनरनत उन, बांधावर आडवा पडलेला तो नांगर...
सावलीत उकिडवा बसून एक टक आभाळाकडे कोरड्या डोळ्याने पाहणारा तात्या....
हाडावंर कातडं ताणून खपाटीला गेलेलं पोट सांभाळत शेवटच्या घटका मोजणारी ढोरं....
पलिकड जमिनीचा ठाव घेत आ वासून बसलेली ती विहीर...
आणि बांधावर लिंबाखाली भर उन्हात तिरपी किरणं अंगावर घेत
घाम फुटल्यासारखा मक्ख बसलेला तो शेंदरी म्हसोबा...
मला आता जायलाच हवं पुढं....
नाहीतर ह्या दृष्टचक्रात मी सुद्धा नांगरलेल्या भुईतून उखडलेल्या तनासारखा
इथच जळून जाईन तुम्हा सगळ्यांबरोबर...
प्रतिक्रिया
21 Jun 2012 - 10:51 am | शुचि
:(
खूप करुण कविता आहे :(. लिहीत रहा
21 Jun 2012 - 10:57 am | श्रीरंग_जोशी
मनाला भावणारी कविता...
पुढील काव्यलेखनासाठी शुभेच्छा!!
21 Jun 2012 - 11:10 am | शैलेन्द्र
आवडली..
22 Jun 2012 - 1:57 pm | पैसा
फार करूण. तुम्ही चांगलं लिहिताय. आणखी लिहा.
22 Jun 2012 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा
हादरलो राव वाचुन... :-(
पु.ले.शु.
23 Jun 2012 - 8:53 am | अमितसांगली
क्षणभर स्तब्ध झालो कविता वाचून....