रत्नहार...........

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Jun 2012 - 10:59 pm

रत्नहार.............

अबोली साने म्हणजे नाजूक सौंदर्याचा एक सर्वोत्तम नमूनाच. नासीफ, चंका, कालिदासांच्याही प्रतिभा कमी पडावी असे तिचे सौंदर्य मग आम्ही कुठे पडावे त्या भानगडीत.. पण म्हणतात ना देवाच्या दरबारात न्यायच नाही. ही नाजूक मुलगी ऐश्वर्यात लोळायची सोडून एका कारकूनाच्या पोटी जन्माला आली आणि आमच्या या नायिकेनेही बापाच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून एका डिप्लोमा होल्डरच्या गळ्यात माळ घातली. नाहीतरी लग्नाच्या बाजारात तुमच्या आर्थिक परिस्थितीला फारच महत्व असते. तर अबोलीचा नवरा एका मोठ्या कंपनीत शिफ्ट सुपरवायझर म्हणून कामाला होता. कंपनी पिंपरीत आणि रहायची सोयही भाड्याने का होईना कंपनीच्या कॉलनीत होती. दोन खोल्याचे का होईना स्वतंत्र घर होते....अजून काय पाहिजे होते ?

बिचारी अबोली साधी रहायची कारण तिच्याकडे चांगले कपडेच नव्हते. पण बिचारीला कुठे येऊन पडलो याचे अतोनात दु:ख होते. ती कुठे जन्माला आली, तिच्या घरची परिस्थिती काय होती याचा तिला हळुहळु विसर पडत चालला होता आणि त्याची जागा तिच्या सौंदर्याच्या अभिमानाने घेतली कारण होतीच तशी ती सुंदर !. बायका शक्यतो दुसर्‍या बाईच्या सौंदर्याची स्तुती करत नाहीत असे म्हणतात पण अबोलीच्या बाबतीत तेही खोटे ठरले होते. सोसायटीच्या कित्येक बायकांनी तिला ती किती सुंदर आहे ते स्पष्टपणे सांगितले होते. त्याने ती खुष व्हायची खरी पण दुसर्‍याच क्षणी तिच्या मनात विषाद दाटून यायचा.

स्वत:कडे आरशात बघताना तिची खात्री होत चालली होती की तिचा हा जन्म जगातील सर्व सुखे भोगण्यासाठीच झाला आहे. तसे होत नाही हे बघून ती आतल्या आत तडफडत होती, चरफडत होती. तिच्या गरिबीने, तिच्या घराच्या ओक्याबोक्या भिंतींनी, डुगडुगणार्‍या खुर्च्यांनी, मळलेल्या एकदोन पडद्यांनी तिच्या आयुष्याची रयाच घालवली होती. सामान्य मध्यमवर्गातील बाईच्या मनात येणारही नाहीत अशा गोष्टींचे विचार तिच्या मनात अगदी सहज येत व तिला छळत. तिला तिच्या असल्या परिस्थितीची अतोनात चीड येई. विशेषत: ती आरश्यासमोर असताना जास्तच. असे झाले की ती डोळे मिटून घेई पण त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर, पापण्यांच्या आत ती स्वत:ला तिच्या मोलकरीणीच्या रूपात बघत असे. मग शांताबाईवर राग निघत असे. आता यात त्या बिचारीचा काय दोष ? रात्री अबोलीला सुंदर तीन बेडरूमच्या प्लॅटची विलक्षण स्वप्ने पडत. नक्षीचा दरवाजा, गालीचा, मस्त तांब्याच्या रंगाचे पडदे, कोपर्‍यात मंद प्रकाश फेकणारे उंच दिवे, आरामदायी गुबगुबीत खुर्च्या, टेरेस आणि त्यात मंद वार्‍यावर मंद हलणारा तो मस्त झोपाळा आणि त्यावर केस सोडून, पायातील पैजण वाजवत बसलेली ती स्वत:....व्वा.. तिच्या स्वप्नात एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीमधे एक सुंदर तरूणी पायर्‍या चढून आत येत आहे आणि सगळ्यांच्या नजरा परत परत तिच्याकडे वळताएत असे दृष्य नियमीत येई. तेथे बसलेली प्रतिष्ठीत माणसे तिची ओळख करून घेण्यासाठी धडपडत असत तर त्यांच्या बरोबर असलेल्या स्त्रिया तिच्याकडे मत्सराने कटाक्ष टाकत. थोडे निरखून बघितल्यावर त्या तरूणीला ती सहज ओळखत असे.

रात्री सनमायकाचे ढलपे उडालेल्या टेबलावर जेव्हा ती समोर बसलेल्या नवर्‍यासाठी वांग्याच्या भाजीच्या भांड्याचे झाकण उघडत असे तेव्हा तिच्या नवर्‍याच्या तोंडून अगदी सहज उदगार बाहेर पडत “व्व्वा ! काय मस्त वास येतोय, जगात यापेक्षा चांगले खायला मिळत असेल असे वाटत नाही” पण त्यावेळी तिचे लक्ष त्याच्याकडे नसे. तिच्या डोळ्यासमोर एखाद्या मेजवानीचे दृष्य तरळत असे. भले मोठे टेबल. त्याच्या भोवती मोजकीच माणसे. भिंतीवर भले मोठे ऑईल पेंटींग त्याच्यात हिरव्या झाडांच्या पार्श्वभूमीवर उडणारा तो गूढ पक्षी, टेबलावर चमचम करणारी भांडी, चमचे....कुजबुजत्या आवाजातील संभाषण कधी कधी नुसतेच हसणे....बस....बस.....बस.....

तिच्याकडे साधी प्युअरसिल्कची साडी नव्हती ना एखादा दागिना. अंगभर दागिने घालून एखादी चांगली साडी नेसून लोकांच्या कौतूकाच्या व मत्सरी नजरा झेलत जायचे तिचे एक स्वप्न होते. त्यातच तिची बाळपणाची मैत्रीण आता पुण्यात रहायला आली होती आणि तिचा बंगला पुण्यात डेक्कन वर पीवायसीच्या मागे होता. ती कधी घरी आल्यावर तर तिला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. शक्यतो तिने घरी येऊ नये अशीच ती देवापाशी प्रार्थना करायची पण तिने बोलाविले की मात्र ती जायची संधी वाया घालवायची नाही. शीऽऽऽ काय आयुष्य चालले आहे आपले.....एक दिवस ती स्वत:चाच तिरस्कार करत स्वत:लाच म्हणाली.

पण एक दिवस संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने उल्हासित नजरेने घरी आला तोच हातातील लिफाफा फडकवत.

“हे घे ! खास तुझ्यासाठी आणलंय.”
तिने घाईघाईने तो लिफाफा फोडला आणि आतला गुळगुळीत कागद बाहेर काढला. कसलेसे निमंत्रण होते ते.
“आरोग्यमंत्री श्री त्रिपाठी आणि सौ. निलिमा त्रिपाठी आपल्याला कंपनीला नवरत्न उद्योगाचा दर्जा मिळाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीसाठी सोमवारी १८ मे रोजी आमंत्रीत करत आहे.
वेळ : संध्याकाळी ७ ते ११”
तिच्या चेहर्‍यावर आनंद दिसण्याऐवजी एक विषादाची छाया झरकन पसरून गेली. तिने ते निमंत्रण कॉटवर फेकले आणि पुटपुटली
“काय करू मी त्याचे ?”
“का ग ! मला वाटले तुला आनंद होईल. तुला अशा सभारंभांना कधी जायला मिळत नाही आणि आता जायला मिळते आहे तर तुझे तोंड वाकडे. फक्त खास लोकांनाच आमंत्रण आहे आणि सगळ्यांनाच जायचे आहे आम्हाला आमंत्रण खरे तर नव्हते पण मी माझ्या साहेबाला विनंती करून ते मिळवले आहे त्याचे तुला काहीच नाही”
तिने कपाळाला आठ्या घालत त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला.
“आणि मी त्या दिवशी काय घालू असे तुझे म्हणणे आहे ?”
हा विचारच त्याच्या मनात आला नव्हता. त्याचे त...त..प..प झाले.
“का आपण परवा नाटकाला गेलो होतो ती साडी नेस की. चांगली दिसते तुला ती...खरे तर तुला काहीही...”
बोलता बोलता तो थांबला. त्याच्या बायकोच्या सुंदर डोळ्यातून अश्रूचे दोन थेंब ओघळत होते. तिच्या गालावरून ओघळत ते तिच्या ओठाच्या महिरपीच्या कडेला जमा झाले....
“काय ग ? काय झाले ? आठवण येते आहे का कोणाची ....” त्याने घाबरून काळजीने विचारले.
स्वत:च्या दु:खावर प्रयत्नपूर्वक ताबा मिळवत तिने तुसडेपणाने पण शांतपणे उत्तर दिले
“काही नाही. माझ्याकडे चांगले कपडे नाहीत म्हणून मी या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. हे निमंत्रण तुमच्या मित्राला द्या किंवा साहेबाला द्या.” “उगंच वाया जायला नको” ती फणकार्‍याने म्हणाली.
त्याला काय बोलावे ते सुचेना....तो हताश झाला...बिचारा...
“हे बघ प्लिज रडू नकोस ना ! बघूया आपण काही करता येते का ते. सांग बर किती पैसे लागतील तुला एखाद्या चांगल्या साडीला ? पण ही साडी नंतर इतर कार्यक्रमातही वापरता आली पाहिजे हं !”
विचार करून तिने अडखळत उत्तर दिले “ मला वाटते दहा हजार रुपये पुरेत.”
तो आकडा ऐकताच त्याच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळले व पोटात खड्डा पडला कारण बरोबर तेवढीच रक्कम त्याने त्याच्या स्कूटरसाठी बाजूला ठेवली होती.
“एवढे ?”
“हो... ब्लाउजची शिलाई किती महाग झाली आहे, आणि त्याचर मॅचींग परकर शिवाय सॅंडल्स, लिप्स्टीक, पर्स हे सगळे धरून कसेबसे बसेल त्यात..”
“ठीक आहे. मी देतो तुला दहा हजार ! आणि चांगली साडी आण. ते महत्वाचे. खूष ?”

जशी जशी कार्यक्रमाची तारीख जवळ येऊ लागली तसे अबोली मॅडम उदास दिसू लागल्या. त्यांची साडी आली होती ती तिला फारच खुलून दिसत होती. पर्स, सॅंडल्सचे तर विचारायलाच नको..पण त्यांच्या चेहर्‍यावरची ही काळजी....
“काय ग ! काय झाले. आता काय बिनसले आहे तुझे ? पूर्वीसारखी हसत नाहीस तू आजकाल !” तिचा नवर्‍याने एका दिवशी संध्याकाळी न राहवून विचारले.
“हे सगळे ठीक आहे पण मला राहून राहून असे वाटते आहे की या सगळ्यावर एखादा दागिना असता तर किती बरे झाले असते ! पण माझ्याकडे मेलं हे काळे मणी सोडल्यास काहीच नाही. मी याच्यात तेथे अगदी दरिद्री दिसेन. मला वाटते न गेलेले बरे !”
“अगं एखादा मस्त मोगर्‍याचा गजरा घाल ना ! किती मस्त दिसतो तुला आणि हल्ली त्याची फॅशनही आली आहे परत !”
“अहो ! मी गळ्यात काय घालू असे म्हणते आहे, केसात नाही”
बाईसाहेबांना अर्थातच ते काही पटले नाही.
“नाही, दागिन्यांनी मढलेल्या बाकीच्या श्रीमंत बायकांमधे दरिद्री दिसणे हा फारच मोठा अपमान होईल माझाही आणि तुमचाही.”
अबोलीचा नवराही आता हट्टाला पेटला. विचार करून तो म्हणाला” काय ग तुझी एक श्रीमंत मैत्रीण पुण्यात आली आहेना रहायला ? काय बरे नाव तिचे ?
“जूई परांजपे. आमच्याच शेजारी रहात होती कोकणात. नशीबवान आहे मेली. कसले श्रीमंत घर मिळाले आहे तिला !” जाता जाता अबोलीने तिच्या नवर्‍याला बोचकारले.
“एवढी जवळची म्हणवतेस तर ती देईल का एखादा दागिना तुला एक संध्याकाळ ?”
अबोलीचा चेहरा आनंदाने उजळला.
“”अय्या ! हो देईल की ! कसं लक्षात नाही आले माझ्या ? उद्याच जाऊन येते मी तिच्याकडे”.
दुसर्‍या दिवशी अबोली साने जूई परांजपेच्या घरी हजर झाली आणि तिने तिची अडचण सांगितली.
जूई आत गेली आणि दागिन्यांची पेटीच घेऊन बाहेर आली.
“हात्तिच्या ! एवढेच ना ! घे तुला काय पाहिजे ते यातले.”
ते दागिने पाहून अबोलीचे डोळे लकाकले. तिने अगोदर पाटल्या हातात घालून बघितल्या पण त्या काही तिच्या मनास आल्या नाहीत. मग तिने मोत्याचा एक जाडजूड सर घालून बघितला पण जूईच “हा तुला फारच मोठा वाटतो बाई” असे म्हणाल्यावर तिने तोही काढून ठेवला.
“जूई अजून काही आहे का ग तुझ्याकडे?”
“अगं नीट बघना त्या पेटीत अजून एक कप्पा आहे.”
अबोलीने तो कप्पा उघडला आणि तिची नजर अधाश्यासारखी एका पेटीवर गेली. उघडल्यावर तीच नजर नवरत्नहारावर खिळली. तो घालायला मिळणार या कल्पनेनेच तिच्या ह्रदयाची धडधड वाढली. तिने तो गळ्यात घातला, मोहक हालचाल करत पाठीवरचा मणी सरकवला आणि तिने आरश्यात बघितले. तिचा स्वत:च्याच डोळ्यावर विश्वास बसेना. हा एवढा महागडा रत्नहार ही देईल की नाही या भितीने तिने भितभितच विचारले” हा देशील का ग मला एक दिवस? फक्त हाच ! ?
“हो ! घे की. खरे तर दृष्टच काढायला पाहिजे तुझी”
“काहीतरीच तुझे !” लाजून अबोलीने उत्तर दिले.
जूईच्या गळ्यात पडून अबोलीने आपल्या या बालमैत्रीणीचे आभार मानले आणि तो रत्नहार घेऊन ती लगबगीने बाहेर पडली.

१८ मेच्या संध्याकाळी बाईसाहेबांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. जमलेल्या सगळ्या स्त्रियांमधे अबोली इतके सुंदर कोणीच दिसत नव्हते. तिचे डौलदार पावले टाकत चालणे, मधेच पदर सावरणे, बोलण्याची पद्धत, मोहक हसणे, गळ्यातील तो तिला शोभणारा रत्नहार....सगळे पुरूष जमेल तसे तिच्याकडे बघत होते, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मुख्य पाहुण्यांच्या पत्नीने तर तिला शेजारी बसून तिचा रत्नहार हातात घेउन बघितला देखील... अबोलीला आता आस्मान ठेंगणे वाटू लागले. तिची पावले आता हवेत तरंगत होती. तिच्या अनेक स्वप्नांपैकी एक तरी तिने पूर्ण होताना बघितले याचा सार्थ अभिमान तिच्या चेहर्‍यावर डोकावत होता त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. कधी एकदा घरी जातेय आणि नवर्या चे आभार मानते असे झाले होते तिला. रात्री ११.३० वाजत ती दोघे त्या पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा दोघांच्याही चेहर्‍यावर समाधान फुलले होते.

त्याने हातातील शाल तिच्या खांद्यावर टाकली. त्या नवीन साडीवर ती शाल कशीचीच दिसत होती. तिने ती झटकली. हो ! कोणी बघायला नको. भरभर चालत ती तशीच पुढे गेली.
अमोल म्हणाला “ अग ! थांब जरा. सर्दी होईल तुला. ही शाल घे अंगावर. मी टॅक्सी मिळतेय का ते बघतो. !”
पण तिने ते एकले न ऐकल्यासारखे केले आणि ती झपझप पायर्‍या उतरायला लागली.
रस्त्यावर पोहोचल्यावर त्यांना रिक्षाही मिळेना. अखेरीस त्यांना एक खटारा रिक्षा मिळाली. जणू काही दिवसा तोंड दाखवायला लाज वाटल्यामुळे ही रिक्षा रात्री यांच्यासाठीच बाहेर पडली होती.

त्या खटार्‍याने त्यांना घरी सोडले आणि संध्याकाळच्या हुरहुर लावणार्‍या आठवणींनी बेचैन होत ते घरात गेले. परत एकदा आपले रूप आरशात बघावे म्हणून ती आरशासमोर उभी राहिली आणि तिने आपले दागिने काढायला सुरवात केली तेवढ्यात तिच्या तोंडून एक अस्फूट किंकाळी बाहेर पडली......

तिच्या गळ्यात तो नवरत्नांचा हार नव्हता............

तिचा चेहरा पांढराफटक पडला होता तो बघून नवर्‍याने वैतागून विचारले “आता काय झाले?”
ती रडकुंडीला येऊन म्हणाली “मी तो...मी तो... रत्नहार हरवलाय !”
अमोल खाडकन उभा झाला आणि किंचाळलाच “नीट बघ असेल ! हे कसे काय झाले बावळट कुठली ! तरी मी सांगत असतो की......जाऊदेत....”
त्यांनी दोघांनी मग सोडलेल्या साडीत तो रत्नहार पुन्हा पुन्हा शोधला. पर्समधे बघितला, बावळटासारखा त्याच्या पॅंटच्या खिशातही बघितला..पण छे !
“आपण बाहेर पडलो तेव्हा तो होता का तो? निश्चित ?”
“हो ! पायर्‍या उतरताना तर तो होताच . मीच माझ्या हाताने तेव्हा तो चाचपून बघितला होता.”
“पण तो रस्त्यात पडला असता तर आपल्याला काहीतरी आवाज आला असता ना ! बहुतेक तो त्या रिक्षात पडला असावा.”
“हो ! मलाही असेच वाटतय. तू त्याचा नंबर घेतला आहेस का ?”
“आता मला काय स्वप्न पडले होते की तो बावळटासारखा तो रत्नहार तेथे टाकशील म्हणून !” अबोलीच्या नवर्‍याचा आवाज त्याच्या नकळत बराच वर चढला होता. ती आता केव्हाही ओक्साबोक्शी रडायला लागेल अशी तिची अवस्था पाहून तो म्हणाला
“ थांब आता मी सगळा रस्ता पायी पालथा घालतो”
असे म्हणून तो पुटपुटत बाहेर चालता झाला.

अबोली बिचारी एकटी तेथचे बसून राहिली. तहान लागूनही ती पाणी पिण्यासाठी उठली नाही. दरवाजाकडे एकटक पहात ती शून्यात नजर लाऊन बसली. पहाटे अबोलीचा नवरा हात हालवत परत आला. त्याला काहीच सापडले नव्हते. मग त्याने पोलिसांमधे तक्रार नोंदवली व तो रिक्षा संघटनेच्या कार्यालयातही जाऊन आला. वर्तमान पत्रात आता जाऊन तो बक्षिसाची जाहीरातही देणार होता...पण काही उपयोग होईल असे त्याला स्वत:लाच वाटत नव्हते.

अबोली बिचारी दिवसभर त्याच अवस्थेत स्वत:ला दुषणे देत घरात बसली होती. रात्री नवरा ओढलेल्या चेहर्‍याने घरी आलेला बघून तिला काय झाले असावे याची कल्पना आली व इतक्यावेळ रोखून धरलेले तिचे रडू कोसळले.
“मला वाटते तू कोपर्‍यावरून तुझ्या मैत्रिणीला फोन कर. तिला सांग त्या हाराचा फासा तुटल्यामुळे मी तो दुरूस्तीला टाकलाय एक दोन दिवसात मिळेलच. आपल्यालाही थोडा वेळ मिळेल शोधाशोध करायला.
अबोली म्हणाली "नको तूच कर ते काम. हा नंबर !”

सात दिवस झाले रत्नहार काही सापडला नाही. रिक्षा संघटनेच्या कार्यालयातून निरोप आल्यावर त्यांची उरली सुरली आशाही नष्ट झाली. शेवटी अमोलने खिन्न मनाने जाहीर केले “हंऽऽऽऽ आता दुसरा विकत घेऊन परत करण्याशिवाय गत्यंतर नाही”. आत्ताच तो दोन वर्षाने म्हातारा दिसायला लागला होता.

दुसर्‍यात दिवशी त्यांनी त्या रत्नहाराची पेटी घेतली आणि सोनारगल्ली गाठली. पेटीवर नाव असलेल्या सोनाराकडे जाऊन त्यांनी त्याला ती पेटी दाखवली. दुकानदार म्हणाला “बाईसाहेब मी काही असला हार कोणाला विकलेला नाही पण मी ही पेटी मात्र विकलेली आहे. त्या तयार करायचा माझा छोटासा कारखानाच आहे ना !”
हताश होऊन त्या दोघांनी आख्खी बाजारपेठ पालथी घातली. अखेरीस एका दुकानात अबोलीला अगदी तसाच रत्नहार शोकेस मधे लावलेला दिसला. आनंदाने चित्कारत ती म्हणाली “हाच. असलाच होता तो.”
त्याची किंमत ऐकून त्या दोघांनाही भोवळच यायची बाकी होती.
“ दीड लाख”

पण बिचार्‍यांपूढे दुसरा पर्यायच नव्हता. अबोलीच्या नवर्‍याकडे त्याच्या वडिलांनी मरताना ठेवलेले ५०,००० होतेच व उरलेल्याची उसनवारी करावी लागणार होती पण नाईलाज होता. त्यांनी सोनाराकडून तीन दिवस तो हार विकायचा नाही असे कबूल करून घेतले, त्याला सगळी परिस्थिती सांगितली आणि अजून एक विनंती केली.
“आमचा हरवलेला रत्नहार जर तीन महिन्यात सापडला तर तूम्ही हा परत याच किंमतीला परत विकत घ्यायचा.”
दुकानदाराने त्यांची अवस्था बघितली होतीच. त्याने होकारार्थी मान हलविल्यावर दोघांचा जीव भांड्यात पडला.
उरलेले तीन दिवस पैसे गोळा करण्यात गेले.

त्याने मित्रांकडून उधार घेतले, बॅंकेकडे अर्ज केला, कार्यालयातून आगावू रक्कम उचलली, सहकारी पतपेढीत प्रॉमिसरी नोट लिहून दिली व पैसे उचलले. अजूनही काही कमी पडत होते ते पठाणी व्याजाने एका सावकाराकडून कर्जावू घेतले. बेअब्रू होण्याच्या भितीने मिळतील तेथून पैसे गोळा करून त्याने ते दुकान गाठले आणि तो रत्नहार ताब्यात घेतला.

अबोली जेव्हा तो तिच्या मैत्रिणीला परत द्यायला गेली तेव्हा तिचा नवरा बाहेर उभा होता. आल्यावर त्याने विचारले काय म्हणाली ग ती?”
“अग लवकर दिला असतास तर बरे झाले असते. मला लागला नाही म्हणून ठीक. मला नाही बाई असे परत मागायला आवडत”. असे म्हणाली. अबोलीने रडत उत्तर दिले.
नशीब तिने ती पेटी उघडून बघितली नाही. तिच्या लक्षात जर तो बदललेला रत्नहार आला असता तर मोठा गोंधळ उडाला असता. सोने ठीक आहे हो, पण रत्नांचे काय सांगणार ? “आपल्याला चोरच समजली असती ती” अबोली मनात म्हणाली.

त्या दिवसापासून अबोलीला गरज म्हणजे काय याची कल्पना येऊ लागली. गरीबी म्हणजे काय याचा अनुभव तिला यायला लागला. अर्थात तिने ते आव्हान मोठ्या हिमतीने स्विकारले त्यात वाद नाही. बायकांना ती ताकद देवानीच दिली आहे म्हणा. आता तिच्या पुढे एकच लक्ष होते - ते कर्ज फेडणे. आणि तिने निश्चय केला की ती ते फेडेलच. तिने पहिल्यांदा तिच्या मोलकरणीला रजा दिली. त्यांनी कंपनीच्या बाहेर स्वस्तातील घर भाड्याने घेतले. घरकाम म्हणजे काय हे अबोलीला आता चांगलेच समजले. ती आता भांडी घासू लागली, केर काढू लागली. तिच्या नखावरचे नेल पॉलीश केव्हाच उडून गेले आणि धूणी धुताना तिचे हात खरखरीत झाले पण तिला आता या फालतू गोष्टीची तमा नव्हती. प्रत्येक खरेदीत ती आता पैसे वाचविण्यासाठी घासाघीस करू लागली. आरश्यासमोरचा नटण्यामुरडण्याचा वेळ आता लहान मुलांना सांभाळण्यात जाऊ लागला. एक एक पै ती साठवू लागली. एकही पैसा आवश्यक नसेल तेथे खर्च होत नव्हता. प्रत्येक महिन्यात आता कर्जाचा आणि पैशाचा हिशेब होऊ लागला.

अबोलीच्या नवर्‍यानेही संध्याकाळी दुसरी नोकरी पकडली व तो रात्री उशीरा घरी येऊ लागला. अशी पाच सहा वर्षे गेली आणि त्यांना आता परिस्थिती सुधारली असे वाटल्यावर अबोलीने तिच्या नवर्‍याला तिला एक गजरा आणायला परवानगी दिली. चक्रवाढ व्याजाने घेतलेली, अजून एक/दोन वर्षाने त्यांची सगळी देणी फिटली.

अबोली आता खुपच वयस्कर दिसायला लागली होती. ती आता सामान्य बायकांप्रमाणे कणखर, कशालाही न घाबरणारी, हाताला घट्टे पडलेली अशी स्त्री झाली होती. कामाची तिला आता इतकी सवय झाली होती की कर्ज फिटल्यावरही तिने सगळी कामे चालूच ठेवली होती कारण तिने एक महिनाच ती बंद करण्याचा प्रयोग करून बघितला तर तिला वेड लागायचेच बाकी होते.

कधी संध्याकाळी खिडकीपाशी आपल्या नवर्‍याची वाट बघत उभी असताना तिला अवचित ती संध्याकाळ आठवायची आणि तिला हसू यायचे.

जर तिच्या हातून तो रत्नहार हरवला नसता तर काय झाले असते ? देवाला माहीत. हे आयुष्य अशा विचित्र घटनांनी भरलेले आहे की एखादी छोटी गोष्टही आपल्याला आयुष्यातून उठवू शकते तिने स्वत:च्या मनाची समजूत घातली.

एक दिवस नवर्‍याबरोबर डेक्कनवर फिरताना तिला एक बाई तिच्या मुलाला घेऊन चाललेली दिसली जुई परांजपेच होती ती. शंकाच नाही. अजूनही तशीच सुंदर टवटवीत...

अबोलीच्या काळजात जून्या आठवणींनी धस्स झालं. बोलावे का हिच्याशी ? तिला तो बदललेला रत्नहार कळला असेल का ? धीर धरून ती तिच्या बालमैत्रिणीला सामोरे गेली.
“ओळखलस का ?”
“नाही हो ! तुमची काहीतरी चूक होती आहे का ?”
“नाही जूई, मी अबोली ! ओळखलस का आता ?”
“अरे देवा ! काय ग तुझी ही हालत ?” आश्चर्याने जुई ओरडली.
“हंऽऽऽऽ कष्टात गेले ग माझे ते दिवस. फार गरीबीत आणि तेही तुझ्यामुळे”
“माझ्यामुळे ?”
“अग तुला तो मला उसना दिलेला रत्नहार आठवतोय का ?:
हो काय झाले त्याचे?”
“मी तो हरवला !”
“अग तू मला तो परत दिलास की ! ”
“मी अगदी तसाच दुसरा हार विकत घेऊन त्या पेटीत ठेवला होता आणि त्यासाठी आम्हाला एक लाख कर्ज काढायला लागले ते आम्ही कसेबसे फेडले एकदाचे ! आम्हाला फार त्रास झाला या सगळ्याचा ! पण ते जाउदेत ! तू कशी आहेस आता ?”
“तू म्हणतेस तू एक रत्नहार, विकत घेतलास, माझा परत करण्यासाठी आणि तो सुद्धा लाखभर रुपायाला ?’
“म्हणजे ते तुझ्या लक्षात आले नाही तर. कसे येणार म्हणा, अगदी सारखेच होते ते !”
अबोलीच्या चेहर्‍यावर हे बोलताना अभिमान, आनंद ओसंडून वहात होता. डोळ्याच्या कडाही पाणवल्याचा भास झाला तिच्या मैत्रिणीला.

जूईने, तिच्या बालमैत्रिणीने अबोलीचे हात हातात घेतले, त्या खरखरीत हाताकडे बघत ती काही म्हणणार तेवढ्यात तिच्या डोळ्यातून दोन अश्रू त्या तळाहातावर पडले.

“अबोली कसे सांगू तुला.... अग तो काही खर्‍या रत्नांचा हार नव्हता...फक्त १००० रुपायाचा होता तो”..........

अबोलीला हसावे का रडावे हेच कळेना.........

जयंत कुलकर्णी.

गी द मुपासाँच्या “The Diamond Necklace या लघूकथेचा स्वैर अनुवाद. !

कथाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

20 Jun 2012 - 11:22 pm | जेनी...

:)

अन्या दातार's picture

20 Jun 2012 - 11:23 pm | अन्या दातार

"अरे देवा! झाला की बल्ल्या" शेवट वाचून हेच मनात आले.

मुक्त विहारि's picture

21 Jun 2012 - 12:07 am | मुक्त विहारि

अनुवाद , छान झाला आहे...

शिल्पा ब's picture

21 Jun 2012 - 12:10 am | शिल्पा ब

गोष्ट वाचुन नेमका काय अर्थ काढावा याचा विचार करतेय.

अनुवाद छान जमलाय.

हि कथा म्हणजे कुठल्या इंग्रजी कथेचा स्वैर अनुवाद आहे का? मागे वाचल्यासारखे वाटतेय!

असेच म्हणते.
अर्थात मी ही कथा एका पुस्तकात वाचली होती.
थोडे बदल होते.
ही कथाही छान झालीये.

स्पंदना's picture

21 Jun 2012 - 5:15 am | स्पंदना

गी द मुपासाँच्या “The Diamond Necklace या लघूकथेचा स्वैर अनुवाद. !
की नंतर अ‍ॅड केलय?

जयंत कुलकर्णी's picture

21 Jun 2012 - 9:48 am | जयंत कुलकर्णी

नंतर अ‍ॅड केलेले नाही !

चित्रगुप्त's picture

21 Jun 2012 - 12:38 am | चित्रगुप्त

छान. आवडली कथा.

बदक's picture

21 Jun 2012 - 1:18 am | बदक

.. असताना इंग्रजी मधे होती ही कथा. रट्टामारु स्वभावामुळे आजही बरीचशी नवनीत भाषांतरे लक्षात आहेत. असो. आठवणींना उजाळा दिल्याबद्द्ल धन्यवाद!
पुलेशु

शुचि's picture

21 Jun 2012 - 3:08 am | शुचि

अफलातून कथा आहे ही. कवडीमोलाच्या रत्नहाराकरता, नकळत लाखमोलाच्या तारुण्य आणि सौंदर्याचा सौदा करणार्‍या अतिशय सुंदर तरुण स्त्रीची ही चटका लावणारी कहाणी आहे.

अनुवाद मस्त झाला आहे.

५० फक्त's picture

22 Jun 2012 - 8:23 am | ५० फक्त

या कथेत तुम्हाला -नकळत लाखमोलाच्या तारुण्य आणि सौंदर्याचा सौदा करणार्‍या - हे कुठं जाणवलं समजवाल का ?

स्वताच्या चुकीच्या परिमार्जनासाठी स्वताच्याच घरी कष्ट करणे याला लाखमोलाच्या सौंदर्याचा सौदा कसं म्हणणार, किंवा रुढार्थाने ज्याला सौंदर्याचा सौदा म्हणतात तसं काही केलेलं जाणवलं नाही कुठं कथेत.

जयंत कुलकर्णी's picture

22 Jun 2012 - 8:51 am | जयंत कुलकर्णी

मला वाटते या कथेत हव्यास आणि त्याची चुकवलेली किंमत हे प्रभावीपणे मांडलेले आहे.
त्याच्याच बरोबर सौंदर्य ही देवाची देणगी आहे (किंवा आई वडिलांची) त्यात आपले स्वतःचे काही कर्तृत्व नसते त्यामुळे त्यात हुरळून जाऊ नये, पाय जमिनीवर ठेवावेत, हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. अर्थात मुळ लेखकाने.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 4:20 am | श्रीरंग_जोशी

हा तर ११ वी युवकभारती (इंग्रजी भाषेचे क्रमिक पुस्तक) मधील एक पाठ होता.

अर्थातच स्वैर अनुवाद छानच जमलाय. मूळ कथा युरोपियन होती...

मृत्युन्जय's picture

21 Jun 2012 - 10:35 am | मृत्युन्जय

एग्झॅक्टली. त्यामुळेच आधी वाचली होती. तेव्हाही आवडली होती. कदाचित मूळ कथा आधी वाचली होती म्हणुन असेल पण मूळ कथा वाचण्यात जास्त मजा आहे.

स्पंदना's picture

21 Jun 2012 - 5:16 am | स्पंदना

वांग्याची भाजी...्आ हा हा

जयंत कुलकर्णी's picture

21 Jun 2012 - 9:47 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

प्रचेतस's picture

21 Jun 2012 - 10:08 am | प्रचेतस

अप्रतिम रूपांतर.
आवडली कथा.

योगप्रभू's picture

21 Jun 2012 - 11:37 am | योगप्रभू

कथेचा स्वैर अनुवाद आवडला.

फक्त साने आणि परांजपे यांच्यात अशी कथा घडेल का, याबद्दल साशंक आहे
(सुधीर गाडगीळ यांच्या 'मोजून मापून कोकणस्थ' या लेखातील तपशील लक्षात घेता चित्पावन गृहिणी गरीबीत असली तर प्रसंगाला एकवेळ स्वतःचा एखादाच लहानसा अलंकार घालेल, पण मिरवण्याच्या हौसेपायी दुसर्‍याच्या दागिन्यांची उधार उसनवारी करणार नाही.)

आता थोडी चंमतग. ह. घ्या.
(पटवर्धन, वैशंपायन, सहस्रबुद्धे, करमरकर अशा लोकांनी आपल्या आडनावात केलेल्या अक्षरांच्या उधळपट्टीवर साने, नेने, लेले, भावे नाराजी दाखवतात. तिथे अमोल साने बायकोला साडीसाठी दहा हजार रुपये देतो म्हणता? मुंग्यांनी मेरुपर्वत तर... :))

विनीत संखे's picture

21 Jun 2012 - 4:05 pm | विनीत संखे

दीक्षित, जोशी, कर्वे इ. आडातली नावेही जोडावीत सोबत.

तिमा's picture

21 Jun 2012 - 8:34 pm | तिमा

रबर स्टँप सुद्धा फक्त 'ले' वा 'ने' असा करुन दोनदा कागदावर उठवतात म्हणे.

जोयबोय's picture

21 Jun 2012 - 12:37 pm | जोयबोय

मला ही कथा ११वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात होती. पन लेखकाचे नाव ओ'हेन्री होते.

मृत्युन्जय's picture

21 Jun 2012 - 12:57 pm | मृत्युन्जय

नाही ओ हेन्रीची कथा वेगळी होती. The Gift of the Magi. माझ्या सर्वात आवडत्या कथांपैकी एक.

त्यावर पंकज उधास चे एक गाणे देखील आहे 'आहीस्ता की जे बाते धडकने कोई सुन रहा होगा"

गणेशा's picture

21 Jun 2012 - 3:54 pm | गणेशा

छान अनुवाद ...

तिमा's picture

21 Jun 2012 - 8:30 pm | तिमा

मूळ कथा वाचली होती तरीही त्याचे मराठी 'रुपडे' आवडले.

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2012 - 11:19 pm | स्वाती दिनेश

मूळ कथा वाचली होती तरीही त्याचे मराठी 'रुपडे' आवडले.
असेच म्हणते,
स्वाती

पैसा's picture

24 Jun 2012 - 11:44 pm | पैसा

अगदी छान मराठी वातावरण निर्मिती केलीय!