ऐन वसंतात ....

मनिषा_माऊ's picture
मनिषा_माऊ in जे न देखे रवी...
28 May 2012 - 1:03 pm

ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा
नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ ||

भरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा
कोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा
झुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१||

मेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला
नवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला
हळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२||

मन कावरं बावरं , मन केवड्याच रान
किती सावरू आवरू आज सुटले हे भान
किती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३||

नाही संपला अजुनी सये तुझा वनवास
तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास
उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४||

सनईचा सूर का गं असा बेसूर लागला
वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला
किती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ ||

ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा
नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||

- मनिषा नाईक (माऊ )

करुणकविता

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

28 May 2012 - 4:26 pm | शैलेन्द्र

चांगला प्रयत्न..
:)

पु ले शु.

चौकटराजा's picture

28 May 2012 - 5:21 pm | चौकटराजा

आपली ही कविता वाचून तृप्त झालो. सलग प्रवाही व अर्थपूर्ण कसे लिहावे याचा उच्चतम नमूना ! आपल्या या कविते वरून माझे आवडते गवई पं. कुमार गंधर्व यांची एक बंदिश आठवली ही बहार रागात आहे.
ऐसो कैसो आयो रिता रे
अंबुवा पे मोर ( मोहर) ना आयो
करे ना गुंजार ए भवरारे
पीर बजो कोयलकी रंग ना खिलो .......

"नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा" हा तर कहर आहे .
म्ह्णणजे या " सार्‍यांच्या गर्दीत मी एकटा एकटा " अशा सारखा विरोधाभास !
आणखी कविता लिहाच !

पैसा's picture

28 May 2012 - 6:13 pm | पैसा

मिपावर पहिल्या कवितेचं स्वागत. चांगलं लिहिताय. लिहीत चला!

जोशी 'ले''s picture

29 May 2012 - 12:03 am | जोशी 'ले'

मस्त, आवडली कवीता... :-)

अमृत's picture

29 May 2012 - 10:29 am | अमृत

कविता आवडली :-)

अमृत

रघु सावंत's picture

4 Jun 2012 - 12:03 am | रघु सावंत

नाही संपला अजुनी सये तुझा वनवास
तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास
उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४||

सनईचा सूर का गं असा बेसूर लागला
वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला
किती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ ||

माऊ मस्त जमलीय की कविता

रघू