तीन गझला

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जे न देखे रवी...
12 May 2012 - 12:43 am

------------१--------------------

बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये
जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये

जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी
सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये

जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे
बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये

कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया
बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये

बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता
आपल्याला जोडणार्‍या तू बळा शोधून ये

--------------२------------------------

प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे
जाणवे हर एक श्वासा अंतरी असणे तुझे

रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका
पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे तुझे

अमृताचा कुंभ तव अधरांवरी का सांडला
अन तयाला रक्षण्या नजरेतुनी डसणे तुझे

सांज येता क्षीण होई हा मनाचा पारवा
ये उभारी त्यास जेंव्हा बरसते हसणे तुझे

मंदिरी आणी मशीदी रोज जागर चालला
जाणले नाही कुणी हृदयामधे वसणे तुझे

-------------३-----------------

धावत्याला जोश येई आणि रस्ता सापडे
पण दुतर्फा बोचकरण्या का उभी ही माकडे

दाबिता कळ काम होई अंगवळणी हे पडे
दहनही माझे विजेवर ना चिता ना लाकडे

काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे

जन्म होता वासुनी आ श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

वासनांचा खेळ सारा या इथे अन त्या तिथे
शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे

शृंगारशांतरसगझल

प्रतिक्रिया

योगेश सुदाम शिन्दे's picture

12 May 2012 - 10:36 am | योगेश सुदाम शिन्दे

<< काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे >>

+१

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2012 - 12:26 pm | अत्रुप्त आत्मा

झाक येकदम :-)

धन्यवाद!
( तीन गझला, निदान तीन तरी प्रतिसाद असावेत म्हणून हा प्रतिसाद लिहिला.)

पैसा's picture

12 May 2012 - 5:35 pm | पैसा

मस्त लिहिताय की! तुम्ही गंभीरपण लिहू शकता. लै झ्याक!