महाभारतातील व्यक्तिचित्रे-३ राजर्षि भीष्म

शरद's picture
शरद in काथ्याकूट
19 Apr 2012 - 12:25 pm
गाभा: 

राजर्षि भीष्म

(आज तिसर्‍या भागाला सुरवात करण्याआधी एक गोष्ट सांगु इच्छितो. प्रतिसादात अनेकजण निरनिराळ्या गोष्टी देत असतात. काय होते, रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथावर लुब्ध होऊन बरेच लेखक त्या ग्रंथात नसलेल्या गोष्टींची भर घालत असतात. कीर्तनकार, पुराणिक, कादंबरीकार व ग्रामिण लेखक यांचा असल्या गोष्टींवर भर असतो व काही कथा लोकप्रियही असतात. उदा. जांभुळआख्यान. पण अश्या "ग्राम्य" गोष्टींमुळे महाभारतातील पात्रांवर अन्याय होतो. व अशीही समजुत होणे शक्य आहे की असे खरेच महाभारतात आहे.. प्रतिसादकर्त्यांच्या बहुश्रुतपणाबद्दल आदर बाळगून माझी नम्र विनंती आहे की हे मनोरंजक किस्से सांगतांना जर ही गोष्ट महाभारतात आहेच याची खात्री नसेल तर तसा उल्लेख केल्यास बरे होईल. उदाहरण म्हणून भानुमतीची गोष्ट घ्या.आदि कालापासून लोकधारणांमध्ये नाग हा पुरुषाचे प्रतिक मानला गेला आहे म्हणून अश्या गोष्टीत शेषाचा उल्लेख.होतो. ही गोष्ट लिहतांना मूळ कथानकातील संदर्भ तुटतात इकडेही दुर्लक्ष होते. खेडेगावात एका वाड्यात दोन भाऊ व त्यांच्या बायका एकत्र राहतात व तुळसीला पाणी घालतांना त्यांना एकमेकींच्या उखाळ्यापाखाळ्या काढता येतात. पण सम्राट कुळातील कौरव-पांडवांचे महाल निरनिराळे असतात इकडे लक्ष जात नाही. मग कृष्णही द्वारकेत असण्याऐवजी या "वाड्याच्या " पलिकडच्या गल्लीत मुक्कामाला असतो व द्रौपदी गार्‍हाणे घेऊन त्याच्याकडे जाते असे मानावे लागते. मनोरंजक किस्से द्यावयास माझी मुळीच हरकत नाही. पण त्यांची योग्य जागा माहीत असणे उचित. आणि महाभारतात अश्या गोष्टींचा खजिनाच आहे. उदा. माधवी व गालव. पाहिजे तर त्याही सांगू.)

राजर्षि भीष्म हे महाभारतकालीन योद्ध्यांमधील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होते." हातात शस्त्र घेणार नाही " ही श्रीकृष्णाची प्रतिज्ञा त्यांनी दोनवेळा मोडावयास लावली. " मला सेनापति कर, मी त्यांना रथाखाली आणतो " असे श्रीकृष्णाला युधिष्ठिराला सांगावे लागले. परशुरामाशी त्यांनी तेविस दिवस युद्ध केले व त्याला पराभूतही केले. काशीराजाच्या राजधानीत त्यांनी एकट्याने सर्व राजमंडळाशी युद्ध करून त्यांना पराभूत केले व तीन राजकन्या जिंकून आणल्या. पण हा एक पैलू झाला. श्रीरामाप्रमाणे त्यांनीही पितृभक्तीमुळे राज्यावर पाणी सोडले व हे पुरेसे नाही म्हणून की काय आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली व ती शेवटपर्यंत पाळली.त्यामुळे कोणतीही अंतिम टप्प्याची प्रतिज्ञा म्हणजे "भीष्मप्रतिज्ञा " असे म्हणण्याचा प्रघात पडला. "रामबाण " सारखा. आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचे धर्म, नीती, अर्थ, राजकारण, समाजकारण इ. संबंधी ज्ञान. युद्धानंतर भीष्मांची अंतिम घटिका जवळ आलेली पाहून व्यथित झालेले श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले " जे जे काही तुझ्या मनांत असेल ते ते त्यांना विचार. ध्रर्मार्थकाममोक्ष, सर्व विद्या,त्रैवर्णिकाम्ची सर्व कर्मे, चारही आश्रमांचे धर्म व राजधर्म यांविषयी सर्व काही त्यांना विचार. त्यांच्या बरोबरच सर्व ज्ञान लोप पावणार आहे." भीष्मांच्या ज्ञानाबद्दल हे श्रीकृष्णाचे मत आहे.

जन्म

ब्रह्मलोकांत गंगादेवी एकदा ब्रह्मदेवाच्या दर्शनास गेली असतांना वार्‍याने तिचा पदर उडू लागला असतांना सर्व सभासदांनी खाली माना घातल्या.पण महाभिष नावाच्या राजाने तिच्याकडे नि:शंकपणे पाहिले व गंगाही क्षणभर त्याच्याकडे पाहूं लागली. ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला की "तू पुनश्च मर्त्यलोकी जा. तेथे गंगा तुला पत्नी म्हणून मिळेल पण ती तुझे अप्रिय करेल. त्याचा तुला राग आल्यावर तू परत येथे येशील ".त्याप्रमाणे त्याने कुरूवंशांत शांतनू म्हणून जन्म घेतला. हा अत्यंत बुद्धिमान, धर्मात्मा, सत्यसंघ होता. जीतेंद्रियता,ज्ञान,क्षमा, अभिजातता, तेज व सामर्थ्य हे त्याचे नैसर्गिक गुण होते. भीष्मांना आपल्या पित्याचा अतिशय अभिमान होता व पित्यावर त्याचे आंत्यंतिक प्रेम होते. ते आपल्याला "शांतनव" म्हणवून घेत.

इकडे गंगा पृथीवर येण्यासाठी निघाल्यावर वाटेत तिला अष्टवसू भेटले. वशिष्ठांनी शाप दिला म्हणून त्यांनाही मर्त्यलोकी जन्म घ्यावयाचा होता. त्यांनी गंगेला विनंती केली की आम्हाला मानवी स्त्रीच्या गर्भात जन्म घेण्याची इच्छा नाही. तेव्हा तू आम्हाला जन्म दे व लगेच पाण्यात बुडवून टाक.( देवही कसे डॅंबिसपणा करतात बघा. शापाप्रमाणे इथे जन्म घेतला पण भोग मात्र भोगावयास नकोत !) गंगेने त्याला मान्यता दिली पण ती स्त्रीसुलभ प्रेमाने व वात्सल्यतेने म्हणाली "माझ्यासारखी देवी पत्नी म्हणून मिळाल्यावर शांतनू निपुत्रिक मरता कामा नये. तुमच्या सर्वांचा अंश असलेला दीर्घायू पुत्र त्याला मिळालाच पाहिजे." वसूंनी त्याला मान्यता दिली. शांतनूला गंगा भेटल्यावर तिच्या दैवी सौंदर्यावर लुब्ध होऊन त्याने तिला मागणी घातली. ती म्हणाली " माझी एक अट आहे. माझ्या कोणत्याही कृतीला तू हरकत घेता कामा नये. नाही तर मी तत्काळ निघून जाईन." शांतनूने त्याला मान्यत दिली व त्यांचा विवाह झाला. नंतर मुलगा झाला की गंगा त्याला पाण्यात बुडवून टाके. शांतनूला काहीच बोलता येत नसे. आठव्या पुत्राच्या वेळी त्याने "निदान याला तरी बुडवू नकोस " अशी गंगेची प्रार्थना केली. गंगा म्हणाली " हा दीर्घायू पुत्र तुला मिळेल पण आपल्यात ठरल्याप्रमाणे मी मात्र निघून जाणार ". जातांना ती भीष्माला बरोबर घेऊन गेली.

शिक्षण

काही वर्षांनी शांतनू गंगेकाठी फ़िरत असतांना एक तरुण मुलगा बाणांनी प्रवाह रोखून धरत आहे असे त्याला दिसले. तो चकितच झाला. इतक्यात स्वत: गंगा तेथे प्रकट झाली व त्याला म्हणाली " हे राजा, हा मी घेऊन गेलेला तुझा मुलगा. स्वर्गात याने वसिष्ठ, देवगुरू बृहस्पति, असूरगुरू शुक्राचार्य व परशुराम यांच्याकडून शिक्षण घेतले आहे. हा दीर्घायु पुत्र आता तुझ्याबरोबर राहील." गंगा निघून गेली व शांतनू आनंदाने राजधानीत परतला. गंगादेवीचा पुत्र आणि या चार जगन्मान्य गुरूंकडे शिक्षण यामुळेच श्रीकृष्णांनी प्रशंसा करावी एवढे ज्ञान भीष्मांना प्राप्त झाले.

भीष्मप्रतिज्ञा

भीष्माला युवराज्याभिषेक करून शांतनू तसा मोकळा होता.गंगेकाठी फिरतांना त्याला एक लावण्यवति, जिच्या अंगाचा सुगंध सगळीकडे पसरला होता, त्याला दिसली. तो प्रेमात पडला व त्याने तिच्या बापाकडे जाऊन लग्नाकरिता मागणी घातली. बाप म्हणाला "हिचा मुलगा राज्याधिकारी होणार असेल तर मला मान्य आहे." शांतनूने अर्थात नकार दिला व तो परतला. पण त्याच्या वागणुकीत जरा फरक पडला. भीष्माने जरा चौकशी केल्यावर त्याला हा प्रकार कळला. तो वडिलांशी न बोलता परस्पर तिच्या बापाकडे गेला. बापाने परत तेच सांगितले. भीष्माने प्रतिज्ञा केली " मी राज्यावरील अधिकार सोडला. तुझ्या मुलीला जो पुत्र होईल तोच आमचा राजा होईल." आता बापाला आणखी लोभ सुटला. तो म्हणाला " आपण आपली प्रतिज्ञा पाळाल पण आपल्या मुलांचा काय भरोसा ?" भीष्माने लगेच दुसरी प्रतिज्ञा केली " मी आजपासून ब्रह्मचर्य पाळीन ! " या त्यागावर प्रसन्न होऊन शांतनूने त्याला वर दिला की " तू स्वेच्छामरणी होशील ".

दुर्दैवाचे आघात

सत्यवतीला शांतनूपासून दोन पुत्र झाले. शांतनू वारल्यावर मोठा राजा झाला पण तो लवकरच एका युद्धात मरण पावला. धाकट्याला भीष्माने राज्यावर बसवले. त्याच्याकरिता वधू म्हणून त्याने काशीराजाच्या तीन मुलींचे स्वयंवर होते तेथे जाऊन अम्बा, अंबिका व अंबालिका या तिघींचे हरण केले. तेथे जमलेल्या सर्व राजांचा त्याने पराभव केला. त्यातला एक शाल्व. घरी आल्यावर तिघींचा विवाह करण्याचे ठरवल्यावर अंबेने त्याला सांगितले की तिचे शाल्वावर प्रेम असून दोघांनी लग्न करावयाचे ठरविले होते. सगळ्यांशी विचारविनिमय करून भीष्मांनी बरोबर ब्राह्मण, दासी वगैरे देऊन तिची रवानगी शाल्वाकडे केली. मात्र शाल्वाने तिला स्विकारावयास नकार दिल्याने तिला काहीच मार्ग उरला नाही. मग तिने परशुरामांची विनवणी केली. त्यांनी भीष्माला सांगितल्यावरही तो आपल्या भावाकरिता अंबेला स्विकारावयास तयार झाला नाही. मग परशुराम-भीष्म यांचे तेवीस दिवस युद्ध झाले. त्यांत भीष्मांचा जय झाला. या विजयाने भीष्माचे नाव सर्व भारतात सर्वोत्तम योद्धा म्हणून झाले. जरासंधासारख्या सम्राटालाही हस्तिनापूराकडे वाकडा डोळा करून पहावयाची हिम्मत झाली नाही.
अंबेला आता कोणीच त्राता उरला नाही. तिने कडक तप आचारावयास सुरवात केली. शेवटी शंकराने तिला वर दिला कीं पुढील जन्मी ती भीष्मांचा वध करेल. ती पुढील जन्मी द्रुपदाची मुलगी (शिखंडी) म्हणून जन्मली पण एका चमत्कारिक योगाने तिचा प्रुरुष झाला. भीष्मांना ही गोष्ट माहीत असल्याने त्यांनी पुढे शिखंडीशी युद्ध करावयाचे टाळले. या शिखंडीच्या पाठीमागे राहून अर्जुनाने भीश्मांशी शेवतचे युद्ध केले. शांतनूचा धाकटा मुलगा विचित्रवीर्य याच्याशी अंबिका व अम्बालिका या दोघींचा विवाह झाला. हा इतका कामी निघाला की तो लवकरच क्षय होऊन मृत्यु पावला. आता वंशात पुत्रच नाही अशी अवस्था प्राप्त झाली. सत्यवतीने भीष्मांसमोर दोन पर्याय ठेवले. त्यांनी राज्य स्विकारावे व लग्न करून वंश वाढवावा किंवा नियोग पद्धतिने अम्बिका-अम्बालिका यांना पुत्र द्यावेत. भीष्मांनी दोन्ही पर्यायांना ठाम नकार दिला नियतीचा खेळ पहा : जिच्या करिता भीष्मांनी दोन प्रतिज्ञा केल्या तिच्यावरच त्यांनी आता त्या मोडाव्यात असे सांगण्याची पाळी आली ! भीष्मांनी एक पर्याय पुढे ठेवला. एखादा चांगला ब्राह्मण बघून त्याच्याकडून पुत्रप्राप्ती करून घ्यावी. नंतर सत्यवती त्याला सांगते की तिला महर्षि पराशर यांच्यापासून एक पुत्र झाला होता व तो म्हणजे महर्षि व्यास. नंतर भीष्मांच्या अनुमतीने सत्यवतीने व्यासांना बोलावून घेतले व त्यांना नियोगाची आज्ञा दिली. व्यासांचा अवतार पाहून राणीने डोळे मिटून घेतले ते उघडलेच नाहीत. धृतराष्ट्र आंधळाच जन्मला. दुसरी अम्बालिका इतकी घाबरली की पांढरीफटक पडली. पांडू हा पांडुररंगाचा झाला. तिसर्‍यावेळी अम्बिकेने आपण जाण्याऐवजी आपली दासीच पाठवून दिली ! तिला घाबरावयाचे कारणच नसल्याने तिने व्यासांचे स्वागत मनोभावाने केले. व्यासांनी प्रसन्न होऊन तिला वर दिला की तुझ्या पोटी साक्षात यमधर्मच जन्म घेईल. तो धर्मात्मा विदूर. जन्मांध असल्याने धृतराष्ट्राचा
सिंहासनावर अधिकार नव्हता. पांडूला राज्याभिषेक झाला. दासीपुत्र विदुर हा विद्वान मंत्री होता. धृतराष्ट्राचे गांधारीशी लग्न झाले.पांडूला कुंती व माद्री या दोन बायका होत्या. आता भीष्मांना नातवंडे खेळवत बसावयास
हरकत नव्हती. पण झाले काय ....
पांडूला मृगयेचा नाद. त्यामुळे धृतराष्ट्राला भीष्म व विदुर यांच्या मदतीने राज्य कारभार बघावयास सांगून तो आपल्या दोन बायकांबरोबर वनातच वेळ काढी. एकदा मृगया करतांना एका ऋषीला त्याचा बाण लागला व त्याने पांडूला शाप दिला की संभोगासाठी तू बायकोला हात लावलास की तू मरशील. आता निपुत्रिक मरावयाचे की काय ? त्याने कुंतीला सांगितले की नियोग पद्धतीने पुत्र प्राप्त करून घे. कुंतीने त्याला दुर्वाससांचा वर सांगितला. आनंदाने पांडूने यमधर्माकडून धार्मिक पुत्र मिळव असे तिला सांगितले. युधिष्ठिराचा जन्म झाला. पण एका मुलाने कसे भागणार ? त्याच्या सांगण्यावरून कुंतीला भीम व अर्जुन हे पुत्र झाले. पुढे कुंतीने नकार दिला म्हणून माद्रीने तिच्याकडून मंत्र घेतला व तिला नकुल-सहदेव ही मुले झाली. गांधारीलाही दुर्योधनादि शंभर मुले झाली. पांडूचा मृत्यु झाल्यावर माद्री त्याच्याबरोबर सती गेली व कुंती पाच मुलांना घेऊन राजधानीला आली. भीष्मांनी कृपाचार्य व मग द्रोणाचार्य यांसारखे श्रेष्ठ गुरूंकडून मुलांना शिक्षण दिले. द्रौपदी स्वयंवरानंतर जेव्हा पांडव परतले तेव्हा कलह नको म्हणून राज्याची वाटणी करण्यात आली. पांडव बाहेर निघून गेले म्हणून भीष्म, कृपाचार्य व द्रोणाचार्य कौरवांकडेच राहिले व शेवटपर्यंत त्यांच्याच बाजूने लढले.

द्यूतप्रसंग

भीष्मांवर सर्वात जास्त गंभीर आरोप करण्यात येतो तो द्यूतप्रसंगी त्यांनी द्रौपदीची बाजू घेऊन कौरवांना शासन केले नाही म्हणून. सत्याची बाजू घेऊन त्यांनी असत्याचा मोड करावयास पाहिजे होते, ते गप्प बसले ही चुक अशी समजूत आहे. नक्की काय झाले ? द्यूत कपटाने खेळले जात आहे असे सर्वांनी सांगितले व तरीही युधिष्ठिर ते खेळला. त्यात तो हरला व त्याने स्वत: व स्वत:चे भाऊ दास आहोत हे कबूल केले.त्याने आपली बायको पणाला लावली व त्यातही तो हरला. त्या वेळी कौरवांनी त्याला सांगितले की " "मी दास नाही " असे तू सांग, आम्ही सर्वांना सोडून देतो." त्याला तो कबूल नाही. म्हणजे एखादा राजा स्वत: दास आहे असे कबूल करत असतांना इतरांनी काय करावयाचे ? द्रौपदीने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तरात त्यांनी सांगितले की, "दास इतरांचा मालक नाही, पण त्याचा त्याच्या पत्नीवरील अधिकार नाहीसा होत नाही." हे त्या वेळच्या धारणांना धरून आहे. "मी अर्थाचा दास आहे" असे ते म्हणतात तेव्हा "अर्थ" याचा अर्थ पैसा असा घेणे चुकीचे आहे. ज्याने राज्याचा त्याग केला तो चार पैशांकरिता लाचार होईल असे समजणे चुकीचे वाटते. त्यांनी एकदा सांगितल्याप्रमाणे कुरूराज्याचा सेवक ही त्यांनी घेतलेली भुमिका आहे व अर्थ याचा अर्थ 'पुरुषार्थ", स्वत:चे ठरविलेले काम, असे त्यांना म्हणावयाचे असावे.

विराटपर्वात अर्जुन एकट्याने सर्व कौरवांचा पराभव करतो व त्यांना संमोहित करून त्यांची वस्त्रे आणावयास उत्तराला सांगतो, तो म्हणतो " बाबा रे, द्रोण, कर्ण, दुर्योधन इत्यादींची वस्त्रे आण, पण भीष्मांसमोरून गुपचुप जा, त्यांना एकट्यालाच या अस्त्राचा प्रतिकार कसा करावयाचा माहीत आहे." एकमेवाद्वितीय !

भीष्मपर्व

दुर्योधनाची युद्धाची भिस्त कर्णावर अवलंबून होती तरी त्याला भीष्मांचे श्रेष्टत्व चांगलेच माहीत होते. म्हणून सुरवातीलाच भीष्म-कर्ण यांच्यात वाद निर्माण झाल्यावर त्याने कर्णाला बाजूला करून भीष्मांनाच सेनापती केले. त्याच वेळी भीष्मांनी आपण काय करू व आपण काय करणार नाही याची स्पष्ट कल्पना दुर्योधनाला दिली. व पांडवांनी मागितलेला सल्ला त्यांना देईन हेही सांगितले. भीष्मांनी अवंचक युद्ध केले. तिसर्‍या व सातव्या दिवशी कृष्णाला आपली प्रतिज्ञा मोडावी लागली यातच त्यांच्या सरळ वृत्तीने केलेल्या युद्धाची खुण दिसते. शिखंडी हा प्रथम स्त्री होता व नंतर पुरुष झाला असल्याने मी त्याच्यावर बाण सोडणार नाही हे त्यांनी आधीही सांगितले होते. प्रत्यक्ष युद्धासंबंधी येथे काही लिहित नाही.

अंत

रथातून खाली पडल्यावर भीष्मांनी प्राण सोडावयाची तयारी केली. पण त्यावेळी दक्षिणायण होते. उत्तरायणात प्राण सोडणे मान्य असल्याने त्यांनी शांतनूने दिलेल्या वराचा उपयोग करण्याचे ठरविले व शारीरिक वेदना सहन करावयाच्या पण प्राणत्याग नंतरच करावयाचे ठरविले. या वेळीही त्यांनी दुर्योधनाची समजुत घालावयाचा प्रयत्न केला. कर्णाला त्याचा उगम सांगून त्याचेही मन वळवण्याच्वा प्रयत्न केला. ते अशक्य आहे असे दिसल्यावर मोठ्या मनाने त्याचे क्षत्रीयत्व, नैपुण्य मान्य करून केवळ कलह टाळण्यासाठी तुझा अवमान करत होतो असेही कबूल केले. योग्य पद्धतीने लढावयास परवांगीही दिली.
वर सांगितल्याप्रमाणे या काळातच युधिष्ठिराने त्यांना आपल्या सर्व शंका विचारल्या. महाभारतातला हा सर्वात महत्वाचा भाग. केवळ यामुळेच महाभारताला "पंचमवेद" ही मान्यता प्राप्त झाली. अंतिम काळात त्यांनी योगमार्गाने ब्रह्मरंध्राचा भेद करून प्राण अंतरिक्षात विलीन केले.

शरद

प्रतिक्रिया

प्रास's picture

19 Apr 2012 - 12:52 pm | प्रास

मस्त! अगदी संतुलित लेख. आवडला.

तुमचं सुरूवातीचं निवेदनही पटण्यासारखंच आहे. पण मला असा प्रश्न पडतोय की हे लेखन तुम्ही काथ्याकुटात का करताय? जनातलं मनातलं मध्ये करता तर जास्त योग्य होईल.

तुमचे महाभारतातील व्यक्तिरेखांची शब्दचित्रे पुन्हा पुन्हा वाचावीत अशीच उतरली आहे.

पुढच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत.

व्यक्तिचित्र म्हणुन छान आहेत. पण शंका येणार्‍या प्रसंगांचे निरसन म्हणुन काही प्रतिसाद येणारच.

आमची एक शंका : महाभारत (टीव्ही) मधे तिनही मुले विचीत्रविर्याची दाखवलीत पराशराची नाहीत. मुळ महाभारत वगैरे काय म्हणतं?

अजुन एक म्हणजे : इच्छामरण म्हणजे नक्की काय होतं?

प्रसाद प्रसाद's picture

19 Apr 2012 - 3:43 pm | प्रसाद प्रसाद

देवव्रताचा (भीष्म) बाप राजा शंतनू सत्यवती नावाच्या कोळीणीच्या प्रेमात पडला. पण सत्यवतीच्या बापाने लग्नाला नकार दिला करण सत्यवतीला होणाऱ्या मुलांचा सिहासनावर अधिकार असणार नाही कारण आधीच देवाव्रताचा जन्म झाला होता. लग्नाला नकार मिळाल्याने राजा शंतनू नाराज होता त्याच्या नाराजीचे कारण शोधून काढून देवव्रत सत्यवतीच्या वडिलांना भेटला आणि आजन्म ब्रह्मचर्याची भयानक (भीष्म) प्रतिज्ञा त्याने केली त्यावर खुश होऊन देवानी किंवा त्याच्या वडिलाने (इथे माझे जरा कन्फ्युजन आहे नक्की वर कोणी दिला) त्याला इच्छामरणाचा वर दिला (भीष्माला हवे तेंव्हाच त्याचा मृत्यू होईल). या वराचा फायदा भीष्माला पराशुरामाबरोबर झालेल्या युद्धात झाला, तसेच शेवटी शरशय्येवर भीष्म पडला तेंव्हा दक्षिणायन सुरु होते, भीष्माला उत्तरायणातच प्राणोत्क्रमणाची इच्छा होती, त्यामुळे परत उत्तरायण सुरु होईपर्यंत इच्छामरणाच्या वरामुळे त्याचे लगेच प्राणोत्क्रमण झाले नाही.

तत्सत's picture

19 Apr 2012 - 4:42 pm | तत्सत

वर शन्तनुनेच दिला. परशुरामाबरोबर झालेल्या युद्धात ह्याचा कसा फायदा झाला हे जाणुन घ्यायला आवडेल. परशुराम चिरन्जिवी आणि भीष्म इच्छामरण प्राप्त झालेला असल्यामुळे नक्की काय झाले असेल? An Irresistible Force Meets An Immovable Object...

कोणता बाप आपल्या सद्गुणी मुलाला असा वर देईल? कामी पित्याने दिलेले हे वरदान पुढे सर्वनाशाला कारणीभूत झाले. अर्थात पुढे जे घडले त्याला भीष्म तेवढाच जबाबदार होता. आपण कोणत्या कारणाने प्रतिज्ञा केली आणि आता काय वाढुन ठेवले आहे ह्याचा सारासार विचार त्याने केला नाहि आणि 'सद्गुण-विक्रुती' च्या आहारी तो गेला. वसिष्ठ, देवगुरू बृहस्पति, असूरगुरू शुक्राचार्य व परशुराम यांच्याकडून शिक्षण घेतले ते फारसे उपयोगी पडले नाही असे दिसते.

शिल्पा ब's picture

19 Apr 2012 - 11:18 pm | शिल्पा ब

हे म्हणजे कचरा डोळ्यात अन फुंकर कानात झालं की!!

इच्छामरण म्हणजे काय? इच्छा होईल तेंव्हा मरण हे तर मलाही समजतय अन थोडफार महाभारत मलाही माहीती आहे. आता इच्छा होईल तेंव्हा मरण हे कसं शक्य आहे या अर्थी प्रश्न आहे.

प्रचेतस's picture

19 Apr 2012 - 4:59 pm | प्रचेतस

महाभारत (टीव्ही) मधे तिनही मुले विचीत्रविर्याची दाखवलीत पराशराची नाहीत. मुळ महाभारत वगैरे काय म्हणतं?

त्याकाळच्या रूढींप्रमाणे राजाला संतती होत नसलीस त्यास पुत्रप्राप्तीचा अधिकार नियोगाद्वारे प्राप्त होत असे. ही पद्धत जगन्मान्य होती. नियोग शक्यतो दिराकडून केला जात असे. नियोगाद्वारे प्राप्त झालेली संतती राजाची संतती म्हणूनच ओळखली जात असे. तसे जर नसते तर तो नियोग नसून मग स्वैराचार ठरला असता.

प्रजेला नियोगाचा अधिकार होता का याबद्दल मात्र माहीत नाही.

मृत्युन्जय's picture

20 Apr 2012 - 10:07 am | मृत्युन्जय

नियोगाचा अधिकार सर्वांना होता. संतती शिवाय जर एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याला मोक्ष मिळत नाही हा समज होता. त्यामुळे नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती ही समाजमान्य पद्धती होती.

पुत्रप्राप्त्यी नसल्यामुळे पांडु कुंतीला काय म्हणातो बघा:

The wise expounders of the eternal religion declare that a son, O Kunti, is the cause of virtuous fame in the three
worlds. It is said that sacrifices, charitable gifts, ascetic penances, and vows observed most carefully, do not confer religious merit on a sonless man.

नियोगाबद्दल महाभारतकालीन विचार असे होते:

The religious institutes mention six kinds of sons that are heirs and kinsmen, and six other kinds that are not heirs but kinsmen. I shall speak of them presently. They are:

1st, the son begotten by one's own self upon his wedded wife;
2nd, the son begotten upon one's wife by an accomplished person from motives of kindness;
3rd, the son begotten upon one's wife by a person for pecuniary consideration;
4th, the son begotten upon the wife after the husband's death;
5th, the maiden-born son;
6th, the son born of an unchaste wife;
7th, the son given;
8th, the son bought for a consideration;
9th, the son self-given;
10th, the son received with a pregnant bride;
11th, the brother's son; and
12th, the son begotten upon a wife of lower caste.

On failure of offspring of a prior class, the mother should desire to have offspring of the next class.

In times of distress, men solicit offspring from accomplished younger brothers.

The self-born Manu hath said that men failing to have legitimate offspring of their own may have offspring begotten upon their wives by others, for sons confer the highest religious merit.

दुर्योधन आणि त्याचे ९९ भाऊ पहिल्या वर्गात मोडतात
पांडव दुसर्‍या वर्गात
तिसर्‍या वर्गाचे उदाहरण मला माहिती नाही
धृतराष्ट्र, विदुर आणि पांडु चौथ्या वर्गात मोडतात
कर्ण पाचव्या वर्गात मोडतो
सहाव्याचे उदाहरण मला माहिती नाही
७ व्या आणि नवव्या मधला फरक मला कळलेला नाही पण बभ्रुवाहन यापैकी एका गटात मोडतो
८ चे उदाहरण मला माहिती नाही
१० व्याचे उदाहरण मला माहिती नाही
११ ची उदाहरणे देण्याची अर्थातच गरजच नाही. भावाची मुले पण स्वतःची मुले मानली गेली आहेत
१२ चे उदाहरण म्हणजे युयुत्सु आणि विदुर

क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांची संतती देखील निम्न दर्जाची मानली जायची. त्यामुळे शुक्राचार्यांनी ययातिला आशिर्वाद दिला होता की त्याची मुले (देवयानीकडुन झालेली) निम्न दर्जाची मानली जाणार नाहित.

असो. खुपच विषयांतर झाले.

अगदी एक एक व्यक्तिरेखा धरुन त्यांचा सुरुवातीपासुन शेवटपर्यंतचा महाभारतातला सहभाग व्यवस्थित देता आहात, अन तो संग्राह्य देखिल आहे.
पण
पुन्हा पण आलाच, मला एक सांगा स्वतःच्या भावा साठी म्हणजे सत्यवतीच्या मुला साठी अंबेला नाकारताना भिष्मान काय कारण दिल? हेच ना की अंबेन दुसर्‍याला वरल्याने मी तुझा स्विकार करु शकत नाही? मग त्याच भिष्माने स्वतःच्या पित्या साठी लग्ना पुर्वी पुत्र असलेली सत्यवती कशी काय स्विकारली?

अन आता तुमची निवेदनात्मक टिपः द्रौपदी हस्तिनापुरी एकाच घरात (महालात म्हणा)राहिली नाही का? आणल होत स्वतः धृतराष्ट्रान लाक्षागृहा नंतर, स्विकार केला होता पाचही पांडवांचा, अन तिथुनच वाटणी म्हणुन खांडववनाचा भाग सुद्धा दिला होता. हा मान्य आहे की कृष्ण पलिकडच्या आळीत रहात नव्हता, पण तो एकच सखा होता तिचा ज्याच्या समोर ती आपल शल्य उघड करु शकत होती.
अस म्हणतात की या जगात अशी एकही व्यक्तीरेखा नाही जिच वर्णन महाभारतात नाही. त्यामुळे आम्ही सांगत असलेया कथा अगदी पार चाळकर्‍यांच्या (कौरव पांडव चाळकरी होते या अर्थी) पायरीला नेउन बसवण्याच्या नक्किच नाहित. स्त्री स्वभावानुसार खोचुन बोलण , अन ते ही ज्या काळी अनेक भार्या करण्याची राजघराण्याची पद्धत होती त्या काळी पाच पति असणारी पांचाली , हे असणारच.
अगदी तुमच्या म्हणण्या नुसार महाभारत हे काव्य असेल तर अश्या मनुष्य स्वभावाला धरुन विणलेल्या कथांनी उलट ते समृद्ध होइल.

स्पष्ट बोलते मी राग नसावा.

__/\__
अपर्णा

मृत्युन्जय's picture

19 Apr 2012 - 4:24 pm | मृत्युन्जय

पुन्हा पण आलाच, मला एक सांगा स्वतःच्या भावा साठी म्हणजे सत्यवतीच्या मुला साठी अंबेला नाकारताना भिष्मान काय कारण दिल? हेच ना की अंबेन दुसर्‍याला वरल्याने मी तुझा स्विकार करु शकत नाही? मग त्याच भिष्माने स्वतःच्या पित्या साठी लग्ना पुर्वी पुत्र असलेली सत्यवती कशी काय स्विकारली?

भीष्माची तिचे विचित्रविर्याशी लग्न लाउन द्यायची तयारी होती. पण तिला शाल्वाशीच लग्न करायचे होते. म्हणुन भीष्मांनी तिला सन्मानाने शाल्वाकडे पाठवुन दिले. शाल्वाने मात्र तिला दुसर्‍याने (म्हणजे भीष्माने) जिंकले असल्या कारणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. (शाल्वाला भीष्मांनी युद्धात हरवले होते आणि मगच तिघींचे अपहरण केले).

परत आल्यावर अंबेने भीष्मांशीच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला विचित्रवीर्याशी लग्न करायचे नव्हते. आमरण ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केलेली असल्याने भीष्मांनी नकार दिला.

यानंतर अंबेने बर्‍याच राजांकडे मदत मागली भीष्मांना धडा शिकवण्यासाठी पण भीष्मांच्या भितीने तिला कोणीच मदत करेना. अखेर तिने परशुरामांकडे मदत मागितली. परशुरामांनी भीष्माशी युद्ध केले. ते २३ दिवस चालले. पण अखेर भीष्मांनी पार्श्वपा अस्त्र काढले. त्याचे उत्तर परसुरामांकडे नव्हते. त्या वेळेस नारदांनी मध्यस्थी करुन भीष्मांना अस्त्र मागे घेण्यास सांगितले. पण भीष्मांचा विजय झाला आहे हे बघुन परशुरामांनी अंबेला त्याऊप्पर मदत करण्यास असमर्थता दर्शवली.

अखेर अंबेने शिवाची आराधना केली आणि भीष्मांचा वध करण्याचे वरदान मागितले. भीष्मांना इच्छामरणाचे वरदान आहे हे जाणुन शिवाने तिला असे वरदान दिले की पुढच्या जन्मात तु भीष्मांच्या मृत्युला कारणीभूत ठरशील.

प्रचेतस's picture

19 Apr 2012 - 4:53 pm | प्रचेतस

हेच म्हणायला आलो होतो.
भीष्माचे ते अस्त्र पार्श्वपा नसून प्रस्वाप आहे.

राहता राहिला सत्यवतीचा मुद्दा, तर पराशराने सत्यवतीला तुझे कौमार्य अबाधित राहील असाच वर दिला होता.

स्पंदना's picture

19 Apr 2012 - 5:10 pm | स्पंदना

>>राहता राहिला सत्यवतीचा मुद्दा, तर पराशराने सत्यवतीला तुझे कौमार्य अबाधित राहील असाच वर दिला होत>>>>
पराशराला तिचा मोह झाला, अन सुगंधाच्या बदल्यात सत्यवती/मस्त्यगंधा वश ही झाली , मग कौमार्य अबाधित कस राहिल? ती काय कुंती होती असा चलाखपणा दाखवाय्ला. माझ म्हणन एव्हढच की हे जे सार मंत्रचळ आहे ते मोठ्या नामवंत घराण्यांना लागु होत होत, कोळ्याची पोर सरळ सरळ व्यवहार करुन मोकळी होणार ना? अन खर तेच सांगणार नाही का?
आता खर सांगायच तर मी जेम्व्हा महाभारताच्या या (म्हणजे मस्त्यगंधा प्रकरण) भागात जाते तेंव्हापासुनच हे खरा बाप सोडुन भलत्याची पोर राज्यावर बसवायची पद्धत सुरु झालेली निदान मला तरी जाणवते.

स्पंदना's picture

19 Apr 2012 - 4:59 pm | स्पंदना

आठवल. तुम्ही मला युद्धात जिंकुन माझ हरण केल्या मुळे तुम्हीच माझ पाणिग्रहण करा असा हट्ट तिने धरला होता. बरोबर.

सुजित पवार's picture

19 Apr 2012 - 2:23 pm | सुजित पवार

खुपच छान.... आधि वाचले आहे, पन आता परत वाचताना मजा येते आहे

प्रसाद प्रसाद's picture

19 Apr 2012 - 3:16 pm | प्रसाद प्रसाद

भीष्माचे मूळ नाव भीष्म नसून देवव्रत असे होते. आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची अवघड/भयानक म्हणजेच भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे त्यांचे नाव भीष्म झाले.

आता श्री शरद म्हणतात त्याप्रमाणे सांगोवांगीची गोष्ट (म्हणजे इंग्लिश भाषांतरीत महाभारतात मला काही ही गोष्ट सापडली नाही) - तरुणपणी देवव्रताने (भीष्म) एकदा सहज चाळा म्हणून जाता जाता बाणाच्या टोकाने एक सरडा उडविला तो नेमका कुंपणावर जाऊन पडला आणि त्याचाच परिपाक म्हणजे मृत्युसमयी भीष्मालाही शरशय्येवर पडावे लागले. (आता इथे परत शर शब्दावर श्लेष आला शर म्हणजे बाण इथे बी. आर. चोप्राचे महाभारत डोळ्यासमोर आणावे आणि दुसरा अर्थ शर म्हणजे एक प्रकारचे शर नावाचे गवत. अभ्यासकांच्या मते दुसरा अर्थ जास्त योग्य असावा.)

तत्सत's picture

19 Apr 2012 - 5:45 pm | तत्सत

अणिमान्डव्य ऋषिची कथा काहीशी अशीच आहे. बालपणी केलेल्या अपराधाबद्दल त्याला मोठेपणी, तो निरपराध असतानाही, जीवघेण्या यातना सहन कराव्या लागल्या. त्याने यमाला त्याचा जाब विचारला आणि जेव्हा यमाने बालपणी केलेल्या अपराधाची त्याला आठवण दिली तेव्हा अणिमान्डव्याने यमाला शाप दिला. ह्या शापाचा परिणाम म्हणुन यमाला शुद्र स्त्रीच्या पोटी विदुराचा जन्म घ्यावा लागला.

५० फक्त's picture

19 Apr 2012 - 3:17 pm | ५० फक्त

अशक्य खपलो आहे, कुणाकडे वंशवृक्ष आहे का महाभारताचा, कोण औरस कोण अनौरस, कोण नियोगी कोण बिन उपयोगी काही कळेना झालंय.

निम्म्यापेक्षा जास्त नियोगानं जन्मले तर ही अवस्था आहे, सगळे रुढ पद्धतीनं जन्मले असते तर ही वेळ आली नसती.

इरावती कर्व्यांच्या युगांत चे परिशिष्ट पहा. त्यात दिलाय तो बर्‍यापैकी डीटेल वंशवृक्ष.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2012 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

इथे पुरु पासून परिक्षितापर्यंतची वंशवेल आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2012 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

आज तिसर्‍या भागाला सुरवात करण्याआधी एक गोष्ट सांगु इच्छितो. प्रतिसादात अनेकजण निरनिराळ्या गोष्टी देत असतात. काय होते, रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथावर लुब्ध होऊन बरेच लेखक त्या ग्रंथात नसलेल्या गोष्टींची भर घालत असतात. कीर्तनकार, पुराणिक, कादंबरीकार व ग्रामिण लेखक यांचा असल्या गोष्टींवर भर असतो व काही कथा लोकप्रियही असतात. उदा. जांभुळआख्यान. पण अश्या "ग्राम्य" गोष्टींमुळे महाभारतातील पात्रांवर अन्याय होतो. व अशीही समजुत होणे शक्य आहे की असे खरेच महाभारतात आहे.. प्रतिसादकर्त्यांच्या बहुश्रुतपणाबद्दल आदर बाळगून माझी नम्र विनंती आहे की हे मनोरंजक किस्से सांगतांना जर ही गोष्ट महाभारतात आहेच याची खात्री नसेल तर तसा उल्लेख केल्यास बरे होईल.

माझ्यामते आजवर ज्यांनी ज्यांनी अशा काही कथा प्रतिसादात दिल्या, त्यांनी त्या कुठे वाचल्या, ऐकल्या अथवा त्या दंतकथा, लोककथा आहेत का ह्याचा व्यवस्थीत उल्लेख केल्याचे मला तरी स्मरते.

खरेतर अशा धाग्यांमुळे कित्येक लोककथा / दंतकथा मग त्या खर्‍या असोत वा कल्पित ह्या लोकांसमोर येत आहेत ह्यात आनंद नाही काय ?

बाकी विस्तारभयाच्या कल्पनेने हा लेख चक्क उरकल्या सारखा वाटला. तुमच्याकडून अजून भरपूर वाचायची इच्छा आहे.

इरसाल's picture

19 Apr 2012 - 3:34 pm | इरसाल

भीष्म म्हणताखेरीज डोळ्यासमोर "शक्तिमान" श्री.मुकेश खन्ना उभे रहातात.

प्रचेतस's picture

19 Apr 2012 - 5:01 pm | प्रचेतस

पुन्हा एकदा उत्तम व्यक्तिचित्रण.

तिमा's picture

19 Apr 2012 - 6:50 pm | तिमा

रामायण व महाभारत वाचताना मला लहानपणापासून एक शंका नेहमीच सतावते. दुसर्‍याला वर किंवा शाप्/उ:शाप देण्यासाठी अंगी कोणते गुण आवश्यक असत ? कारण जसे ऋषी वर वा शाप देत असत तसे राजे कसा वर देऊ शकतात ते अजूनही नीटसे कळले नाहीये.

पैसा's picture

19 Apr 2012 - 7:08 pm | पैसा

त्याच्या निमित्ताने घडणार्‍या चर्चासुद्धा अगदी वाचायलाच पाहिजे अशा! धन्यवाद शरद!

मदनबाण's picture

20 Apr 2012 - 12:40 pm | मदनबाण

वाचतोय !