लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी,
उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी ।
सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे
मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'?
चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती
(मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती ! )
पाय पाहुनी निवडुन घेतो अंथरूण माझ्यापुरते
बायकोस मी गजरा घेतो, सुख नाही मज यापरते ।
बिचकत जातो मी रस्त्याने, जिवात नसतो जीव कधी
कधी स्वतःवर हसतो, रडतो, आणिक करतो कीव कधी ।
तरी उद्याची थोडी आशा माझ्या हृदयी मिणमिणते
आणि देवळामधली घंटा माझ्या कानी किणकिणते ।
सामान्याला, जगण्या-मरण्यामधले अंतर- आयुष्य...
उरते कोठे सामान्याच्या मरणानंतर आयुष्य?
- चैतन्य
प्रतिक्रिया
19 Mar 2012 - 7:42 pm | यकु
कुर्निसात!
19 Mar 2012 - 8:03 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच फार छान!
19 Mar 2012 - 8:14 pm | हारुन शेख
वाह !! खूपच छान. कविता जमून आली आहे.
केशवसुतांचे अश्याच भावार्थाचे हे कडवे आठवले.
' आम्ही नव्हतो अमुचे बाप,
उगाच का मग पश्चाताप,
आसवे न आणू नयनी ,
मरून जाऊ एक दिनी '
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
19 Mar 2012 - 8:21 pm | गणेशा
सुंदर
19 Mar 2012 - 8:23 pm | निशदे
वाह चैतन्य....... झकासच.........
एकदम "मी मोर्चा नेला नाही" ची आठवण झाली........ :)
20 Mar 2012 - 11:32 am | चैतन्य दीक्षित
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
हारुन, केशवसुतांच्या ओळी काय भन्नाट आहेत. इथे दिल्याबद्दल धन्यवाद :)
20 Mar 2012 - 12:31 pm | प्रीत-मोहर
मस्तच रे चैतन्य :)
कबिता अत्यंत आवडल्या गेली आहे.
26 Mar 2012 - 4:19 pm | मूकवाचक
मस्त कविता. आवडली.
26 Mar 2012 - 4:38 pm | मेघवेडा
आवडली कविता असा सामान्य प्रतिसाद देऊन मोकळा होणार नाही.
प्रत्येक ओळीमागील विचार सुरेख आहे. :)