स्वप्नांस शाप आहे............!

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
7 Mar 2012 - 12:27 pm

रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा
स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा

गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या
झाला सराव आता, अंधार साहण्याचा

या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा
चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा

नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी
आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा

गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे
श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा

लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

संध्या

शृंगारशांतरसगझल

प्रतिक्रिया

यकु's picture

7 Mar 2012 - 12:29 pm | यकु

क्लासऽ !
जमून गेलं.

प्रचेतस's picture

7 Mar 2012 - 12:29 pm | प्रचेतस

सुंदर.

किसन शिंदे's picture

7 Mar 2012 - 12:39 pm | किसन शिंदे

मस्तच कविता!

अन्नू's picture

7 Mar 2012 - 12:42 pm | अन्नू

मनाला स्पर्शून गेल्या ओळी.
हॅट्स ऑफ! अप्रतिम!

चाणक्य's picture

7 Mar 2012 - 1:31 pm | चाणक्य

एक नंबर झालीये. ओळ अन् ओळ आवडली

लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

सुरेखच...!

गवि's picture

7 Mar 2012 - 2:13 pm | गवि

अतिशय मस्त जमून आले आहे...

दर्जेदार.

उदय के'सागर's picture

7 Mar 2012 - 2:41 pm | उदय के'सागर

एक नंबर !!!

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा

ह्या ओळी तर केवळ अहाहा!!!!

("खेळ सावल्यांचा" ह्या चित्रपटातील "रात्रीस खेळ चाले" ह्या गाण्याच्या चालीवर एकदम जमुन येतंय तुमचं काव्य :) )....

"खेळ सावल्यांचा" ह्या चित्रपटातील "रात्रीस खेळ चाले" ह्या गाण्याच्या चालीवर एकदम जमुन येतंय तुमचं काव्य

खरंच की.. हे नव्हतं लक्षात आलं.. खास निरिक्षण भाऊ..

मयुरपिंपळे's picture

7 Mar 2012 - 3:38 pm | मयुरपिंपळे

अचुक गवि साहेब ;)

उदय के'सागर's picture

7 Mar 2012 - 3:46 pm | उदय के'सागर

धन्यवाद गवि भाऊ :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2012 - 2:42 pm | अत्रुप्त आत्मा

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा >>> ---^---भटांच्या एल्गार'ची अठवण झाली...

पियुशा's picture

7 Mar 2012 - 3:13 pm | पियुशा

छान कविता :)

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 3:16 pm | चौकटराजा

आधार चंद्रमेचा ? काय प्रकार आहे ? चंद्रमा असा मूळ शब्द असेल तर " मराठी व्याकरणा प्रमाणे "चंद्रम्याचा " असा शब्द हवा !
सागर खाली आहे चंद्रमा वर हे भौगोलिक सत्य नसले तरी मानवी जगातील सत्य आहे . मग सागर " चंद्रमेचा " आधार कसा घेईल ?
चंद्रमा या कल्पनेचा लाटांशी भरतीशी संबंध आहे त्या नुसार " चंद्रमेचा" खरे तर सागरास धाक असतो .जे न देखे रवी ते देखे कवि असेल
तरी ही कवि कल्पना अतीच झाली.

चंद्रास धाक आहे अवसेस भागण्याचा ?
या वाक्याचा अर्थ कळला नाही . भागणे म्हणजे दमणे चांदोबा चांदोबा भागलास का ? याचा अर्थ चांदोबा दमलास का असा आहे दडलास का
असा नाही. म्हणूनच लिंबोणीच्या झाडामागे लपलास का असे वेगळे वाक्य तिथे आहे . असे फार तर म्हणता आले असते
चंद्रास शाप आहे अवसेस लोपण्याचा

गंधाळल्या मिठीचा हा श्वास खास आहे ?

गंधाळल्या मिठीला श्वास लाभून देणारा प्रजापति कोण ? फार तर असे म्हणता येईल ० गंधाळल्या मिठीचा हा वास खास आहे

श्वासास भास आहे आवेग थांबण्याचा ??????
कसला भास ? त्याला तर खरा धाक हवा थांबण्याचा .

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा

लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

देहात..... .ही स्थिति विरहिणी ची वाटते

मग हाकेला ( अर्जुनाच्या , द्रौपदीच्या, सुभद्रेच्या ) धावणारा किसनदेव नव्हे तर सोळा सहस्त्र नारीना आपलीशी करणारा दिसतोय !

सांजसंध्या जी गदिमांचा सॉल्लीएड अभ्यास करावा असं मला वाटतं ब्वा !

काय जमून आलं आहे ?

ब्वॉर्र! नाही जमून आलं. झालं?
आम्ही आपलं आपापल्या परीन कौतुक केलं ब्वॉ.

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 3:58 pm | चौकटराजा

यशवंत राव अशी समजूत बाळाची काढतात . २०१३ ला ६० पुरी होणार !
जास्त माहिती साठी प्रोफाईल पहावी हे नम्र विनंति !

२०१३ ला ६० पुरी होणार !

ओक्के आजोबा.. चालू द्या तुमचे मग.

आणि हो, मी तुमची समजूत काढली नाही.

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 4:27 pm | चौकटराजा

फसलीच तान आहे , देउ कसा मी दाद ?
हो, उगीच " वाहवेचा नाही मलाच नाद !

सांजसंध्या जी
आता मीच आताच बसच्या तिकिटावर लिहिलेल्या या ओळी वाचा .
दोन्ही ओळीमधे संगीत , कळा , व रसिक यांचा संबंध कसा आणला आहे . व वास्तवा तील आहे की नाही. पिवळी हिरवळ किंवा हिरवी वैरण
अशी कवि कल्पना आपल्याला यात दिसते का ?
आता हिरवा आजोबा हीच कल्पना घ्या ना . " हिरवेपण , तरूण पणातील उत्साह या कल्पना एकदम कल्पना नाहीत .

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 4:30 pm | चौकटराजा

फसलीच तान आहे , देउ कसा मी दाद ?
हो, उगीच " वाहवेचा नाही मलाच नाद !

सांजसंध्या जी
आता मीच आताच बसच्या तिकिटावर लिहिलेल्या या ओळी वाचा .
दोन्ही ओळीमधे संगीत , कळा , व रसिक यांचा संबंध कसा आणला आहे . व वास्तवा तील आहे की नाही. पिवळी हिरवळ किंवा हिरवी वैरण
अशी कवि कल्पना आपल्याला यात दिसते का ?
आता हिरवा आजोबा हीच कल्पना घ्या ना . " हिरवेपण , तरूण पणातील उत्साह या कल्पना एकदम कल्पना नाहीत .

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 4:37 pm | सांजसंध्या

फसलीच तान आहे , देउ कसा मी दाद ?
हो, उगीच " वाहवेचा नाही मलाच नाद !

काका वृत्त गंडले आहे. शेर चांगला होईल असं वै.म.

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 5:12 pm | चौकटराजा

एकटाकी लिहिलेल्या ओळी वृत्तात फसणे स्वाभाविक आहे. कारण त्यात शब्दांशी झटापट नसते. वृत्त एकवेळ फसले तर चालेल पण काव्य
हा मुख्यत: अर्थ सांगण्याचा प्रकार आहे त्यामुळे अर्थ अधिक महत्वाचा !
उदा देतो -
शांता शेळके यानी लिहिले ले गीत
थंड गार ही हवा त्यात मंद गारवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा

खेबुक्डकरानी लिहिलेले
हवास तू हवास तू हवास मज तू हवास तू

पण हवास व हवा यात खेबूडकर जास्त बरोबर आहेत
कारण शांताबाईंचे व्याकरण वृत्त्तच्या आहारे गेल्याने चुकले आहे.

शैलेन्द्र's picture

7 Mar 2012 - 6:52 pm | शैलेन्द्र

"शांता शेळके यानी लिहिले ले गीत
थंड गार ही हवा त्यात मंद गारवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा

खेबुक्डकरानी लिहिलेले
हवास तू हवास तू हवास मज तू हवास तू

पण हवास व हवा यात खेबूडकर जास्त बरोबर आहेत
कारण शांताबाईंचे व्याकरण वृत्त्तच्या आहारे गेल्याने चुकले आहे."

का? तसही वृत्तात आणी शब्दात बसणार काव्य करण्यापेक्षा, मनात उसळणारे शब्द लीहिण जास्त चांगल..

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 8:37 pm | चौकटराजा

त्यासाठी तर पाडगावकरानी मुक्तछंद जवळ केला व यशस्वी पणे वापरला .
सलाम ही कविता

मयुरपिंपळे's picture

7 Mar 2012 - 3:47 pm | मयुरपिंपळे

वल्ली साहेब ह्यावर मार्गदर्शन सुरेख करतील ;)

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 4:34 pm | सांजसंध्या

तरी ही कवि कल्पना अतीच झाली.

चौरा काका
समुद्रातल्या खलाशांना ता-यांचा आधार म्हणजे काय असतं ?

देहात आग ही स्थिती विरहीणीची ???

श्वासास भास आहे आवेग थांबण्याचा ??????
कसला भास ? त्याला तर खरा धाक हवा थांबण्याचा . >>> तुमचं म्हणणं नाही समजले.

गदिमांचा सॉल्लीएड अभ्यास करावा
खरंच सूचना चांगली आहे. त्याने नुकसान काहीच नाही. काका तुम्ही कवितेकडे कसे पाहता ते एकदा कळाले कि मला तुमचे म्हणणे चटकन समजू शकेल असं मला वाटतं.

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 5:26 pm | चौकटराजा

समुद्रातल्या खलाशांना ता-यांचा आधार म्हणजे काय असतं ?
समुदातल्या खलाशानाच काय , मोठ्या वाळवंटातील प्रवाशानाही तार्‍यांचा आधार बौद्धिक असतो .उदा , ध्रुव उत्तर दिशा दाखवितो. ही कवि कल्पना नाही ते विज्ञान आहे.
मनातली आग ही सूडाची रागाची, द्वेषाची असते तर देहातली पोटाच्या भुकेची ( सहज म्हणतो आपण पोटात इथं आग पडलीय
दुसरी आग विषय वासनेची उदा,. अंगसे अंग लगाले सांसो मे है तूफान जलने लगी है काया जलने लगी हए जान ( ही विरहिणी ची अवस्था)
श्वासाचा संवंध लयीशी वेगाशी, अतः सुरू होण्याशी...... थांवण्याशी. श्वासाला अशी भिति ( धाक ) वाटते आपण थांबणार तर नाहीना ?
सुरेश भट हे ग्रेट आहेत पण गदिमा ग्रेटेस्ट !

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 5:30 pm | सांजसंध्या

खरडवहीत प्रतिसाद दिला आहे तो पहावा.

शैलेन्द्र's picture

7 Mar 2012 - 6:43 pm | शैलेन्द्र

काका..

कवीता समजुन देण्याचे क्लास काढता का?

:)

बाकी मला तरी आवडली, कवीता/गझल्/मुक्तक जे काय आहे ते..

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 8:34 pm | चौकटराजा

सचिन तेंडूलकर यांची ग्रीप चुकीची आजही आहे. पण रमाकांत आचरेकरानी ती तशीच असू दे असा सल्ला त्याला दिला होता म्हणे
पुअर फुटवर्क असणारा वीरू दोन त्रिशतके काढू शकतो . हे झाले चमत्कारी पुरूष !
आपले सर्वांचे असे नाही हो !
कविची ग्रीप ( म्हणजे चांगल्या कवितेची संकल्पनाच) पहिल्यापासून चुकीची होउ नये म्हणून हा उपदव्याप व आनंद ही !

एक प्रसिद्ध कवि चे एक काव्य पहा -
या ह्रदयीच्या जळवंतीशी नीळी ओढणी तुला हवी का
रुप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला

वरील दोन ओळींचा एका दमात अर्थ सांगाल का मला ?

आता या कवीच्या दोन ओळी पहा
वाईट तितुके इथे पोसले , भले पणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार

कोणत्या कवीच्या ओळी पटकन अर्थवाही होतात ते सांगा बर बुवा !

वपाडाव's picture

7 Mar 2012 - 8:43 pm | वपाडाव

आम्ही पडलो मंदबुद्धी... तुम्ही 'रसग्रहणाचे' धागेच का नाही टाकत म्हणजे असले १० प्रतिसाद देण्याऐवजी एकच यथासांग धागा काढुन 'उसमे सबकुछ बता देने का'...
नाही ही टवाळी नाही हे एक प्रपोजल आहे.

खेळाडू १०० टक्के प्लान घेऊन कधीच खेळू शकत नाही गोलंदाज जसा फुलेल तसा तो ही उमलतो.

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 4:22 pm | सांजसंध्या

आपल्या सर्वांचे मनापासून आभार या जंगी कौतुकाबद्दल

गवि- आनंदकंद वृत्त आहे हे. केव्हांतरी पहाटे पासून अनेक गाणी याच वृत्तात आहे.

चौराकाका.. धन्यवाद आपल्या मतांबद्दल. सूचनांचा आदर आहे. पण ही एक गझल असल्याने काफिया आणि रदीफ सांभाळावा लागेल. व्याकरणाबद्दलच्या सूचनेचा विचार करत आहे.

चाणक्य's picture

9 Mar 2012 - 2:13 pm | चाणक्य

संध्याजी, मला ही गझल फार आवडली. पण तुम्ही म्हणताय तसं यात रदीफ नाहीये. हां, काफिया आणि अलामत मात्र तुम्ही नक्कीच सांभाळली आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2012 - 4:31 pm | परिकथेतील राजकुमार

मुलीनी कविता केली असल्याने :- वा: ! साला काय मस्त जमली आहे. शब्दा शब्दात एक धुंदी आहे.

स्वतःचे ज्ञान दाखवायचे असल्याने :- पण काहितरी मिसिंग वाटते आहे बॉ कवितेत. थोडी वृत्तात मार खाते आहे.

स्मिता.'s picture

7 Mar 2012 - 5:32 pm | स्मिता.

सांजसंध्या, गजल आवडली... मला जास्त बारकावे कळत नाहीत पण वाचताना छान वाटली.

रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा
स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा

हा पहिलाच शेर खूप आवडला.

राघव's picture

7 Mar 2012 - 6:28 pm | राघव

पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा
ही ओळ विशेष आवडली. पु. ले. शु. :)

राघव

चिम् चिम् मामा's picture

7 Mar 2012 - 6:45 pm | चिम् चिम् मामा

लिहाव्या अश्याच तुम्ही, छान-छान कविता...
वाहुदे तुम्ह्च्याच कविंतेनी , मि.पा वरील कवितेंची सरिता....!

लै झाक....:-)

प्रचेतस's picture

7 Mar 2012 - 6:48 pm | प्रचेतस

तुम्ही मात्र नका लिहू हो मनाचे श्लोक...
वाचताना आम्हालाच होतोय मोठाच शोक.....!

अमितसांगली's picture

7 Mar 2012 - 7:38 pm | अमितसांगली

काही ओळी खूपच भावतात मनाला ....

"अवसेस भागण्याचा" याचा अर्थ काय ?

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 7:46 pm | सांजसंध्या

आभार सर्वांचे :)

अमित ... चांदोबा भागलास का या अर्थी .. दमलेला चांदोबा. लोपण्याचा हा शब्दही चालला असता. दमून भागून निघून जातो असं काहीसं.

गणेशा's picture

7 Mar 2012 - 8:11 pm | गणेशा

मस्त लिहिले आहे .. आवडले.

पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा

हि ओळ खुपच छान. आवडली..

पहिला मतला छान
त्याप्रमाणे लिहिल्यास

गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या
झाला सराव त्यांना, अंधार साहण्याचा
हे जास्त योग्य वाटते आहे का ?

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 8:42 pm | चौकटराजा

आपल्या ओळी परफेक्ट मीटर बरोबर अर्थ बरोबर ! वाह ! क्या बात है यार ! कुर्बान !

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 8:22 pm | सांजसंध्या

शेरांमधे एक मध्यवर्ती थीम आहे. तीत "त्यांना " अभिप्रेत नाही. त्यांना म्हणजे चांदण्यांना असं वाटेल. इथे नायिकेला असंच म्हणायचंय

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 8:45 pm | चौकटराजा

त्याना ऐवजी तिजला असा शब्द वापरला तर ?

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 9:55 pm | चौकटराजा

गजल पुरी प्रथम पुरूषी एकवचनी असेल तर तिजला च्या ऐवजी मजला घ्या भौ !

वपाडाव's picture

7 Mar 2012 - 8:25 pm | वपाडाव

आग को पाणी का डर लगे रहेना चाहिए... और यहां तो, पाणीपरही इल्जाम है आग लगाने का...
वाह !! क्या बनाया है... खुबसुरत, माशाअल्लाह !!!

गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे
श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा

खूपच सुंदर ....

खूप खूप आवडलं ..लिहित रहा.:)

गणेशा's picture

7 Mar 2012 - 9:29 pm | गणेशा

@ चौकट राजा ..
धन्यवाद.. पण गझलेच्या बाबतीत मी ढ आहे. सुरेश भटांची पुस्तके आणि त्यांच्या गझल्स या पलिकडे उडी नाही.

तरीही तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होता ते आवडले होते. सांगितले नव्हते.

@ सांजसंध्या :
आपण छान लिहिले आहे, नक्कीच आवडले आहे.
पण जर थीम म्हणुन म्हणाल तर कदाचीत मी वेगळी घेतली होती.

सांगतो ..
( आणि एक मनातील., आपल्या कवितेबद्दल इतके बोलणे येथे होत आहे हे पाहुन छान वाटले, सर्व कवितांचे पण चांगले वाईट बोलले गेले पाहिजे.. प्रामाणिक लेखकाला/कविला त्यातुन बरेच शिकता ही येते आणि उत्साहाने पुन्हा लिहिता येते. )

एका वाचकाने घेतलेली थीम : (गझल पेक्षा काव्य कसे ह्यावरुन बोलतोय, गझल ज्ञान खुप कमी आहे)

पहिला मतला असे सांगतो आहे की.

रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा
स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा

म्हणजे कवयित्रीस असे सांगावयाचे आहे की, एक जी पहिली गोष्ट आहे, तिला दूसर्या गोष्टीची आवड आहे. पण ती जी दूसरी गोष्ट आहे तीला ही स्वताचे स्वातंत्र्य नाही..
उदा. रात्रीला स्वप्नांत राहण्याचा छंद आहे, पण स्वप्नांना शाप आहेच की .
येथे रात्र कवयत्रीची जागा घेतो.

२.

या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा
चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा

येथे ही सागराला चंद्रमा आधार वाटतो आहे, पण कवयत्री म्हणते चंद्राला ही धाक आहेच की.
येथे कवयत्री सागरासम आहे.

पाण हे असे वाचत गेल्यास काही शेरा मध्ये जो पहिला ऑब्जेक्ट आलाय त्या एवजी स्थीती आली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे कवयत्री तेथे डायरेक्ट आल्यासारखे वाटते
उदा.

३.

गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे
श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा

कवयत्रीचला गंधाळलेल्या मिठीत, श्वासांची ओढ आहे, जवळीक आहे.
पण श्वासांना भिती वाटते आहे, संपण्याची.

४.

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा

पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा.
हि ओळ ह्या संपुर्ण काव्यातील खरेच शोभा आहे.
पण थीम म्हणाल तर पहिल्या ओळीने तिला सार्थकी लावले नाही.

देहात आग आहे, येथे कवयत्रीचय देहात आग आहे. तिला जवळीक हवी आहे, ती आग तृप्त करण्यासाठी तीला प्रश्न पडला आहे ( येथे तीला स्पष्ट सांगता आले पाहिजे होते तसे होत नाही
त्यामुळे विझवण्यासाठी पाणी असते , म्हणुन दूसर्या ओळीत पाण्यावर ही आरोप आहे हे सुंदर लिहिले आहे.

गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या
झाला सराव आता, अंधार साहण्याचा

वरील पहिल्या २ शेरांच्या थीम वरुन ,
चांदण्यांची रात्र ही पहिली, दूसरी आवड असणारी गोष्ट म्हणजे प्रकाशामध्ये ओतप्रोत न्हावून निघणे..
म्हणुन येथे मी रात्र म्हणजे कवयत्री ची जागा घेतले ..

समजा असे घेवुन तुम्ही हे कडवे वाचा
गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या
झाला सराव त्यांना, अंधार साहण्याचा

म्हणजे ज्या रात्री ही कधी चांदण्याच्या शितल प्रकाशात न्हाहुन निघत होत्या, त्या ही आता सरावाने काळोखात राहण्यास शिकल्या आहेत.
म्हणजेच कवयत्री/नायिका असे म्हणते आहे, सख्या तुझ्या सवे पाहिले मी जग सारे. आता सराव मजला, एकटे राहण्याचा.

याही पुढे जावून

लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

तुम्ही जे सांजसंध्या नाव घेतले आहे, शेवटच्या शेरामध्ये, तेथे कृष्णा ऐवजी तुम्ही सूर्य घेवुन पहा.
सांज संध्या, रात्र, रजनी आणि त्यास हाक द्यायला सूर्यास बंध नाही.
हे जास्त योग्य वाटते आहे.

चुकभुल देणे घेणे.
पुढील लिखानास शुभेच्छा !

आणि एक मत.
चौकट राजा म्हणतात तसे, वृत्त बर्याचदा थीम ला धक्क पोहचवु पाहत असतात..
आपल्या शब्दांशी प्रतारणा कवीने करुच नये. असे मनोमन वाटते.
जे भाव तेच शब्द मनाला जास्त जिव्हाळा देतात.
तरीही गझलेंच्या प्रेमात मन हरवते ही कबुली.

गणेशा
खूप छान समजावल्यात ओळि ..
शिकन्यासारख बरच असत अश्या चर्चेतुन .

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 10:07 pm | चौकटराजा

सांजसंध्या यानी विकसलेला फॉर्मॅट समजला . लई ब्येस हाय ! ज्यावर अवंलबून रहावे त्यालाही मर्यादा , संकटे आहेत हा तो फोरमॅट .
ज्या प्रमाणे आनंद बक्शीनी चिंगारी कोई भडके मधे एक फोरमॅट वापरला आहे . ज्याला मदत मागितली त्यानेच घात केला तर ? हा तो फॉरमॅट !

अन्नू's picture

7 Mar 2012 - 10:15 pm | अन्नू

आसंच स्पष्टीकरण आंम्ही करणार होतो, पण तुंम्ही बाजी मारलीत राव. काही आमच्या स्पष्टीकरणाच्या गोष्टी याच्याशी तंतोतंत जुळत्यात भौ! :)

फाल्गून पौर्णिमेला करपून पोळी गेली
मी एकटाच आहे हरवून होळी गेली

होळीस खेळ चाले , पोळीस लाटण्याचा
मधुमेही बेत करतो चोरून लाटण्याचा

मला कवीतेललं काही टिमकीच कळत नाही.
पण वरची संपुर्ण चरचा वाचली.

मधुमेही बेत करतो चोरून लाटण्याचा

चौकटकाका या शेवटच्या ओळीत द्विरुक्ती नाही का झाली?
(खोट काढत नाही.. मी या विषयात खरच 'ढ' आहे. )

चौकटराजा's picture

8 Mar 2012 - 4:46 pm | चौकटराजा

पहिले लाटणे म्हणजे चक्क पोळपाटावर लाटणे
मधुमेह्याला पुरण पोळी आवडते पण त्याला बायको फक्त चतकोर देते मग तो
बेत करतो रात्री उठून हळूच ड्ब्यातली पोळी लाटू

च्यायला आमचे काव्य म्ह्ण्हजे इतके दुर्बोध झाले क्क्क्का काय ?

हा हा हा काका तुम्ही फसलात. माझा प्रतिसाद नीट वाचा बर परत. मी केवळ दुसर्‍या ओळी बद्दलच बोलतोय.

मधुमेही बेत करतो चोरून लाटण्याचा
या दुसर्‍या ओळी बद्दल म्हणतोय. इथे लाटणे हा चोरणे या उद्दशानेच वापरलाय ना? मग परत वर चोरुन कशाला?
यालाच मी द्विरुक्ती म्हणालो. :)

असो जौ द्या.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 1:24 pm | चौकटराजा

मुक्त छंद असता ना तर .... तो खेळ कोण खेळत आहे याचा उल्ल्लेख केला असता पण राव इथे, ते वृत्ताचे नियम आडवे आले
अन आमची साधी भोळी कविता गुढगुंजनात जाऊन बसली.
आता सपष्ट करतो. बायकोला ती पोळी तशी नीट जमत नाहीये ! म्हणजे काही वेळा जास्तच पुरण आत जातंय काही वेळा पोळी करपतीय
काही वेळा जाडच लाटली जात आहे असा एकंदरीत तिचा लाटण्याचा खेळ चालू आहे म्हाराजा ! चांग भले !

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 10:06 pm | सांजसंध्या

गणेशा
आपल्यासारखे मोठे कवी इथे असताना स्वतःच्या कवितेविषयी खूप बोलावे लागणे हे अवघडल्यासारखे वाटतेय.

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा

आग विझवणारे जे पाणी आहे त्यावरच आरोप आहे जाळण्याचा. इथे पाणी म्हणजे पाणीच नव्हे हे लक्षात येईल. आणि तसा अर्थ ध्यानात घेतला नाही तरी फरक पडणार नाही.

गेल्या कितीक रात्री

आयुष्यात चांदण्यांच्या रात्री कित्येक आल्या होत्या. पण त्या नुसत्याच उलटून गेल्या. आता त्यातला अंधार उरलेला आहे तो साहण्याची सवय झाली आहे.

लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

ज्याचा धावा करायचा त्या कृष्णावर आज कसलेही बंधन नाही. थोडक्यात येईल कि न येईल सांगता येत नाही. शेवटच्या शेरात तखल्लूस घ्यायचे असताना सूर्य का घ्यायचा हे समजले नाही. जरा उलगडून सांगा. आपल्यासारख्या ज्येष्ठ गझलकारांकडून शिकता आले तर भाग्यच आहे.

अन्नू's picture

7 Mar 2012 - 10:21 pm | अन्नू

म्हणजे शेवटच्या ओळींचा आशय आंम्हाला बरोबर समजला होता तर!
पहील्यांदाच १०० पैकी १०० भेटले म्हणायचे.

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 10:27 pm | सांजसंध्या

अन्नुजी :)

( या स्मायली कशा टाकायच्या ?)

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 10:08 pm | सांजसंध्या

सर्वांचे मनापासून आभार.

चौकटराजा काका
आपली तयारी असल्यास आपण खरडवहीत चर्चा करूयात का ?

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 10:19 pm | चौकटराजा

ही चर्चा इथे का तर ती अनेक मनांना प्रेरित करते विचारासाठी ! नवीन कल्पना ,आणण्यासाठी. खरडवहीतून एकाचेच प्रबोधन होईल .

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 10:31 pm | सांजसंध्या

चौराकाका
हम्म..

थीमबद्दल - जे हवंय त्याचा काही न काही कारणाने लाभ घेता येत नाहीये किंवा हातातून निसटण्याची भीती आहे.

लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

या शब्दाचा फेरविचार करा

बुरा न मानो होलि है

काकांच मनावर घेऊ नका
खव त हाय म्हणतात.

...........................................................................................................................
''विरासत मै मिली है तु मुझे ऐ जिन्दगी
मै तुझे रेल कि पटरि पर कैसे लिटा दु ऐ जिन्दगी''

पैसा's picture

8 Mar 2012 - 8:03 am | पैसा

कवितेच्या निमित्ताने झालेली चर्चाही आवडली.

चैतन्य दीक्षित's picture

8 Mar 2012 - 12:25 pm | चैतन्य दीक्षित

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा

लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

हे विशेष आवडलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2012 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा
लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा

या ओळी तर लैच भारी.

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

8 Mar 2012 - 6:19 pm | सोत्रि

मला कवितेमधलं काही कळत नाही. छंद, मात्रा वगैरे मराठी शब्द आहेत इतकेच माहिती आहे.
शक्यतो मी ह्या विभागात फिरकत नाही. आलो तरी काही कळायला तर पाहिजे ना :)
पण ही गझल की कविता जे काही असेल ते, ह्यावर असलेल्या प्रतिसादांच्या संख्येवरून आत आलो.

पण चीज झाले, गणेशाचा प्रतिसाद, चौकटराजांनी केलेली समिक्षा आणि त्या अनुषंगाने झालेली चर्चा वाचून हाही विषय मनोरंजक आहे आणि ह्याची आवड जोपासण्यासारखी आहे असे वाटले म्हणून हा प्रतिसाद.

- (कविता शिकण्यासाठी गुरुजी मिळालेला) सोकाजी

अभिजीत राजवाडे's picture

9 Mar 2012 - 3:27 am | अभिजीत राजवाडे

काव्य आवडले.
पुढिल लेखनास शुभेच्छा.

मनमोकळि's picture

9 Mar 2012 - 5:58 am | मनमोकळि

धन्स

कविता आवडलि

मनमोकळि's picture

9 Mar 2012 - 6:06 am | मनमोकळि

महिला दिन २०१२ साजरा करु या..

सांजसंध्या's picture

9 Mar 2012 - 11:47 am | सांजसंध्या

गझल आवडल्याचे कळवणारे, समिक्षा करणारे, सूचना करणारे, विडंबन करणारे अशा सर्वांचेच मनःपूर्वक आभार... इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल काय बोलावं तेच कळत नाही :)