भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.
नुसती रुपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळीची फुले संध्यासमयी हिमवर्षावाप्रमाणे झाडाखाली सुगंधी सडा घालत असतात.बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे रसिकांना सुखद अनुभव असतो. तो मी मे महीन्यात अगदी वेळ काढून घेतला.
आमच्या घरापासून १५ मिनीटांच्या अंतरावे एक मठ आहे. त्या मठीच्या आवारात २-३ बकुळीची झाडे माझ्या लहानपणापासुन पाहते. मागिल मे महिन्यात लेकीला सुट्टी पडल्या पडल्या ही फुले वेचायला जायचा चंग मनाशी बांधला. ह्या फुलांचा सडा प्राजक्ताप्रमाणे सकाळीच पडत असावा असा माझा भ्रम होता म्हणून एक दिवस लवकरच उठून आम्ही सहपरीवार बकुळीच्या झाडाखाली गेलो. पण तिथे तेंव्हा अगदी ४-५ फुले पडलेली सापडली. झाडावर पाहीले तर झाड फुला, कळ्यांनी गच्च भरले होते.
तिथल्याच एका माणसाला विचारले असता त्याच्याकडून संध्याकाळी ही फुले पडतात असे समजले. मग आम्ही संध्याकाळी ही फुले वेचण्यासाठी गेलो तर नुकतीच सडा पडायला सुरुवात झाली होती. माझी मुलगी बालपणीचा फुले बकुळीची फुले वेचण्याचा पहिला अनुभव घेत होती तर मी मोठेपणी लहान होऊन हा अनुभव घेत होते आणि माझे मिस्टर आमच्या दोघींच्या आनंदात सामिल झाले. बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया अशा काहीतरी गाण्याच्या ओळी मनामध्ये आपोआप गुणगुणल्या जात होत्या.
पिक्चमध्य स्लोमोशन दिसते तशी बकुळीची फुले हळूवार येउन खाली पडत होती. एक फुल वेचल की बाजुला दुसर येऊन पडायच. आमच्या दोघींची घाई झाली होती फुले वेचण्याची. फुले वेचून आम्ही एका रुमालात ठेवली. १५-२० मिनीटे आम्ही ह्या सुगंधी पुष्पवृष्टीचा आनंद घेत होतो.
ती रुमालभर फुले घेउन आम्ही घरी आलो. घरी गेल्या गेल्या पहिला एका पानावर ती फुले ठेऊन फोटो काढले.
नंतर त्याचे गजरे करायला घेतले. बकुळीचा गजरा करणे म्हणजे अतिशय सोप्पे काम. एखाद्या नारळाच्या, ताडाच्या पातीचा धागा काढून किंवा बिनपानांचे जे वेल असतात अमरवेल सारखे त्यात बकूळीची फुले बिनासुईने ओवली जातात. कारण ह्या फुलाला आधीच होल असते. कदाचीत ह्या कारणामुळेच बकुळीला दुसरे नाव ओवळी असे पडले असावे. दोर्यात गुंफतानाच सुईची गरज भासते पटापट ओवण्यासाठी.
हा गजरा केसात माळल्यावर १-२ दिवस ह्याचा सुगंध केसात दरवळत असतो. कालांतराने ही फुले बदामी, बदामी वरून चॉकलेटी रंगाची होऊ लागतात पण बकुळीच्या सुगंधात मात्र काही कमतरता येत नाही. ह्या फुलांची अजुन एक गंमत म्हणजे ही फुले मावळली तरी पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात. पुर्वी वह्या-पुस्तकांच्या पानांमध्ये ही फुले ठेवण्याचा माझा छंद होता. ही फुले असलेल्या पुस्तकाची पाने उघडल्यावर त्यातुन सुगंध दरवळत असे.
बकुळीपासुन सुगंधी साबण, अत्तर तयार करतात. बकुळीच्या सालीचा उपयोग आयुर्वेदात दातांच्या उपचारासाठी करतात. बकुळीला फळे धरतात.
बकुळीच्या झाडाखाली कृष्ण बासरी वाजवून गौळणींना आकर्षीत करत असे असा महाभारतात बकुळीच्या झाडाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या बकुळीसोबर प्रेमभावनाही जुळलेल्या आहेत.
प्रतिक्रिया
21 Feb 2012 - 4:30 pm | पियुशा
सह्हिच !!!!
21 Feb 2012 - 4:37 pm | स्मिता.
आजकाल जागुताईचे धागे असेच काहितरी सुंदर वाचायला/बघायला मिळेल या आशेने उघडले जातात आणि ती पूर्णही होते :)
बकुळीच्या झाडाबद्दल आणि फुलांबद्दल आजपर्यंत कित्येक गाण्यांत आणि प्रेमकथांत वाचलं/ऐकलंय पण हे झाड बघण्याचं आणि त्या फुलांचा सुगंध घेण्याचं भाग्य काही मला अजून लाभलेलं नाही :(
21 Feb 2012 - 6:56 pm | वपाडाव
मलाही नाही लाभलं...
21 Feb 2012 - 4:40 pm | जागु
पियुषा धन्स.
स्मिता अजुन तु ह्या फुलांचा सुगंध घेतला नाहीस ? अरेरे. पण कसेतरी एकदा जमवच. कुठे राहतेस तु ?
21 Feb 2012 - 4:49 pm | स्वातीविशु
मस्त... बकुळीचा सुगंध वेड लावतो. :-) प्राजुतै खुपच भाग्यवान आहात तुम्ही. आम्हाला अशी झाडे शोधावी लागतात. :(
21 Feb 2012 - 4:52 pm | सानिकास्वप्निल
ओ त्या प्राजुतै नाही जागुतै आहेत :)
21 Feb 2012 - 4:59 pm | सानिकास्वप्निल
मला खुप आवडतात बकुळीचे गजरे :)
बकुळीचा सुगंध मनाला वेड लावणारा आहे :)
धन्यवाद
21 Feb 2012 - 6:55 pm | शुचि
:)
21 Feb 2012 - 4:57 pm | प्यारे१
फुलं म्हटलं की लगेच फुलं आली.(कोण म्हटलं रे ते धोतर्याची फुलं म्हणून ;) ?)
21 Feb 2012 - 5:33 pm | स्वातीविशु
माफ करा. बकुळ फुले बघून मिस्टेक झाली. ;)जागुतै म्हणायचे होते मला. :-)
अवांतर : जागुतैंचे सासरचे नाव प्राजक्ता असे वाचलेले आठ्वते आहे.
21 Feb 2012 - 6:08 pm | प्रचेतस
सुंदर फुले, सुंदर लिखाण.
21 Feb 2012 - 6:09 pm | अमृत
मस्त ताई नेहमीप्रमाणे छानच... बकुळीच्या फुलांबरोबर जास्त संबंध आला नाही मात्र याच निमीत्ताने 'बकाणी' च्या(उंच झाड आणि लांब दांडिची पांढरी) फुलांची आठवण झाली. आता टंकत असताना ऑफिसच्या खिडकीतून मस्त बहरलेली पांढर्या, पिवळ्या आणि गुलाबी चाफ्याची झाडे दिसतात आहेत. माझ्या घरीसुद्धा आईने चमेली, जाई, जुई, जास्वंद, दूध मोगरा, मोगरा, निशीगंधा, काटेकोरांटी, लीली, चक्री, नानाविध प्रकारचे गुलाब लावले आहेत. पूर्वी घरी एक बोगनवेल पण होता रोज त्याच्या कागदी फूलांचा लाल सडा अंगणात पडलेला असे. सहजच आठवण झाली.
अमृत
21 Feb 2012 - 6:56 pm | शुचि
बकाणी = बूच का? बूचाचे झाड आमच्या शाळेत होते :)
21 Feb 2012 - 8:19 pm | बहुगुणी
जागुताई: छान लेख आणि सुंदर प्रकाशचित्रे.
मूळ धाग्यापेक्षा थोडं अवांतर होतंय त्याबद्दल क्षमस्व! पण बुचाच्या फुलांची आठवण करून दिली म्हणूनः
बकाणी म्हणजे बूच का ते माहीत नाही, पण बुचाच्या झाडाला आकाशमोगरा असं सुंदर नाव आहे. त्याच फुलांना आकाशनिंब असंही म्हणतात. बकुळ किंवा मोगरा यांसारखाच अत्यंत वेडावणारा सुगंध असतो या फुलांना. आमच्या घरासमोरच्या मैदानात निदान २५ एक तरी ऊंचच ऊंच बुचाची झाडं होती, संपूर्ण आसमंत धुंदावून टाकायची त्यांची फुलं. रात्री उशीरा ही फुलं अक्षरशः शेकड्यांनी फुलायची आणि पहाट उठून पाहिलं तर झाडांखाली खच पडलेला असायचा!
(Indian Cork Tree - Millingtonia hortensis - या वृक्षाच्या बुंध्याच्या सालापासून बाटल्यांची बूचं तयार करतात. खालील प्रकाशचित्रे आंतर्जालावरून.)
22 Feb 2012 - 9:29 am | अमृत
मस्त वेडावून टाकणारा सुगंध असतो या फूलांचा. गेल्या आठवड्यात बस ने प्रवास करताना रस्त्याच्या दुतर्फा केशरी तांबडा पळस फुललेला दिसला वाह काय मस्त नजारा होता तो. विषयांतरा बद्द्ल क्षमस्व पण या फुलांच्या आठवणीसुद्धा गजर्याप्रमाणे एकमेकांत गुंफलेल्या आहेत मग एक आठवली की मग दुसरी मग........ असो.
शुची आणि बहुगुणी तुमचे आभार.
अमृत
22 Feb 2012 - 5:59 pm | पर्नल नेने मराठे
आय लव्ह बुच यार !!!
आम्च्या गावात पण बुचाची झाडे आहेत.
23 Feb 2012 - 12:46 pm | प्यारे१
>>>>आय लव्ह बुच यार !!!
ही चुचु पण ना!
आडवा होऊन होऊन लोळतोय.... ख्या ख्या ख्या ख्या!
23 Feb 2012 - 5:55 am | प्राजु
वाह बहुगुणी...! इचलकरंजीत डेक्कन मध्ये रहात होतो तेव्हा तिथे या फुलांचे झाड होते... वेड लावतो याचा सुगंध. अतिशय मादक सुगंध असतो याचा. याला बहुतेक अर्जूनाची फुले असेही म्हणतात. अर्जुन वृक्ष हाच असावा.
जागु, तुझा धागा बघूनच काहीतरी हटके असणार याची खात्री झाली आणि अपेक्षा पूर्ण झाली.
बकुळीची फुले ...! आम्ही शाळेत असताना पलिकडेच डिकेटीई मध्ये जायचो ही फुले गोळा करायला. मोठीच्या मोठी झाडे होती तिथे.. खूप फुले मिळायची.. मैत्रीणींसोबत ओट्यामध्ये गोळा केलेली फुलं घरी आणायची .. आणि मग त्या शाळेच्या स्कर्टला बकुळीचा वास लागलेला असायचा... खूप आठवणी जाग्या झाल्या...
सुंदर लेख.. आणि त्या केळीच्या पानावर खूप सुंदर दिसताहेत ही फुले.
सुंदर!! मन एकदम प्रफुल्लीत झालं.
23 Feb 2012 - 1:03 pm | विसुनाना
इचलकरंजीला ही चंदनबटव्याची (बुचाची?) झाडे खूप होती. आमच्या हायस्कुलातही होती. त्याचे फळ (चंदनबटवा) हेही बदामासारखे लागते. खरेतर अशोकापेक्षा हीच झाडे का लावत नाहीत याचे आश्चर्य वाटते. हे झाड चार मजल्यांपेक्षा उंच जाते, उंचावरून सावली धरते आणि सुवासिक फुलेही देते.
24 Feb 2012 - 2:18 pm | प्रास
हे वायलं अन् अर्जुन वायलं.....
अर्जुनाची फुलं अशी असत्यात बघा....
21 Feb 2012 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार
फुलराणी जागुतैचा विजय असो !
बाकी 'प्राजक्ता'ने 'बकुळी'ची फुले वेचणे ही कल्पनाच मनोहर आहे. ;)
21 Feb 2012 - 6:34 pm | वपाडाव
:)
21 Feb 2012 - 7:11 pm | अन्या दातार
मलाही बकुळीच्या फुलांचा वास आवडतो. पण सध्या चिमण्यांप्रमाणेच ही झाडेही शोधावी लागतात.
21 Feb 2012 - 7:17 pm | चित्रा
जागु, तुझे लेख म्हणजे माझ्यासाठी लहानपणात जाणे असते.
मी शाळेत असताना आम्ही मार्च-एप्रिलमध्ये अशी सकाळी सकाळी फुले वेचायला जात असू. अगदी लवकर नाही पण सकाळी सहाच्या सुमारास गेले की भरपूर फुले असत. मला माहिती नाही, तुम्ही गेलात तेव्हा सकाळी कशी नव्हती. आम्हाला उलट रात्रीच्या वेळी बकुळीकडे जाऊ नये असे सांगायचे, कारण माहिती नाही.
बकुळीच्या झाडाची लहानशी फळेही पडतात असे आठवते. तीही आम्ही खात असू.
21 Feb 2012 - 7:22 pm | वपाडाव
अश्या सुवासिक झाडांच्या बुंध्यांना साप विळखे मारुन बसतात, कदाचित हे कारण असेल. म्हणुन तुम्हाला तेव्हा संध्याकाळी झाडाजवळ जाण्यास मनाइ केली असेल... प्राजक्ताच्या झाडाला असे होते की नाही माहित नाही... पण माझ्या कालेजात एक चंदनाचे झाड होते, त्याच्या खाली चिक्कार वेळा 'काती' पडलेल्या पाहिल्या आहेत...
22 Feb 2012 - 9:34 am | अमृत
ही सापांची आवडती झाडं... बाबांनी घरी मदनमस्त लावला होता पण आई आणि इतरांनी तो तोडायला लावल्याचे आठवते... कारण हेच..
अमृत
21 Feb 2012 - 7:26 pm | अत्रुप्त आत्मा
पर्वाच मी बकुळीचे अगदी जेनुइन अत्तर मिळवले,आणी आज हा लेख...मी पण अम्च्या गावाला(लहान असताना) विहिरिवर हे झाड आहे,तिथे सुपारीच्या होडित ही भरपुर फुले वेचुन आणायचो...आई,मावशी यांना दिली की अखंड ५०पैसे मिळायचे...जागु तैंचे धागे म्हणजे आंम्हाला ''बालपणीच्या सुखाच्या काळात'' परत नेणारे झाले आहेत,बकुळीचा गोड सुगंध जितकं वेड लावणारा आहे,तितक्याच त्या अठवणीही वेडं करणार्या आहेत... :-)
21 Feb 2012 - 8:40 pm | जाई.
वाह
निसर्गकन्येची आणखी एक अप्रतिम भेट
छान लेख जागुतै
21 Feb 2012 - 9:47 pm | रामदास
नेहेमीप्रमाणे सुंदर लेख .
या लेखाच्या निमीत्ताने काही सुंदर गाणी आठवली .त्यापैकी एक म्हणजे धाडीला रामा का तिने वनी ह्या नाटकातील एक पद. घाई नको बाई अशी आले रे बकुलफुला आणि दुसरे मंगला नाथ यांचे एक भावगीत बकुलफुला कधीचे तुला धुंडते वनात .
22 Feb 2012 - 4:34 am | चतुरंग
+१ अगदी हेच गाणे आठवले "घाई नको बाई अशी आले रे बकुलफुला"
बकुळीचा सुगंध अगदी मादक असतो आणि कितीही छाती भरुन घेतला तरी पुन्हःपुन्हा घेत राहावा असे वाटत राहते.
(बकुळप्रेमी)रंगा
22 Feb 2012 - 6:51 pm | मेघवेडा
हे गाणं आठवलंच!
मग बकुळ पंडित आणि म्हणून "विकल मन आज झुरत असहाय"ही आठवलं! :)
फुलराणी जागुतैचा विजय असो!
22 Feb 2012 - 1:04 pm | योगप्रभू
रामदासजी!
ते मंगला नाथ यांनी गायलेले भावगीत कुठे मिळेल? लिंक किंवा शब्दरचना देणार का?
22 Feb 2012 - 12:01 am | रेवती
आहाहा! मादक सुगंधाच्या या फुलांचा गजरा मला लहानपणी कधीही माळावासा वाटला नाही पण आज्जी मात्र आवडीनं दोन तीन दिवस तिच्या आंबाड्यावर घालायची. मला त्यावेळी बुचाच्या फुलांचं भयंकर आकर्षण होतं आणि त्याच्या लांब देठांचा बीन सुईदोर्याचा गजरा करत असे. बहुगुणींनी सुचवलेले आकाशमोगरा हे नाव समर्पक आहे. आज्जीच्या अठवणीनं कासावीस झाले. वरचे सगळे फोटू मस्तच. चांदण्यांसारखे!
22 Feb 2012 - 1:21 am | इनोबा म्हणे
आमच्या एका 'बकुळफुले' नामक मिपामैत्रिणीची याद ताजा करुन दिलीत. :D
22 Feb 2012 - 1:37 am | Pearl
मलाही बकुळफुलांचा सुगंध खूप आवडतो.
सर्व फोटो आवडले.
22 Feb 2012 - 1:39 am | पाषाणभेद
दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणात
त्या सगळ्या बकुळफुलांची शपथ तुला आहे
शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !"
फुलांतल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे
भुरभुरता पाउस होता सोनिया उन्हात
गवतातुन चालत होतो मोहुनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटुनि येती असे अंतरंगी
या उदास आभाळाची शपथ तुला आहे
- मंगेश पाडगावकर
काय शब्द आहेत! या सुंदर गीताप्रमाणेच आपला लेख सुरेख आहे. असल्या देखण्या अन सुवासीक लेखांमधून सुवास पोहचविण्याची सुविधा आंतरजालावर पाहिजे होती.
22 Feb 2012 - 2:40 am | बहुगुणी
बकुळीच्या या चर्चेवरून सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं हे वसंत बापटांचं गाणंही आठवलं:
या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नांसाठी, एक रेशमी झुला झुले
इथेच माझी बाळ पाऊले दवात भिजली बालपणी
दूर देशीच्या युवराजाने इथेच मजला फुल दिले
तिनेच आसवे पुसली माझी हृदयामधला गंध दिला
चांदण्यातेले दोन कवडसे माझ्यासाठी अंथरले
बकुळी माझी सखी जीवाची जन्मांतरीचे प्रेम जुने,
मला पाहता फुलते ती अन् तिला पाहता मी ही फुले
22 Feb 2012 - 2:17 pm | स्मिता.
काल हा लेख वाचल्यापासून अजूनही याच ओळी मनात गुणगुणत आहे!!
22 Feb 2012 - 7:00 am | इन्दुसुता
मला आत्ता पायजे बकुळीचा वास आणि गजरा.......
बकुळीचा मनसोक्त वास घेऊन आणि धुंद होऊन किती वर्षे होऊन गेलीत सांगता येत नाही. बुचाची दोन मोठ्ठी झाडे माझ्या बहिणीच्या बागेत आहेत. गम्मत अशी कि हिच दोन झाडे तिला लहान पणापासुन अतिशय आवडत आणि जणूकाही त्यांच्या सर्व फुलांवर तिचाच हक्क असे. ती ( बहिण)मोठी झाल्यावर ( अनेक वर्षांनी ) ते घर विकायला काढ्ले होते, तिने ते घर केवळ त्या झाडांसाठी विकत घेतले... काय ऋणानुबंध झाडांशी !!!
मलाही कधीतरी आयुष्यात असेच एक बकुळीचे झाड माझ्या अंगणात हवे आहे. .. सध्या मी जेथे सायकल चालवते किंवा फिरायला जाते तिथे काही फुले बकुळीसारखी दिसतात ...पण वास वेगळा आहे आणि पानेही... झाडांची वेगळीच जात असावी...
जागु ... या वर्षी च्या सीझन मध्ये माझ्या नावाने २ गजरे घाल नक्की....
22 Feb 2012 - 8:43 am | ५० फक्त
माझ्याकडुन - घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला - जाम भारी आहे हे नाट्यपद.
बकुळीची फुलं म्हणजे सोलापुरातली हुतात्मा बाग आठवते, सावरकर मैदानाकडच्या गेटमधुन आत गेलं की पहिल्याच टर्नला दोन मोठी झाडं आहेत, मोठ्या बहिणींनी भेळ खाउ घालण्याच्या अटीवर अर्धा अर्धा तास फुलं वेचली आहेत, नंतर भेळ खातानाही हाताला तोच वास यायचा, त्यावेळी सक्त मजुरी वाटायची पण आज कधीतरी पुन्हा अशी फुलं गोळा करुन बहिणींकडं जायचंय, रडुन भेळ वसुल करायचीय.
22 Feb 2012 - 10:44 am | जागु
चित्रा पुर्वीच्या लोकांची अशी कल्पना होती की बकुळीच्या झाडावर सांजवेळी भुते असतात. त्यामुळे पुर्वी अशा काही झाडांजवळून बायका-पोरांना फिरकू दिले जात नसे.
झाडाच्या थंडाव्यामुळे सापही येतात हेही एक कारण आहे. पण फुलांची गळती ही संध्याकाळीच चालू होते.
अमृत, शुची, बहुगुणी बुचाची फुले म्हणजे माझाही विक पॉईंट. अजुनही हे फोटो पाहून मन पहाटेच्या अंधारात ही फुले वेचतं. माझ्यामाहेरीच हे झाड होते. आता तिथेही छोटी छोटी आहेत. अजुन फुले येत नाहीत. ही फुले कुठे दिसली की त्यावरही लेख लिहीणार आहे.
सगळ्यांच्या कविता, प्रतिसाद खुप आवडले. धन्यवाद.
22 Feb 2012 - 11:03 am | चैतन्य दीक्षित
मस्त लेख.
या लेखावरून ९वी का १० वीत अभ्यासाला होती ती एक कविता आठवली.
उद्यानात अनंत वृक्ष फुलले, त्यांची सुंगंधी फुले,
घेतो जो न करात तोच सुकती, पस्तावतो त्यामुळे |
यांचा (बकुळीच्या फुलांचा) गंध अनंत काळ टिकतो, जाती न कोमेजुनी
मेमरीनं आयत्या वेळी दगा दिला :( शेवटची ओळ आठवेच ना :(:(
कुणाला आठवत असेल तर द्या इथे.
अवांतरः बुचाच्या फुलांचे फोटो पाहून सातार्याचा खिंडीतील गणपती आठवला. त्या परिसरात किमान ६-७ तरी झाडे आहेत बुचाच्या फुलांची. फुलं असली म्हणजे आख्ख्या परिसरात नुसता घमघमाट असतो.... आहा !!
22 Feb 2012 - 11:23 am | सस्नेह
वा.वा.. लेख जास्ती सुरेख की त्यातले फोटो, की त्यावरच्या प्रतिक्रिया असा सुखद स॑भ्रम कि हो पडला ?
बकुळीची फुले म्हणजे माझा weak point ! (चिमण्या॑सारखा..) आणि बुचाची फुलेपण. त्या॑ना गगनजाई असेपण नाव आहे. फोटो पाहूनच सुग॑ध दरवळल्यासारख॑ वाटल॑...
22 Feb 2012 - 1:18 pm | धनुअमिता
जागु ताई लहानपणी ची आठवण करुन दिलीत.शाळेतुन घरी आलो कि हात-पाय धुवून जेवण करुन परडी घेवुन हि फुले वेचायला जायचो. खुप मजा यायची फुले वेचायला.वरती झाडाकडे बघायचो आणी फुल पडले कि झेलायचो.खुप फुले झाली की घरी येवुन त्याचे गजरे विणायचे,मग हे गजरे रुमाल ओला करुन त्यात ठेवायचे व दुसर्या दिवशी शाळेत जातान केसांत घालुन जायचे. खुप मजा व भांडणे हि केली हि फुले वेचताना.
पण आता हे बकुळीचे झाडच नाही आहे, आहेत त्या फक्त आठवणी. पण आजही अजुनही तशाच ताज्या आहेत मनात.
आजही बकुळीच्याफुलांची आठवन येते. खुप खुप लिहावेसे वाटते आहे ,पण शब्दच नाही आहेत भावना व्यक्त करायला.
आता या क्षणाला असे वाटते की ऑफीस मधुन निघुन घरी जावे हातात परडी घ्यावी व बकुळीची फुले वेचायला जावे.
:-)
22 Feb 2012 - 1:56 pm | जागु
धनुअमिता. काय जादू असते ना ह्या सुगंधामध्ये इतके वर्षही आठवणी ताज्या राहतात.
22 Feb 2012 - 2:14 pm | धनुअमिता
हो ना.
23 Feb 2012 - 12:38 pm | जागु
प्राजू, मेघवेडा धन्यवाद.
23 Feb 2012 - 1:10 pm | विसुनाना
आजकाल शहरांतून जशा चिमण्या, पोपट दिसत नाहीत तशीच ही बकुळ, बुच अशी झाडेही दिसेनाशी होत आहेत.
लेखिकेने बकुळीची फुले वेचण्यासारख्या अत्यंत साध्या गोष्टीतूनही किती आनंद मिळवता येतो ते दाखवले आहे. तो आनंद प्रतिसादांतूनही परिमळतो आहे.
धन्यवाद.
23 Feb 2012 - 7:58 pm | प्राजु
अख्खं मिपा आज बकुळमय झालंय असं वाटतंय.
जागु, तुझ्या या फोटोंपैकी तो केळीच्या पानावरचा फोटो मी सेव करून घेतलाय गं.. तुला न विचारताच. :)
23 Feb 2012 - 9:27 pm | पैसा
फोटो फार आवडले. हल्ली बकुळीचे गजरे १५/२० रुपयानी असतात, पण येतात तेव्हा मी न चुकता घेतेच! ५/७ वर्षाची लहान मुलं सकाळी लवकर उठून ताज्या बकुळीच्या फुलांचे गजरे बस स्टँडवर विकत असतात, त्याना गजरे विकून शाळेत जायचं असतं, तेवढीच आपल्याकडून मदत. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही झाले! या फुलांचा वास मंद असतो, आणि त्याच सुमाराला येणारी सुरंगी अगदी घमघमणारी! त्यामुळे बकुळी केव्हाही जास्त आवडीची.
24 Feb 2012 - 12:36 pm | जागु
प्राजू काही हरकत नाही ग. तुझ्यासारख्या रसिक व्यक्तिने घेतला ह्यात मला अजुन आनंद आहे.
पैसा हल्ली खुपच दुर्मिळ झाली आहेत ही फुल. आपल्याला मिळतात हेच आपल नशिब समजायच आणि त्या बिचार्यांना त्यामुळे काही मिळकतीचे साधन मिळते हे त्यांचे नशीब.
सुरंगीची आठवण केलीस म्हणुन मागचा सुरंगीचा धागा टाकते.
http://www.misalpav.com/node/17348
24 Feb 2012 - 3:14 pm | जागु
प्रास ह्या अर्जुन वृक्षाला आम्ही आईन/ऐन म्हणतो.