काय करावे मन तळमळते !

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
1 Feb 2012 - 4:43 pm

साधे सोपे सहज शब्द ते
एकापुढती एक ठेवले ,
कांगावा काही ना करता
निमुटपणे ते कविता बनले !

याला तुम्ही कविता म्हणता ?
-उसळुन सारे धावत आले ,
शांतच होती माझी कविता
घाव किती अंगावर पडले !

अगम्य असभ्य शब्द कोषिचे
एकापुढती एक ठेविले ,
डोक्यावरती घेऊन सारे
कविता सापडली म्हणाले !

ही कविता की ती कविता मज
अजूनही पुरते ना कळते ,
भीत रहावे - लढत रहावे -
काय करावे मन तळमळते !

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 6:26 pm | प्रचेतस

चमचमीत मसालेदार बुफे ते
एकापुढती एक ठेवले
कांगावा काही न करता
निमुटपणे ते मी रिचविले!

याला तुम्ही जेवण म्हणता
उसळुन सारे वरती आले ,
तरी शांतच होतो मी वरवरी
जठरात ते डचमळले तरी!

अगम्य अनंत ते मसाले
एकामध्ये अनेक मिसळीले
पोटात होवुनी कालव सारे
पित्त वाढले असे म्हणाले!

हा पदार्थ की तो पदार्थ
खावू किती ते ना कळते
उपाशी राहावे-चरतच राहावे
काय करावे पोट मळमळते!

मोहनराव's picture

1 Feb 2012 - 6:35 pm | मोहनराव

हसुन फुटलो!!

वपाडाव's picture

1 Feb 2012 - 6:48 pm | वपाडाव

मालक, आपण विडंबनाला उंचीवर नेउन ठेवलंत... या जरा खाली या... तुम्ही पडल्यास खुर्च्या-टेबलांना इजा होइल नै का !!!

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 6:32 pm | मेघवेडा

छान कविता आहे. आवडली. संदेश पोहोचला.

प्रसिद्धीचे निकष बदलत असले तरी गुणवत्तेचे निकष कसे बदलतील, नाही का? तेंव्हा, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे! :)

ये लगा मेवे का सिक्सर !! खरंच तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. त्याही पुढे चित्ती असू द्यावें समाधान. ;)