टेलिफोनची ट्रॅजेडी !!

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
28 Jan 2012 - 2:27 pm

कुठलीही गोष्ट नसते तेव्हाच तिची खरी किंमत कळते…… असं कोणीतरी म्हटलंय ना……… ते अगदी मनापासून पटलं गेल्या काही दिवसात. ह्म्म्म्म……. आणि ती गोष्ट म्हणजे आमचा फोन. आमची Land Line. गेल्या दोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽन महिन्यापासून आमचा हा फोन अक्षरश: मृतवत पडला होता. अगदी बघवत नव्हतं हो…….. कधी मधी त्याच्या छातीला कान लावून थोडी तरी धुगधुगी उरलीये का………. हे बघत होतो आम्ही आळीपाळीने. पण कसलं काय…….. ! शेवटी चक्क कोमातच गेला !! कोमात गेला तो आणि मरणप्राय अवस्था झाली आमची.

आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस झाला आणि अगदी त्याचीच वाट बघत असल्यासारखा फोन २ दिवसानंतर गेला……… गेला म्हणजे…….मेलाच ! अगदी गपगार….निपचित पडला. कुठलीही कल्पना न देता असं अवेळी जाणं मनाला कसं चटका लावून जातं ना ! तब्येतीची कुरबुर असती तर माणसाच्या मनाची तयारी होते…… पण इथे…… स्वप्नातसुद्धा असा विचार केला नव्हता हो……… असं काही इतक्यात होईल म्हणून. सुरवातीला सावरायलाच कितीतरी दिवस लागले. मित्रमैत्रिणींचं सांत्वन आणि मोबाईल ची साथ असल्यामुळे दु:ख सोसणं जरा सुसह्य झालं.

कुवेतमधे अनेक वाईट सवयी जडतात आणि त्यातली एक म्हणजे फोनवर बोलणे. मोबाईल नाही हं…….. आपला छानसा Cordless फोन. कितीही वेळ बोला, कुणाशीही बोला…….. फुकट. म्हणजे अगदीच फुकट नसतं पण अगदीच नगण्य पैशात. त्यामुळे फोनवर बोलणं ही स्वत:च्याही नकळत जडलेली वाईट सवय. आता तुमच्या बोलण्यावरच कोणी गदा आणली तर…….. चक्क मौनव्रताची शिक्षाच झाली ना ….!! त्यात आमच्या मंडळाचा वार्षिकोत्सव, मी सेक्रेटरी, असंख्य मेलामेली, त्यासाठी internet गरजेचं आणि Land line नाही म्हणजे नेट नाही. तुम्ही विचार करा……… काय भयंकर प्रसंग होता. म्हणजे फोन मेल्याचं दु:ख करायलाही वेळ नव्हता. त्यात मायबोलीच्या शिर्षक गीताची practice, recording ची गडबड. संकटं कशी सगळी एकाचवेळी, हातात हात घालून येतात मेली.

शेवटी खाली राहणाऱ्या मित्राकडून नेट उधारीवर घेऊन खिंड लढवली. वार्षिकोत्सव दणक्यात पार पडला. मायबोली शिर्षक गीतासाठी माझ्या Audio Clips व्यवस्थित देता आल्या. जरा हु:श्श झालं. पण अजूनही फोन मेलेलाच. तेवढ्यात नवऱ्याची भारतवारी ठरली आणि १० दिवसांसाठी तो गेलासुद्धा. इकडे आमच्या आयुष्यात निर्वात पोकळी !! वर्षभर महाराष्ट्र मंडळाची धामधूम…….. ती आता संपलेली, दुसरं जेव्हा काही काम नसतं तेव्हा नवऱ्याचं डोकं खायची सवय, पण नवरा भारतात गेल्यामुळे ते ही शक्य नव्हतं. लेक अभ्यास, क्रिकेट, म्युझिक ह्यात आकंठ बुडालेला…….. विचार करा…….. कित्ती कित्ती एकटी पडले असेन मी कोणी कितीही सांत्वन केलं तरी ज्याचं दु:खं त्यालाच भोगावं लागतं ना …..!! ज्याचं जळतं त्यालाच कळतं !!

दिवस असेच ढकलल्या सारखे पुढे पुढे जात होते. सगळ्या पातळ्यांवर फोनसाठी प्रयत्न सुरु होते. पण कुणाच्याच हाताला यश येत नव्हतं. आता तर लोक दिलासा देण्याऐवजी कीव करायला लागले. इतकं बिचारं कधीच वाटलं नव्हतं आयुष्यात !!

होता होता कालचा दिवस उजाडला. आम्ही तर आशाच सोडून दिली होती. फोनची सगळी सेवा मात्र सुरु होती. रोज त्याचं नित्यनेमाने स्पंजिंग वगैरे तितक्याच प्रेमानं सुरु होतं. शेवटी इतके दिवस आमच्यात होता………त्याला त्याच्या शेवटच्या दिवसात असंच कसं सोडून देणार … ! तर झालं काय की आम्ही भारतीय दूतावासात झेंडा फडकवायला जाऊन आलो आणि घरी आल्यावर खालच्या बकाला वाल्याने सांगितलं की आत्ताच फोनवाले येऊन गेले पण तुम्ही घरी नव्हता म्हणून ते निघून गेले. ……ऐकून जीवाचं अगदी पाणी पाणी झालं. पण आता धीर सोडून चालणार नव्हतं…….हीच खरी कसोटीची वेळ होती. Haris (म्हणजे वॉचमन) कडे गेले. तो अरबी…….. त्याला समजेल अशा खाणाखुणा (चक्क जीभ बाहेर काढून फोन मेला असं दाखवलं) करणं म्हणजे माझ्या अभिनयकलेची खरी कसोटी होती. मी जीवाच्या आकांताने त्याला सांगितलं आणि तो समजला………… मी धन्य धन्य झाले. पण खरी धन्यता तेव्हाच होती जेव्हा त्याने माझ्या दु:खाची तीव्रता समजावून घेऊन त्या फोनवाल्याना परत आणून माझा फोन पुन्हा एकदा माणसात घेऊन आला असता तर !! पण त्या दिवशी सगळे ग्रह तारे जोरावर असावेत. फक्त तासाभरात तो त्या फोनवाल्यांना घेऊन आला. आता तो फक्त एक तास मी कसा घालवला असेन ह्याची तुम्ही कल्पना न केलेलीच बरी !! जेव्हा तो वॉचमन त्या फोनवाल्यांना घेऊन माझ्या दारात आला तेव्हा मला आनंदाने गहिवर फुटला. डोळ्यातलं पाणी लपवत मी कसंबसं माझं दु:ख त्यांना सांगितलं. नशीब ते फोनवाले भारतीय होते नाहीतर पुन्हा माझ्या अभिनय कौशल्याला मला जागृत करावं लागलं असतं.

मग ते कामाला लागले. Junction Box खालच्या मजल्यावर आणि आमचं घर चौथ्या……. पण खालीवरच्या २-३ वाऱ्या मी अगदी माझ्या शरीराला पेलवणार नाही इतक्या चपळाईने केल्या. आणि ……..

आणि…….. माझ्या आणि त्या फोनवाल्यांच्या कष्टाला फळ मिळालं. त्यांनी माझ्या मोबाईल वरून घरच्या फोनवर फोन करायला सांगितलं. मी थरथरत्या हाताने नंबर डायल केला आणि सगळे प्राण कानात ओतून मोबाईल कानाला लावला. अतिशय गोड आवाजातली बेल ऐकायला आली. डोळ्यात एकदम पाणीच तरळलं. पण समाधान काही होईना. पुन्हा पुन्हा फोन केला. फोनची बेल तितक्याच मंजुळ आवाजात ऐकू येत होती. आनंदाने त्या फोनवाल्यांना मिठीच मारायची बाकी होती. घरी आले. सगळ्यात पहिला फोन नवऱ्याला……. “अहो, आपला फोन…… आपला फोन….. “आनंदातिशयाने तोंडातून शब्दच फुटेनात. ”झाला का सुरु…..” “हो, आत्ताच……. अभिनंदन ” तिकडून नवराही खुश !! दो………. न महिने……….!! दोन महिने ह्या आनंदाला आम्ही मुकलो होतो. फोनची तहान मोबाईलवर कशीबशी भागवत होतो. आज पार्टी तो बनती ही है.

संध्याकाळी हळदी कुंकाची फेरी आटपून घरी यायला निघालो. गाडीतच बोलताना घसा त्रास द्यायला लागला. घरी येईस्तोवर चक्क बसला. बोलताना त्रास व्हायला लागला. गरम पाणी, मीठ घालून गुळण्या सगळं केलं पण घसा जाम मोकळा होईना. मी ह्यांच्याकडे अगदी केविलवाण्या नजरेने बघितलं…….. माझ्या नजरेची भाषा ह्यांना लगेच समजली. दात आहेत तर चणे नाहीत………चणे आलेत तर दात नाहीत. इतके दिवस फोन नव्हता म्हणून बोलता येत नव्हतं आणि आता……….. आता इतक्या प्रतिक्षेनंतर फोन सुरु झाला तर माझी बोलतीच बंद झाली.

अब इंतजार है……… मेरा घसा खुलनेका……. !! त्यानंतरच माझ्या फोनचं सुख मला उपभोगता येणार आहे. तुमच्या सदिच्छांची नितांत गरज आहे हो !!!!!!!!!!!

स्थिरचित्रअनुभव

प्रतिक्रिया

कॉमन मॅन's picture

28 Jan 2012 - 2:55 pm | कॉमन मॅन

लेखन छानच..

नावातकायआहे's picture

28 Jan 2012 - 2:55 pm | नावातकायआहे

……… ……… … ……… !!

:) जयवी तै सर्वप्रथम सिल्व्हर ज्युबलीच्या शुभेच्छा !!!
फोन गाथा आवडली.
हल्ली आमच्या घरचा फोनही असाच वारंवार रुसुन बसतो. बाकी हाल्लीचा 'मोबाईल' मुलांना लँड्लाईनच महत्व काय कळायचं. मैत्रीणीचे फोन घरच्यांनी उचलू नये म्हणुन काय काय दिव्य करायला लागायची..(त्या आठवणींनी नॉस्टॅल्जीक झालोय. ;) )

मुक्त विहारि's picture

28 Jan 2012 - 3:19 pm | मुक्त विहारि

कुवेत मध्ये ही परिस्थिती , मग भारतात काय होत असेल?

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2012 - 3:38 pm | प्रभाकर पेठकर

अतिरंजित पण सुंदर कथा.

सानिकास्वप्निल's picture

28 Jan 2012 - 4:05 pm | सानिकास्वप्निल

खुप छान लेखन :)

रेवती's picture

28 Jan 2012 - 8:05 pm | रेवती

ही ही ही.
जयुताई, तुमच्या फोनची गोष्ट भारी झालिये.
तुझा घसा बरा होण्यासाठी शुभेच्छा!

चतुरंग's picture

28 Jan 2012 - 9:54 pm | चतुरंग

सिल्वरजुबिलीच्या शुभेच्छा!
फोनकथा आवडली.

खुद के साथ बातां - रंगा, जयवीतैच्या मिस्टरांचाच प्लॅन नसेल ना आधी फोन बंद करायचा आणि मग फोन सुरु करुन तैंची बोलतीच बंद करायची म्हणजे काही काळ तरी बडबड बडबड ऐकून कान किटणार नाहीत! (ह.घ्या.) ;)

रंग्या...... अरे खुद से बाता करते करते ..... दुसरोंके नवरे के दिल की बाता भी जानने लगे तुम तो :)
काही सांगता येत नाही रे........ ऐसा भी हो सकता है ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2012 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घसा खुलने की लिये आणि मन की बाते फोन से करने के लिये मनःपूर्वक शुभेच्छा.........! :)

फोनकथा चांगलीच रंगली आहे,आवडली.

-दिलीप बिरुटे

जयवी's picture

29 Jan 2012 - 2:59 pm | जयवी

तहे दिल से शुक्रिया दोस्तो :)
पण घसा खुलण्यापेक्षा जास्तच बंद होतो आहे...... :(

प्राजु's picture

30 Jan 2012 - 3:03 am | प्राजु

छान लिहिले आहेस..
अखेर फोनच्या कानात प्राण फुंकले म्हणायचे.. !
:)

फोनच्या कानात प्राण फुंकले गेले पण घशातला प्राण बाहेर गेलाय गं :(

मराठे's picture

30 Jan 2012 - 5:41 am | मराठे

फार सुरेख लिहिलंय. आजकाल फोन आणि इंटरनेट म्हणजे प्राणवायु झालाय आमचाही. एक दिवस नेट नसेल तर काय याचा विचारही करवत नाही.

ह्म्म्म्म........ आणि नेमकी अशाचवेळी फोन आणि इंटरनेटच्या शिवाय अडणारी कामं येतात. खरंच प्राणवायु च्या व्याख्येत फोन आणि इंटरनेटचाही समावेश करावा लागणार :)

मी-सौरभ's picture

30 Jan 2012 - 1:10 pm | मी-सौरभ

आवडेश!!

फोनवाल्यांनी भारतीय पद्धतीने बक्षीसी मागितली नाही का? ;)

अमोल केळकर's picture

30 Jan 2012 - 3:55 pm | अमोल केळकर

मस्त :)

अमोल केळकर

गणपा's picture

30 Jan 2012 - 4:32 pm | गणपा

बाकी ती ...............टिंबे पाहुन एका आयडीची आठवण झाल्या वाचुन राहिली नाही. :)

असुर's picture

30 Jan 2012 - 5:51 pm | असुर

. गणपाषेट ,तुम्हाला
) टिंब पा(हून कु
...ठल्या आय
डीची आ
ठ,.}-)वण झा...ली असा
..वी असा प्र
,,श्न प)))डून गेला>>.

जयवीतै,
मस्त लिहीलंय. सध्या आम्हाला देखील कोणी नवीन फोन लाईन जोडून देत नसल्याने साधारण याच दु:खातून जातोय.
कुणी जाल का, सांगाल का,
सुचवाल का, त्या एक्सेंजला... झालंय अगदी!

--असुर

गणपा...... अरे ही इतकी टिंबं कशी उमटली....... मला पण कळत नाहीये !!
पण जर त्यामुळे काही गोड आठवणी जाग्या झाल्या असतील तर चांगलंच आहे ना :)