"आई"

अन्नू's picture
अन्नू in जे न देखे रवी...
19 Jan 2012 - 9:36 pm

दहावी ला असताना आंम्हाला फकीरराव शिंदे यांची 'आई' ही कविता होती. शाळेत असताना आमच्या सर्वात जास्त आवडत्या कवितांमधीलच ही एक कविता! फ.मु. शिंदेंनी आपल्या प्रभावि अन् नेमक्या शब्दांत आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवुन दिला होता. तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा होता.
अशीच एक 'आई' या शिर्षकाची कविता याअगोदरच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये होती, काळाच्या ओघाने ती विस्मरणात गेली होती, पण फ.मु. च्या कवितेने- त्या कवितेची आठवण पुन्हा ताजी केली. 'यशवंत' यांची होती ती कविता! फ.मु.ची कविता जेथे हृदयस्पर्शी होती तिथेच यशवंत यांची कविता मनाच्या खोल गर्तेत सलणारी, हृदयाला चटका देणारी होती. त्यावेळी यशवंत यांच्या कवितेने आमच्या डोळ्यांतुन पाणी आणले होते, आजही ती वाचायला घेतली की डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होतात. या दोंन्ही कविता आजही आमच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.

आज इतक्या वर्षांनी मला यशवंत यांची आई कविता एका जुन्या पेपरात भेटली आणि ती इथे मिपा वर तुमच्यासोबत मला ती शेअर कराविशी वाटली.

"आई"

'आई' म्हणोनि कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी.
नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी?
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी!
ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी...

चारा मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यांत वासरांना, ह्या चाटतात गाई.
वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा, व्याकुळ मात्र होई
वात्सल्य माऊलीचे, आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का, आम्हास नाही आई...

शाळेतुनी घराला, येता धरील पोटी
काढून ठेविलेला, घालील घास ओठी.
उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुम्बना ती
कोणी तुझ्याविना गे, का ह्या करील गोष्टी?
तुझ्याविना न कोणी, लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया, आम्हा 'शुभं करोति'...

ताईस या कशाची, जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला, समजे न यांत काही.
पाणी तरारताना नेत्रांत, बावरे ही
ऐकून घे परंतु "आंम्हास नाही आई"
सांगे तसे मुलींना "आंम्हास नाही आई!"
ते बोल येति कानी "आंम्हास नाही आई!"...

आई! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे, अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे, औदार्य या धरेचे
नेत्रांत तेज नाचे, त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी, त्या मेघमंडळाचे
वास्तव्य या गुणांचे, आई तुझ्यात सांचे...

गुंफून पूर्वजांच्या, मी गाईले गुणाला
सार्‍या सभाजनांनी, या वानिले कृतीला
आई, करावया तू, नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही मज त्याज्य पुष्पमाला!
पंचारती जनांची, ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा, तव कौतुका भुकेला...

येशील तूं घराला, परतून केधवां गे
दवडू नको घडीला, ये ये निघून वेगे.
हे गुंतले जिवींचे, पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माऊलीचे, करण्यास येई वेगे
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
ये रागवयाही, परि येई येई वेगे...

>>>>>>>>-(यशवंत)<<<<<<<<<

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

19 Jan 2012 - 10:09 pm | गणेशा

संपुर्ण कविताच क्लास !
निशब्द
आमच्या पाठ्युपुस्तकात नव्हती ही कदाचीत ,

चारा मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यांत वासरांना, ह्या चाटतात गाई.
वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा, व्याकुळ मात्र होई
वात्सल्य माऊलीचे, आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का, आम्हास नाही आई...

ग्रे८ ओळी

अश्याच आधारावरच्या काही कविता वाचायच्या असल्यास हि लिंक बघा
नुकते येथे पुनःप्रकाशित करणार होतो..
ह्या कवितेमुळे आता नाही पण लगेच..

पुन्हा वाचतो आता कविता रिप्लाय देवुन

http://www.misalpav.com/node/17166 - आई .. मिटलेला श्वास

पुन्हा वाचली ,,
निशब्द करणारी कविता ..
अशा आठवणीतल्या कविता .. ज्या केंव्हा ह्रयाचा ठाव घेतात त्या अश्याच येत राहुद्या ..

पुढील कवितेच्या प्रतिक्षेत

शाळेतुनी घराला, येता धरील पोटी
काढून ठेविलेला, घालील घास ओठी.
उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुम्बना ती
कोणी तुझ्याविना गे, का ह्या करील गोष्टी?
तुझ्याविना न कोणी, लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया, आम्हा 'शुभं करोति'...

सुंदर ओळी .. मनाला भेदुन आरपार गेल्या ..

तुझ्याविना न कोणी, लावील सांजवाती
हि ओळ तर खुप करुन आहे.. वाईट वाटले ओळ वाचुन

मन१'s picture

19 Jan 2012 - 10:48 pm | मन१

आम्हालाही होती कविता.

फमुंच्या गाववाला

आई सारखे दैवत सार्र्या जगतावर नाही...

तसेच आणखी १ कविता आठवते जी जीतेंद्र जोशी यांनी गायली आहे. ती कुणाकडे असल्यास येथे प्रकाशित करावी.

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले गायीमंदी दीसती माझी माय !

म्हणूनच पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते

आई सारखे दैवत सार्र्या जगतावर नाही...

मराठमोळा's picture

20 Jan 2012 - 9:08 am | मराठमोळा

कविता एकदम छान..
इथे दिल्याबद्दल धन्यवाद. :)

आईवर मीही इथे एक कविता टाकली होती.

कवी यशवंतांची कविता सुरेखच .

इथे दिल्याबद्दल धन्यवाद !

पैसा's picture

20 Jan 2012 - 1:18 pm | पैसा

अशीच माधव ज्युलियन यांची "प्रेमस्वरूप आई" आठवली.

ajay wankhede's picture

21 Jan 2012 - 12:19 am | ajay wankhede

मला तर साने गुरुजी आठवलेत