भक्ती........

निशदे's picture
निशदे in जे न देखे रवी...
17 Jan 2012 - 9:48 am

उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो ||

दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||

उडवती नाणी, ओवाळिती नोटा
सारे त्या भगवंता, लाच दाखविती ||
येई कोणी शेट, मागाहून पुढे
देवाहून जास्ती, सलाम ठोकिती ||

हा परी इथे, खातो शिळेपाके,
देवाच्या वाटी, साधा नमस्कार ||
भक्ती मनी दाटे, परी भूक लागे,
पोटापुढे नसतो, मनाचा विचार ||

कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||

देव येई निघुनी, याच्यापुढे उभा,
"मला लेका तुझा, नमस्कार भारी ||
येती लाखो माझ्या, सामोरी आडवे
भक्तीपरी मात्र, पैशाची मुजोरी ||

बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||

पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||

देव जाई निघुनी, मंदिरी कल्लोळ
सारेची निष्फळ, प्रयत्न यांचे ||
दोषारोप चालू, पोलीसा सांगिती,
पूरची लोटिती, हरेक उपायांचे ||

अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

निशदे's picture

17 Jan 2012 - 9:49 am | निशदे

बऱ्याच काळाने लेखनाचा प्रयत्न केला...... किंबहुना मधल्या कित्येक महिन्यात काही सुचलेच नाही.......
"कविता" या प्रकारात शिरण्याचा माझा पहिलाच प्रयत्न....... मागील लेखनप्रयास तुमच्या प्रतिक्रिया/सूचना यामुळे यशस्वी झाला...... यावेळीही तसेच होईल याच शंका नाही ...... :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2012 - 10:20 am | अत्रुप्त आत्मा

छान आहे...कवितेवर संत साहित्याचा बराच प्रभाव आहे.

निशदे's picture

17 Jan 2012 - 6:55 pm | निशदे

अजून पर्यंत तरी संत साहित्याचे वाचन/अभ्यास केलेला नाही. हे अगदी सुचले तसे लिहिले आहे...... धन्यवाद

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Jan 2012 - 10:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी

'देऊळ' आठवला.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Jan 2012 - 10:47 am | मिसळलेला काव्यप्रेमी

'देऊळ' आठवला.

मीनल's picture

17 Jan 2012 - 6:40 pm | मीनल

अत्यंत वास्तव वादी आणि उत्तम लेखन!

निशदे's picture

17 Jan 2012 - 6:55 pm | निशदे

:) . आपल्या संदेशाला उत्तर दिले आहे.

काव्य रचना छान जमली आहे :)

निशदे's picture

17 Jan 2012 - 8:50 pm | निशदे

धन्यवाद जाई.......

कविता मस्त !

प्रत्येक ओळीत सहा च अक्षरे असती तर वाचताना मजा अजुन आली असती असे वाटते

उदा:

नाव घेती कोणी,
कोणी धुंद होता
कल्लोळ भक्तीचा,
दूर पसरतो ||

दूर पहा तिथे,
बैसे कोणीतरी
हातातील नाणी,
उगीच मोजतो ||

पोटाचेच जिथे,
रोजचे सायास
कैसा भक्तीभाव,
तयाला सुचतो ||

येथे प्रत्येक ओळीत ६ अक्षरे आल्याने वाचायल छान होते आहे..

अभंगाच्या जवळ जाणारे लिखान

निशदे's picture

18 Jan 2012 - 7:08 am | निशदे

धन्यवाद गणेशा,

पूर्वीचे दोन्ही लेख लक्षात आहेत. कवितेचा पहिला प्रयत्न चांगला जमलाय. वेळ मिळेल तसं यापुढेही लिहा!

निशदे's picture

18 Jan 2012 - 7:02 pm | निशदे

यापुढे लिहित जाईनच. :)