तुम गगन के चंद्रमा हो

स्मिता.'s picture
स्मिता. in जनातलं, मनातलं
9 Jan 2012 - 11:11 pm

बरेच दिवस झाले या गोष्टीला. तेव्हा ज्या घरात मी रहायचे त्या घराला एक छानशी गच्ची होती. रात्री जेवण झाल्यावर त्या गच्चीत अगदी मस्त शतपावली करता यायची. ती सवयच झाली होती. आणि मग बरेचदा त्यावेळी काही काही विचार चालू असायचे मनात.

असंच एकदा शतपावली चालू होती. आजूबाजूला अगदी शांत वातावरण होतं. कानात हेडफोनवर मंद आवाजात रेडिओ चालू होता. रात्रीची विविध भारतीवर सुंदर सुंदर जुनी हिंदी गाणी लागतात. मुख्य म्हणजे त्यात आता एफेम वाहिन्यांवर चालते तशी बकबक नसते. निवेदक कामापुरतंच बोलतात. गाण्यांचा मूड जात नाही त्यामुळं. निवेदक सांगत होता की आता पुढचं गाणं सती-सावित्री चित्रपटातलं आहे आणि लता मंगेशकर / मन्ना डे यांनी गायलंय. गीतकार भरत व्यास आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत आहे.

गाणं सुरू झालं... आणि पुढची तीन-चार मिनिटं फक्त काहीतरी होतंय आपल्याला एवढंच जाणवत होतं. काय होतंय ते कळत नव्हतं... अजूनही कळलेलं नाहीये. काहीतरी जादू होत होती हे नक्की. मधले सगळे क्षण 'ना मी इथली! ना इथले कोणी माझे!' अशी माझी अवस्था झाली होती. गाणं संपून पुन्हा निवेदक महाशय बोलायला लागले तेव्हा ती तंद्री भंगली. मला आलेला सुरांचा साक्षात अनुभव.

त्यानंतर ते गाणं शोधण्याकरता मी जालावर कुठे कुठे नाही शोधलं! जंग जंग पछाडलं! शेवटी कुठल्यातरी एका गाण्यांच्या संस्थळावर सापडलं. आता युट्युबवर सहज उपलब्ध आहे. त्यानंतर ते गाणं मी कित्येकवेळा ऐकलं! भरभरून ऐकलं!! वाट्टेल तेव्हा ऐकलं!!! वारंवार ऐकूनही कायम माझ्या मनाला मोहिनी घालणारं हे गाणं गेल्या आठवड्यात असंच परत एकदा ऐकलं आणि त्याबद्दल लिहावंसं वाटलं.

हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे तो मी कधी पाहिलेला नाही की गाणं पाहिलेलं नाही. गाण्यातले अभिनय करणारे कलाकार कोण, गाण्याची पार्श्वभूमी, आधी-नंतरचा प्रसंग, काही-काही माहिती नाही. माहिती आहे ते गाणं, त्याचे शब्द, संगीत आणि आवाज! बास, तेवढ्याच आधारावर जे काही वाटतं ते लिहितेय!

*****

ते गाणं आहे ... तुम गगन के चंद्रमा हो, मै धरा की धूल हूं!

*****

गाण्याच्या सुरुवातीला असलेलं साधंच पण अतिशय मधुर संगीत जाणीव करून देतं की पुढे आपण काहीतरी सुरेख अनुभव घेणार आहोत, मूड सेट होतो आणि तेवढ्यात लताबाईंचा अतिशय गोड आवाज आपल्या कानातून मनाचा ताबा घेतो. त्यांच्या गळ्याबद्दल काय बोलावं? तो दैवी आहेच. पण त्यांचा असा आवाज मी तरी पहिल्यांदाच ऐकला होता. (ते गाणं खरं तर सुमन कल्याणपूर यांनी गायलंय असाही एक प्रवाद नंतर वाचला. पण त्यात किती तथ्य आहे याची मला कल्पना नाही). गाण्यातलं मला फारसं कळत नाही. सूर, ताल, रस काहीच नाही. पण हे युगलगीत असलं तरी मला त्यात शृंगारापेक्षा शांतरस जास्त आहे असं वाटतं. हा शृंगार शांतवणारा आहे, भरभरून तृप्त करणारा आहे. गाणं ऐकताना निखळ, नि:स्वार्थी भावना जाग्या होतात. एका शांत चांदण्या उत्तररात्री एखाद्या सरोवरातल्या नौकेवर शांतपणे विहार करतोय असं वाटतं.

अतिशय अर्थवाही आणि समर्पक शब्द, उपमा... गायक-गायिकेचा सुमधुर आवाज आणि परिणामकारक संगीत या एखाद्या गाण्याला गरजेच्या असणार्‍या सर्वच गोष्टी या ठिकाणी छान जुळून आल्या आहेत.

*****

तुम गगन के चंद्रमा हो, मै धरा की धूल हूं!
तुम प्रणय के देवता हो, मै समर्पित फूल हूं!!

लताबाईंच्या आवाजातील ओळींनी गाण्याला सुरुवात होते. निरतिशय प्रेमात असलेल्या प्रेयसीने तिच्या प्रियकराला तिच्या भावविश्वात सर्वोच्च स्थान दिलं आहे. तिच्याकरता तो आकाशिचा चंद्र आहे आणि त्याच्यापुढे ती केवळ जमिनीवरची धूळ आहे. इथे ती त्याला आपल्या प्रेमविश्वात सर्वोच्च स्थानी बघतेय आणि स्वतःला मात्र त्याच्यापुढे तितकीशी अनुरूप(पात्र) समजत नाही. तो तिच्या प्रेमाची देवता आहे आणि ती त्या देवाला अर्पण केलेलं फूल आहे. आह्ह्ह! मला सगळ्यात जास्त आवडलेली उपमा आहे ही. गाण्याला आणि आपल्या मूडला एका वेगळ्याच उंचीवर घेवून जाणारी.

तुम हो पूजा मै पुजारी, तुम सुधा मै प्यास हुं

प्रेयसी आपल्या प्रियकराला देवता मानतेय तर प्रियकर तिला त्याच्या जगण्याचं कारण मानतोय. तो पुजारी तर ती त्याच्या आयुष्याचं एकमेव कारण, ध्येय, साध्य आहे. त्याच्यासारख्या तहानलेल्यासाठी ती सुधा म्हणजेच संजीवनी आहे.

तुम महासागर की सीमा, मै किनारे की लहर
तुम महासंगीत के स्वर, मै अधुरी सांस पर
तुम हो काया मै हुं छाया, तुम क्षमा मै भूल हूं

इथे पुन्हा एकदा प्रेयसी आपल्या प्रियकराला सर्वच क्षेत्रांत सर्वोच्च स्थानावर बघतेय. या ओळी केवळ इथे नुसत्या वाचणं वेगळं... ऐकताना जाणवतं की त्याचं प्रेम मिळवून ती इतकी तृप्त आणि धन्य झालीये की या जगात तिच्याकरता आता अजून काही मिळवायचं बाकी राहिलंच नाहीये आणि तिचं अस्तित्व आता त्याच्यासाठीच आहे. त्याला शरीर आणि स्वतःला सावली म्हणवून घेत ती हेच सांगतेय की त्याच्याशिवाय तिला काही अस्तित्वच नाही. तो आहे म्हणून ती आहे, तो नसेल तर ती असण्याचा प्रश्नच नाही. त्याला क्षमा आणि स्वतःला चूक म्हणून ती तिचं त्याच्यामुळे असलेलं अस्तित्व तर दाखवतेच आहे आणि सोबतीला पुन्हा त्याच्या उच्च स्थानाचा आणि तुलनेत स्वतःच्या दुय्यम स्थानाचा उल्लेख करतेय.

खरं तर तीसुद्धा त्याच्यावर तेवढेच प्रेम करतेय पण त्याच्याकडून मिळणार्‍या प्रेमाने ती एवढी भारावून गेलीये की तिला तिचे प्रेम त्याच्या प्रेमाच्या तुलनेत कमी वाटतेय. त्याच भ्रमामुळे ती वारंवार स्वतःला सर्वात खालच्या पायरीवर ठेवून तेथून सर्वोच्च स्थानी असलेल्या प्रियकराच्या बरोबरीला येण्याइतपत भरभरून प्रेम करू इच्छित आहे.

तुम उषा की लालिमा हो, भोर का सिंदूर हो
मेरे प्राणो की हो गुंजन, मेरे मन की मयुर हो

तुम हो पुजा मै पुजारी, तुम सुधा मै प्यास हूं

आपल्या प्रेयसीला तिचं स्वतःचंच प्रेम कमी वाटतंय हे बघून प्रियकर तिचा भ्रम दूर करण्याकरता तिला तिच्या सुंदर, लोभस, मोहक व्यक्तिमत्वाची जाणीव करून देतोय. जशी ती त्याच्या उत्कट प्रेमाने भारावून गेली आहे त्याचप्रमाणे त्याचंही हृदय तिच्या समर्पित प्रेमाच्या अधीन झालंय. त्याच्या मनात तिचे विचार मोरासारखे थुईथुई नाचत असताना आणि तिचेच विचार श्वासागणिक गात असतानाही ती त्याला पहाटेच्या लालीप्रमाणे पवित्र वाटते. हे सांगून तो तिला पुन्हा पटवून देतोय की केवळ तीच आता त्याच्या जीवनाचे सार्थक आहे, तीच त्याच्या आयुष्याची संजीवनी आहे.

वाह! काय ते उत्कट प्रेम आहे. भलेही त्यांनी एकमेकांना दिलेल्या उपमा निव्वळ अतिशयोक्तीपूर्ण असतील, पण प्रेमात आकंठ बुडाल्यावर मनाची काय स्थिती होते ती प्रत्येकाने केव्हा ना केव्हा तरी अनुभवली असणारच! या गाण्यातून नायक-नायिकेची तीच स्थिती दिसून येतेय.

असं एखादं गाणं आपण ऐकतो... नव्हे असं एखादं गाणं अवचित आपल्या पुढ्यात उभं ठाकतं, त्यातही नेमकं एखाद्या हळव्या वळणावर गाठतं तेव्हा ते सगळं उसळून वर येतं... त्या शब्दात आपल्याच भावना गुंफत जातो आपण आणि ते मनोमन आपल्या प्रणय देवतेला अर्पणही होऊन जातं!

संगीतप्रेमकाव्यआस्वाद

प्रतिक्रिया

प्रास's picture

9 Jan 2012 - 11:21 pm | प्रास

मस्त लिहिलंत!
गाण्यात काय सांगितलंय ते प्रत्येकाचं प्रत्येकाने हुडकायचं असतं पण कधी कधी एखादं गाणं ऐकणार्‍याच्या मनावर असं काही गारुड करतं की त्याच्या चित्तवृत्ती पूर्वी कधीही फुलून आल्या नाहीत तशा त्या वेळी फुलून येतात आणि ते गाणं आपल्याला आपल्यासाठीचा असलेला खास असा अनुभव देऊ लागतं. पण यातही एक गंमत असते. अशावेळी आपण एकदा का हा अनुभव घेतला की कधी तो दुसर्‍यांना सांगतोय असंच होऊन जातं.
ते गाणं आपण नंतर कित्येक वेळा ऐकतो पण पहिल्या श्रवणाने निर्माण झालेल्या भावनांचे हिंदोळ आपल्याला विसरता येत नाहीत.
तुमचंही काहीसं असंच झालं असल्याचं लक्षात येतंय.
आवडलं; नव्हे, नव्हे, भावलं तुमचं लिखाण.
येऊ द्या असेच तुमचे सांगीतिक अनुभव....

चैतन्य दीक्षित's picture

10 Jan 2012 - 5:43 pm | चैतन्य दीक्षित

वरील प्रतिक्रियेच्या प्रत्येक शब्दाशी सहमत.
छान लिखाण.
असेच अजून लिहा.

कवितानागेश's picture

9 Jan 2012 - 11:23 pm | कवितानागेश

छान वाटले. :)

गाण्याच्या सुरुवातीलाच अंगावर सरसरून काटा आला. किती कोमल, सोज्वळ आवाज.
प्रेम व्यक्त करताना कोणत्याही भडक शब्दांचा वापर नाही. फक्त सागर, लाटा, उषा यासारख्या उपमा.
अगदी मस्त गाणं.

चिंतामणी's picture

9 Jan 2012 - 11:50 pm | चिंतामणी

>>>विविध भारतीवर सुंदर सुंदर जुनी हिंदी गाणी लागतात. मुख्य म्हणजे त्यात आता एफेम वाहिन्यांवर चालते तशी बकबक नसते.

त्या बकबकीने पकायला होते.

असो.

लताबाई, आशाताई, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी अशी अनेक रत्ने त्या विधात्याने आपल्यासाठी भुतलावर पाठवली. जो त्याचा भरभरून उपभोग घेत नाहीत ते करंटे.

ऐंशीच्या दशकापर्यन्त हिंदी चित्रपटसृष्टीत संगीताचे सुवर्णयुग होते. पन्नासवर्षापुर्वीच्या गाण्यांची गोडी अजून तशीच. आजच्या काळातील एक दोनदा ऐकल्यावर विसरून जातात.

आता ह्याच गाण्याचे बघा. १९६४ साली प्रदर्शीत झालेल्या सिनेमातील गाणे आहे आणि अजून ते मनाला रिझवते.

अश्याच अनेक गाण्यांनी रिझवणा-या लतादिदींना आणि त्याकाळातील त्यांचे या वाटचालीतील साथी गायक, संगीतकार आणि वादक यांना सलाम.

(हिंदी सिनेमातील संगीताच्या सोनेरी युगाचा दिवाणा) चिंतामणी

रामपुरी's picture

9 Jan 2012 - 11:51 pm | रामपुरी

चाल थोडीशी या गाण्याच्या वळणावर जात आहे काय?

बहुगुणी's picture

10 Jan 2012 - 12:25 am | बहुगुणी

कानसेन रामपुरी साहेबः दोन्ही गाणी यमन कल्याण रागावर आधारित आहेत :-)

रामपुरी's picture

10 Jan 2012 - 2:27 am | रामपुरी

पण "साहेब" म्हणू नका.
(अजून सुप्रिटेंडंट म्हणून पर्मनंट नाही आणि साहेब काय मोठे लोक काय :) साहेब म्हणणार्‍यांना रौरव आणि मोठे लोक म्हणणार्‍यांना कुंभीपाक)

एका छान गाण्याची अतिशय छान ओळ्ख करुन दिलीस :)
धन्यवाद गो :)

चिंतामणी's picture

10 Jan 2012 - 12:26 am | चिंतामणी

(म्हणजे माझ्या अल्पमतीप्रमाणे) दोन्ही गाणी यमन कल्याणमधे बांधलेली असल्याने साम्य आहे.

शुचि's picture

10 Jan 2012 - 4:21 am | शुचि

अतिशय सुरेख गाणं.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2012 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा..छानच हो स्मिताजी..या निमित्तानी जेंव्हा घरी फक्त रेडियो होता,त्या काळातल्या विविधभारतीच्या अठवणी जाग्या झाल्या...आमच्या वाड्याला गच्ची हा प्रकार नसल्यामुळे,,थंडीत ती हौस भागवायला आंम्ही छोटा ट्रांन्झिस्टर घेऊन घराच्या पत्र्यावर अगदी बेला के फुल पर्यंत जो शेवटचा कार्यक्रम असेल तिथ पर्यंतची सर्व गाणी मंद आवाजात ऐकायचो...काय मजा यायची त्या वातावरणाची ..मला असच एक गाण अत्ता अठवतं ते म्हणजे-गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल...आणी त्यातली ती--ओ बंधू रे.... ही हरवुन टाकवणारी साद... किंवा ओहो रे ताल मिले नदी के जल मे,नदी मिले सागर मे..हे असच जुन्या अठवणी जागवणारं गाणं... त्यामुळे आजही आंम्ही जास्तीवेळा विविधभारतीशीच सल्लग्न असतो...

प्राजु's picture

10 Jan 2012 - 1:00 am | प्राजु

खूप सुंदर लिहिलं आहेस स्मिता!!

माझ्याही अशाच काही आठवणी
http://www.misalpav.com/node/18660

इथे जरू वाच.

प्रत्येकाचं भावविश्व स्थलकाला प्रमाणे आगळं वेगळं असतं. त्यातील आनंदाचे मोजमापच करता येत नाही. तो आनंदही परत परत अगदी तश्शीच आनंदाची अनुभुती देत असतो. ह्यालाच हृदयाच्या तारा छेडणे म्हणतात असे मला वाटते. लताताईंची काही गाणी अशीच कायमची हृदयात साठवली आहेत तशीच तलतजी आणि हेमंतकुमारजी यांचीही.मीही कधी कधी आंतरजालावर जावुन ह्या गाण्यांच्या भावविश्वात एकटीच तासन् तास समाधिस्त होते. त्यानंतरची वास्तवता देहाने भुलोकी आल्याची जाणिव देत असुनही मन काहीकाळ तरल अवस्थेतच असते.
स्मिता, हे गाणं ऐकवून एका वेगळ्या आनंदात सहभागी केल्याबद्दल आपले आभार.

फार मस्त लिहीलं आहेस स्मिता. मला "छुपा लो यूं दिल मे प्यार मेरा" जास्त आवडतं. "के जैसे मंदीरमे लौ दियेकी" ची बातच काही और आहे.

पैसा's picture

10 Jan 2012 - 9:29 am | पैसा

फार छान लिहिलंयस. आमचं नशीब, की या सुंदर गाण्यांच्या सोबत आमची पिढी लहानाची मोठी झाली. अमिताभचा उदय झाला आणि मग तेव्हाच संगीतकारांची जुनी फळी काळाच्या पडद्याआड जाऊ लागली, तेव्हा हिंदी सिनेमासंगीताला उतरती कळा लागली. पण १९५० ते १९७० साधारण हे हिंदी सिनेमाचं गाण्यांच्या दृष्टीने सुवर्णयुग होतं. आणि लता हा त्याचा 'कोहिनूर".

हे गाणं सुमनताईंनी म्हटलं या प्रवादाबद्दल मी इतकंच म्हणेन की सुमनताईंचा आवाज लताच्या जवळ जाणारा असला तरी लता म्हणजे कल्पलताच! आमच्यासारखे जे लताची गाणी ऐकत लहानाचे मोठे झाले ते या दोघींच्या आवाजातला फरक सहज ओळखू शकतात. हा लेख आणि प्रतिक्रिया वाचताना जाणवलं की एका मोठ्या संख्येच्या वाचकाना लताची जादू पुरती माहिती नाही. त्यांच्यासाठी ही ३ जादुई गाणी सप्रेम भेट.

१. स्री सिनेमातलं "ओ निर्दयी प्रीतम"

२. आम्रपालीमधलं " तुम्हे याद करते करते"

३. तीसरी कसम मधलं "रात ढलने लगी"

मृत्युन्जय's picture

10 Jan 2012 - 12:11 pm | मृत्युन्जय

अतिशय सुंदर गाणे. कधी ऐकले नव्हते. पण ऐकुन इतके गार गार प्रसन्न वाटले. खुपच छान. लिहिले सुद्धा छान आहे. लताबाईंचा आवाज तर स्वर्गीय .

प्रमोद्_पुणे's picture

10 Jan 2012 - 12:44 pm | प्रमोद्_पुणे

गाणे आहे. बाईंची ही गझल ऐका..http://www.youtube.com/watch?v=htIwpTe9ZEo
केवळ अप्रतिम आहे.

स्मिता.'s picture

10 Jan 2012 - 2:16 pm | स्मिता.

सर्व वाचकांचे आणि लेख वाचून आवर्जून प्रतिक्रिया देणार्‍यांचे मनःपूर्वक धन्यवाद! हे गाणं एवढ्या लोकांना आवडलं/आवडतं हे बघून आनंद वाटला.

@रामपुरी: तुम्ही दिलेलं गाणं पहिल्यांदाच ऐकलं... चाल सारखीच आहे. तेही गाणं आवडलं :)

@अतृप्त आत्मा: रात्रीच्या शांत आणि थंड वातावरणात विविधभारतीवरची गाणी ऐकणं हा खरंच एक सुखद अनुभव असतो.

@प्राजु: 'ए दिल ए नादान' पण मस्तच. खूप छान लिहिलंय. आपला अनुभव बराचसा सारखाच... अश्या अनुभवानेच एखादं गाणं मनात घर करून असतं!

@पैसाताई: मलाही १९५० ते १९७० च्या दरम्यानची गाणी खूप आवडतात. बरेचसे मित्रमैत्रिणी त्याला 'जुनाट आवड' म्हणून हसतात. तरी मी बहुतांश वेळी जुनीच गाणी ऐकते.

@प्रमोदः तुम्ही आणि पैसाताईंनी दिलेली गाणी अजून ऐकली नाहीत. घरून ऐकेन.

ढब्बू पैसा's picture

10 Jan 2012 - 2:35 pm | ढब्बू पैसा

स्मिता, छानच लिहिलंयंस . जाम आवडलं!
तुझ्या गाण्यांच्या आवडीविषयी माहिती होतंच पण हे लिखाण म्हणजे सुखद धक्का आहे :).
खूप ऐक आणि लिहीत रहा.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jan 2012 - 2:38 pm | परिकथेतील राजकुमार

गाण्याची ओळख एकदम आवडेश.

आता लेखणी पुन्हा थांबवू नका.

आता लेखणी पुन्हा थांबवू नका.

अगदी हेच मनात आलं.

लिखते राहो.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jan 2012 - 4:08 pm | बिपिन कार्यकर्ते

+२

प्रीत-मोहर's picture

10 Jan 2012 - 4:11 pm | प्रीत-मोहर

+३

असच म्हणते. :)

प्यारे१'s picture

10 Jan 2012 - 4:13 pm | प्यारे१

लेखणी 'बोर्डावर' चालूच राहू दे.

नीलकांत's picture

14 Jan 2012 - 7:18 am | नीलकांत

+५

स्वाती दिनेश's picture

10 Jan 2012 - 2:41 pm | स्वाती दिनेश

खूप छान, तरल लिहिलं आहेस स्मिता. खूप आवडलं.
स्वाती

मराठी_माणूस's picture

10 Jan 2012 - 2:45 pm | मराठी_माणूस

असाच झपाटलेला अनुभव लताचे "जलती निशानी" ह्या चित्रपटतील "रुठ के तुम तो चल दिये ..." ह्या गाण्याने दिल होता.
त्या दिवशी पहील्यांदाच ते गाणे रेडीओ वत ऐकले आणि मनात घर करुन राहीले. नंतर नेट वरुन त्या गाण्याची माहीती काढली आणि "फेव्हरीट" मधे ठेउन दीले . मधुन मधुन ऐकत असतो. ते गाणे अजुनही तेव्हढा आनंद देते.
"चल दिये" हे शब्द लताने असे काही गायले आहेत की त्याला तोड नाही. अनिलदांच्या संगीताचा ही वाटा आहेच.

sneharani's picture

10 Jan 2012 - 3:38 pm | sneharani

मस्त लिहलय!!
:)

विशाखा राऊत's picture

10 Jan 2012 - 4:00 pm | विशाखा राऊत

स्मिता जबरदस्त :)

पहिल्यांदाच ऐकले न परत परत ऐकते आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jan 2012 - 4:07 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय सुंदर अनुभव स्मिता.! काही गाणी अशीच आत जात असतात.

मला आवडलेले असे काही : हे गाणं नाहीये. बासरीवादन आहे. या क्लिपच्या पहिल्या काही सेकंदातच मी विरघळून गेलो होतो.

तिमा's picture

10 Jan 2012 - 6:51 pm | तिमा

लिहिलेले सहजसुंदर वाटले व गाण्याची ओळख करुन देण्याची पद्धत आवडली.
असेच एक वेड लावणारे गाणे म्हणजे दिदी - मदनमोहनचे, ' चांद मध्धम है आँसमाँ चुप है '. हे गाणं सीडीच्या शेवटी ठेवावं, कारण त्यानंतर दुसरे कुठलेही गाणे त्या क्षणाला ऐकवणार नाही. माझ्याकडे द्यायला लिंक नाही. जाणकारांनी कृपया द्यावी.

स्मिता.'s picture

10 Jan 2012 - 7:07 pm | स्मिता.

तुम्हाला हे गाणं म्हणायचंय का?

सध्या ऑफिसातून ऐकता येत नाहीये. घरून नक्की ऐकेन.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे पुन्हा एकदा आभार.

तिमा's picture

11 Jan 2012 - 8:26 pm | तिमा

हो, हेच गाणं! पण कोणीतरी त्याचा ऑडिओ ट्रॅक दुसर्‍याच व्हिडिओवर चढवला आहे. तरी बघायला छान आहे.

चिंतामणी's picture

11 Jan 2012 - 1:39 am | चिंतामणी

यांच्याबद्दल काय बोलावे तेव्हढे थोडे आहे. या दोघांच्या कलाकृती अजरामर आहेत. किती गाणी लिहू? नमुन्यादाखल काही पुढे देत आहे.

हम प्यार में जलनेवालों को (जेलर-१९५८)

यूँ हसरतों के दाग़, मुहब्बत में धो लिये ( अदालत-१९५८)

उन को ये शिकायत है के हम, कुछ नहीं कहते (अदालत-१९५८)

है इसी में प्यार की आबरू, वो ज़फ़ा करें मैं वफ़ा करूँ (अनपढ-१९६२)

रस्म-ए-उल्फ़त को निभाएं तो निभाएं कैसे(दिल की राहे-१९७३)

नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके हाए(मेरा साया-१९६६)

वो चुप रहें तो मेरे दिल के दाग़ जलते हैं(जहाँ आरा-१९६४)

ज़रा सी आहट होती है तो दिल सोचता है (हकिकत-१९६४)

(लतादिदी आणि मदनमोह्न यांचा भक्त) चिंतामणी

स्मिता.'s picture

11 Jan 2012 - 3:46 am | स्मिता.

'यूँ हसरतों के दाग़, मुहब्बत में धो लिये' हे गाणं मला कधीपासून हवं होतं पण पहिले शब्दच आठवत नव्हते त्यामुळे शोधता येत नव्हतं. यादीत ते गाणं बघून अतिशय आनंद झाला.

मराठी_माणूस's picture

11 Jan 2012 - 11:14 am | मराठी_माणूस

अजुन काही

अगर मुझसे मोहब्बत है
जो हमने दांस्ता अपने सुनाई
आपकी नजरोने समझा

मेघवेडा's picture

11 Jan 2012 - 4:22 pm | मेघवेडा

जिया ले गयो जी मोरा सावरिया
तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा
नैना बरसे रिमझिम रिमझिम - याचं तमिळ व्हर्जनही खूप छान आहे 'नानी वरुवे इंगुम आंगुम!'. चाल तीच पण तमिळ शब्द ऐकायला मस्त वाटतात! पी. सुशीलानी गायलंय. लिंक देता येत नाहीये आता.. :(

छान लिहिलंय स्मिता.! लेखणी अशीच परजत राहा अधनंमधनं.. :)

स्मिता, काय सुरेख लिहिले आहे!

गणेशा's picture

11 Jan 2012 - 9:30 pm | गणेशा

छानच ओळख

सानिकास्वप्निल's picture

13 Jan 2012 - 3:36 pm | सानिकास्वप्निल

अतिशय सुंदर गाणं आहे स्मिता आधी ऐकले नव्हते पण आता सारखे ऐकत रहावेसे वाटत आहे धन्यवाद :)
खुपचं सुरेख लिहिले आहेस असेच लिहित रहा
शुभेच्छा :)

श्यामल's picture

14 Jan 2012 - 4:31 pm | श्यामल

व्वा क्या बात है ! नितांतसुंदर गाणं आणि त्याची सहजसुंदर ओळख !

अनिंद्य's picture

15 Feb 2018 - 5:22 pm | अनिंद्य

@ स्मिता.,

भरत व्यास ! काल झालेल्या व्हॅलेंटाईन कलकलाटाच्या पार्श्वभूमीवर..... 'तुम क्षमा मै भूल हूं' ऐकले, त्यात आज हा लेख वाचला.

बहुत सुकून मिला.

अनिंद्य

'शाम ढले जमुना किनारे'. चित्रपट: पुष्पांजली.

सिरुसेरि's picture

16 Feb 2018 - 11:15 am | सिरुसेरि

अजुन एक लक्षात राहिलेले गीत म्हणजे "जरा सामने तो आओ छलिये " .

सिरुसेरि's picture

16 Feb 2018 - 11:16 am | सिरुसेरि

+ १ . ज्योतीकलश छलके . - संगीतकार सुधीर फडके .

shashu's picture

16 Feb 2018 - 11:36 am | shashu

अशीच तुम्ही अनुभवलेली अनुभूति मला या गीतात अनुभवता आली. (जमल्यास ऐकून पहा)
हा चित्रपट सुद्धा छान आहे....

गीत : राह पे रहते है...
चित्रपट : नमकीन
लेखक, निर्देशक, गीतकार : गुलजार
संगीत : पंचमदा

गुलजार-पंचमदा या द्वयिन बद्दल काय बोलणार (थोडक्यात लायकी नाही माझी).

क्षमस्व
गायक : किशोर कुमार
(यांचा उल्लेख राहुन गेला).

<<<अशीच तुम्ही अनुभवलेली अनुभूति मला या गीतात अनुभवता आली. (जमल्यास ऐकून पहा)
हा चित्रपट सुद्धा छान आहे....

गीत : राह पे रहते है...
चित्रपट : नमकीन
लेखक, निर्देशक, गीतकार : गुलजार
संगीत : पंचमदा

गुलजार-पंचमदा या द्वयिन बद्दल काय बोलणार (थोडक्यात लायकी नाही माझी).>>>>>