अखेरचा पाठ

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
20 Dec 2011 - 12:03 pm

शाळेत जायला रोजच्यापेक्षा जरा उशीरच झालेला. तरी मी पाय ओढत चाललेलो. आज शाळेत मला मास्तरांची बोलणी खायला लागणार आणी कदाचित मारही, हे त्रिकालाबाधित सत्य होतं. कारण काल हॅमेल मास्तरांनी सांगितलेलंच होतं की आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत नि मला कृदन्तातलं ओ की ठो येत नव्हतं. आता चांगलंच उजाडलेलं. पक्षी बाजूच्या झाडींमधून चिवचिवत होते आणि पलिकडच्या मैदानात प्रशियाचं सैन्य संचलन करत होते. व्याकरणातील कृदन्तांच्या माहितीपेक्षा संचलनाचं ते दृश्य जास्त मनमोहक होतं पण मी माझ्या मनावर ताबा ठेऊन शाळेच्या दिशेने जाऊ लागलो.

शाळेच्या रस्त्यावर शहर सभागृहावरून जाताना मला तिथल्या फळ्यावरची बातमी वाचणारी गर्दी दिसली. गेल्या दोन वर्षांपासून हा फळा आम्हाला सगळ्या वाईटच बातम्या पुरवत होता - हरलेल्या लढाया, जेत्यांचे जाहिरनामे, मुख्य सैन्याधिकार्‍यांच्या नागरिकांसाठीच्या आज्ञा वगैरे वगैरे. मग मी चालता चालताच विचार करू लागलो, आज कोणती वाईट बातमी देतोय हा? या विचारातच चालत असताना, तिथे आपल्या मदतनिसांबरोबर उभ्या असलेल्या शिकलगार आणि घड्याळचीने मला हाक मारून म्हण्टलं, "अरे मुला, का इतका घाईने चालला आहेस? आता शाळेत अगदी आरामातच पोहोचशील की तू!"

मला वाटलं ते माझी मस्करी करत आहेत म्हणून मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला आणि नंतर अगदी धावतच पुढे निघालो, असा की हॅमेल मास्तरांची वाडी येईतो मला चांगलाच दम लागला.

एरवी शाळा सुरू असताना इथे एक प्रकारचा गोंधळ असतो. त्याचा आवाज पार दोन आळी पलिकडे पर्यंत ऐकू येतो. कधी पाढे म्हणण्याचा आवाज, कधी कविता म्हणण्याचा आवाज तर कधी संथा घोकतानाचा आवाज, अगदी जोरजोराने अभ्यास सुरू असतो. परिस्थिती अशी की आपले कान झाकून घेतल्याखेरिज आपल्याला कधी कधी स्वतःचा आवाजही ऐकू येत नाही. त्यातच मास्तरांच्या हातची वेताची छडीही आवाज करत असते. कधी याच्या पाठीवर तर कधी त्याच्या. पण आज वातावरण काही वेगळंच होतं. मी कुणाच्याही लक्षात न येता आपल्या जागेवर जायच्या प्रयत्नात होतो पण त्या दिवशी अगदी सुट्टीचा दिवस असल्यासारखी शांतता होती. खिडकीतून मला माझे सहपाठी मित्र आपापल्या जागा पकडून बसलेले दिसले. हॅमेल मास्तर आपली छडी घेऊन त्यांच्या मधल्या जागेतून फिरताना दिसले. मग सगळ्यांसमोर मला वर्गात जाऊन बसावं लागलं. तुम्हाला कल्पना आलीच असेल की मी किती घाबरलेलो असणार तेव्हा ते!

पण माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. हॅमेल मास्तरांनी माझ्याकडे बघितलं आणि मृदू स्वरात म्हणाले, "अरे फ्रांज, आम्ही तुझ्याशिवायच वर्ग सुरू करत होतो. जा बस तुझ्या जागी."

मी उडी मारून माझ्या बाकड्यावर बसलो तेव्हा कुठे माझा थोडा जीवात जीव आला. मी पाहिलं की गुरूजींनी त्यांचा आवडता शेवाळी रंगाचा कोट चढवलाय, त्याखाली फ्रीलवाला शर्ट घातलाय आणि त्यांची काळी, कलाबुत केलेली छोटीशी टोपीही घातलीय. पण हे सारं तर ते फक्त शाळा तपासणीच्या दिवशी किंवा बक्षीस समारंभाच्या वेळेसच घालायचे! आज वेगळेपण केवळ यातच नव्हतं, ते जणू अख्ख्या शाळेतंच दाटून आलेलं. पण मला सगळ्यात जास्त आश्चर्याचा धक्का, जेव्हा एरवी रिकामी असलेली आमच्या वर्गातली पार मागची बाकडी काही गावकर्‍यांनी बसल्यामुळे भरलेली पाहिली, तेव्हा बसला. गावातील ती प्रतिष्ठीत मंडळी अगदी आमच्या सारखीच वर्गात बसलेली. आपल्या त्रिकोणी टोपीसह म्हातारबा हाऊजर, आमच्या गावचे माजी सरपंच, माजी पोस्ट मास्तर आणि इतर अशी अनेक जणं. सगळेच जण दु:खी वाटत होते. म्हातारबा हाऊजरने आपल्या समोर एक जुना स्वाध्याय उघडून ठेवलेला. त्यावर त्याचा तो पुराणकाळचा चष्मा ठेवला होता.

मी या सगळ्याबद्दल विचारच करत होतो की हॅमेल मास्तर आपल्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या नेहमीच्या गंभीर पण काहीशा मायाळू आवाजात म्हणाले, "मुलांनो, आज तुम्हाला माझा हा शेवटचा वर्ग असेल. बर्लिनहून आदेश आलाय अल्साक नि लॉरेनच्या शाळांमध्ये आता केवळ जर्मन भाषाच शिकवली जाईल. नवीन मास्तर उद्यापासून शिकवायला येईल. आपल्या फ्रेंच भाषेची ही शेवटची शिकवणी असेल कारण उद्यापासून मी गावात नसेन. माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका.

मला ते शब्द जणू वज्राघातासारखेच वाटले.

अच्छा! म्हणजे शहर सभागृहावर हीच बातमी लावली असणार!

फ्रेंच भाषेचा माझा शेवटचा वर्ग, पण का? मला तर जुजबी फ्रेंचही लिहिता येत नव्हतं अजून! आता मला ते कधीच शिकता येणार नाही! ते शिक्षण इथेच थांबणार? अरेरे! मला कितीतरी दु:ख होत होतं, मी माझा फ्रेंच भाषेचा पाठ वेळच्या वेळी शिकलो नव्हतो, त्यावेळी मी पक्षांची अंडी मिळवण्यासाठी, घसरगुंडीवर खेळण्यासाठी म्हणून वेळ वाया घालवला होता. अगदी थोड्या वेळापूर्वीपर्यंत मला माझी अभ्यासाची पुस्तकं मूर्खपणा वाटत होती, उचलून शाळेत आणण्यासाठी मोठा भार वाटत होती पण आता माझं व्याकरणाचं पुस्तक, माझं इतिहासाचं पुस्तक हे सर्व माझे जुने मित्र वाटत होते. त्यांची साथ सोडणं मला जीवावर येत होतं. हेच हॅमेल मास्तरांच्या बाबतीतही वाटत होतं. ते आता आम्हाला सोडून दूर जाणार आणि पुन्हा आम्हाला कधीच भेटणार नाहीत ही भावना मला त्यांचे नियम, त्यांच्या छड्या आणि त्यांचं वेळोवेळी आमच्यावर ओरडणं विसरायला लावत होती.

बिचारे हॅमेल मास्तर, आज त्यांचा शिकवण्याचा शेवटचा दिवस असल्याने आपले ठेवणीतले कपडे त्यांनी घातलेले. आता माझ्या लक्षात आलं की गावची थोर मंडळी आज शाळेत का आली आहेत ते! कारण या बातमीने ते देखिल दु:खी झालेले. तेही जास्ती शाळा शिकले नव्हते. ती बहुतेक त्यांची हॅमेल मास्तरांच्या चाळीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत होती, ही सेवा सुद्धा अशा देशाच्या भाषेची की जो देशच आता त्यांचा उरला नव्हता.
मी हा सगळा विचार करत असतानाच माझं नाव पुकारलं गेलेलं मी ऐकलं. आता वाचण्याची माझी पाळी होती. तो कृदन्ताचा नियम मला मोठ्याने, व्यवस्थितपणे आणि न चुकता म्हणता यावा म्हणून तेव्हा माझी काहीही द्यायची तयारी होती पण मी पहिल्याच शब्दावर अडखळलो आणि तसाच धडधडत्या हृदयाने, खालमानेने उभा राहिलो. हॅमेल मास्तर मला म्हणाले,

"मी तुला ओरडणार नाही, फ्रांज बाळा, तुझं तुलाच वाईट वाटलं पाहिजे. बघ कसं असतं, आपण रोज स्वतःला म्हणतो, ह्या! काय घाई आहे? माझ्याकडे खूप वेळ आहे, मी उद्या शिकेन आणि आता पहा बरं आपल्यासमोर काय मांडून ठेवलंय ते! हं, अल्साकची हीच सर्वात मोठी अडचण आहे, इथे सगळेजणच शिकायचं उद्यावर टाकतात. मग बाहेरची लोकं म्हणतात, हे असं कसं? तुम्ही स्वतःला फ्रेंच म्हणवता अणि तुमची स्वतःची भाषा तुम्ही लिहू तर शकत नाहीतच पण धड बोलूही शकत नाही. पण फ्रांज बाळा, तू काही फार वाईट मुलगा नाहीस, या सगळ्याचा दोष आम्हालाच लागणार आहे."

“तुमच्या पालकांचीच तुम्ही शिकावं अशी इच्छा नाही. ते तुम्हाला शेतात किंवा गिरणीत काम करायला प्रोत्साहन देतात कारण त्यामुळे थोडे जास्त पैसे मिळतात. आणि मी? मीसुद्धा काहीसा दोषी आहेच. मी तर तुमच्यापैकी कित्येकांना शाळेच्या अभ्यासाच्या वेळात माझ्या बागेला पाणी घालण्यासाठी पाठवलंय आणि कित्येक वेळा मला मासेमारीचा आनंद घ्यावासा वाटला म्हणून तुम्हाला सुट्टी नाही दिलीय?"

मग एकातून दुसरं असं करत करत हॅमेल मास्तर आपल्या फ्रेंच भाषेबद्दल बोलू लागले. त्यांनी सांगितलं की फ्रेंच भाषा जगातली सगळ्यात गोड भाषा आहे. सगळ्यात सुस्पष्ट आणि तर्कदृष्ट्या अचूक, आपल्याला आपल्या जीवाच्या आकांताने तिचं रक्षण करायला पाहिजे आणि कधीही तिचा विसर पडू देता कामा नये कारण जो पर्यंत आपण आपली भाषा उराशी जपून ठेवतो तोपर्यंत गुलामगिरीतून सुटण्याची किल्लीच जणू आपल्याजवळ बाळगतो. मग त्यांनी व्याकरणाचं पुस्तक उघडलं आणि तो धडा वाचायला सुरूवात केली. मला आश्चर्यच वाटायला लागलं कारण आता तोच धडा मास्तर वाचत असताना मला चांगल्यापैकी समजत होता. ते जे काही शिकवत होते ते सोप्पं वाटत होतं, फारच सोप्पं. मी विचार केला, इतक्या काळजीपूर्वक मी कधी पाठ ऐकलाच नव्हता की मास्तरांनी यापूर्वी इतक्या संयमाने कधी तसा शिकवला नव्हता? मला असं वाटू लागलेलं की जायच्या आधी हॅमेल मास्तरांना जितकं शक्य होईल तितकं जास्त शिकवायचं होतं, जणू सगळंच्या सगळंच, एकाच फटक्यात!

व्याकरणानंतर आमचा लिखाणाचा तास होता. त्या दिवशी हॅमेल मास्तरांनी आमच्यासाठी सुंदर, बाळबोध अक्षरात फ्रान्स, अल्साक, फ्रान्स, अल्साक असं लिहिलेले नवे कागद आणलेले. आमच्या वर्गात छोट्या छोट्या झेंड्यांप्रमाणे ते सगळीकडे अडकवले, आमच्या बाकड्यांवर छोट्या काठीवर लावले. तुम्ही त्यावेळी सगळ्यांना लेखन सराव करताना बघायला हवं होतं, किती शांतपणे तो सराव सुरू होता! जर कुठला आवाज होत होता तर तो केवळ लेखणीचा कागदावर होणारा! मधूनच काही फुलपाखरं नि भुंगे उडत उडत वर्गात आले पण एरवी अशावेळी दंगा करणारे आज एकदम शांत होते. कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. सगळे जण अक्षरं गिरवत होते. अगदी लहान बच्चेकंपनीनेही तिथे लक्ष दिलं नाही. ते देखिल आपला चित्रातला माशाचा गळ गिरवत होते जणू तो गळ म्हणजे फ्रेंच मूळाक्षरंच होती. आमच्या वर्गाच्या छतावर काही पारवे घुमत होते. माझ्या मनात विचार आला, आता या पारव्यांनाही ते जर्मन भाषेमध्ये घुमायला लावणार की काय?

जेव्हा जेव्हा मी मधूनच मान वर करून पाहिलं तेव्हा तेव्हा हॅमेल मास्तर मला स्तब्धपणे त्यांच्या खुर्चीवर बसून कधी इथे तर कधी तिथे असं बघताना दिसले, जणू मनात इथल्या वर्गातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची छबी टिपून घेत होते. बापरे! या एकाच जागी ते चाळीस वर्ष होते. बाहेरचा बगिचा आणि पुढ्यात सगळी मुलं, असंच, सलग चाळीस वर्ष! आता वर्गातली बाकडी वापरून वापरून गुळगुळीत झालेली, बगिच्यातली अक्रोडाची झाडं उचीने खूप वाढलेली आणि त्यांनी स्वतः रुजवलेली चमेली खिडकीवरून पार छतावर पसरलेली. त्यांच्या हृदयाला किती यातना होत असतील हे सारं सोडून जाताना? वरच्या मजल्यावरच्या खोलीत त्यांच्या बहिणीचा सामानाची बांधाबांध करतानाचा आवाज येत होता. नंतरच्याच दिवशी त्यांना देश सोडून जायचं होतं. पण मास्तरांमध्ये येवढा संयम होता की त्यांनी आमचा संपूर्ण पाठ आमच्याकडून शेवटपर्यंत म्हणून घेतला, मग लेखन करून घेतलं, इतिहासाचा धडा शिकवला मग लहान मुलांकडून बा बे बि बो बु वगैरे म्हणून घेतलं.

आमच्या वर्गात मागे बसलेला म्हातारबा हाऊजरही आपला चष्मा लाऊन आणि पुस्तक दोन्ही हातात धरून त्यातून अक्षरं वाचत होता. आम्ही बघत होतो की तो रडत देखिल होता, भावनावेगाने त्याचा आवाज चिरकत होता. तो इतका विनोदी वाचत होता की आम्हाला त्यावर हसावसं नि त्याचवेळी त्याच्यासारखं रडावसंही वाटत होतं. हं, तो अखेरचा पाठ मला किती व्यवस्थित कळलाय!!

त्याचवेळी अचानक चर्चच्या घड्याळाचे बारा वाजल्याचे टोले पडले आणि मग प्रार्थनेची घोषणा झाली. मागोमाग प्रशियन सैन्याच्या कवायतीच्या समाप्तीची धून वाजवणारी ट्रंपेट्स वाजली. हॅमेल मास्तर उदासपणे खुर्चीतून उठून उभे राहिले, तेव्हा इतके उंच ते मला आधी कधीच वाटले नव्हते.

"माझ्या मित्रांनो," ते बोलू लागले, "मी - मी -" पण त्यांचे शब्द घशातच अडकले. ते पुढे काही बोलूच शकले नाहीत. मग ते फळ्याकडे वळले, हातात खडू घेऊन त्यांच्या संपूर्ण आवाक्याने, मोठ्यात मोठ्या अक्षरात त्यांनी तिथे लिहिलं -

"फ्रान्स चिरायु होवो!"

आणि मग ते थांबले, भिंतीला रेलून उभे राहिले आणि एकही शब्द न बोलता आम्हाला आपल्या हाताने इशारा केला -
"शाळा सुटली, तुम्ही आता जाऊ शकता."
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(अल्फॉन्स दूदे यांच्या "द लास्ट लेसन" या कथेचा स्वैर अनुवाद)
छायाचित्रे आंतरजालावरून साभार

कथाआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

स्पा's picture

20 Dec 2011 - 12:15 pm | स्पा

मस्त अनुवाद प्रास

अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 7:54 pm | इंटरनेटस्नेही

.

किसन शिंदे's picture

20 Dec 2011 - 12:24 pm | किसन शिंदे

हेच म्हणतो अतिशय सुंदर अनुवाद केला आहे.

पियुशा's picture

20 Dec 2011 - 12:51 pm | पियुशा

मस्त अनुवाद !
आवडेश :)

मन१'s picture

20 Dec 2011 - 12:54 pm | मन१

आवडले.

किचेन's picture

20 Dec 2011 - 1:17 pm | किचेन

खूप आवडली.सुंदर भाषांतर.डोळ्यात पाणी आल.
शाळेतल्या शेवटच्या तासाची आठवण झाली.रविवारी जास्तीचा तास होता.इतिहासाचा.आमच्या मुख्याध्यापिकाच आम्हाला इतिहास शिकवायच्या.त्यादिवशी आम्ही सगळ्या फार अस्वस्थ होतो.आणि त्याच दिवशी शाळेत आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी रीमा लागूही आली होती.
फोटो बिटो काढायला कॅमेरा नव्हता.पण त्यांनी आणि बाईंनी तेव्हा सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही आठवल्या कि डोळ्यात पाणी येत.

यशोधरा's picture

20 Dec 2011 - 1:25 pm | यशोधरा

सुरेख अनुवाद.

>आता या पारव्यांनाही ते जर्मन भाषेमध्ये घुमायला लावणार की काय? >> :(

यशोधरा's picture

20 Dec 2011 - 1:26 pm | यशोधरा

दोनदा प्रकाशित झाल्याने प्रतिसाद काढून टाकला आहे.

गणपा's picture

20 Dec 2011 - 2:30 pm | गणपा

सुरेख अनुवाद केलायस.

स्मिता.'s picture

20 Dec 2011 - 4:18 pm | स्मिता.

अनुवाद आवडला. ही कथा आधी वाचल्यासारखी वाटत आहे.
मराठी मध्यमात शिकणार्‍या मुलांच्या इंग्रजीच्या ८वी-९वीच्या पाठ्यपुस्तकात आहे/होती का ही कथा?

अवांतरः आता या पारव्यांनाही ते जर्मन भाषेमध्ये घुमायला लावणार की काय? हे वाक्य वाचून वाईट वाटले. पण नंतर मनात आले की याची भरपाई म्हणून तर आता पारव्यांनाही फ्रेन्चमध्ये घुमायला लावत नसावेत ना?

आबा's picture

20 Dec 2011 - 4:32 pm | आबा

छान झालाय अनुवाद !
ज्ञानप्रबोधिनीच्या छात्रप्रबोधन मध्ये ही कथा वाचल्यासारखी वाटतेय.

स्वातीविशु's picture

20 Dec 2011 - 5:04 pm | स्वातीविशु

अनुवाद मनाला खुप भावला. सर्वकाही समोर घडत आहे, असे वाटले.

आत्मशून्य's picture

20 Dec 2011 - 5:25 pm | आत्मशून्य

Beautiful translation. Initial felling was like reading Sartre. Realy touched by this tale & its bottomline.... Thank you.

सविता००१'s picture

20 Dec 2011 - 6:24 pm | सविता००१

मस्त अनुवाद. आवडेश :)

पैसा's picture

20 Dec 2011 - 7:33 pm | पैसा

या कथेवर कोणत्यातरी युद्धाची सावली भरून आलेली कळते आहे. लहान मुलाच्या नजरेतून फारच छान मांडणी केली आहे. आणि त्यातील भावना आमच्यापर्यंत पोचवण्यात प्रास अत्यंत यशस्वी झाले आहेत. मस्त!

तिमा's picture

20 Dec 2011 - 7:51 pm | तिमा

कथा वाचताना अगदी गुंगून गेलो. त्या लहानग्याला आपल्या जबाबदारीची जशी जाणीव झाली तशी आपल्या देशातल्या लोकांना कधी होणार ? का त्यासाठी आपल्यालाही युद्धाची प्रत्यक्ष झळ लागली पाहिजे ?

आम्हाला ९ की १० वीला होता हा धडा.
अजून कथा पूर्ण वाचली नाहीय, पहिल्या काही ओळींमध्ये संदर्भ लक्षात आला.
आता निवांत वाचू म्हणे.

+१ कुठेतरी वाचलीये.पण नेमक कुठे ते आठवत नाही.

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 9:37 pm | अन्या दातार

तुम्ही आणि जयंतराव, दोघांनी मिळून अनुवादित कथांचे एक पुस्तकच काढा बघू!

क्रान्ति's picture

20 Dec 2011 - 10:02 pm | क्रान्ति

खूपच खास अनुवाद!

अर्धवटराव's picture

21 Dec 2011 - 12:00 am | अर्धवटराव

फारच सुंदर अनुवाद... आणि एक महत्वाचा संदेश..." इफ यु थिंक समथींग इज इंपोर्टंट, देन डू इट राइट नाऊ"
क्या बात है

(मराठी) अर्धवटराव

जयंत कुलकर्णी's picture

21 Dec 2011 - 9:10 am | जयंत कुलकर्णी

व्वा ! व्वा ! सुंदर ! काय बक्षीस देऊ तुम्हाला ........?

५० फक्त's picture

21 Dec 2011 - 10:15 am | ५० फक्त

जबरदस्त जबरदस्त आणि केवळ जबरदस्त लिखाण, युद्ध म्हणजे फक्त गोळ्या बंदुका अन मिसाईल नाही तर, त्या पलीकडेही बरंच काही असते हे समजवणारा धडा.

प्रास भाउ, तुमचे अतिशय आभार.