द्वंद्व
स्वर्गात शंकर-पार्वती आपल्या आसनावर विराजमान असताना खाली पृथ्वीवर पहात होते आणि पार्वतीच्या नजरेस एखाद गरीब ब्राह्मण पडतो आणि मग पुढे ती गोष्ट चालू होते.... अशा अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील. वरून बघतांना त्यांना आता ही शहरे कशी दिसत असतील आणि त्यात त्यांना माणसे दिसत असतील का ? असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच उभा रहातो. मला तर वाटते त्यांना ही शहरे एखाद्या मुंग्यांच्या वारूळासारख्या दिसत असतील. सध्या जसा मुंग्यांच्या वारूळाचा अभ्यास करण्यासाठी काचेच्या पेट्या असतात त्याप्रमाणे तेही खाली असलेल्या या मुग्यांच्या वारूळाचा अभ्यास करत असतील का ? दोन वारूळांमधील फरक त्यांना कळत असेल का ? शहरांमधील फरकामुळे त्यांची निश्चितच करमणूक होत असेल याबद्दल शंकाच नाही. खाली असलेल्या अनेक शहरांमधे मुंबई नामक शहर त्यांना आगळे वेगळे वाटत असणार हे निश्चित. माझ्या समोर बसलेल्या शाम देशपांडे आणि रत्नाकर चौघुले या दोन मित्रांशी गप्पा मारताना हाच विषय प्रामुख्याने चर्चेत होता. “मुंबई”
मुंबईत माणसांनी पक्षांची संख्या केव्हाच ओलांडली होती आणि तरीही मुंबईत माणसे येतच आहेत. पैसे कमवायला, पोट भरायला, आपली कला दाखवायला, शिकवायला, शिकायला आणि आपली स्वप्ने पुर्ण करायला माणसे मुंबईत आपली पूर आल्यासारखी ओसंडून वहात आहेत. काही जिवाची मुंबई करायला तर काही व्यवसाय करायला. काही उपाशी पोटी आली आहेत तर काही भरलेल्या पोटी आलेली आहेत. काही अर्थात कामानिमीत्तही आलेली आहेत. या सगळ्यांमुळे काय झाले आहे ते एकच. मुंबईची लोकसंख्या वाढली आहे.
पण प्रत्येक माणसाला मुंबईच्या फूटपाथवर पाऊल टाकताच एका गोष्टीची जाणीव होतेच ती म्हणजे येथे जगायचे असेल तर त्याला रोज लढाईला सामोरे जावे लागणार. ही लढाई कोणीतरी एक जिंकेतोपर्यंत लढले जाते. या लढाईच्या दोन फेर्यांमधे विश्रांती नाही. थोडक्यात ही लढाई सुरू झाली की दोघांपैकी एक संपल्यावरच संपते. तुम्ही भिकारी असा किंवा लक्षाधीश, येथे उतरला की ही लढाई तुमच्या नशिबात असतेच.
ही लढाई असते एका अतिताकदवान प्रतिस्पर्ध्याशी. त्याचे नाव आहे “ मुंबई” हो मुंबई! या शहराशीच ही लढाई लढावी लागते. या युद्धानंतर ठरते की तुम्ही मुंबईकर होणार का नाही, का रत्नागिरीकर, पुणेकर, दिल्लीवाले का अहमदाबादी....रहाणार..तुम्ही मुंबईच्या प्रेमात पडता किंवा तिचा द्वेष करता. त्यात सामावले जाता किंवा निष्ठूरपणे बाहेर फेकले जाता. मुंबई तुम्हाला नुसते फटकेच मारत नाही तर तिच्याकडे अजून एक अत्यंत घातक अस्त्र आहे. ती तुम्हाला मोहात पाडते. ती तुम्हाला दूर ढकलते, पाडते, आणि त्याच वेळी तुम्हाला प्रेमाने जवळही करते. तुम्हाला जेवायला घालते पण ते खायला वेळ देत नाही. तिच्या मायाजालात फसलात की तुमच्या मनात तिच्याविरुद्ध चाललेले युद्ध तुम्ही हरल्यात जमा असते.
बाकीच्या शहरात असे नसते हो!. त्या शहरात तुम्ही पाहुणे म्हणून सहज खपून जाऊ शकता. पुण्यात तुम्ही जा, कोल्हापूरला जा, दिल्लीला जा आणि तेथे खुशाल रहा. त्या शहरांशी तुमचे युद्ध होऊच शकत नाही. तुम्हाला माहीत असते की केव्हा ना केव्हातरी तुम्ही तुमच्या गावाला परत जाणार. अगदी म्हातारे झाल्यावरसुद्धा. पण मुबईत रहायचे म्हणजे तुम्ही एकतर मुंबईकर असता किंवा बाहेरचे असता. दोनच जाती. मी बाहेरचा आणि मुंबईत रहातो हे खर्या अर्थाने अशक्य !
मी, शाम देशपांडे आणि रत्नाकर चौघूले एकाच दिवशी मुंबईत येऊन उतरलो. चौघुले यांना पहिल्याच दिवशी खरोखरच फूटपाथवर मारामारीला सामोरे जावे लागले आणि त्यांचा ओठ फाटला तो त्यांना अजुनही त्या पहिल्या दिवसाची आठवण करून देतो आणि लढाई अजून संपली नाही याची जाणीव. देशपांडे एक चित्रकार आहेत. ते दोघेही कोल्हापूरजवळील एका खेडेगावातून मुंबईत अवतरले ते वेगवेगळी स्वप्ने उराशी घेऊन. चौघुलेंना धंदा करून भरपूर पैसा कमवायचा होता तर देशपांड्यांना आपल्या कलेची समाजाला जाणीव करून द्यायची होती. ते मुंबईत आल्यापासून मी मुंबईला आल्यामुळे जवळजवळ चारएक वर्षांनी आम्ही एकामेकांना भेटत होतो.
“रत्नाकर ! तू लेका संपल्यात जमा आहेस. या शहराने तुला गिळून टाकले आहे. तुझ्या व्यक्तिमत्वाच्या चिंध्या करून तिने त्या येथे विखरून टाकले आहेत म्हणेनास ! या शहरातील कोट्यावधी लोकांमधला एक अशीच आता तुझी ओळख राहिली आहे. त्यांच्यातून तुला ओळखायचे तर तुझ्या मोबाईल नंबरवरूनच ओळखता येईल, एवढीच काय ती तुझी ओळख. खरे तुझे नाव रत्नाकर नसून ९८२४२४०९८० आहे असे सांगितले तरी चालेल आता”.
“शामराव ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ अजून तुम्हाला गावी परतण्याची इच्छा आहे वाटते. मी आपला येथेच ठीक आहे. क्रॉफर्ड मार्केट हेच माझे गाव आता. मलाही तुझ्यासारखेच वाटायचे पहिल्यांदा. पण मी तेव्हा मुंबई खर्या अर्थाने बघितलीच नव्हती असे म्हटले तरी चालेल. असो. काळा घोडा संगीत महोत्सवाला गेला आहेस का कधी ? मलाही माहीत नव्हता. माझ्या बायकॊनेच पाठ्वले होते एकदा मला तेथे. संगीताची मेजवानी रे ! जा एकदा !”
“रत्नाकर, तुला आठवते का आपण जेव्हा मुंबईत यायचे ठरवले तेव्हा काय बोललो होतो ते ? आपण मुंबईत येऊन मुंबई जिंकायची पण मुंबईला आपल्यावर स्वार होऊन द्यायचे नाही असे ठरवले होते. ते विसरलास की काय एवढ्या लवकर ? पण मुंबईनेच तुला जिंकलेले दिसते आहे. बुडलास तू मुंबईत हेच खरे !”
“तू काय बोलतो आहेस ते मला कळत नाही. मी गावातल्यासारखे कपडे करत नाही हे मान्य. माझ्या व्यक्तिमत्वाच्या चिंध्या झाल्यात असे तू म्हणतोस हेही मान्य पण त्या शिवून त्याची एक छान गोधडी शिवलेली आहे हे तुझ्या लक्षात येत नाही का रे? आणि त्या गोधडीत उब आहे हे कसे नाकारणार ? मुंबईत रहायचे तर मुंबईकरांसारखेच रहायला पाहिजे ना ! मी तर येथे खूष आहे. बक्कळ पैसा मिळवतोय, अजून काय पाहिजे यार ! तू का मुंबईच्या विरूद्ध आहेस ते काही कळत नाही”
शाम देशपांड्यांनी एखाद्या अजाण बालकाकडे पहावे तसे रत्नाकर चौघूल्यांकडे नजर टाकली. कसे समजावे या माणसाला असा भाव त्यांच्या चेहर्यावर उमटला.
“मुंबई म्हणजे एक जळू आहे जळू ! ही रक्त पिते गावांचे. जो कोणी येथे येतो त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देते. जर तुला जळू हा शब्द योग्य वाटत नसेल तर तू तिला जगन्नाथाच्या गाड्याची उपमा देऊ शकतोस. सगळे याला जुंपलेले असतात. ही एक पुतना मावशी आहे, तुम्हाला विषारी दुध पाजणारी. कोणाला रहायचे आहे येथे ?, रत्नाकर बघशील तू मी या महामायेला कधीच शरण जाणार नाही. मी नाही जिंकून देणार तिला. मी मुंबईचा द्वेष करतो. माझ्या मनात तिच्याबद्दल घृणेशिवाय दुसरे काहीही नाही. तु मात्र ही लढाई हरला आहेस ! पराभूत ! एखादे चिनी कृत्रीम चकचकीत फुल नकोय मला. मला आपल्या परसातील शेवंती पाहिजे आहे. मी तीच मिळवणार शेवटी. मी उद्याच हे शहर सोडणार आहे........
“विचार कर ! काय ठेवले आहे त्या गावात ? मी पुढच्याच महिन्यात एक फार्म हाऊस घेणार आहे मस्त !”
तेवढ्यात रत्नाकरचा फोन वाजला आणि तो बोलायला उठून जरा दूर गेला. आता मी आणि शाम एवढेच राहिलो. त्याच वेळी शामरावांचाही फोन वाजला. फोन घेताना त्याचे डोळे चमकत होते आणि चेहर्यावर हसू पसरले होते. फोन संपताच त्याने लगेचच त्याच्या बायकोला फोन लावला “ हे बघ सुधा मी उद्या येऊ शकेन असे वाटत नाही. माझे एक चित्र एका उद्योगपतीला विकत घ्यायचे आहे आणि अजूनही बरीच चित्रे पाहिजे आहेत म्हणे त्याला. त्यापेक्षा तु असे कर ना, तुच इकडे ये !”
ही काही एखादी फार करमणूक करणारी गोष्ट नाही. पण मला प्रश्न पडलाय मुंबईशी झालेली लढाई कोणी जिंकली हा ! शामरावने का रत्नाकर चौघुल्यांनी ? का.....
हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे..... बघा आपल्याला उत्तर सापडते आहे का.......
जयंत कुलकर्णी
O Henry च्या The Duel या कथेचे स्वैर भाषांतर.
प्रतिक्रिया
14 Dec 2011 - 1:05 am | यकु
विलियम सिडनी पोर्टर उर्फ ओ. हेन्री हा इंग्लिशमधला आपला अत्यंत आवडता लेखक.. :)
अमेरिकेचा मोंपासा.
त्याच्या इंग्लिश कथा वाचायच्या म्हणजे इंग्रजी शब्दकोश जवळ घ्यावा लागतोच लागतो; तरी त्याचे शब्द सापडतीलच याची खात्री नाही.
जयंतरावांचा या कथांना भारतीय चेहेरा देण्याचा प्रयत्न खूप आवडला..
चपखल कथांच्या प्रतिक्षेत.
13 Dec 2011 - 8:57 pm | आदिजोशी
मुंबई जिंकली, नेहेमीसारखीच.
13 Dec 2011 - 9:42 pm | प्रास
सुंदर भाषांतर.
तुम्ही सांगेपर्यंत हे भाषांतर आहे असं वाटलंच नाही. तुमच्या भाषांतराच्या शैलीला ओ. हेन्रीच्या लेखनशैलीप्रमाणेच कुर्निसात!
आवडले.
बाकी मुंबई नेहमीच जिंकत आलीय आणि जिंकत राहिल पण महत्त्वाचं हे आहे की तिला आह्वान देणारेही नव्या जोमाने येतच असतात. तेव्हा मुंबई कधी थकतेय हेच बघणे हातात. अर्थात अजूनही मुंबईचा दमखम बाकीच आहे.
तुमचा फ्यान :-)
13 Dec 2011 - 10:36 pm | मन१
तुम्ही सांगेपर्यंत हे भाषांतर आहे असं वाटलंच नाही.
+१
आवडले.
13 Dec 2011 - 10:07 pm | देविदस्खोत
मुंबईविषयी ओघवत्या भाषेत एक चिरंतन सत्य लिहिलेत !!!! मनाला पटले !!!!!
13 Dec 2011 - 11:59 pm | ५० फक्त
जबरदस्त लिहिलंय तुम्ही सर. धन्यवाद.
14 Dec 2011 - 1:10 pm | विलासराव
आमचीही लढाई चालुच आहे अजुन........
14 Dec 2011 - 1:20 pm | गवि
खास.. चपखल...
उत्तम , उत्कृष्ट...
14 Dec 2011 - 2:19 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद मित्रांनो !
पण एक लक्षात आले का .... जिंकला तो लेखक... म्हणजे ज्याने ही गोष्ट सांगितली आहे.
//ही काही एखादी फार करमणूक करणारी गोष्ट नाही. पण मला प्रश्न पडलाय मुंबईशी झालेली लढाई कोणी जिंकली हा ! शामरावने का रत्नाकर चौघुल्यांनी ? का...............////
या का मधे उत्तर आहे !
14 Dec 2011 - 3:27 pm | गवि
एक्स+१ सिंड्रोम असं म्हणून परदेशस्थ लोकांबाबत चर्चा होते..
इथे दिसतंय की सर्वच स्थलांतरांच्या पातळ्यांवर हा सिंड्रोम आहे..
उदा. कोकणातल्या जाकादेवी किंवा देशावरच्या डिग्रज गावातून निघून रत्नागिरी किंवा कोल्हापूर....
..तिथून निघून मुंबई..
..मुंबईहून अमेरिका..
प्रत्येक नव्या आणि तुलनेत मोठ्ठ्या ठिकाणी राहताना सोडून परत जावंसंही वाटतं पण जाववतही नाही..
जाववत नाही हे समजून घ्यावं आणि परत जावंसं वाटण्याची इच्छा ही एक फँटसी समजावी.. सोयीसाठी ठेवावी लागणारी.
आणि जिथून "जाववत नाही" तिथे रहावं...
..मग जिंकेना मुंबई..काय ** फरक पडतो..?
14 Dec 2011 - 10:39 pm | जयंत कुलकर्णी
आपला प्रतिसाद वाचून आयन रॅंडचे एक प्रसिद्ध वाक्य आठवले -
Contradiction do not exist, if you find any, check your premises.
अर्थात हे तुम्हाला उद्देशून नाही हे आपण लक्षात घ्याल अशी आशा आहे, वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद गवि !
14 Dec 2011 - 4:06 pm | मोहनराव
खुप छान भाषांतर केले आहे. लेख आवडला.
14 Dec 2011 - 7:02 pm | आत्मशून्य
मुंबईशी लढाइ एकाने सॉलीड जिंकली तर दूसर्याने सपशेल हारली... बाकी कोण जिंकल कोण हारलं हे सांगाणारा मि कोण ?
14 Dec 2011 - 8:53 pm | कापूसकोन्ड्या
.तिथून निघून मुंबई..
मुंबईहून अमेरिका..
प्रत्येक नव्या आणि तुलनेत मोठ्ठ्या ठिकाणी राहताना सोडून परत जावंसंही वाटतं पण जाववतही |नाही. जाववत नाही हे समजून घ्यावं आणि परत जावंसं वाटण्याची इच्छा ही एक फँटसी समजावी.. सोयीसाठी ठेवावी लागणारी.
आणि जिथून "जाववत नाही" तिथे रहावं...
अगदी अगदी केवढे मोठे सत्य सांगून गेलात हो गवि.