वसा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
8 Dec 2011 - 3:56 pm

कुणा माहिती काल होतो कसा?
मला मीच ना आठवे फारसा !

प्रवाहातल्या ओंडक्यासारखा,
किती दूर वाहून आलो असा

दगा देतसे सावलीही मला,
भरोसा करावा कुणाचा कसा?

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !

खरा चेहरा दाखवू पाहता,
चरे पाडले, फेकला आरसा

नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा?

उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !

शांतरसगझल

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Dec 2011 - 3:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

रचना मनापासून आवडली.

आह्हा! सगळेच शेर सुरेख आहेत! मस्त!

अतिशय आवडल्या गेले आहे.

सूड's picture

8 Dec 2011 - 4:15 pm | सूड

दो आ प्र का टा आ

गवि's picture

8 Dec 2011 - 4:17 pm | गवि

खूपच सुंदर... आवडले..

साधं सोप्पं सुंदर काव्य.

जाई.'s picture

8 Dec 2011 - 4:30 pm | जाई.

छान

चित्रा's picture

8 Dec 2011 - 6:27 pm | चित्रा

>खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
>इथे कोरडा मी जसाच्या तसा !

हे विशेष आवडले.

प्रचेतस's picture

8 Dec 2011 - 10:13 pm | प्रचेतस

सुंदर काव्य, आवडले.

पैसा's picture

8 Dec 2011 - 10:17 pm | पैसा

गझल आवडली. नव्या कवीनी ही अवश्य वाचावी असं सांगेन. किंबहुना क्रान्तिचं जेवढं लिखाण मिळेल तेवढं वाचावं आणि मग आपल्या कविता प्रकाशित कराव्यात!

पाषाणभेद's picture

9 Dec 2011 - 7:49 am | पाषाणभेद

>>.....जेवढं लिखाण मिळेल तेवढं वाचावं आणि मग आपल्या कविता प्रकाशित कराव्यात!

प्रतिसाद अस्थानी असेल पण आजकाल येथे कवितांच्या कुटूंबनियोजनाचे व कविताभॄणहत्तेचे जे प्रयत्न चालू आहेत ते सारे कवि अन कवितांना मारक आहेत हे नक्की. गाजलेल्या कविता दिसतात पण त्या कविता येण्यापुर्वी लिहीलेले कागदी बोळे दिसत नाहीत. नविन कविंनी प्रयत्नच करू नये काय? की एकदम सेलेबल प्रॉडक्टच येथे अपेक्षीत आहे. संपादक या नात्याने सर्व थराच्या लेखकांना बरोबर घेणे गरजेचे आहे.

पैसा's picture

9 Dec 2011 - 10:44 am | पैसा

पाभे, हे कुटुंबनियोजन नाही किंवा भ्रुणहत्याही नाही. त्यां नवोदितांच्या भल्यासाठीच सांगत आहेत सगळेजण. निदान मी तरी. तुमच्या कवितांना कोणी कधी नावं ठेवलीत का? नाही ना? इथे सेलेबल प्रॉडक्टचा प्रश्नच नाही. कोणी काही विकत नाही आणि विकत घेत नाही. सर्वचजण हौशी लेखक्/कवी आहेत (एखादे रामदास किंवा क्रान्ति सोडून). उत्तम लिहिणार्‍यांचा अभ्यास करा म्हटलं तर त्यात चूक ते काय? नव्या कवीनी लिहू नका असं मी कुठे म्हटलंय का? उलट कोणत्याही नव्या कवीला जे ४/५ प्रतिसाद येतात त्यात माझा एक नेहमीच असतो. मी आवर्जून जे काही चांगलं वाटलं ते लिहिते. तसंच चांगलं वाचा हेही सांगितलं त्यात एवढा बाऊ करण्यासारखं काही नाही. तरीही तुम्हाला दुखावलं असेल तर क्षमा मागते. त्यातून लेखांवरच्या प्रतिक्रिया संपादक लिहितात तेव्हा त्या वैयक्तिक एक सदस्य म्हणूनच लिहिलेल्या असतात, संपादक मंडळाचं जे काही म्हणणं असेल ते संपादक मंडळ या आयडीनेच लिहिलं जातं हे कृपया समजून घ्या. :)

पाषाणभेद's picture

9 Dec 2011 - 4:02 pm | पाषाणभेद

अहो ताई राग वैगेरे काही नाही. कृपया मनातले टाका. माझा याच प्रतिसादाला लिहीलेले उत्तर छापले गेलेले दिसत नाही. त्यात विस्तारीत रित्या लिहिलेले होते. आपले प्रतिसाद देण्याचे प्रयत्न समजतात.
>> निदान मी तरी. तुमच्या कवितांना कोणी कधी नावं ठेवलीत का?
येथे वैयक्तिकरित्या काहीच घेतलेले नाही. तुम्हीही घेवू नका. माझे म्हणणे केवळ हेच आहे की कविता करणे हे एक लेथ मशीन नाही की त्यातून एकसारखा जॉब बाहेर पडेल.

चित्रा's picture

9 Dec 2011 - 6:44 pm | चित्रा

मशीनमधूनही चांगले कपडे येतात आणि हाताने शिवलेले कपडेही सुरेख असू शकतात. शिलाई ओबडधोबड का होईना, पण पक्की असली की झाले. किंबहुना मशीनप्रमाणे कविता नकोत हाच आग्रह आहे.

मी मागेही सांगितले आहे - येथे येणार्‍या कवितांच्या फलकावरील कवितेची यादी क्रिकेटच्या फलकावरच्या धावांपेक्षाही जलद गतीने बदलत असते. रोज अनेक संस्करण न केलेल्या कविता आलेल्या दिसतात, त्यांच्या मार्‍यात चांगल्या कविता खाली कुठेतरी चटकन निघून जातात. तुम्ही म्हणता तसे सगळे कवी कवितांच्या कागदांचे अनेक बोळे आधी फेकून देत असतील तर अशा मंथनातून निघालेली कविता ही निदान थोडीतरी वाचनीय असायला हवी? तसे नसते म्हणून तर हे लिहीले गेले आहे. प्रोत्साहन देताना सातत्याने नुसतेच प्रोत्साहन दिले गेले आणि मार्गदर्शन लाभले नाही, तर सुधारणा अजिबातच शक्य नाही.

नव्या-जुन्याचा माझ्या मते हा प्रश्न नाही. काही नवे कवी/लेखक जुन्या कवी/लेखकांपेक्षा कधी सकस लिहीतात, तर कधी जुने अधिक सफाईने लिहीत असतात. त्यामुळे हा नवे विरूद्ध जुने असा काही संघर्ष आहे असे समजता येत नाही.

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !

उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !

हे दोन विशेष आवडले! :)

-रंगा

इन्दुसुता's picture

9 Dec 2011 - 6:00 am | इन्दुसुता

फारच छान. आवडली.

<< प्रवाहातल्या ओंडक्यासारखा,
किती दूर वाहून आलो असा

दगा देतसे सावलीही मला,
भरोसा करावा कुणाचा कसा?

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा ! >>

हे विशेष आवडले ....

काही रचनाच अशा असतात की प्रतिसाद दिल्यावाचून चैन पडत नाही.
ही रचनाही त्यातलीच एक. सगळेच शेर सुंदर आहेत.
त्यातही हा शेर खूप आवडला -

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !

राघव

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 2:09 pm | पक पक पक

याचा अर्थ काय.....?

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 2:12 pm | पक पक पक

काही रचनाच अशा असतात की वाचुन छान वाटते........काव्य खुप आवडले...

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 2:15 pm | पक पक पक

वल्लि आणी अन्या दातार , यात काहि गैर नाहि ना...?

प्रचेतस's picture

10 Dec 2011 - 3:16 pm | प्रचेतस

गैर काहीच नाही हो,
तुम्ही अगदी बिन्धास १०० प्रतिसाद द्या की. मालकांनी आपल्याला मिपा फुकट वापरायलच दिलंय ना.

मास्तर लोकं रागवतात हो शुद्धलेखन चुकले कि...........

हरिकथा's picture

11 Dec 2011 - 10:36 pm | हरिकथा

काव्य छान आहे. सगळ्या साध्याशा कल्पना काहीसे असामान्य भाव प्रदर्शित करत असल्यासारखे वाटत आहेत.
कवयित्री उत्तम तयारीच्या वाटतात.
इथे चांगले काव्य वाचायला मिळते आहे.
धन्यवाद.

दत्ता काळे's picture

12 Dec 2011 - 10:37 am | दत्ता काळे

कविता आवडली.

क्रान्ति's picture

13 Dec 2011 - 1:30 pm | क्रान्ति

शतशः धन्यवाद !

सोनल कर्णिक वायकुळ's picture

14 Dec 2011 - 10:47 am | सोनल कर्णिक वायकुळ

सुन्दर सुन्दर्...बर्याच दिवसानी एक चान्गली कविता वाचल्याच समाधान मिळाल.