भेट !
३० जून १९४३.
बॅलार्ड पिअरच्या पोस्टऑफिसच्या समोर जो रस्ता आहे, तेथे तो पोलीस नेहमीप्रमाणे करडी गस्त घालत होता. खांद्यावरच्या तार्यांनी तो एक आधिकारी आहे हे सहजच लक्षात येत होते. तसा रस्त्यावर शुकशुकाटच होता. पण त्याला काय फरक पडणार होता म्हणा. तो त्याचे काम सवयीने चोख पार पाडत होता. रात्रीचे १० वाजायला आले होते आणि हवेतला गारठा ही उत्तरेकडे झुकत होता. समुद्रावरचे गार वारे सुटले होते आणि पावसाच्या शक्यतेने त्या रस्त्यावर नेहमी असणारे नेहमीचे लोकही आज गायब होते.
दरवाजांकडे लक्ष देत स्वारी हातातील दंडुका मधेच गरागरा फिरवत डौलात चालली होती. त्याच्या त्या हालचालीतून एक प्रकारचा आत्मविश्वास डोकावत होता आणि एवढेच काय त्याच्याकडे पाहणार्यार माणसाच्या मनातही सुरक्षितता वाटावी असे त्याचे व्यक्तिमत्व होते. त्या रस्त्याचा तो तारणहार आहे आणि तेथील शांतता त्याच्यामुळेच आहे असे कोणालाही वाटले असते. त्या रस्त्यावर विशेष कोणी रहात नसे कारण तो भागच सगळा कार्यालयांचा होता आणि ती तर संध्याकाळीच लवकर बंद होत असत. आपणही संध्याकाळी सातनंतर कधी त्या भागात गेलात तर आपल्यालाही ती शांतता लगेचच जाणवेल. अर्थात एखादे सिगारेटचे दुकान उघडे दिसते पण बाकी सगळीकडे एक प्रकारचे उदासीन वातावरण भरून राहिलेले असायचे. माणसांचा वावर नसला की असे होते हेच खरे.
एका इमारतीसमोर त्या पोलिसाचा चालण्याचा वेग एकदम मंदावला. एका हार्डवेअरच्या दुकानासमोर एक माणूस दरवाजाला टेकून उभा होता. आपल्या पोलिसाइतकाच रुबाबदार. त्याच्या ओठांमधे त्याने एक न पेटवलेला चिरूट सवयीने अगदी सहज धरला होता. पोलिसाने त्याच्याकडॆ पावले टाकलेली पाहून त्याने लगेचच तो चिरूट ओठातून काढला व पोलिसाच्या प्रश्नार्थक चेहर्यानकडे बघत तो घाईघाईने म्हणाला
“अहो काही विशेष नाही. मी माझ्या मित्रासाठी थांबलोय. तुम्हाला गंमत वाटेल, आमची ही भेट आम्ही २० वर्षापूर्वी ठरविली होती. अर्थात तुम्हाला यात काही संशयास्पद वाटत असेल तर मी तुम्हाला सगळं सांगतोच कसं !”
त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला “ या इथे, आता हे दुकान आहे ना, त्यावेळी एक हॉटेल होते. त्याचे नाव ग्रीनवुड. एक पारशी चालवायचा ते.”
“हं पाच वर्षांपर्यंत होते ते येथे. नंतर बंद पडले ते. तो म्हाताराही गेला”.
त्या माणसाने हातातील चिरूट परत ओठात ठेवला आणि त्याने तो काडीने पेटवला. त्या पेटणार्या काडीच्या आवाजाने पोलिसाचे लक्ष क्षणभर त्यावर केंद्रित झाले आणि उजळणार्या प्रकाशात पोलिसाला त्याचा चेहरा नीट बघता आला. पांढुरकी त्वचा, रूंद जबडा आणि उजव्या भुवईवर एक जखम लक्षात राहील अशी होती. अजून एक वस्तू निष्काळजीपणे त्याने स्कार्फवर लावली होती. “एक मोठा हिरा”.
२० वर्षापूर्वी मी येथे, या ग्रीनवुडमधे माझ्या जिवलग मित्राबरोबर, कर्वेबरोबर जेवण करत होतो. मुंबईत आम्ही दोघे सख्ख्या भावासारखे वाढलो. मी असेन १८ वर्षाचा आणि तो असेल २०. दुसर्याच दिवशी मी आफ्रिकेला माझे नशीब आजमावयाला जाणार होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो माझ्याबरोबर का नाही आला. पण कर्वेला हे बाँबे म्हणजे प्राणाहून प्रिय. याशिवाय दुसरे जग आहे यावर त्याचा विश्वासच नव्हता. पण त्या रात्री आम्ही, कुठल्याही परिस्थितीत, कुठेही असलो तरीही, कितीही प्रवास करायला लागला तरी एकामेकांना २० वर्षानंतर येथेच त्याचवेळी भेटायचे वचन दिले होते. २० वर्षांनंतर आम्ही आमच्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेले असू असा आमचा त्यावेळी विश्वास होता. अर्थात आर्थिक परिस्थितीचा या भेटीशी कसलाही संबंध नव्हता. ती कशीही असली तरीही भेटायचेच असेही ठरले होते.”
“अरे व्वा ! फारच मजेशीर ! २० वर्षांनंतर म्हणजे कमालच आहे. पण काय हो ! तुम्ही या मित्राबद्दल मधे काही ऐकले असेलच की !.”
“काही काळ आमच्यात पत्रव्यवहार होत होता, पण दोन वर्षांनंतर आमचा संपर्कच राहिला नाही. परक्या देशात कितीही काम केले तरी कमीच पडते, आणि आफ्रिकेतून मी अरब देशातही धंदा वाढवला होता. मीही माझ्या धडपडीत बुडून गेलो होतो. आताही मी माझी कामे कशीबशी आटोपून आलो आहे. कारण एकच ! माझा मित्र मला येथे भेटणार हे निश्चित. जगातील माझा सगळ्यात चांगला, प्रामाणिक मित्र वचन मोडेल, हे अशक्य ! या रात्री यावेळी येथे येण्यासाठी मी हजारो मैल प्रवास करून आलो, माझा मित्र भेटला तर माझ्या या कष्टाचे चीज झाले असे मी म्हणेन.”
त्या माणसाने शर्टाची बाही थोडी मागे करून घड्याळात वेळ बघितली, तेवढ्यात त्या घड्याळाच्या भोवती असलेले हिरे लखलखलेले त्या पोलिसाच्या नजरेत भरले.
“१० ला तीन मिनिटे कमी आहेत. ग्रीनवुडच्या दरवाजात आम्ही एकमेकांचा निरोप घेतला तेव्हा बरोबर १० वाजले होते.
“आपण आफ्रिकेत हिर्याच्या व्यापारात रग्गड पैसा मिळवलेला दिसतोय ! पोलीस म्हणाला.
“खरंय ! कर्वेनेपण चांगला कमावला असेल अशी खात्री आहे. तसा तो कष्टाळू, प्रामाणिक माणूस होता. मला मात्र परदेशात कसल्या कसल्या माणसांना तोंड द्यावे लागले याची कल्पना आपल्याला यायची नाही.”
पोलिसाने आपल्या दंडुक्याला दोन/तीन गिरक्या दिल्या आणि त्याने पुढे जाण्यासाठी पावले टाकली.
“चला निघतो मी आता. येईल तुमचा मित्र. काळजी करू नका. बरोबर १० वाजता या प्रकरणावर पडदा टाकणार की काय तुम्ही ?”
“नाही, नाही. तसेच काही नाही. अजून अर्धा एक तास थांबेन म्हणतो मी. कर्वे जर जिवंत असेल तर तेवढ्या वेळात तो यायलाच पाहिजे. तसा वेळेचा पक्का आहे तो.”
“ठीक आहे. आपल्याला शुभेच्छा.” असे म्हणून पोलिसाने गस्तीसाठी आपली पावले उचलली आणि त्याची नजर परत रस्त्याचा आणि इमारतींच्या दरवाजांचा वेध घेऊ लागली.
वातावरण कुंद होऊन आता पावसाचे थेंब पडायला सुरवात झाली होती. मुंबईचा पाऊस आणि समुद्रावरचा वारा, थोड्याच वेळात वातावरण संपूर्ण बदलून गेले आणि रस्त्यावर जी काही वर्दळ होती तीही अंतर्धान पावली. घरी परत जाणार्या उरलेल्या माणसांनी आपल्या छत्र्या उघडल्या आणि पावसाचा मारा चुकवत ते घाईघाईने परतीचा मार्ग धरू लागले, तर काहींनी आपले रेनकोट सावरले आणि टोप्या कानावर ओढल्या. अखेरीस पावसामुळे दिव्यांचा प्रकाशही मंद पडू लागला.
पोलिसाने आपला रस्ता धरला आणि त्या अफ्रिकेहून आलेल्या माणसाने शांतपणे आपला चिरूट ओढायला सुरवात केली. त्यातून निघणारी धुरांची वलये त्या पावसात आळसावून वर जात होती. आफ्रिकेतून इतक्या लांब आलेला तो माणूस त्या वलायांखाली शांतपणे वाट बघत उभा होता.
वाट पहात वीस एक मिनिटे झाली असतील तोच एक रेनकोट घातलेला उंच माणूस रस्ता ओलांडून आला. त्याने झोडपणार्या पावसापासून स्वत:चा चेहरा टोपीने आणि रेनकोटच्या कॉलरने झाकून घेतला होता. तो सरळ त्या आफ्रिकेतून आलेल्या माणसापाशी गेला.
“राजू शर्मा का ? त्याने शंका प्रदर्शित केली.
“कर्व्या, ओळखले नाहीस का मला ? मीच ! राजू !.” तो माणूस आनंदाने ओरडत म्हणाला.
“अरे देवा ! वीस वर्षे झाली. पण मला खात्री होती की तू जर जिवंत असलास तर मला भेटणारच. अरे काय, कसे काय चालले आहे तुझे..... ग्रीनवुड बंद पडले रे. ते असते तर त्याच टेबलावर बसून आपण बिअर पित गप्पा मारल्या असत्या.... काय म्हणते आफ्रिका....”
“कर्वे, आफ्रिकेने मला सगळे काही दिले पण तुझ्यासारखा मित्र नाही दिला. पण तुझी तब्येत खूपच सुधारली आहे रे. आणि जरा उंचही दिसतोएस. हं काय करतोस सध्या ? मुंबईतच का ? का अजून कुठे ?”
“ठीक चालले आहे. सरकारी नोकरीत आहे. म्हणजे जास्त काही सांगायला नको.” चल रे राजू, दुसरीकडे बसू आणि गप्पा आणि बिअर.. हाणू..”
“ठीक चल ! चल !
ती दोन माणसे फूटपाथवरून मरीन ड्राईव्हच्या दिशेने चालू लागली. बोलता बोलता त्यांनी आपले हात एकामेकांच्या हातात केव्हा गुंफले हे त्यांनाच कळले नाही. शर्मा त्याच्या आफ्रिकेतील करामती रंगवून सांगत होता आणि कर्वे त्या लक्ष देऊन ऐकत होता आणि कर्वेकडे तसे सांगण्यासारखे होतेच काय ? चौकात आल्यावर दिव्यांच्या लखलखाटात त्यांनी एकामेकांकडे नजर टाकली.
शर्मा जागच्या जागी थांबला आणि त्याने आपला हात पटकन सोडवून घेतला.
“तू कर्वे नाहीस. वीस वर्षे झाली पण माणसात एवढा बदल होत नाही आणि तुझे नाक एकदम फताडे होणे तर शक्यच नाही. कोण आहेस तू ?”
“बरोबर आहे नाक बदलणे शक्य नाही पण चांगला माणूस वाममार्गाला लागू शकतो. पटणी उर्फ राजू शर्मा आपण गेले १० मिनिटे माझ्या अटकेत होतात. इंटरपोलचा आम्हाला कालच संदेश आला की आपण मुंबईला येणार आहात. मला वाटते आपण शांतपणे माझ्या स्वाधीन व्हावे हे बरे. आणि हो मघाशी आपल्याला जो पोलीस भेटला त्याने आपल्याला एक चिठ्ठी दिली आहे. ती वाचण्यापुरती मी आपल्याला वेळ देतो. असे म्हणून त्याने ती चिठ्ठी आपल्या कैद्याकडे दिली. आफ्रिकेतून आपल्या मित्राला भेटायला आलेल्या त्या माणसाने आपल्या थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उजेडात धरली आणि तो वाचू लागला...
.
राजू,
मी ठरलेल्या वेळी ग्रीनवुडच्या समोर हजर होतो. चिरूट ओढायच्या वेळी तू जी काडी पेटवलीस त्याच्या प्रकाशात मला तुझा चेहरा पूर्ण पाहता आला आणि मी ताबडतोब ओळखले की इंटरपोलला हवा असलेला माणूस तूच आहेस. पण मला तुला अटक करणे शक्य नव्हते. तू मला ओळखले नाहीस म्हणून मी तुला अटक करायला माझ्या जोडीदाराला पाठवत आहे.
मित्रा, शक्य झाल्यास या मित्राला क्षमा कर.
तुझा,
कर्वे.
ओ हेन्रीच्या कथेचे भाषांतर.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
3 Dec 2011 - 10:05 pm | अन्या दातार
केवळ अप्रतिम!!!!
3 Dec 2011 - 10:58 pm | दादा कोंडके
ओ हेन्रीच्या छोट्या छोट्या कथा वाचायला खूप मजा येते. भाषांतर पण छान जमलंय!
3 Dec 2011 - 11:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे
कुलकर्णी साहेब, गोष्ट मस्त लिहिली आहे. एकदम डोळ्यासमोर सगळे चित्र उभे राहते. फार छान.
एक निरीक्षण, एप्रिल महिन्यात मुंबईत रात्री दहा वाजता गारवा सध्या नसतो आणि पाऊस तर नसतोच नसतो. १९४३ साली गारवा असेल कदाचित पण पावसाचे जरा कठीण वाटते. (त्यातून सगळे छत्री आणि रेनकोट घेऊन होते याचा अर्थ रेग्युलर पावसाचा सीझन होता.)
योग्य तो बदल केला आहे.
-संमं.
4 Dec 2011 - 12:48 am | श्रीरंग_जोशी
हिच कथा १९९६/९७ साली लोकसत्तेच्या लोकरंग मध्ये छापून आली होती. ती मात्र २ अमेरिकन मित्रांबाबतच होती. फारच ह्रुदयस्पर्शी कथा. कधीच न विसरता येणारी.
आपले मनापासून आभार.
4 Dec 2011 - 8:50 am | रेवती
कथा आवडली.
साधारण आठव्या नवव्या यत्तेत असताना अश्या कथा वाचायला आवडत असत.
आत्ताही त्यावेळची आठवण आली आणि छान वाटले.
4 Dec 2011 - 10:06 am | जाई.
ओ हेन्रीच्या कथा छान असतात
तुमचा अनुवादही आवडला
4 Dec 2011 - 7:18 pm | पक पक पक
झकास !! मस्त !!! अप्रतिम !!! कुलकर्णी साहेब अनुवाद खुप आवडला .
4 Dec 2011 - 7:32 pm | प्रचेतस
सुंदर कथा.
ओ हेन्रीच्या अजूनही काही कथांचे अनुवाद येऊ द्यात.
5 Dec 2011 - 3:28 pm | नगरीनिरंजन
सहमत आहे.
येऊ द्या अजून.
4 Dec 2011 - 7:36 pm | देविदस्खोत
वा वा साहेब कथा खुपच मस्त होती आवड्ली.....................!!!!!!
5 Dec 2011 - 2:48 am | गणपा
अनुवाद छान जमुन आलाय.
5 Dec 2011 - 10:05 am | प्यारे१
कथा वाचतानाच वाटत होतं की ही जेकेंची भाषा नाही म्हणून. (आम्ही लेख वरुन खाली असा वाचतो ना! ;) )
शेवट वाचला आणि लक्षात आलं.
ओ हेनरी च्या लघुकथा मस्तच असतात.
पूर्वी दूरदर्शनवर एक हिंदी मालिका पण सुरु झालेली या कथांवर.
'ट्रॅफिक जॅम' आणि कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून तुरुंगात जाऊ इच्छिणार्या एका गरीब माणसाची गोष्ट अजून आठवते त्यातली. एकमेकांना गिफ्ट देता यावी म्हणून त्याग करणारं प्रेमी जोडपं तेही बहुधा ओ हेन्रीचंच.
अजून अनुवाद कोणी करणार असतील तर .... ;)
-(फुकट्या मराठी वाचक) प्यारे१ (इन सोकाजी'ज शूज)