ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा फिल्डवर जायला कलेक्टरांना आवडे. कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी समजून घेण्याचा खात्रीशीर मार्ग! आणि जिल्हा हा नकाशात बघण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिलेला केंव्हाही चांगला.
आज शनिवार. ग्रिव्हन्स डे. कलेक्टर आणि एस्पींनी एकत्र जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याचा दिवस. प्रत्येक शनिवार वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आदेशच होता मुख्यमंत्र्यांचा. जेणेकरुन जनतेला जिल्हा मुख्यालयाला येण्याचा व्याप आणि खर्च करावा लागणार नाही. आज बोइपारीगुडा ब्लॉकला जायचं होतं. मराठी-गुजरातीचा भास होणारे आणि तेलुगु भाषेचे मजेशीर मिश्रण असणारे हे ओडिया नाव कलेक्टरांना मोठे रंजक वाटले होते. इथे येऊन जेमतेम आठवडाच झाला असेल. कलेक्टर म्हणून पहिलेच पोस्टिंग. अजून जिल्हा पुरता पाहिलेला नव्हता. सर्व विभागांची माहितीही नीट झालेली नव्हती. अशा वेळी गाऱ्हाणी ऐकणे आणि समाधानकारक मार्ग काढणे जरा अवघडच होते. पण रेटून नेण्याइतका आत्मविश्वास एव्हाना कलेक्टरांना मागच्या पोस्टिंगमधून आलेला होता. शिवाय गाऱ्हाणी सहानुभूतीने नीट ऐकून जरी घेतली, थोडा वेळ दिला, डोळ्यांत डोळे घालून नीट लक्ष देऊन ऐकले तरी गाऱ्हाणे मिटते आणि कावलेला माणूस शांत होऊन जातो एवढे कलेक्टरांच्या लक्षात आले होते.
बोईपारीगुडा ब्लॉक “अफेक्टेड” होता. म्हणजे नक्षलग्रस्त. चौदांपैकी नऊ ग्रामपंचायती अर्थात जवळपास ऐंशी गावांमध्ये माओवाद्यांच्या नियमित सभा होत आणि सरकार कसे निकम्मे आहे याचे धडे शिकवले जात. भाग दुर्गम. सीमेवर. एकेक गावही विस्कळीत स्वरुपात लांबच्या लांब पसरलेले – इथे दहा घरे, तिथे वीस, असं. मध्ये दोन दोन, तीन तीन किमीचं अंतर, असं. रस्ते धड नाहीत. वीज नाही. पाण्याची मारामार.
‘मिशन शक्ती’ मार्फत महिला स्वयंसेवी बचत गटांचे काम जोर धरत होते. कलेक्टरांनी याच बचत गटांना इंटरऍक्शनसाठी बोलावले होते. अफेक्टेड गावांमधील महिला आल्या होत्या. अर्थात अजून आशा होती. पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर डायरिया, मलेरिया, ऍंथ्रॅक्स साठी काय काय काळजी घ्यायची, आणि कुणाला असा आजार झालाच तर त्याला दवाखान्यात लगेच घेऊन यायचं, त्याचे पैसे मिळतील, नाहीतर फोन करायचा, आणि लगेच गाडी पोचेल, असंही त्यांनी सांगितलं. डायरियामुळे एकही मृत्यू जिल्ह्यात होता कामा नये अशी शपथच सर्वांनी घेतली. लिहिता वाचता येणाऱ्या “मा” ना हात वर करायला कलेक्टरांनी सांगितले. फार कमी हात वर आले. कलेक्टरांनी मिशन शक्ती संयोजकांना तीन महिने दिले. सर्व महिला गटांतील सर्व महिला साक्षर – अर्थात पेपर वाचता आला पाहिजे, आणि लेखी हिशेब जमला पाहिजे – झाल्याच पाहिजेत. अफेक्टेड भागात नक्षल शिक्षणविरोधी प्रसार करत असल्याचे त्यांना रिपोर्ट्स मिळत होतेच. “आम्ही आदिवासी, कष्टकरी, कष्टाने भाकर कमवू आणि खाऊ. आम्हाला हे असलं शिकून कुणाचं शोषण करायचं नाही, आणि आम्हीही शिकलेल्यांकडून शोषण करवून घेणार नाही” अशा आशयाची भडकावू भाषणे माओवादी सभांमध्ये होत असत. यानंतर कलेक्टरांनी पाण्याचा प्रश्न येताच लगेच जाहीर करून टाकले की जिल्ह्यातील सर्व म्हणजे आठ बोअरिंग मशीन्स प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहेत आणि जिथे जिथे मंजूरी आहे तिथे तिथे तातडीने काम सुरू आहे. परंतु याने जमिनीतील पाणी कमी होते, आणि यापेक्षा अन्य काही मार्ग आहेत तेही शोधावे लागतील. अर्थात हे एकाच बैठकीत पटवणे अवघड होते. पण पुन्हा पुन्हा सांगितल्याने एखादी गोष्ट महत्त्वाची आणि खरी वाटू लागते हा अनुभव असल्याने कलेक्टर जलसंवर्धनाचा मुद्दा पुन्हा पुन्हा मांडत असत.
यानंतर कलेक्टर ग्रिव्हन्स ऐकायला बसले. चार तास संपले तरी ग्रिव्हन्स संपायला तयार नव्हते. मारुतीच्या शेपटाप्रमाणे न संपणारी गाऱ्हाण्यांची यादी पाहून कलेक्टर थक्क झाले. त्यांनी बीडीओंना विचारले, ‘हे असे इतके ग्रिव्हन्सेस असतात इकडे?’ बीडीओ म्हणाले, ‘सर पूर्वी नसायचे. हा भाग अफेक्टेड झाल्यापासून वाढले आहेत. काही काही भोळे लोक आम्हाला येऊन सांगतातही की आम्हाला अशा अशा तक्रारी घेऊन पाठवले आहे म्हणून.’
सगळे ग्रिव्हन्सेस संपल्यावर कलेक्टरांनी एक गोषवारा घेतला. काय प्रकारच्या तक्रारी आहेत. दोन प्रकार ठळक दिसले. एक – वैयक्तिक गाऱ्हाणी – मला बीपीएल कार्ड नाही, इंदिरा आवासमध्ये घर हवे, वार्धक्य भत्ता हवा, आजारी आहे, मदत हवी, इत्यादि. दोन – सामूहिक गाऱ्हाणी – आमच्या गावात वीज नाही, रस्ता नाही, पाणी नाही, हायस्कूल नाही, पूल नाही, दारु बंद करा. वर तोंडी लावायला धमकी पण – आम्ही रस्ता बंद करु, पंचायत ऑफिस बंद करु, इत्यादि.
कलेक्टरांच्या मनात काही एक विचार सुरू झाले. तंद्रीतच ते हेडक्वार्टरला परतले.
घराच्या बाहेर पन्नासेक लोक ठाण मांडून बसले होते. संध्याकाळचे सहा वाजले होते. कलेक्टरांना शंका आली, अजून ग्रिव्हन्सेस साठी लोक थांबले आहेत? तसंही सकाळी बोईपारीगुडाला जायच्या अगोदर इथे वाटेत थांबलेल्यांचे ग्रिव्हन्सेस ऐकूनच ते गेले होते.
वाटेत न थांबता कलेक्टर सरळ घरात गेले आणि पीएंना विचारले, लोक कशासाठी आलेत. ग्रिव्हन्सेस साठीच आले होते. त्यांना ऑफिसकडे पाठवायला सांगून कलेक्टरांनी गोवर्धनला चहा टाकायला सांगितला.
कलेक्टरांना वाटले होते पन्नास साठ तरी गाऱ्हाणी असतील. बराच वेळ लागणार. पण त्यांना आश्चर्याचा धक्का बसायचा होता. या सर्व लोकांचे एकच गाऱ्हाणे होते – “आमच्या गावात वीज नाही, रस्ता नाही, पाणी नाही, पूल नाही, हायस्कूल नाही, आम्ही गरीब आहोत, आम्हाला बीपीएल कार्ड द्या.”
हे एवढे गाऱ्हाणे मांडायला ही सर्व “गरीब” मंडळी भाड्याच्या तीन गाड्या करून शंभर किमी वरून आली होती, कलेक्टर नाहीत म्हणताना दिवसभर थांबली होती, आणि गाडीभाड्याचा दहाहजार आणि बाहेरच्या जेवणाचा दोनेक हजार रुपये खर्चही केला होता.
सर्व गाऱ्हाणी एकदा नजरेसमोर ठेवल्यावर काही गोष्टींची संगती लागत होती. इतके दिवस ग्रिव्हन्सेस येत नव्हते, आत्ता यायला लागले हे एक प्रकारे चांगले लक्षण होते. लोकांमध्ये जागृती होतेय असं म्हणायला वाव होता. पण ग्रिव्हन्सेसचे स्वरुप पाहिले तर खरंच जागृती होतेय का हाही विचारात टाकणारा प्रश्न पडत होता. त्याला फुकट तांदूळ मिळतोय, मग मला का नाही? ही तक्रार खरी होती. पण सगळ्याच तक्रारी असल्याच.
मला रोजगार हमी योजनेत मागूनही काम मिळत नाही अशी एकही तक्रार का येऊ नये? गावपातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचारातील एक मुख्य – रोजगार हमी योजना – मस्टर रोल वर अंगठा/ सही करायचे दहा वीस रुपये घ्यायचे, आणि सरकारी कारकुनाला/ ग्रामसेवकाला/ सरपंचाला वरचे शंभर रुपये खाऊ द्यायचे, यात सामील होणाऱ्या एकाही गावकऱ्याला या प्रकाराची तक्रार करावीशी वाटू नये? याला जागृती म्हणावे का? बरं. गावातील सामूहिक गरजांचे प्रश्न – पाणी, वीज, रस्ते, इत्यादि यासाठी पदरचे दहा बारा हजार खर्चून “गरीब” लोक खरंच गाऱ्हाणे मांडायला येतील?
त्यांना हे पैसे दिले कुणी? आणि का? जे प्रश्न सहज सुटण्यासारखे नाहीत, लगेच सुटण्यासारखे नाहीत, ते हायलाईट करुन कुणाला काय साध्य करायचे होते? तुम्ही अगदी कलेक्टरकडे गेलात तरी काहीही होणार नाही असं सिद्ध करुन कुणाला गावकऱ्यांना भडकवायचं होतं? दारुबंदी होणे अशक्य आहे, प्रबोधनाशिवाय, केवळ जोरजबरदस्तीने, – कारण एकजात सगळा गाव दारुबाज - हे दिसत असताना त्याचीच मागणी होणे, म्हणजे सरकारने बंद करावी, आम्ही गाव म्हणून काही करणार नाही – याला काय म्हणावे? कलेक्टरांना हळूहळू संगती लागत होती. कामाची दिशा हळूहळू समजू लागली होती.नक्षल स्ट्रॅटेजी कलेक्टरांच्या हळूहळू ध्यानात येत होती आणि गावपातळीवर प्रशासनाची हजेरी यापूर्वी कधी नव्हती ती आत्ता किती गरजेची आहे हेही त्यांना प्रकर्षाने जाणवत होते. दिवसेंदिवस कमी होत जाणारे सरकारातील माणूसबळ आणि वाढतच चाललेला भ्रष्टाचार यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना हे निव्वळ प्रशासनाच्या हजेरीचे आव्हानही डोंगराएवढे वाटू लागले होते.
आधार होता फक्त अन्नपूर्णा किसानी या सदा हसतमुख आदिवासी बाईचा. “माझी काहीही असुविधा नाही” असं हसतमुखानं सांगणाऱ्या या बाईने आज कलेक्टरांनी विचारल्यानंतर ‘माझ्यासाठी काही करणारच असाल तर माझ्या बचत गटाला अजून थोडे कर्ज मिळवून द्या, म्हणजे अजून थोडा व्याप वाढवता येईल’ असे उत्तर दिले होते. एका ग्रामपंचायतीत यासारखी एक बाई जरी सापडली तरी कलेक्टरांपुढचा आव्हानाचा डोंगर भुगा होऊन पडणार होता.
प्रतिक्रिया
26 Oct 2011 - 2:32 pm | प्रशांत
लेख आवडला, पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत
26 Oct 2011 - 2:33 pm | इंटरनेटस्नेही
कलेक्टरांचे सूक्ष्म निरीक्षण पाहुन त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला. त्यांना भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
26 Oct 2011 - 2:38 pm | जयंत कुलकर्णी
//आधार होता फक्त अन्नपूर्णा किसानी या सदा हसतमुख आदिवासी बाईचा. “माझी काहीही असुविधा नाही” असं हसतमुखानं सांगणाऱ्या या बाईने आज कलेक्टरांनी विचारल्यानंतर ‘माझ्यासाठी काही करणारच असाल तर माझ्या बचत गटाला अजून थोडे कर्ज मिळवून द्या, म्हणजे अजून थोडा व्याप वाढवता येईल’ असे उत्तर दिले होते. एका ग्रामपंचायतीत यासारखी एक बाई जरी सापडली तरी कलेक्टरांपुढचा आव्हानाचा डोंगर भुगा होऊन पडणार होत////
फार योग्य लिहिले आहे. उद्यमशील असणे ही सगळ्यात मोठी देणगी आणि कर्तव्य आहे.
योग्य आणि चांगला लेख.
26 Oct 2011 - 9:06 pm | विकास
लेखाचा हा शेवट क्लायमॅक्स आहे आणि आशादायी आहे असेच वाटले. अजून येउंदेत!
26 Oct 2011 - 3:08 pm | प्रास
एका चांगल्या आणि अभिनिवेशविरहित लेखाचा अगदी समर्पक शेवट केला आहे.
कलेक्टरांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि 'त' वरून ताकभात ओळखण्याची क्षमता त्यांना भावी कार्यकाळात खूप उपयोगी पडेल अशी खात्री आहे.
पुलेशु
:-)
26 Oct 2011 - 3:18 pm | जाई.
अंर्तमुख करायला लावणारे लेखन
नक्षलवादाचा सामना किती कोणत्या पातळीवर करावा लागेल याची झलक दिसते
देशाचं इंडीयात रुपांतर होत असताना खऱ्या भारतात सुप्रशासनाची निकड जाणवली
त्याचबरोबर अन्नपूर्णा किसानीँच्या उत्तराने एक आशेचा किरण दिसला
लेखन वाचनखूणामधे साठवल आहे
26 Oct 2011 - 4:16 pm | पिंगू
सूक्ष्म निरिक्षण करुन योग्य माहिती पुरवल्याबद्दल अभिनंदन. गावपातळीवर प्रशासन कार्य़क्षम केल्यावर तरी अशा तक्रारींचा निपटारा लवकर करता येईल आणि गाव विकासाचे योग्य उद्दिष्ट गाठता येईल. अर्थातच त्यासाठी खंबीर आणि उद्यमशील प्रशासकीय अधिकार्यांची गरज आहे.
- पिंगू
26 Oct 2011 - 4:59 pm | चिंतामणी
का कोणास ठाउक अपुरा वाटला. कदाचीत अजून वाचण्यास उत्सुक असल्याने तसे झाले असावे.
(लेखाखाली "क्रमशः" असे लिहायचे राहून गेले असे उगाचच वाटले.)
पुढील लिखाण लौकर येउ द्या.
26 Oct 2011 - 5:08 pm | धमाल मुलगा
हा मनुक्ष एकतर लिहितो फार कमी. जे लिहितो, ते लिहितो मोठं दमदार, आशयगर्भ आणि परिस्थितीचं चित्र वेगळ्या अंगानं दाखवणारं! आम्ही पामर काय बोलणार ह्यावर?
बाकी, ही पेड ग्रिव्हन्सची युक्ती मोठी नामी आहे. आवडली आपल्याला. समोरच्यांच्या हातात अधिकार आहेत ना, त्याच अधिकारांनी त्यालाच पिळून काढा!
हे माओवादी लेकाचे असतात मात्र मोठे बेरकी! ह्या अशा डोकेबाजपणाचं कौतुक वाटतं. कधी वाटतं, हीच बुध्दी भल्यासाठी कामाला लावली असती तर? पण...ह्या खुळ्या आशावादातला फोलपणा जाणवतो. जिथं क्षुल्लक हव्यासापोटी तल्लख बुध्दी पणाला लाऊन घडवण्यापेक्षा बिघडवणारे आपल्या सभोवताली सहजच दिसतात, तिथं नक्षल/माओवादासारख्या प्रचंड ब्रेनवॉशिंग केलेल्या विचारांनी भारलेल्यांकडून काय अपेक्षा करावी?
कलेक्टरांनी ह्या पेचाचा सामना कसा केला हे वाचायला नक्की आवडेल. सरकारी बाजूच्या समग्र काळ्या रंगावर असे काहीसे आशादायी प्रसंग कळले की, आमच्यासारख्यांना 'अजून चांगुलपणा शिल्लक आहे' हा दिलासा मिळतो. भले मग तो इथं बसून कितीही वांझोटा असो.
पुढच्या कथनाची वाट पाहतो आहे सायबा!
26 Oct 2011 - 5:40 pm | चिंतामणी
हा मनुक्ष एकतर लिहितो फार कमी.
नावच सांगते त्यांची किर्ती. (आ.रा. - ह.घ्या.)
जे लिहितो, ते लिहितो मोठं दमदार, आशयगर्भ आणि परिस्थितीचं चित्र वेगळ्या अंगानं दाखवणारं!
सहमत
आम्ही पामर काय बोलणार ह्यावर?
तरीसुद्धा प्रतिक्रीयेचा लघु निबंध लिहीला की हो तुम्ही.;)
सरकारी बाजूच्या समग्र काळ्या रंगावर असे काहीसे आशादायी प्रसंग कळले की, आमच्यासारख्यांना 'अजून चांगुलपणा शिल्लक आहे' हा दिलासा मिळतो. भले मग तो इथं बसून कितीही वांझोटा असो.
(पुन्हा एकदा) सहमत
26 Oct 2011 - 8:04 pm | तिमा
धमुंशी सहमत. लेख आवडला.
27 Oct 2011 - 7:38 am | नगरीनिरंजन
पुनश्च एकदा विचार करायला लावणारे लेखन.
कलेक्टरांनी ह्या पेचाचा सामना कसा केला हे वाचायला नक्की आवडेल असेच म्हणतो. शिवाय अशा किती वेगवेगळ्या प्रश्नांना सरकारी अधिकार्यांना तोंड द्यावे लागत असेल आणि त्यातूनही कामावरची निष्ठा न ढळू देणे हे किती कठीण कर्म आहे याची जाणीव होऊन कलेक्टरसाहेबांना मनोमन प्रणाम करतो.
27 Oct 2011 - 5:23 pm | हरिप्रिया_
+ १
आपले अजुन अनुभव जरा लवकर लवकर येवू द्या की...
26 Oct 2011 - 7:44 pm | रेवती
नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखन.
27 Oct 2011 - 12:30 am | आळश्यांचा राजा
सर्व वाचकांचा आणि प्रतिसादकांचा मनापासून आभारी आहे!
27 Oct 2011 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दर्जेदार लेखन.
रोजगार हमीवर काम मागण्यासाठी लोक का येत नाही. हा कलेक्टरांना जो प्रश्न पडला आणि त्याचं जे उत्तर आहे, ते व्यवस्थेकडे बोट दाखवणारं आहे. कलेक्टरसाहेबांनी बाकी पेच कसे सोडवले ते वाचायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
27 Oct 2011 - 10:27 pm | धनंजय
ओघवती कथा आहे.
हे विश्लेषण थोडेसे समजले, आणि थोडेसे समजले नाहीसुद्धा. ५० लोकांचे गाडीभाडे आणि जेवण १२,०००; म्हणजे प्रत्येकी खर्च १२०००/५० = २४०/-
हे गरिबाला थोडे जड आहेच. पण हा खर्च गार्हाण्याच्या तर्हेवर अवलंबून नाही. वैयक्तिक गार्हाणे असले, तरी दरडोई २४०/- असे जडच असणार. मग ग्रीव्हन्स डे हा ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांच्याकडे वरकड २४० रुपये नाहीत अशांसाठी सोयीस्कर नाही, हा "स्ट्रक्चरल" आडथळा आहे.
त्यामुळे आपोआपच "ग्रीव्हन्स डे" सुविधेचा फायदा कमीतकमी २४०/- रुपये वरकड असणार्या लोकांनाच घेता येईल.
वीज-पाणी-रस्ते वगैरे सामायिक गरजा आहेत. त्यांच्याविषयी गार्हाणी वैयक्तिक कशी होऊ शकतील? जर गावापर्यंत रस्ता नाही, तर "माझ्या घराजवळ वैयक्तिक रस्ता नाही" हे गार्हाणे ठीक वाटत नाही. अशा प्रकारची गार्हाणी सामायिकच असू शकतात.
- - -
वेगळ्याच देशातील आणि वेगळ्याच सुबत्तेतील माझा वैयक्तिक अनुभव सांगतो :
काही वर्षांपूर्वी एका सेवाभावी संस्थेच्या जथ्थ्यासमवेत मी वॉशिंगटन-डीसी येथे यू.एस. संसदेत गार्हाणे मांडायला गेलो होतो. आरोग्यविषयक कायदे अधिक सुदृढ व्हावेत, त्या कायद्यांबाबत तपशीलवार गार्हाणे होते. कुठलेही मोठे प्रस्थ असावे, तशीच ही संसद म्हणजे गल्ल्या-बोळ-जिने-प्रवेशनिषेध यांचा भूलभुलैया आहे. नेमका कुठला सांसद कुठल्या खोलीत बसतो, ते कळणे थोडे कठिणच (अर्थात जमू शकते). संसदेत या बाबतीत कुठले बिल कुठल्या पायरीवर गेलेले आहे, कसे अडकले आहे, वगैरे तपशील मला कळायला कठिण गेले. सेवाभावी संस्थेच्या कायदातज्ज्ञाने समजावून सांगितले तेव्हाच गार्हाण्यातील तपशील नीट समजले. आपल्या मतदारसंघातल्या आणि राज्यातल्या ज्या-ज्या सांसदांना भेटायचे त्या सगळ्यांची एकाच दिवशी अपॉइंटमेंट मिळणे मला जमले असते, की नाही, कोणास ठाऊक. ("नाही" असे वाटते.) सेवाभावी संस्थेने सदस्यांच्या जथ्थ्याकरिता एकत्रित अपॉइंटमेंट, वेगवेगळ्या अपॉइंटमेंट वगैरे साधून घेतल्या म्हणून जमले. शिवाय "तंबाखूविषयक धोरण" हे माझे वैयक्तिक गार्हाणे नाही. माझ्या कार्यालयात आणि घरी तंबाखू वापरून आजारी पडणारे कोणीच नाही. अन्य लोकांना तंबाखूमुळे आजार होतो, त्यामुळे होणार्या खर्चाने माझ्यावरचा करभार आणि स्वास्थ्यविम्याचे दर वाढतात, अशी मला तिरकी झळ पोचते. वगैरे, वगैरे. पण आरोग्यविषयक सेवाभावी संस्थेचा सदस्य म्हणून आम्हा सर्वांचे ते सामायिक गार्हाणे होते. (अशाच प्रकारे, रस्ते-पूल-पोलीस-वगैरे-वगैरे मागणी करणार्या जथ्थ्यांची सुद्धा सोय करून देणार्या संस्था आहेत.) जर सर्वात परिणामकारक गार्हाणे एखाद्या दरिद्री व्यक्तीचे असेल - तंबाखूमुळे-कॅन्सर होऊन उपचारांमुळे कंगाल झालेला - तर त्याला आम्ही [कंगाल न-झालेले लोक] का न नेणार? त्याचे गाडीभाडे का न देणार? त्याच्या गार्हाणे मांडल्यामुळे आमच्या गार्हाण्यांना धार येते. हा केवळ नाटकीपणा नाही.
तर सामायिक गार्हाणे जास्तीतजास्त सांसदांपुढे जास्तीतजास्त कार्यक्षमपणे ठेवता यावे, याकरिता सेवाभावी संस्थेच्या मार्फत केलेली सुसूत्रता आवश्यकच होती. "कोणी केली ही सोय" वगैरे प्रश्न ठीक असले, तरी "कोणीतरी सोय केलीच" एवढ्यावरून गार्हाणे बाद होत नाही. उलट सामायिक गार्हाण्याला जोर येण्यासाठी सूत्रबद्धतेशिवाय पर्याय नाही.
- - -
सुशिक्षित शहरी व्यक्ती असून गार्हाणे मांडण्याच्या प्रक्रियेने मी [एकटा असतो तर] गांगारून गेलो होतो; गार्हाणे-तज्ज्ञाच्या शिकवणीमुळे धीट झालो. मग अर्धशिक्षित गावकरी नाही का भांबावणार? मग शिकवलेले-पढवलेले-सुसूत्र धीट लोकच गार्हाणे सांगायला येणार. आणि तेवढ्यावरून आपण म्हणू शकत नाही, की त्यांची गार्हाणी खोटी आहेत.
जर कलेक्टरांना "ज्यांच्याकडे प्रवासा-जेवणासाठी वरकड २४० रुपये नाहीत" अशांची गार्हाणी खरेच ऐकायची असतील, तर "ग्रीव्हन्स डे"चा वेगळा काही प्रकार त्यांनी कार्यान्वित करायला पाहिजे. म्हणजे प्रवासखर्च न-करता आणि घरच्याघरी जेवून गार्हाणी सांगायची सोय त्या गरिबांसाठी होऊ शकेल.
सध्याच्या "ग्रीव्हन्स डे"मध्ये कलेक्टरांचे सध्याचे विश्लेषण म्हणजे "कैचीचा शह" आहे. म्हणजे प्यादे प्रवास करून हलले तरी खोटे, आणि जागच्या जागी राहिले तरी खोटेच.
29 Oct 2011 - 8:15 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच. एका छोट्या स्फुल्लिंगात ठिणग्या पाहण्याची कलेक्टरसाहेबांची दॄष्टी आवडली.
धनंजय यांचा प्रतिसादही दुसर्या दिशेने विचार करायला लावणारा वाटला. पण खात्री आहे, एवढी माणुसकी असणारे कलेक्टरसाहेब या प्रश्नावरही काही तोडगा काढतील.