मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं ४ - माफ

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
20 Sep 2011 - 5:36 am

नुकतीच एक कविता वाचण्यात आली, माफ नावाची. निखिलचं शाईपेन या आयडीने लिहिलेली. कविता छान आहे, तांत्रिक बाजूत सुधारणेला वाव आहे. मुक्तछंदात लिहून एक लय, एक चढत जाणारा टेंपो पाळण्याच्या बाबतीत काही दुरुस्त्या करता येतील. पण त्यापलिकडे कवितेचा आशय प्रभावी आहे.

संपूर्ण कविता वाचून मला पहिल्याप्रथम जाणीव झाली ती एका एकतर्फी केविलवाण्या प्रेमभंगाची. या जळजळीत अनुभवानंतर जी एक विरक्ती येते तिचं वर्णन या कवितेत आहे. पण ही विरक्ती खरी विरक्ती नाही. वेदना भळभळत असताना तिच्याकडे बघत म्हणावं, केलं, या घाव घालणाऱ्याला मी माफ केलं. ते म्हणताना एक कडवटपणा असतो. त्या कडवटपणाने या कवितेत माफ करण्याच्या मिशाखाली वेदनेचंच वर्णन आहे.

मी माफ करायचं ठरवलंय
ज्यांच्या मागे वेड्यासारखं धावलो ... धावतो
आणि
त्याचं सोयरसुतक नसलेल्या दगडांना.

एकतर्फी प्रेमात हा अनुभव काही थोड्याथोडक्यांना येत नाही. मनात एखादीची छबी देवीप्रमाणे धरलेली असते. तिचं अहोरात्र चिंतन, पूजन होतं. पण तिला आपली पर्वा नसल्याचं कधीतरी लक्षात येतं. आणि मग ही देवी नसून निव्वळ पत्थर आहे असंच वाटतं. जा तुला माफ केलं म्हणताना कवी त्या दगडाने त्याच्या हृदयाची काच कशी तुटली आहे हेच सांगतो आहे.

मी माफ करायचं ठरवलंय
केसांनी गळा कापणाऱ्यांना
पाठीत खंजीर खुपसाणाऱ्यांना
आणि
शब्दांनी रक्तबंबाळ करणाऱ्यांना...

प्रेमात झिडकारला गेलेल्याला संपूर्ण जग असह्य होतं. सुरूवातीला आश्वासक वाटलेल्या नजरा थंड होतात. एकदा कळलेसे वाटलेले इशारे नंतर चुकीचे ठरतात. अशा वेळी आपला विश्वासघात झाला असं वाटणं सहाजिकच आहे. असा विश्वासघात करणाऱ्यांना उदात्त कडवटपणाने कवी माफ करतो. जखमांमध्ये खोल शिरलेले शब्द कुठल्याही शस्त्रक्रियेने बाहेर येणारे नसतात. पण ती जखम बाळगण्याचं भाग्य ज्यांच्यामुळे मिळालं त्यांनाही माफ. असं म्हणताना आपल्यावर झालेल्या अन्यायाचंच कवी वर्णन करतो आहे.

ज्यांनी त्रास दिला त्यांनाही .. माफ ..
आणि प्रेमाने बांधून पंख कापू पाहिले त्यांनाही माफ
जे दुरूनच हसत होते त्यांनाही माफ
जे जवळ येऊन डिवचून गेले त्यांनाही माफ

या सर्व नाट्यात छळणारे असतात, प्रेमाने घुसमटवून टाकणारे असतात. आणि आसपासचे बघ्ये असतात. काही जवळिकीच्या हक्काने हसतात तर काही अंतराचा फायदा घेऊन. 'इक खिलौना बन गया दुनिया के मेलें में, कोई खेले भीड में कोई अकेले में'. हसणाऱ्यांची दोन घडी करमणुक होते, पण ज्याची छीथू होते त्याच्यासाठी कायमचे वण रहातात. हे वण आहेत हे सांगण्याचा मार्ग म्हणजे, जाऊदेत, केलं माफ.

आता सगळ्यांनाच माफ करतोय तर
बऱ्याचदा
वेळी नाही म्हणू न शकलेल्या
आणि कितीदा हवं तेव्हा हो न म्हणू शकलेल्या
खेरीज,
न येणाऱ्यांची वाट बघत
आयुष्याच्या बऱ्याचश्या वळणांवर थांबून मागे बघणाऱ्या,
जे मला आवडतात त्यांच्यासाठी
ज्यांना मी आवडतो त्यांच्यावर
नकळत
अन्याय करणाऱ्या, स्वतःलाही
आज माफ करायचं ठरवलंय.

हे शेवटचं कडवं सगळ्यात परिणामकारक आहे. किंबहुना या धर्तीच्या कविता अनेकांनी लिहिलेल्या आहेत. अमुकला सलाम.. तमुकला सलाम. किंवा फैजने लिहिलेली यांच्यासाठी अन् त्यांच्यासाठीही या आशयाची एका कवितासंग्रहाची अर्पणकविता. अनेक उदाहरणं आहेत. अशा कवितांमध्ये एक यादी असते. ती कितीही लांबवता येते. जर ती फार मोठी झाली तर कंटाळवाणी होते. एकसुरीही होण्याची शक्यता असते. वरच्या कवितेत मात्र कवीने ते कौशल्याने टाळलेलं आहे. हे कडवं थोडं क्लिष्ट झालं आहे, पण उलगडून बघितलं की पूर्ण परिणाम जाणवतो.

'खेरीज' या शब्दाच्या जागी 'तसंच' हा शब्द वापरला तर उलगडा करणं सोपं जातं. हवं तेव्हा हो म्हणणं, आणि नकोशा गोष्टींना नाही म्हणणं ही आत्मकेंद्री व्यक्तींची खूण आहे. जेव्हा दुसऱ्यावर प्रेम असतं तेव्हाच हा स्वार्थ बाजूला ठेवला जातो.
'माझ्यासाठी निःस्वार्थीपणे कोणी, मी येत नसूनही मागे वळून वाट बघितली. त्यांच्यावर या दगडांमागे धावताना मी अन्याय केला. म्हणून मलाही माफ.' असं कवी जेव्हा म्हणतो तेव्हा तो पौगंडी प्रेमभग्न झालेल्या सामान्याच्या पलिकडे जातो. मी या दगडांना शिव्या घालतोय, पण काहींसाठी मीही असाच निर्घृण दगड ठरलो नाही का? सर्वसामान्य कवितांमध्ये, गजलांमध्ये, या जगाने माझ्यावर कसा अन्याय केला आहे याचं वर्णन असतं. आपणही त्याच चक्रातला एक दाता आहोत, घेतो तसंच देतोही, ही या कवितेतली जाणीव प्रगल्भ आहे.

स्वतःला माफ करण्यातून कवीचा कडवटपणा दुधारी होतो. मग या सगळ्यांना माफी करण्यामागचं खरं इंगित कळतं. माफी करण्यावाचून इलाजच रहात नाही.

हे ठिकाणकविताआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

रसग्रहण आवडलं. कविता वाचायची राहून गेली होती, ती या निमित्ताने वाचता आली.

म्हणून मलाही माफ.' असं कवी जेव्हा म्हणतो तेव्हा तो पौगंडी प्रेमभग्न झालेल्या सामान्याच्या पलिकडे जातो. मी या दगडांना शिव्या घालतोय, पण काहींसाठी मीही असाच निर्घृण दगड ठरलो नाही का? सर्वसामान्य कवितांमध्ये, गजलांमध्ये, या जगाने माझ्यावर कसा अन्याय केला आहे याचं वर्णन असतं. आपणही त्याच चक्रातला एक दाता आहोत, घेतो तसंच देतोही, ही या कवितेतली जाणीव प्रगल्भ आहे.

स्वतःला माफ करण्यातून कवीचा कडवटपणा दुधारी होतो. मग या सगळ्यांना माफी करण्यामागचं खरं इंगित कळतं. माफी करण्यावाचून इलाजच रहात नाही.

सहमत आहे. मात्र त्याचप्रमाणे, आपणच कधी कधी आपल्यावर अन्याय करत असतो. मग ते आत्मताडन अनाठायी असो किंवा हातून घडलेल्या चुकांबद्दल झालेला पश्चात्ताप किंवा टोचणी. त्याबद्दल स्वतःलाच माफ करणं हेही एका अर्थी आवश्यकच.

चित्रा's picture

20 Sep 2011 - 7:49 am | चित्रा

रसग्रहण आवडले. आणि प्रतिसादही आवडला.

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2011 - 8:29 am | नगरीनिरंजन

रसग्रहण आवडले. कविता वाचायची राहून गेली होती. नंदन यांचा प्रतिसादही आवडला.
आयुष्यात जखमा देणार्‍यांबद्दल आणि स्वतःच्याही चुकांबद्दल अढी धरून बसण्यापेक्षा पुढची वाटचाल सुकर होण्यासाठी हे असं माफ करणं अपरिहार्य असतं. ही अपरिहार्यता कवितेत पुरेशी जाणवली नाही. ती कविला अभिप्रेत नसावी असं वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2011 - 8:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जी, उपक्रम आवडला आहे. त्या निमित्ताने चांगल्या कविता समजतील अशी आशा आहे.

नंदन यांचा प्रतिसाद आवडला पण Easier said than done .

अभिजीत राजवाडे's picture

20 Sep 2011 - 7:45 am | अभिजीत राजवाडे

कविता हि छान आणि रसग्रहण हि.

क्रेमर's picture

20 Sep 2011 - 8:10 am | क्रेमर

रसग्रहण कवितेला वाचवू शकलेले नाही तरीही वाचनीय आहे.

कवितानागेश's picture

20 Sep 2011 - 1:12 pm | कवितानागेश

रसग्रहण आवडले.
पण तरीही, मला यात कडवट्पणा जाणवला नाहीये.
सुरुवतीला माफमध्ये थोडी उपेक्षा आहे, कोरडेपणा आहे.
नन्तर मात्र राग आहे पण नाईलाज असल्यानी सोडून देत आहे, असा भाव वाटतो.
पण या भावनांशी निगडित असलेल्यांच्या भावना पहिल्यानंतर मात्र स्वतःमधलेदेखिल दोष दिसू लागले आहेत.
त्यानंतर खरोखरच क्षमेचा भाव निर्माण झालेला दिसतो.

दीप्स's picture

20 Sep 2011 - 2:17 pm | दीप्स

अतीशय सुन्दर कवीता आणि रसग्रहण.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2011 - 4:01 pm | प्रकाश घाटपांडे

जो देगा उसका भी भला जो नही देगा उसकाभी भला

रसग्रहण आणि कविता दोन्ही छान.

जाई.'s picture

20 Sep 2011 - 6:54 pm | जाई.

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2011 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचनीय रसग्रहण. मनःपूर्वक आभार...!

-दिलीप बिरुटे

रसग्रहणामुळे वाचायला मिळाली, धन्यवाद.

आशय-कल्पना भन्नाट आहे. रसग्रहणही आकृतीतले दोष अतिशय सौम्यपणे दाखवत सौष्ठवाकडे लक्ष वेधणारे आहे.

नंदन यांचा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो.