प्रेरणा

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
10 Sep 2011 - 3:08 pm

“सर गेल्या वेळी आपल्या जिल्ह्यातून १९ आदिवासी तरुण आर्मीत भरती झाले होते. यावेळी किमान ८० जण तरी गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही!” बारीक बाबू कलेक्टरांना म्हणत होते.

बारीक बाबू, म्हणजेच टुकू बारीक, हे होते पीए आय टी डी ए अर्थात प्रोजेक्ट ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी. अतिशय सिन्सिअर आणि विश्वासार्ह अधिकारी. या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या, पण फक्त जिल्ह्यातून बाहेर. आत यायला कुणी तयारच नसायचं. कुणाची बदली झालीच तर कुठेना कुठे काहीतरी वशिलेबाजी करुन बदली रद्द व्हायचीच व्हायची. ज्यांचा कुणीच गॉडफादर नाही ते बापडे नाइलाजाने पोटासाठी इथे येऊन पाट्या टाकत. एकूण चांगल्या अधिकाऱ्यांचा सोडा, अधिकाऱ्यांचाच दुष्काळ असलेल्या जिल्ह्यात टुकू बारीक ही रेअर कमोडिटी होती. त्यामुळेच कर्नल शर्मांचा फोन झाल्या झाल्या कलेक्टरांच्या डोळ्यांपुढे पहिले नाव टुकूचेच आले.

कर्नल शर्मा आर्मी रिक्रूटमेंट ड्राइव्हसाठी योग्य जिल्हा शोधत होते. हा जिल्हा सहा जिल्ह्यांना मध्यवर्ती पडत होता. गेल्या वेळी वेगळा जिल्हा होता. त्या जिल्ह्याची जागा चुकीची निवडली असे त्यांना वाटत होते. १२० जागा असताना केवळ ८० जणच निवडले जाऊ शकले होते. याला प्रमुख कारणे दोन – रिक्रुटमेंटचे ठिकाण आर्मी टीमसाठी, आणि उमेदवारांसाठी फारसे सोयीचे नसावे; आणि दुसरे म्हणजे तयारी असलेले पुरेसे उमेदवार मिळाले नाहीत/ उमेदवारांची पुरेशी तयारी रिक्रुटमेंटच्या दिवसापर्यंत होऊ शकली नाही. बारीकबाबूंनी उल्लेख केलेले १९ उमेदवार याच ड्राइव्हमध्ये निवडले गेले होते.

कर्नल शर्मांना बऱ्याच गोष्टी लागणार होत्या. बारीकबाबूंच्या भरवशावर कलेक्टरांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांना मनमोकळे निमंत्रण दिले. “तुम्ही या तर खरे, जे काही लागेल ते सगळे होईल ऍरेंज.” या मागास जिल्ह्यात आठ दिवस ऐंशी जणांच्या आर्मी टीमची राहण्याची, कॅम्प ऑफिसची सोय करणे हे चुटकीसरशी होण्यासारखे नव्हते. झटावे लागणार होते. आधीच अधिकाऱ्यांचा दुष्काळ, त्यात राज्य सरकारच्या खंडीभर योजना, पंचायत राज निवडणुका तोंडावर आलेल्या, बीपीएल सेन्सस पुढच्या महिन्यात सुरु होत होती, त्यात आदिवासींना प्राणांहून प्रिय असलेला पारंपारीक उत्सव – या जिल्ह्याचे भूषण असलेला – “परब” दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला. डेंग्यू आणि मलेरियाच्या आउटब्रेकमुळे अर्धे माणूसबळ तिकडे वळलेले. असे एकूण फायरफायटिंग सुरु होते.

कर्नलना शब्द तर दिला आपण, पण निभावायचे कसे या विचारात कलेक्टरांनी बारीकबाबूंना फोन लावला आणि रात्री घरीच बोलावले. संयत व्यक्तीमत्वाच्या बारीकबाबूंनी कलेक्टरांच्या सर्व आशंका ऐकून घेतल्या. शांतपणे विविध पर्याय कलेक्टरांच्या पुढे ठेऊन त्यांना आश्वस्त केले. दुसऱ्याच दिवशी कलेक्टरांनी साइट व्हिजिट ठेवली. लगोलग बीएसएफच्या डीआयजींना फोन करुन कल्पना देऊन ठेवली. त्यांचीही मदत लागणार होतीच.

प्लॅनिंग फायनल झाल्यावर बारीकबाबू म्हणाले, “सर, हा ड्राइव्ह आपल्याच जिल्ह्यात होऊ देत. यावेळी मी किमान ८० तरी पोटेन्शियल नक्षल आर्मीत पाठवतो की नाही बघा!”

कल्याणी, कलेक्टरांची पत्नी, तिथेच बसली होती. तिने चमकून बारीकबाबूंकडे बघीतले. बारीकबाबूंच्या संयत व्यक्तीमत्वातून झळकणारा त्यांचा उत्साह दिपवून टाकणारा नसला तरी मोहवून टाकणारा निश्चितच होता.

बारीकबाबू सांगत होते, “सर आपण एवढ्या पंचवीस हजार आदिवासी पोरा-पोरींना होस्टेल फॅसिलिटी देतोय, पण बारावीनंतर काय या मुलांचं? स्किल ट्रेनिंग देऊन किती जणांना असा जॉब मिळतो, आणि मिळाला तरी कोणत्या लेव्हलचा? आपण त्यांना एवढं शिकवूनही त्यांना त्याप्रमाणात काही जग बघायला मिळालं तर खरं. आर्मीचा जॉब त्यांना जग दाखवील, आणि ही आर्मीत जाऊन बाहेरचं जग पाहून आलेली मुलं आपल्या इथल्या विकासाच्या लढाईत आपले सैनिक बनतील. असा आर्मीत गेलेला एकेक मुलगा दहा गावांमध्ये चर्चेचा विषय बनेल. तुम्ही बघाच सर, मी यावेळी किमान हजार उमेदवारांचे महिन्याभऱ्याचे फिजिकल ट्रेनिंगचे कॅम्प्स घेणार आहे. बेसिक जनरल नॉलेजच्या उजळणीसाठी एक आठवडा माझे दहा शिक्षक इकडे वळवणार आहे. ही मुलं गेली पाहिजेत आर्मीत. त्याशिवाय मला झोप यायची नाही!”

बारीकबाबू निघून गेल्यावर कल्याणी कलेक्टरांना म्हणाली, “अजित, नक्षल बनणाऱ्या/ बनू पाहणाऱ्या आदिवासी तरुणांना काहीतरी निमित्त असेल – खरं, खोटं. आर्मीत जाऊ इच्छिणाऱ्यांनाही चांगलं आयुष्य बनवावंसं वाटणं साहजिक आहे. पण मला एक समजत नाही, महिना वीसपंचवीस हजार टिकल्या मिळत असताना, तेही या अशा निरुत्साही सरकारी वातावरणात, या टुकू ला या आदिवासींना या रानावनांतून बाहेर काढण्याचा एवढा उत्साह येतो तरी कुठून? कुठून मिळत असेल प्रेरणा या टुकुसारख्या लोकांना?”

याचे उत्तर कलेक्टरांकडेही नव्हते. ते एवढेच म्हणाले, “प्रेरणा कुठून येते हे माहीत नाही. पण हा देश याच प्रेरणेवर चाललेला आहे हे नक्की!”

कथा

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

10 Sep 2011 - 3:22 pm | नगरीनिरंजन

कलेक्टरसाहेबांचा आणखी एक चांगला अनुभव! धनकीर्तीसन्मान वगैरे भौतिक गोष्टींपेक्षा दुसर्‍याच कोणत्यातरी आंतरिक सुखाच्या प्रेरणेने काम करणारे हे लोक कर्मयोगीच म्हणायचे.

अन्या दातार's picture

10 Sep 2011 - 3:32 pm | अन्या दातार

अशीच प्रेरणा सर्वांना मिळो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2011 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशीच प्रेरणा सर्वांना मिळो.

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

10 Sep 2011 - 3:52 pm | श्रावण मोडक

कुठून येतं हे सारं? तेंडुलकरांना पडलेला हा प्रश्न.
कल्याणीनं वाचलं असावं तेंडुलकर. नसेल वाचलं तरी हरकत नाही. प्रश्न पडतोय हेच मोलाचं. उत्तराचा शोध कल्याणी आणि अजित यांच्यासारख्या व्यक्तिरेखा घेत असतील. ती उत्तरं काय आहेत, हे कधी लिहिणार?

स्वाती२'s picture

10 Sep 2011 - 4:55 pm | स्वाती२

टुकू बारीकना _/\_.

शिल्पा ब's picture

10 Sep 2011 - 9:42 pm | शिल्पा ब

तुमचे अनुभव खुपच वेगवेगळे आहेत. बारीक बाबुंच्या धैर्याचे कौतुक वाटते.

नमस्कार पोहोचवा आमचा बारीक बाबुंना, अण्णा हजारेंमुळे नाही तर अशा लोकांमुळं आपण टिकुन आहोत.

पैसा's picture

10 Sep 2011 - 10:52 pm | पैसा

आजच्या काळात असा विचार कोणाच्या तरी मनात येतो हीच फार मोठी गोष्ट आहे!

राजेश घासकडवी's picture

11 Sep 2011 - 3:37 am | राजेश घासकडवी

नोकरशाहीत बारीकांसारखे प्रेरित लोक असतात. डेंग्यू व मलेरिया आला म्हणून राबवल्या जाणाऱ्या योजना असतात. पंचवीस हजार आदिवासी तरुणांनी शिकावं म्हणून त्यांना हॉस्टेल फॅसिलिटी पुरवल्या जातात. असं असूनही सरकार व नोकरशाही ही भ्रष्ट, निष्क्रीय म्हणूनच ओळखली जाते. त्या चित्रात थोडं तथ्य असलं तरी पूर्ण तथ्य नाही. हे तुम्ही दाखवून देत आहात, त्याबद्दल धन्यवाद. एकांगी दृष्टीऐवजी थोडं चांगलं, थोडं वाईट असं समजून घेणं केव्हाही चांगलं.

आळश्यांचा राजा's picture

11 Sep 2011 - 4:09 pm | आळश्यांचा राजा

बरोबर आहे. काही चांगलं काही वाईट. चांगलं करणारीही आपलीच माणसं आणि वाईट करणारीही आपलीच. त्यामुळे व्यवस्थेत प्रॉब्लेम आहे की माणसांत हा प्रश्न उत्तर द्यायला जरा अवघ्ड आहे.

रेवती's picture

11 Sep 2011 - 7:04 am | रेवती

ग्रेट!

सहज's picture

11 Sep 2011 - 9:43 am | सहज

अनेक नकारात्मक बातम्यांमधे असे काहीसे सकारात्मक वाचल्याने दोन घटका बरे वाटते हे मान्य.

पण हेही खरेच की 'देश चाललेला आहे' याला 'खरच? नक्की कुठे?' असे उपप्रश्न येतात.

बारीक बाबूंनी आपल्यापुरते उत्तर शोधले असे दिसते इतरांचे काय?

आळश्यांचा राजा's picture

11 Sep 2011 - 10:01 am | आळश्यांचा राजा

अनेक नकारात्मक बातम्या असे आपण ज्यावेळी म्हणतो, त्याचा अर्थ असा घ्यायला हवा काय, की नकारात्मक बातम्यांना बातमीमूल्य आहे कारण त्या सकारात्मक किंवा उदासीन घटनांच्या तुलनेत कमी आहेत? जसे, ही गोष्ट, सकारात्मक पैलू दाखवते, ही बाब एकंदर
नकारात्मक बातम्यांच्या तुलनेत दुर्मिळ आहे.

विचार करतोय.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Sep 2011 - 12:47 pm | बिपिन कार्यकर्ते

नेहमीप्रमाणे कलेक्टरसाहेबांच्या पोतडीतून एक अद्भुत चीज!

टुकुलबाबू आणि त्यांच्यासारखे लोक सरकारपक्षात आहेत, नक्की आहेत. आणि त्यांची संख्या फार नसली तर अगदीच चार दोनही नसावेत. पण...

०१. अशा लोकांना हुडकून त्यांना अजून पुढे कसे आणता येईल याबाबत काय काम होते? होते का?
०२. अशा प्रेरणेवरच केवळ जर का देश चालला असेल तर मात्र देशाचे काही खरे नाही असे वाटते. नुस्त्या प्रेरणेवर वगैरे किती काळ चालणार?

असो. मोडकांनी लिहिल्याप्रमाणे, प्रश्नांच्या उत्तरांबद्दल अजित आणि कल्याणी काय विचार करत आहेत बगैरेंबद्दल वाचायला आवडेल.

आळश्यांचा राजा's picture

11 Sep 2011 - 4:03 pm | आळश्यांचा राजा

नुसत्या प्रेरणेवर किती काळ चालणार म्हंजे काय! चालावसं वाटायला तरी प्रेरणा नको का कार्यकर्ते! ;-)

बाकी बारीकबाबूंसारखी माणसे वाया जात नाहीत. व्यवस्थेला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांची गरज असते. त्यांना शोधून शोधून त्यांची पळवापळवी केली जाते असे ऐकून आहे!

रामदास's picture

11 Sep 2011 - 1:07 pm | रामदास

वार्‍याची झुळुक आल्यावर जीवाला बरं वाटतं तसंच बारीक बाबूंसारखी माणसं भेटल्यावर वाटतं. नेहेमी प्रमाणे चांगला लेख.-- अर्थातच अपेक्षा वाढवणारा.
अवांतरः बारीकबाबू कार्यालयात आहेत म्हणजे साहेबांचे पोस्टींग ओरीसात - बालासोरच्या आसपास झालेले दिसते आहे.

आळश्यांचा राजा's picture

11 Sep 2011 - 3:56 pm | आळश्यांचा राजा

थँक्स! बारीकबाबूंचा बालासोर भागाशी काही संबंध असला तरी नक्षलवाद बालासोरात नसल्यामुळे इथे बारीकबाबू (आणि साहेब) बालासोरात पोस्टेड नाहीत! :-)

बाकी बारीकबाबूंसारखे ऑप्टिमिझम रोगाचे क्रॉनिक पेशंट वार्‍याची झुळूक आणतात हे खरंच.

जाई.'s picture

11 Sep 2011 - 6:40 pm | जाई.

लेखन आवडले

बरीकबाबूना_/\_

खरोखर बरीकबाबूसारखी माणस मिळण दुर्मिळच
अशी माणसे आणि त्या प्रेरणाच देश टिकवून आहेत

वरती म्हटल्याप्रमाणे अशी प्रेरणा सगळ्याना मिळो

अप्पा जोगळेकर's picture

11 Sep 2011 - 8:16 pm | अप्पा जोगळेकर

बारीक बाबूंना आमचा दंडवत.
आमच्यासारख्या तुंबड्या लावत बसणार्‍या कट्टेकर्‍यांमुळे नव्हे तर बारीकबाबू, अण्णा हजारे यांच्यासारख्या प्रेरणादायी लोकांमुळेच हा देश टिकून आहे..

प्रास's picture

11 Sep 2011 - 9:08 pm | प्रास

उत्तम लेख. आवडला.

कथा म्हणून आणि कथेच्या माध्यमातून काही प्रमाणात वास्तव म्हणून.

नक्षलवादग्रस्त तरुणांसाठी सैन्यदलातील नोकरीचा मार्ग योग्यच वाटतोय. शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, व्यवसायासाठी भांडवल, बाजारनिर्मिती इ. इ. बाबींबरोबरच सैन्यदल हा देखिल एक चांगला पर्याय होऊ शकतो हे आपल्या लेखामुळेच लक्षात आलंय.

असेच लेख येऊ द्यात.

नेहमीच तुमच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत असलेला :-)

श्यामल's picture

12 Sep 2011 - 12:28 am | श्यामल

बारीक बाबूसारखी दुर्मिळ आशास्थाने आजही अवती भवती असल्याचे दाखवून दिल्यामुळे धन्यवाद !

अर्धवट's picture

12 Sep 2011 - 2:05 am | अर्धवट

कलेक्टरसाहेब..

>>पण हा देश याच प्रेरणेवर चाललेला आहे हे नक्की!”

तुमच्या लेखांची वाटच बघत असतो.. आमच्य कोत्या जगण्याला जरातरी मोठी दृष्टी देण्याची ताकद आहे तुमच्यात.. धन्यवाद...

श्री. टुकू बारीक यांच्यासारखी माणसे आजही अस्तित्वात आहेत व अचानक भेटून सुखद धक्काही देतात. त्यांची अण्णा हजारेंशी केलेली बरोबरी कांहींना योग्य वाटेल तर कांहींना अयोग्य, पण मला तरी ती योग्य वाटली.
राजेसाहेबांनी आपले अशा तर्‍हेचे लिखाण सतत चालू ठेवावे हीच विनंती. पण हा लेख अचानक संपल्यासारखा वाटला, कांहींसा अनैसर्गिकपणे!
श्री. टुकू बारीक यांना प्रणाम