माहेरी जायची मला झाली आता घाई

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
10 Sep 2011 - 7:10 am

माहेरी जायची मला झाली आता घाई

डायवर दादा रं
डायवर दादा जोरात गाडी चालीव की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला
पुरं व्हत आलं आता वरीस त्या सणाला
आखाजी संपून आता दसरा आला की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

बा माझा कसा आसलं शेतात राबूनी
थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी
यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड
सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर
कधी भेटती ती मला आसं मला झालं रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

मोटा भाव आन ल्हान बी माझा भाव रं
राम क्रिश्नाची जोडी त्यांची शोभते रं
मधली हाय मी भन त्यांची एकुलती लाडकी रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

सासरं माझं झालं जरी आता घरं
म्हायेराची सय कधी येती येळवारी रं
दोन्ही घरं जोडायाची सवय आता झाली रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०९/२०११

कविता

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

10 Sep 2011 - 3:08 pm | किसन शिंदे

मस्त..

ग्रामीण भागातल्या माहेरवाशीणीच्या मनातले भाव अगदी योग्य शब्दात तुम्ही कागदावर उतरवलेत.

गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला
पुरं व्हत आलं आता वर्ष त्या सणाला
आखाजी संपून आता दसरा आला की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

इथे वर्ष ह्या शब्दाच्या जागी वरीस हा शब्द नाही का टाकता येणार.

चित्रगुप्त's picture

10 Sep 2011 - 3:41 pm | चित्रगुप्त

अतिशय भावपूर्ण, अप्रतीम...

बा माझा कसा आसलं शेतात राबूनी
थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी
यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड
सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर
कधी मिठी मारतीया तिला आसं मला झालं रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं...

वाचून डोळे पाणावले...

इंटरनेटस्नेही's picture

12 Sep 2011 - 4:46 am | इंटरनेटस्नेही

एकदम जागतिक दर्जाची कविता!

निनाद's picture

12 Sep 2011 - 6:35 am | निनाद

आखाजी संपून आता दसरा आला की रं

आखाजी, यिचारपुसं, म्हायेराची, येळवारी अशा सारख्या वेचक शब्दांमुळे बहिणाबाईंच्या काव्याच्या जवळ नेणारा अनुभव या कवितेतून पाषाणभेद मांडत आहेत असे वाटले. कवितेतून उलगडत जाणारे कष्टाळू माहेराचे चित्र मोहक आहे.
कविता आवडली आहे.

कधी मिठी मारतीया तिला आसं मला झालं रं

या सामाजिकतेतून येणारी मुलगी आईला मिठी मारण्यासारखी गोष्ट शब्दातून मांडेल का, या विषयी शंका वाटली - कदाचित तसे होऊही शकेल. तरी वर्ष प्रमाणे हा शब्द बदलावा का?