"नावं" ही सोनल कर्णीक वायकुळ यांची कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. ही कविता जितकी भावूक खोल, आणि गहीरी आहे तितकीच तर्कदृष्ट्या भक्कम देखील. त्यामुळे ती वाचकाचा आनंद द्विगुणीत करते. तर्कदृष्ट्या भक्कम म्हणते आहे कारण कवितेची धाटणी थोडी गणिती सिद्धांताप्रमाणे आहे. प्रथम भूमिका मग स्पष्टीकरण मग समर्पक उदाहरणे.
कवितेचा विषय आहे नावं दिलेली अथवा न दिलेली नाती.
कवयित्री सुरुवातीलाच काही ओळीत तिचे म्हणणे मांडते - की नात्यांना नावं शोधायची नसतात, नात्यांना नावं ठेवायची नसतात. आणि कवयित्री नावांना "पिंजरा" हा शब्द संबोधून तिची नावांविरुद्धची भूमिका अधोरेखीत करते. शिवाय प्रत्येक नातं म्हणजे जणू एक देखणं रूप लाभलेला , मन असलेला प्राणीच अशी अनवट उपमादेखील ती नात्यांना देते.
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात
नावांच्या पिंजा-याबाहेर सुद्धा एक सुंदर बन आहे
त्यातल्या एकेक प्राण्यालाही एक सुंदर मन आहे
‘कोण आहे तो तुझा’ हे व्यवहाराला बर आहे
‘ओळख आहे आमची’ हेच उत्तर खर आहे
आणि मग संपूर्ण कवितेमध्ये या ओळींचे अर्थात कवयित्रीच्या भूमिकेचे स्पष्टीकरण येत जाते. आणि ते इतक्या समर्थ शब्दांत सामोरे येते की आपण त्याच्या समर्थनार्थ होकारच भरतो.
पुढील कडव्यात जखमेवरच्या खपल्या आणि भीजलेले दिवस हा विरोधाभास लगेचच्या ओळीतील परसातला चाफा अन कुंपणातल्या तारा या विरोधाभासाने प्रतिबिंबित होतो. हे या कवितेतील सौंदर्यस्थळ आहेच.
ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी
जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी
ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी
परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी
ओळख पटते आगंतुक डोळ्यामधल्या हसण्याशी
आणि ओळख निघते गही-या लाघव डोळ्यामधल्या स्वप्नाशी
नातीच ना हो हि सगळी कळत नकळत जोडलेली
बहरलेल्या वेलीसारखी अंगा खांद्यावर वाढलेली
कवयित्रीने परत एकदा नात्यांना वेलीची उपमा देऊन निसर्गाशी सन्निध्य साधले आहे. कडवी वाचत आपण नकळत भावूक होत जातो आणि कवयित्रीचे म्हणणे साधारण पटू लागते तोच कवयित्री अतिशय चपखल उदाहरणेच आपल्यासमोर ठेवते. यशोदा आणि पन्ना दाईचे. आणि तिचा मुद्दा अगदी आता तर निर्विवाद पटवून देत आपल्या रूढ समजूतींना खो देते.
नावं देवून सांगा त्यांना व्याख्येत कस बांधायचं?
कस सांगायचं आतापासून पुढे असंच वागायचं?
पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?
पुढील कडव्यात कवयित्री नावे असलेल्या पण कोंडमारा झालेल्या नात्यांचादेखील ओझरता उल्लेख करते जो मनाला चटका लावून जातो.
नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती
म्हणूनच सांगू का
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात
ही कविता वाचल्यावर पुढील ओळी उगाचच मनात रेंगाळू लागतात -
"सिर्फ एहेसास है येह रूह से मेहेसूस करो,
प्यार को प्यार ही रहने दो कोइ नाम ना दो"
प्रतिक्रिया
6 Sep 2011 - 8:50 am | सहज
हे ही छान.
कविता ह्या लेखनप्रकाराची तितकीशी आवड नसलेल्या माझ्यासारख्या वाचकांना कायमच वाटत आले आहे की रसग्रहणाशिवाय कविता अपूर्ण आहे. त्यामुळे लेखमालेची ही कल्पना अतिशय आवडली आहे. व त्यात स्वयंस्फ्रूर्तीने भाग घेणार्या लेखकांचे कौतुक आहे.
6 Sep 2011 - 9:02 am | शैलेन्द्र
"कविता ह्या लेखनप्रकाराची तितकीशी आवड नसलेल्या माझ्यासारख्या वाचकांना कायमच वाटत आले आहे की रसग्रहणाशिवाय कविता अपूर्ण आहे. "
खरतरं कवितेच रसग्रहण वैयक्तीक पातळीवर जास्त चांगल होत अस मला वाटत. कवितेच्या अर्थाला अनेक पदर असु शकतात, आणी व्यक्ती व कालसापेक्ष वेगवेगळे अर्थ तुम्हाला भावतात.
अर्थात या रसग्रहणाच्या उपक्रमाचे स्वागतच आहे..
6 Sep 2011 - 8:54 am | शैलेन्द्र
छान रसग्रहन..
तुमच्या रसग्रहनामुळे ही कविता परत वाचनात आली.
6 Sep 2011 - 2:19 pm | नगरीनिरंजन
नात्यांच्या नावांना पिंजरा म्हणणारी ही कविता पहिल्यांदा वाचली होती तेव्हाच आवडली होती. त्या कवितेचे छान रसग्रहण केले आहेत.
6 Sep 2011 - 2:26 pm | गणपा
काव्य प्रांतातला औरंगजेब असल्याने स्वतःहुन फारसा कधी कवितेच्या वाटे जात नाही. (अपवाद शरदिनीतैंच्या कविता. त्या कळत नसल्या तरी त्यात जो नाद असतो तो आवडतो.)
या मालिकेमुळे कविता उलगडायला मदत होतेय. :)
6 Sep 2011 - 3:46 pm | गणेशा
शुचि तै, रसग्रहन मस्तच , अजुन रसग्रहनाची आपल्याकडुन अपेक्षा...
निसर्गाचे पांघरुन घेवुन येणारे शब्द मला नेहमीच आनंदाची सावली देतात ...
अवांतर : @ ऑल- रसग्रहन सिरीज छान चालु झाली आहे, तरी ही यापुढे कमीत कमी १ वीक एका रसग्रहनास ठेवुया असे वाटते ... नाहितर खुप अश्याच धाग्याने जनातल्-मनातल भरेल आणि वाचकांना नाविन्याचा आनंद मिळणार नाही..
6 Sep 2011 - 6:19 pm | शुचि
हाहा :) ओके. नक्की.
6 Sep 2011 - 5:56 pm | अभिजीत राजवाडे
छान !!! मी हि कविता वाचली नव्हती. उत्तम कवितेचे उत्तम रसग्रहण.
9 Sep 2011 - 9:17 pm | अर्धवट
कविता निसटली होती.. पण आता वाचली आणी आवडलीही
10 Sep 2011 - 1:35 am | धनंजय
सोनल कर्णिक वायकुळ यांची "किती वेळ" ही कविता मला आवडली होती.
ही कविता वाचायची सुद्धा सुरुवात आधी केली होती.
रसग्रहणाच्या निमित्ताने सर्व ओळी वाचल्या.
धन्यवाद शुचि.
13 Sep 2011 - 10:11 am | सविता००१
ही कविता आधी पण वाचली आहे. पण तू इतके मस्त रसग्रहण केले आहेस की मजा आ गया! खूप छान लिहितेस तू.
13 Sep 2011 - 10:12 am | सविता००१
ही कविता आधी पण वाचली आहे. पण तू इतके मस्त रसग्रहण केले आहेस की मजा आ गया! खूप छान लिहितेस तू.
13 Sep 2011 - 8:33 pm | सोनल कर्णिक वायकुळ
शुचि,
खुप खुप आभार. माझ्या कवितेच कोणी रसग्रहण करेल अस मला स्वप्नातही वाटल नव्हत.
इतरान्च्या सुद्धा अशाच सुन्दर कविता भेटिला आणत रहा.
अधिक काय बोलु?