पावसाळ्यात कुठे फारसं भटकण झालच नव्हतं, खरतर वेळाही नाहीये सध्या, पण बाहेर पाउस पडत असताना घरात बसुन रहायचं म्हणजे जरा अत्याचारच वाटतात स्वतःवर, सह्ज म्हणुन शुक्रवारी रात्री जुन्या मित्राला, जयंत भट्ला फोन केला. बोलता बोलता प्लॅन ठरला- सकाळी सहाला निघायचं, दोन वाजोस्तर परतु डोंबिवलीत..
जयंतला घेवुन सहाला निघायच हे जरा कठीणच होत, मी ५.४५ ला त्याला उठवायसाठी कॉल केला, फार अपेक्षा नव्हती पण फक्त ४५ मिनिट उशिरा म्हणजे, ६.४५ ला तो त्याची नवी मांझा घेवुन हजर झाला. गाडीत पेट्रोल भरुन कल्याण सोडता सोडता अर्धा तास गेला..
एकदा शहाडचा पुल पार केला, सेंचुरी रेयॉन मागे पडली, की माझा अत्यंत आवडता माळशेजचा रस्ता सुरु होतो. खरतरं मुंबईतुन महाराष्ट्राच्या गाभ्यात, म्हणजे नगर, मराठ्वाडा, विदर्भ या भागात पोहचायला याहुन सोपा मार्ग नाही. डाव्या बाजुच्या फाट्यावरुन टिटवाळ्याच्या गणपतीला मनोमन नमस्कार केला. लफ्फेदार वळणं घेत गाडी धावत होती. मस्त मुड लागला होता.एकदा मुरबाड मागे पडल की हा रस्ता ड्रायव्हींगचा खरा आनंद देतो. दोन्ही बाजुला मस्त हिरवळ होती, भाताची खाचर पोटात पाणी भरुन डोलत होती.
कॅमेरा बाहेर काढला..
चालत्या गाडीतुन क्लिकलेला रस्ता
उजवीकडचे भिमाशंकरचे डोंगर धुक्यात बुडाले होते.
टोकावडा मागे पडलं, एका ठीकाणी महामंडळाची महाराणी उभी होती, गेवराइ कल्याण रातराणी.. आम्हीही आमची गाडी तिच्या शेजारी लावली.. कड्ड्क चहा मारला, कांदा भजे हाणले. गाडीला सेल मारत, एखाद किलोमीटरवर असलेल्या, उजव्या वळणावर, नानेघाटाच्या पायथ्याशी उभे राहीलो....
हा भाग मला कायमच मंत्रमुग्ध करत आलाय. किती अर्वाचीन ईतीहास आहे या भागाचा? उजवीकडे भिमाशंकरची रांग, डावीकडे आजोबा, थोड पुढे मोरोशीतुन डावीकडे फुटत उभा ठाकलेला साधले घाट, त्यावरती हरिश्चंद्राचा कोकणकडा.. नाकासमोर गरगरत गेलेल्या रस्त्याने चढणारा माळशेज.
जुण्या काळी अत्यंत गजबजलेल्या कल्याण बंदराचे, जुन्नर या आर्थीक राजधानीशी असलेले दळणवळण सुखद व्हावे म्हणुन माळशेजच्या पोटात, थोडं अलीकडे सातवाहनांनी नानेघाट बांधला. धसईवरुन भिमाशंकर रांगेकडे चढणारा अहुपे घाट व मोरोशीवरुन पुढे सह्याद्रीला डावी घालत जाणारा माळशेज यामध्ये हा घाट बांधल्याने लमाणी तांड्यांचा कमित कमी दोन- तीन दिवसांचा प्रवास वाचत असावा.
वनविभागाच्या कमानीतुन सरकारी स्वागत स्विकारत घाटात प्रवेश केला.
सगळा निसर्ग जणु हिरवा शालु ल्याला होता.. ओलेत्या लज्जेने मोहरलेलं सृजनाचं हिरवपणं..
त्यावर पुन्हा धुक्याच गुढ आमंत्रण..
पोपटी गवतातुन धावणारी तांबडी पायवाट..
पहीला ओढा लागला, आणी अचानक जयंत थांबला म्हणुन मागे पाहील, त्याची चप्पल निसटली होती.
आयचा घो.. बेनं चप्पल घालुन आलं होतं घाट चढायला..
"अरे, तु चप्पल पहनके आया?"
"अरे वो खादी ग्रामोद्योगसे खरीदा है"
"तो?"
बहुदा त्यालाही काय बोलाव ते सुचल नसणार, नाहीतर अशी उत्तर तो सहसा देत नाही..
झालं असं होत की त्याने मला कुठे जायच ते विचारल्यावर, मी त्याला माळशेजजवळ असं उत्तर दिलेलं, त्याला वाटल, मी त्याला माळशेजला घेवुन जातोय आंघोळ घालायला.. म्हणुन तो सरळ चप्पल घालुन आला.
पण आता काय करायचं? खादी ग्रामोद्योगातुन आणलेली चप्पल काही सातवाहणांचा नानेघाट चढु शकली नसती. हा सगळा रस्ता दगड गोट्यांनी भरलेला आहे. तिव्र चढण आहे. त्याचे हाल करायची माझी इच्छा नव्हती. शेवटी मंडळाने अस ठरवलं की नानाच्या आंगठ्याच्या पायथ्याशी जे जंगल पसरलय, तिथे भटकायचं.. बराचसा मोकळा, पठारी प्रदेश आहे. पण तरीही छान आहे..
मग दुसर्या क्रमांकाचा मोठा ओढा पार करुन, डाव्या बाजुला न जाता, सरळ रस्ता पकडला.
सुरवातीला ओढ्याच्या आतल्या अंगाने जंगलात उतरायचा प्रयत्न केला, पण रस्ता फारच कोंदट होत होता, हा रस्ता खाली दरीत उतरतो बहुदा.. मग तो नाद सोडुन आम्ही वर चढायला लागलो, नानाच्या अंगठ्याच्या दिशेने.
हा रस्ता टप्या- टप्याने वर चढतो, प्रत्येक टप्यावर छोटेसे पठार आहे..
चढताना एका झाडावर दिसलेली भुछत्र..
पायवाटेच्या दोन्ही बाजुला दाट झाडी.
झाडीतुन बाहेर पडलं की गवताचा गालीचा, मोकळं आभाळं
रुक्ष कातळाने पांघरलेला हिरवा गालीचा.
अशाच कातळात सापडलेली एक पावुलखुण.. रामाचा, भिमाचा, कींवा मारुतीचा पाय म्हणुन सहज खपुन जाईल..
एका पठारावर मस्त "पोपटी" तरारली होती.. या पाल्याला काहीतरी वेगळे नाव आहे, त्याची भाजीही करतात.. जंगलात फिरत असताना हा इंस्टंट एनर्जी सोर्स आहे. खावुन पाहीली.. मस्त ताजी होती..
जंगलात मनोसोक्त फिरलो.. एका मागोमाग एक टप्पा पार करत नानाच्या अंगठयाच्या पायथ्याशी पोचलो..
नानांनी आपला अंगठा धुक्याच्या तोंडात घातला होता..
शेवटी एक मस्त पठार बघीतल, आणी गप्पा ठोकायला बसलो..
कॉलेजपासुनच्या साठलेल्या आठवणी बाहेर आल्या.. अनेक टक्के टोणपे खात झालेल दोघांच शिक्षण, संघर्ष.. पण त्यातल सुख.. रस्त्यात भेटलेले अनेक लोक, काही जखमा, काही खपल्या.. या प्रवासात दोघांनीही अचानक हरवलेले पितृछत्र.. ओल्या आठवणी.. थोडीशी हुरहुरती तृप्ततेची भावना.. खरचं, तक्रार करण्यासारख नाही वागल आयुष्य आमच्याशी.. कातळावर पाय जरुर भाजले पण वेळ आली तेंव्हा ओला हिरवा गालीचाही मिळाला..
बराच उशीर झाला होता, परतायच ठरवल..
रस्त्यात एक अजब कारागरीचा नमुना दिसला.. एका करवंदाच्या झुडपावर मुंग्यांनी(?) हवामहल बांधायला घेतला होता..
या कारागीरीसाठी त्या करवंदाचाच चीक वापरत होत्या की स्वता:च्या अंगचा स्त्राव वापरत होत्या कुणास ठावुक.. मनोसोक्त फोटो काढले.
परतायच्या वाटेवर टीपलेले काही क्लोजअप..
शेवटी बाहेर पडायच्या रस्त्यावर आलो..
ओढा आडवा आला.. मग काय कपडे काढले आणी अर्धा तास मस्त जाकुझी घेतला..
परतताना दिसलेल एक झाड.. वाकेन पण मोडणार नाही..
गाडी काढली.. रस्त्याला लागलो.. परत एकदा कड्डक चहा..
रमतगमत डोंबीवलीत पोहचायला चार वाजले.. मजा आली, अजुन काय ...
प्रतिक्रिया
17 Aug 2011 - 11:05 pm | जाई.
फोटो दिसत नाहीयेत
17 Aug 2011 - 11:19 pm | यकु
ब्येश्ट लिवलंय पण
फोटू दिसत नसल्याने धाग्याचा आनंद घेता आला नाही :(
17 Aug 2011 - 11:31 pm | प्रास
अगदी अगदी...
शैलेन्द्रजी, फोटू दिसण्याचं बघा की जरा.......
17 Aug 2011 - 11:41 pm | शैलेन्द्र
अरे काय कराव कळत नाहीये.. फ्लिकरवरचे फोटो आहेत तरी दिसत नाहीयेत.. , कुणी मदत करेल का?
18 Aug 2011 - 2:51 am | निनाद
पिकासा वरऊन प्रयत्न करा... फ्लिकरने ती सेवा खंडीत केली आहे बहुदा.
18 Aug 2011 - 9:38 am | किसन शिंदे
हेच म्हणतो, पिकासावरनं इथे अपलोड करा म्हणजे दिसतील. वर्णन तर छानच आहे परंतू फोटो दिसत नसल्यामुळे निराशा होतेय.
अवांतर: नानेघाट कि नाणेघाट? ;)
18 Aug 2011 - 9:55 am | प्रचेतस
खूपच सुरेख लिखाण पण फोटो हवेच होते.
एक दुरुस्ती-जुन्नर ही सातवाहनांची राजधानी कधीही नव्हती. राजधानी होती ती प्रतिष्ठान (पैठण). जुन्नर हे या व्यापारी मार्गावरचे एक प्रमुख शहर, उपराजधानी म्हटले तरी चालेल.
गौतमीपुत्र सातकर्णीच्या आधी सातवाहनांचा पराभव करून क्षत्रपांचे काही काळ इथे वर्चस्व निर्माण झाले होते त्या काळात जुन्नर ही क्षत्रपांची राजधानी होती.
अवांतरः खुद्द माळशेजच्या डांबरी घाटाला लगटूनच काळूच्या वोघानजीक (घाटपायथ्यावरून दिसणारा सर्वात मोठा धबधबा) सातवाहनांची खोदीव पायवाट वर चढते. त्या घाटवाटेवर खोदीव पायर्या, पाण्याची टाके अजूनही बघायला मिळतात.
18 Aug 2011 - 10:01 am | शैलेन्द्र
मस्त माहीती.. नक्कि कुठे आहे ही पायवाट? काढा की एक भटकंती..
18 Aug 2011 - 10:35 am | प्रचेतस
माळशेज घाटातून जाताना दरीत जी नदी दिसते ती काळू नदी. घाटपायथ्यावरून (थिटबी गावाकडून) तिच्याकडेकडेनच सरकत राहायचं थोड्याच वेळात आपण एका डोहापाशी येतो. एका मोठ्या धबधब्यामुळे हा तयार झालाय. याला लगटूनच एक पाउलवाट वर चढते या वाटेने चढत गेलं की दोनेक तासात आपण घाटावर पोचतो. मध्ये पाण्याची खोदीव टाकी, काही पायर्याही आहेत. विकीमॅपियावर येथे बघू शकता.
18 Aug 2011 - 11:48 pm | शैलेन्द्र
धन्यवाद.. ही वाट वरती कुठे निघते? बोगद्याच्या पुढे?
19 Aug 2011 - 7:59 pm | प्रचेतस
नाही,
ही वाट अगदी एमटीडीसी च्या जवळच निघते. वरून जाताना १० मिनिटांची छोटीशी उतरण पार केली की आपण नाळेनजीक येतो. तिथेच पाण्याचे टाके आणि गणपतीची छोटीशी मूर्तीदेखील आहे
20 Aug 2011 - 12:24 am | शैलेन्द्र
धन्यवाद.. नक्कि पाहुन येइल.
18 Aug 2011 - 9:51 am | स्पा
वल्ली आपण सातवाहन काळावर आख्खा एक खंड लिहिणार होतात...
काय झाल त्याच पुढे..
घ्या लवकर मनावर
18 Aug 2011 - 1:47 pm | बिपिन कार्यकर्ते
कृपया फोटो टाका लवकर. उत्सुकता लागून राहिली आहे.
18 Aug 2011 - 2:24 pm | बिपिन कार्यकर्ते
काही फोटोचे दुवे सुधरवले आहेत. त्याप्रमाणे बाकीचे दुवे सुधरवा. फ्लिकरमुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. दुवे नीट दिले नव्हते.
अवांतर : बाकीचे फोटोही बघितले फ्लिकरवर. अप्रतिम आहेत. :)
18 Aug 2011 - 2:37 pm | शैलेन्द्र
धन्यवाद बिका.... जमल एकदाच..
18 Aug 2011 - 3:11 pm | शैलेन्द्र
स्पाचेही स्पेशल आभार..
18 Aug 2011 - 2:47 pm | सूड
फोटो सुरेख, वर्णनही आवडले.
>>या पाल्याला काहीतरी वेगळे नाव आहे, त्याची भाजीही करतात.
टाकळा असावा तो बहुधा.
19 Aug 2011 - 2:08 pm | मेघवेडा
टाकळाच असावा. भाजी कसली सॉल्लीड लागते!
आणि इमला बांधणारे ते हुमले आहेतसे दिसतात.. कसला झकास दरवळ येतो त्यांचा.. एखादा हातावर धरून मारून बघा कधीतरी! ;)
बाकी फोटू लै लै भारी! कल्लास!
18 Aug 2011 - 2:51 pm | शाहिर
नानांनी आपला अंगठा धुक्याच्या तोंडात घातला होता..
एकदम भारी
अवांतर : हिन्दी काय हो बोलता ??
19 Aug 2011 - 7:45 pm | शैलेन्द्र
माहीत नाही, पण फक्त या मित्राशीच बोलताना मी हिंदी बोलतो.. आता तुम्ही म्हणाल की मी त्याला मराठी शिकवलं पाहीजे, तर मला सांगायला आवडेल की मराठी नाटक व गाणी यांची आवड मला याच अमराठी मित्राने लावली. काय माहीत काय आहे ते, पण थोडावेळ मराठीत बोलुन आमची गाडी परत हिंदीवर जाते, मी त्याच्या घरी गेलो किंवा तो माझ्या घरी आला तर मात्र आम्ही घरातल्यांशी मराठीतच बोलतो. :)
18 Aug 2011 - 3:26 pm | गणपा
छळवाद मांडला आहे या भटक्यांनी आहे.
19 Aug 2011 - 12:22 am | शैलेन्द्र
तुम्ही पाकृ बनवुन एकटेच खाता तेंव्हा आम्ही आमची जळजळ दाखवतो का?
18 Aug 2011 - 3:27 pm | नितिन थत्ते
मस्त फोटो. जावंसं वाटायला लागलं. आजतागायत माळशेज घाटात गेलेलो नाही. :(
21 Aug 2011 - 3:18 pm | शैलेन्द्र
चला..
18 Aug 2011 - 4:09 pm | इरसाल
सगळे फोटो अतिशय छान.
तुम्ही जो पोपटी म्हणताय तो "टाकळा" आहे.
18 Aug 2011 - 4:45 pm | गणेशा
अप्रतिम .. एकदम छान वआटले फोटो पाहुन आणि वाचुन
18 Aug 2011 - 4:56 pm | स्वाती दिनेश
हिरवेगार फोटो बघून मनही ताजतवानं, हिरवं,टवटवीत झालं,
स्वाती
18 Aug 2011 - 6:47 pm | प्रभो
मस्त फोटो!
19 Aug 2011 - 12:19 am | ५० फक्त
मस्त फोटो आणि मस्त सहल
19 Aug 2011 - 1:53 pm | स्वैर परी
आवडले! आणि मुंग्यांचा हवेतला महाल देखिल सुरेख च! :)
बाकि ओढा आणि फुलाचा फोटो मस्त जमलाय!
19 Aug 2011 - 2:53 pm | जे.पी.मॉर्गन
जबर्या फोटू अन वर्णनही ! ब्येष्ट... लई झ्याक्क !
जे पी
19 Aug 2011 - 10:25 pm | राही
ह्या घाटाला नाणेघाट म्हणतात कारण पश्चिम किनार्यावरची कल्याण सोपारा चौल आदि बंदरे मध्य महाराष्ट्राशी जोडणार्या ह्या मार्गावर व्यापारी वाहातूक पुष्कळ असे आणि ह्या व्यापारी तांड्यांकडून नाण्यांच्या स्वरूपात जकात गोळा केली जाई. ही नाणी साठवण्यासाठीचा मोठा दगडी रांजण अजूनही त्या पायवाटेवर आहे. म्हणून हा नाणेघाट. इथल्या शिलालेखांमुळे महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास उलगडण्यास मोठी मदत झालेली आहे.
आणि हो, ती भाजी म्हणजे टाकळाच. खूप काही चांगला लागत नाही. जर्रासा जून निघाल्यास अगदी तुरट चरट लागतो.
20 Aug 2011 - 12:31 am | शैलेन्द्र
"ह्या व्यापारी तांड्यांकडून नाण्यांच्या स्वरूपात जकात गोळा केली जाई. ही नाणी साठवण्यासाठीचा मोठा दगडी रांजण अजूनही त्या पायवाटेवर आहे. म्हणून हा नाणेघाट."
दुसरी उत्पत्ती अशी आहे की "नाने" नावाचा एक व्यापारी होता, त्याने हा घाट खोदला (बी ओ टी तत्वावर असावा) म्हणुन नानेघाट. त्याचा सहयोगी "आने" यानेही त्याच मार्गावर घाट खोदायचा प्रयत्न केला पण चुकीचे ठीकाण निवडल्याने त्याला खुपच तिव्र उतार लागला. त्याने तो अर्धवट सोडुन दिलेला घाट अजुनही नानेघाटाच्या वर, पठारावर बघायला मिळतो. (आना- माळशेज हा शब्दप्रयोग आजही तिथले स्थानीक लोक करतात)
"नाने" म्हणजे छोटा असाही अर्थ असु शकतो.
20 Aug 2011 - 8:46 am | हुप्प्या
पावसाळ्यातला सह्याद्री म्हणजे अफाट सुंदर. कितीही वेळा पाहिला तरी समाधान होत नाही.
सह्याद्रीची हिरवाई दुसरीकडे कुठ्ठे बघायला मिळायची नाही! अगदी हिमालयातही!
त्यात ह्या झाडाझुडुपाशी जुनी ओळख असल्यामुळे जुने मित्र भेटल्याचा आनंद होतो.
उत्कृष्ट फोटो. आभारी आहे.
20 Aug 2011 - 12:41 pm | सुहास झेले
ज ह ब ह र ह द ह स्त ह !!
फोटो मस्त आले आहेत... नाणेघाट माझा आवडता, दोन आठवड्यापूर्वीच जाऊन आलोय. :) :)
21 Aug 2011 - 7:07 pm | पैसा
वर्णन आणि फोटो फारच सुंदर!
या मुंग्याना आम्ही ओंबील म्हणतो. ते असे झाडाच्या पानांची घर तयार करतात. चुकून जर कधी चावला तर मात्र अर्धा तास तरी ठणाणा करत बसावं लागतं! आणि चावलेली जागा ओंबील मेला तरी अजिबात सोडत नाही. तोडूनच काढावा लागतो!
हा तुमचा मित्र "भट" म्हणजे कोकणी बोलणारा असावा बहुधा! :)
21 Aug 2011 - 11:39 pm | शैलेन्द्र
"हा तुमचा मित्र "भट" म्हणजे कोकणी बोलणारा असावा बहुधा! Smile"
हो, अगदी अगदी.. मासेखावु भट.. मंगलोर/ कारवारचा.. खेकडे खायला त्यानेच शिकवले मला..